बलात्काराची एक घटना तिच्याबाबतीत घडली खरी, त्याने तिला सोळा वर्षांची मानसिक अंधारकोठडी दिली. पण एका क्षणी त्या सगळ्यातून बाहेर काढणारा एक जादूई शब्द तिला खूप खूप वेगळेपण देऊन गेला, तिच्या कार्याला मोठेपण देत गेला.. बलात्कार ही जगात कुठेही घडणारी गोष्ट, पण तिच्याबाबतीत खूप काही वेगळं घडवून गेली.. आणि त्याच्याबाबतीतही..
ती एक घटना.. अनेक प्रश्न निर्माण करणारी, अनेकांना चौकटीच्या पलीकडे विचार करायला लावणारी, त्या पुढे जात माणुसकीलाच जाब विचारत सामाजिक संकेतांवर आसूड ओढणारी आणि एका टप्प्यावर तर थेट अध्यात्मापर्यंत पोहोचणारी..
काय होती ती जगावेगळी घटना? घटना जगावेगळी नाहीच, उलट जगाच्या पाठीवर कुठल्याही स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणारी ही घटना होती, बलात्काराची! जगावेगळेपण आहे त्यानंतरच्या घटनाक्रमात! ही घटना घडली, तेव्हा थोरडिस एल्वा सोळा वर्षांची होती. ती राहात असलेल्या आइसलॅण्डमध्ये स्टुडण्ट एक्स्चेंज प्रोग्रामसाठी थेट ऑस्ट्रेलियातून आलेल्या टॉम स्ट्रेंजरच्या ती प्रेमात पडली. ते वयच तसं असतं, तसं दोघंही प्रेमाच्या नशेत होते. त्या नशेनं भान हरवलेलं. एका पार्टीत तिने आयुष्यात पहिल्यांदा रमची चव चाखली. प्रेमाच्या नशेत या नशेची भर पडली. एकामागोमाग एक पेग रिचवले गेले. सहन न झाल्याने मग उलटय़ा सुरू झाल्या. तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य असल्यासारखा तो तिच्या मागे होताच. शेवटी ते घरी जायला निघाले. सुरक्षारक्षकानं अॅम्ब्युलन्स मागवू का विचारलंही, पण तिचा त्याच्यावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास होता. नकार देऊन ते दोघं निघाले. घरी पोहोचले. त्याने तिला बेडवर हळुवारपणे झोपवलं. आपली इतकी प्रेमाने काळजी घेणाऱ्या त्याच्याविषयी तिचं मन कृतज्ञतेनं भरून आलं. ती शांतावली. तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्याजवळ होता.. पण काही क्षणच.. तिला जाणवू लागलं काही तरी वेगळं घडतंय. तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या स्वप्नांनाच सुरुंग लावत होता.. त्याने तिचे कपडे काढायला सुरुवात केली.. तिने प्रतिकार करायला सुरुवात केली, पण दारूच्या नशेने तिची सारी ताकद दुबळी पडली.. आणि शेवटी ते घडून गेलंच..
ती भानावर आली तेव्हा तो निघून गेला होता, आपल्या मायदेशी.. तक्रार कोणाविरुद्ध आणि काय करणार? जगाला हसण्याची, तिलाच बोल लावण्याची संधी देण्यापेक्षा तिने मौन पत्करणं पसंत केलं. पण मन.. ते आक्रंदत होतं. तो आपल्याशी असं वागूच कसं शकतो? आपण असं कसं होऊ दिलं? का आपण दारू प्यायलो? त्याच्याबरोबर आलोच का? प्रश्न प्रश्न प्रश्न प्रश्न.. चारही बाजूंनी फक्त प्रश्नांचा भडिमार आणि दाटून आलेला अपराधी भाव. त्या एकाच भावनेनं तिचं आयुष्य काळवंडून गेलं.
