कोहळा ही आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदिक शास्त्रातही तिच्या औषधी गुणधर्मामुळे महत्त्वाची वनस्पती समजली जाते. मराठीमध्ये कोहळा तर संस्कृतमध्ये विदारी कुष्मांड या नावाने हे फळ ओळखले जाते.
ही वनस्पती वेलीच्या स्वरूपात असते, तर तिची पाने मोठी व लांब असतात. कोहळा हे फळ गोल, लंबगोल आकाराचे असून त्याचा आतील गर हा मऊ व पांढराशुभ्र असतो व त्यामध्ये आद्र्रतेचे (पाण्याचे) प्रमाण जास्त असते. हेमंत ऋतूमध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसांत कोहळ्याच्या वेलीला फुले येतात, तर ग्रीष्म ऋतूमध्ये (उन्हाळात) फळे येतात. कोहळा हे फळ अनेक महिने टिकते.
औषधी गुणधर्म
कोहळा हा शीत, लघू, स्निग्ध, मधुर, गुणात्मक, बुद्धीवर्धक, वात-पित्तशामक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने तंतुमय व पिष्टमय पदार्थ, आद्र्रता, ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. त्याच्या या औषधी गुणधर्मामुळे आहारामध्ये त्याचा आवर्जून वापर करावा. आग्य्राचा पेठा म्हणून प्रसिद्ध असलेली मिठाई ही कोहळ्यापासूनच बनवली जाते. कोहळ्याचे थालीपीठ, पराठा, भाजी, कोहळा रस व सूप असे अनेक प्रकार बनविता येतात.
उपयोग
० कोहळा सप्तधातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वाढीच्या वयातील मुलांना याची नियमितपणे थालीपीठ, भाजी करून द्यावी. यामुळे मुलांची सर्व अवयवांची वाढ चांगली होऊन उंचीदेखील वाढते. तसेच स्मरणशक्ती व बुद्धीवर्धनासाठीदेखील कोहळ्याचा वापर करावा.
०मज्जासंस्थेची कार्यशक्ती वाढविण्यासाठी कोहळ्याचा आहारात वापर करावा. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.
० कोहळ्यामध्ये तंतुमय पदार्थ व आद्र्रता भरपूर असल्याने मलावरोधाची तक्रार असलेल्यांनी कोहळ्याची भाजी खावी. यामुळे शौचास साफ होते.
० मूळव्याधीचा त्रास होत असेल व शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तर कोहळा आवर्जून खावा.
० कोहळा हा शुक्रवर्धक असल्याने व धातूदौर्बल्य दूर करून धातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांनी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.
० हृदयविकार असणाऱ्यांनी हृदयाचे बळ वाढविण्यासाठी कोहळा रस किंवा कोहळा सूप प्यावे.
० नाकातून रक्त येणे या विकारात कोहळ्याचा रस प्यावा, कारण कोहळा हा रक्त पित्तशामक असल्याने लगेचच आराम मिळतो.
० कृश व्यक्तींनी धातूदौर्बल्य कमी होऊन शरीराचे पोषण होण्यासाठी व वजन वाढविण्यासाठी कोहळ्यापासून बनविलेला कोहळेपाक नियमित खावा.
० गर्भवती स्त्रीने कोहळ्यापासून बनविलेला कुष्मांडावलेह या अवलेहाचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे गर्भस्थ बाळाचे व मातेचे पोषण व्यवस्थित होते.
० तळहात, तळपाय यांची आग होत असेल व त्याबरोबर जळवात हा विकार झालेला असेल तर रात्री झोपताना तळव्यावर कोहळ्याचा कीस बांधून ठेवावा, त्यामुळे थंडावा निर्माण होऊन भेगा हळूहळू कमी होतात.
० जुनाट ताप, सर्दी, खोकला, क्षयरोग, टायफॉइड, मलेरिया, कावीळ आदी आजारांमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर त्यावर कोहळा हे उत्तम टॉनिक आहे.
० उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.
० भाजलेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी कोहळ्यांच्या पानांचा किंवा फळाच्या आतील गर त्वचेवर लावावा. त्यामुळे लगेचच दाह कमी होतो.
० चेहऱ्यावरील मुरुमे, काळे डाग कमी करून सौंदर्य वाढवण्यासाठी कोहळ्याचा गर चेहऱ्यावर लावावा.
० मूतखडा झालेला असल्यास तसेच लघवी साफ होत नसल्यास व लघवीला जळजळ होत असेल तर कोहळ्याचा रस प्यावा.
० अशा प्रकारे शरीराच्या सप्तधातूंचे पोषण होऊन त्यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी व एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये कोहळ्याचे सेवन आवर्जून करावे.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com