पुढची १६ र्वष या एकाच अपराधी भावनेनं तिला मनाच्या काळोख्या गुंफेत चिणून टाकलं. प्रत्येक क्षण ती त्या घटनेबरोबर जगत राहिली, स्वत:ला फटके मारत राहिली, त्यालाही दोष देत राहिली.. आणि एके दिवशी.. तिलाच सापडला एक उपाय! त्या एका शब्दामध्ये ती सारी ताकद होती, सारं काही मागं ठेवण्याची.. ती भावना होती क्षमेची! तिला जाणवू लागलं होतं की तिने स्वत:भोवती रचलेल्या पश्चात्ताप, निराशा, राग, तिरस्कार, वेदना, चीड या साऱ्यातून तिला फक्त एकच व्यक्ती बाहेर काढू शकत होती आणि ती व्यक्ती होती ती स्वत:च! स्वत:ला दोषी मानण्यातून ती जगाला संधीच देत होती तिला अपराधी ठरवण्याची. १६ वर्षांचा प्रदीर्घ काळ तिने जणू अपराधाच्या काळोख्या गुंफेत काढला होता आणि आता तिच्या हाती तो जादूई शब्द लागला होता. फरगिव्हनेस, क्षमा! जो तिला त्यातून बाहेर काढणारा, मुक्तीचा प्रकाश दाखवणार होता. लेखिका असलेल्या तिला ते शब्दांतून व्यक्त करावंसं वाटू लागलं. तिने लिहायला सुरुवात केली. आत्तापर्यंतच्या भोगवटय़ाचा जणू तो निचरा होता. आणि त्याच्यापर्यंत ही सारी भावना पोचायलाच हवी या तीव्रतेतून कुठल्याही प्रतिसादाची अपेक्षा न ठेवता तिने तो ई-मेल टॉमला पाठवूनही दिला.
इथेच काही तरी जगावेगळं घडायला सुरुवात झाली.. तिला अपेक्षा नसतानाही त्याचं पत्र आलं, अगदी भावनेनं ओथंबलेलं. त्याचीही ती १६ र्वष त्याच अपराधी भावनेनं गंजून गेली होती. आपण आपल्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत असं करूच कसं शकलो, या एकाच भावनेनं त्याला इतकं अपराधी केलं की, तिची माफी मागण्याचं धाडसही त्याला झालं नव्हतं. पण या एका पत्राने ती कोंडी सुटली होती.. ते दोघंही लिहीत राहिले एकमेकांना.. तब्बल आठ र्वष! खूप काही. जे जे साचलं होतं ते ते सारं. दरम्यान, तिची अपराधाची भावना विरळ होऊ लागली होती, तरी काही तरी अपुरं वाटत होतं. तिला या सगळ्यातून पूर्णत: मुक्ती हवी होती. त्यासाठी तिला त्याला प्रत्यक्ष भेटायचं होतं. जे काही झालं ते त्याच्या समोर त्याच्या तोंडून संपवून टाकायचं होतं. खरं तर आयुष्यात दोघेही खूप पुढे चालून आले होते. ते घडलं तेव्हा ती सोळा वर्षांची तर तो अठरा वर्षांचा होता. त्यानंतर सोळा र्वष गेली होती. दोघांची लग्नं झाली होती. तिला तर मुलगाही होता. तरीही तिला ती निकड होती. त्याला भेटण्याची. तिच्या नवऱ्याची मान्यता होती परंतु तिच्या वडिलांनी अर्थातच याला नकार दिला परंतु तिला मुक्ती हवी होती, पूर्णत:.
पुन्हा काही तरी वेगळं घडत होतं.. बलात्कार करणाऱ्या त्याला ती पुन्हा एकदा, एकटीच भेटणार होती. त्यासाठी त्या दोघांनी केपटाऊनची निवड केली. आणि तिथे ते भेटले तब्बल एक आठवडा. ती म्हणते, ‘‘त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा कोणतीच भावना शिल्लक राहिली नव्हती. मन शांत होतं.’’ ते दोघं मग खूप बोलले. मन मोकळं मोकळं झालं आणि त्यातूनच त्यांनी आणखी एक धाडसी पाऊल उचललं. हे सारं जगासमोर मांडायचं. लेखिका असलेल्या तिला हे सारं शब्दबद्ध करणं कठीण नव्हतंच. ती लिहीत गेली. तोही लिहीत गेला आणि दोघांच्या लेखणीतून जन्माला आलं पुस्तक, ‘साऊथ ऑफ फरगिव्हनेस.’ स्वत:ला माफ करण्याचा उदारपणा तिला मोठं करत गेला आणि त्यातूनच उभी राहिली तिची चळवळ लैंगिक अत्याचारांविरुद्ध लढण्याची, पण वेगळ्या भूमिकेतून!
त्या दोघांनी ती एकत्रित लढवायचं ठरवलं, तेच त्यांचं आणखी एक वेगळेपण होतं. आत्तापर्यंत बलात्कार होणारी स्त्रीच सगळ्यांच्या केंद्रस्थानी असते. तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होण्यापासून ते तिलाच दोषी ठरवण्यापर्यंत सारं काही तिच्याभोवती फिरत असतं. पण मूळ दोषी असतो तो पुरुष, त्याचं काय? अनेकदा तो उजळ माथ्याने फिरत असतोच. एल्वा आणि टॉमनं ठरवलं, बलात्कार करणाऱ्याला लक्ष्य करायचं. त्याला बोलतं करायचं. टॉम सांगतो, ‘‘माझ्या हातून ती घटना घडली कारण मला वाटत होतं की, हे कृत्य म्हणजे माझं प्रेमच आहे. पण नंतर लक्षात आलं की, तो फक्त सेक्स होता. तिच्या शरीराबद्दलचं आकर्षण होतं. याचं कारण सेक्सबद्दलच्या कल्पनाच स्पष्ट नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जातं, पण ते शारीरिक गोष्टीवरच भर देतात.’’ त्या दोघांच्या मते, दोघांमधल्या नात्यातल्या निकोपपणाबद्दल, एकमेकांविषयी आणि एकमेकांच्या देहाविषयीचा आदर शिकवलाच जात नाही की शारीरिक जवळिकीसाठी आवश्यक असणारं परिपक्वपण, एकमेकांची परवानगी असणं याचा त्यात कुठेही उल्लेख नसतो. सेक्स एज्युकेशन खूप वेगळ्या पातळीवर गेलं पाहिजे, असं म्हणत या दोघांनी अनेक विषयांना वाचा फोडलीय..
त्या दोघांनी आणखी एक धाडसी पाऊल टाकलं ते ‘टेड टॉक’, ‘बीबीसी’च्या माध्यमातून जगासमोर प्रत्यक्ष येण्याचं. त्यांच्या मुलाखती, भाषणं सुरू झाली. आपापलं म्हणणं मांडलं जाऊ लागलं. इंटरनेटच्या, यूटय़ूबच्या माध्यमातून त्यांचा ‘टेड टॉक’ तर २० लाख लोकांनी पाहिला आहे. अत्याचारित स्त्रीला दोष देण्याच्या समाजाच्या मानसिकतेवर तिने प्रहार करायला सुरुवात केली. टॉमच्या माध्यमातून त्याचाही अपराधभाव व्यक्त व्हायला लागला. टॉम एका क्षणिक मोहाचा बळी होता. त्या क्षणी स्वत:चा विवेक गमावून गुन्हा करून बसला होता. ‘‘मला बलात्कारी म्हणू नका. मी गुन्हेगार नक्कीच आहे, पण बलात्कारी नाही..’’ तो सांगतोय..
इथेच या घटनेला एक भलं मोठं वळण मिळालं.. हे त्याचं म्हणणं वा त्यानं असं जाहीरपणे स्वत:ची बाजू मांडत फिरणं अनेकांना, विशेषत: काही स्त्री-संघटनांना अस्वस्थ करणारं ठरलं. त्यांनी जाहीर निषेध करायला सुरुवात केली. इतकी की, त्या दोघांचा एका स्त्री-संघटनेच्या व्यासपीठावरील जाहीर कार्यक्रम त्यांनी होऊ दिला नाही. ‘बलात्कार करणाऱ्याला समर्थन करायची संधी देणं म्हणजेच बलात्काराविरुद्धच्या लढय़ातलं गांभीर्य कमी करणं आहे,’ असा दावा करत ही निदर्शनं सुरू झाली. ‘‘एका बलात्कारकर्त्यांबरोबर व्यासपीठावर उभं राहून बोलणं म्हणजे लैंगिक अत्याचाराचं समर्थन करणं आहे.’’, ‘‘या गुन्ह्य़ाला माफी नाहीच,’’ असं सांगत टॉमच्या शिक्षेची मागणी सुरू झाली. पण त्याचबरोबरीने त्यांचं समर्थन करणारे आवाजही उठू लागले. ‘‘ते दोघं अत्यंत धाडसी काम करत आहेत. असा आपण केलेल्या गुन्ह्य़ाचा जाहीर स्वीकार करणं, ते जगासमोर आणणं आणि त्या निमित्ताने प्रश्न सोडवणं खूपच महत्त्वाचं आहे.’’, ‘‘त्यानिमित्ताने पुरुषांच्या भूमिकाही स्पष्ट होतील. बदल मुळापासून हवा असेल तर पुरुषाचं ऐकून घ्यायला हवंच,’’ असाही सूर काहींनी, विशेषत: पुरुषांनी लावला आहे.
परदेशात, एका देशात घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, ते मात्र सार्वत्रिक आहेत. कुणाही संवेदनक्षम माणसाला विचार करायला लावणारे आहेत. बलात्कारी पुरुषाला स्वत:ची भूमिका मांडू द्यावी का, की तसं केल्याने त्याच्या गुन्ह्य़ाचं गांभीर्य कमी होईल? त्याला माफी असू शकते का की त्याने त्या धगीतच जळावं, हीच त्याची शिक्षा असेल?
बलात्कारी पुरुषाला असं जाहीर व्यासपीठ देणं योग्य आहे का, की त्यातून त्याला त्याच्या सुटकेचा मार्ग सापडू शकेल किंवा जाहीर माफी मागणं शक्य होईल. आणि त्याचा पश्चात्ताप मान्य करता येईल?
टॉम म्हणतो तसं तो बलात्कारी आहे की लैंगिक अत्याचार करणारा एक गुन्हेगार? बलात्कार करण्याच्या उद्देशाने त्याने तिचा फायदा घेतला नव्हता आणि ही त्याच्या आयुष्यातली एकमेव चूक होती. हे त्याचं म्हणणं मान्य करावं का?
खरं तर टॉम आणि एल्वाचं प्रकरण तसं थोडं वेगळंच आहे. ते दोघंही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते आणि एका क्षणिक मोहापायी ही घटना घडून गेली होती. जिचा पश्चात्ताप टॉमला पुढची १६ र्वष होत राहिला. आपलं प्रायश्चित्त म्हणून आपण केलेल्या गुन्ह्य़ासह तो जगासमोर उभा राहिला. तसं न करण्याचा पर्याय त्याच्याकडे होता, पण त्याने तो स्वीकारला नाही. उलट स्त्री-अत्याचाराविरुद्धच्या लढय़ात तो सक्रिय उतरलाय. त्यासाठी दोघांनी या पुस्तकातून वा कार्यक्रमातून येणारे पसे याच कामासाठी खर्च करायचं ठरवलंय.
पण खरंच, बलात्कार करणाऱ्यांकडे इतकं सहज, सोपेपणाने, बघता येईल? अनेकदा आपल्या गर्लफ्रेंडवर अत्याचार करणारा तिचा बॉयफ्रेंडच असतो. मित्र, शेजारी, नातेवाईक, हितचिंतक, बॉस इतकंच कशाला सख्खा बाप असतो आणि त्यातल्या कित्येकांकडून एकदाच नव्हे तर अनेकदा त्याच व्यक्तीवर किंवा अनेक स्त्रियांवर बलात्कार होत असतो. ना त्याला पश्चात्ताप असतो ना खेद. म्हणूनच तिहार तुरुंगातून निर्लज्जपणे आपल्या गुन्ह्य़ाची कबुली देताना ‘निर्भया’ प्रकरणातल्या गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा मागमूसही नसतो. किंवा कोपर्डी प्रकरणातला गुन्हेगार बलात्काराच्या कृत्यामागे असणाऱ्या आपल्यातल्या पशूकडे बोट दाखवताना आपल्याकडेच या पशूला थोपवण्याचा विवेक आहे, याचं भान सोयीस्कर विसरतो.
बलात्कार करण्याला माफी असावी का, हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. गुन्हा संपवला पाहिजे, गुन्हेगार आपोआप संपतील, हे आध्यात्मिक तत्त्वज्ञान मान्य करायचं तर त्याला माफी द्यायला हवी की हा फक्त तिचा आणि तिचाच निर्णय राहील की त्याला शिक्षा द्यायची का आणि काय द्यायची? पण हा प्रश्न फक्त त्या दोघांचा व्यक्तिगत मानायचा का की तो स्त्री विरुद्ध पुरुष असाच आहे? जागतिक आहे. सार्वत्रिक आहे. टॉमच्या बाबतीत मानायचं तर त्याला त्या काही क्षणांवर, आपल्या विवेकाने विजय मिळवता आला नाही. त्याचे गंभीर परिणाम लक्षात आले नाही. त्याच्यासाठी ते प्रेम होतं, पण म्हणून त्याच्या गुन्ह्य़ाची धार कमी होते का, पुरुषी वर्चस्व वा स्वायत्तता याच भावनेतून ते घडलं असेल ना, अन्यथा आपल्या गर्लफ्रेंडच्या देहाची, मनाची
पर्वा न करता त्याचं तिथून निघून जाणं हा अपराध होताच ना?
आणखी एक प्रश्न एल्वाच्या निमित्ताने उपस्थित झालाय. खरं तर फारच पूर्वीपासून तो रुजून राहिला आहे. फक्त त्यातून काही अंकुरत नाहीए. तो म्हणजे, बलात्कारित स्त्रीच्या मानसिक आणि सामाजिक बहिष्काराचा. तो बहिष्कारच असतो, अघोषित! त्या स्त्रीला स्वत:च्या शरीरावर एकदा झालेला बलात्कार स्वत:च्या आणि लोकांच्या डोळ्यात रोज भोगावा लागतो. तिची काहीही चूक नसताना भोगाव्या लागणाऱ्या या शिक्षेतून सुटका करणारी सामाजिक मानसिकता कधी बदलणार? म्हणूनच सुनीता कृष्णन, आज वेश्याव्यवसायातील स्त्रियांसाठी भरीव कामगिरी तिच्या ‘प्रज्वला’ या संस्थेमार्फत करत असली तरी तिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर आधी स्वत:च्या नजरेला नजर देण्याची आणि मग घरच्यांच्या आणि मग समाजाच्या नजरेला नजर देण्याची ताकद तिला दोन र्वष घरातल्या अंधारकोठडीत स्वत:ला बंदिस्त केल्यानंतर मिळाली. तर एल्वाला जगासमोर खणखणीत उभं राहण्यासाठी तब्बल २५ र्वष लागली. १६ वर्षे अपराधातली आणि नंतरची आठ वर्षे पत्रव्यवहारातली. आपल्या देशात असो किंवा कोणत्याही देशात अगदी प्रगतिशील देशातही स्त्रीविषयी, बलात्कारित स्त्रीविषयीची भावना सार्वत्रिकच असते. तो कलंक नाही हे सत्य जोपर्यंत आजूबाजूचे लोक तिला सांगत नाहीत, तुझा त्यात काहीच दोष नाही, याचं भान जोपर्यंत लोक देत नाहीत, तिच्यावर घातलेला अप्रत्यक्ष बहिष्कार उठवत नाहीत आणि जोपर्यंत ती स्वत:ला अपराधी मानणं सोडत नाही, तोपर्यंत बलात्कारित स्त्रीचं पश्चात्तापाच्या, भीतीच्या, अपराध भावनेच्या काळोख्या गुंफेत राहणं पर्याप्त आहे. खरं तर त्यानिमित्ताने हा ही सवाल उपस्थित होतोच की अशा गोष्टींमध्ये समाजाचा इतका विचार करायचा का? त्या व्यक्तींचा विचारही न करता दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांचे पर्वा करावी का? यात माझी काहीही चूक नाही, मग मला का लाज वाटावी असा खणखणीत सवाल जोपर्यंत एखादी बलात्कारित स्त्री लोकांच्या नजरेला नजर भिडवून म्हणत नाही तोपर्यंत तिच्याकडेच बोट दाखवले जाणार पण एल्वाने ते एका क्षणी नाकारलं आणि पुढे जगावेगळं घडत गेलं..
आणि म्हणूनच शेवटाकडे येताना म्हणावंसं वाटतं की, जग काय म्हणेल ते म्हणेल. आपण स्वत:बद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचं. इथेच घटनाक्रमाचं आणखी एक वेगळेपण सामोरं येतं तो म्हणजे स्वत:ला क्षमा करण्याचा साक्षात्कार!
काय असतं हे स्वत:ला माफ करणं? या माफ करण्यात आकाशाला व्यापून उरेल इतकं विशालत्व आहे. उदारता आहे. आपण माणूस आहोत, याची पूर्ण, स्वच्छ जाणीव आहे. गुन्हा, चूक करणाऱ्याला माफ करायचं की नाही हा नंतरचा विचार, त्याआधी स्वत:ला माफ करायचं का? तर हो. आणि ती नुसती भावना नाही, तो स्वत:शी, स्वत:साठी घेतलेला ठाम निर्णय आहे. त्यात भूतकाळाला मागे टाकून स्वत:साठी योग्य भविष्यकाळ निवडण्याची संधी आहे. मुख्य म्हणजे नवीन सुरुवात करण्यासाठी स्वत:ला दिलेली ही सुवर्णसंधी आहे. महात्मा गांधींनी या क्षमाशीलतेबद्दल म्हटलंय, ‘‘क्षमा करणं हे सशक्त, कणखर माणसाचं लक्षण आहे. दुबळी माणसं क्षमा करूच शकत नाहीत.’’ कारण हे माफ करणं सोपं नाहीच, कित्येकदा तर तुमच्या घावांच्या वेदनेपेक्षा ती वेदना कैकपटींनी जास्त असते. पण क्षमेशिवाय शांती नाही, मुक्ती नाही, भविष्य नाही. स्वत:ला माफ करून विशाल झालेलं मन मग त्या घटनेला, परिस्थितीला, त्या व्यक्तीलाही माफ करून टाकते, जे एल्वाने केलं..
एल्वाला स्वत:साठी क्षमा हा शब्द उच्चारण्यासाठी तब्बल १६ र्वष द्यावी लागली. ती स्वत:मध्ये पूर्णत: रुजवायला आणखी आठ र्वष लागली. कुठल्याही बलात्कार झालेल्या स्त्रीने स्वत:ला अपराधी का मानावं? अपराध बलात्कारकर्त्यांने केलेला असतो, मग त्याची शिक्षा तिने का भोगावी? ते तिला पूर्ण उमजलं, मात्र त्यासाठी तिला स्वत:ला या घटनेतून वेगळं काढावं लागलं. मनाला मोठं, उदार करावं लागलं आणि त्या तटस्थतेतून तिने तिला माफ करून टाकलं. तिने स्वत:साठी उच्चारलेला क्षमा हा शब्द तिला इतकं मोठं करून गेला की, त्यात त्याचाही अपराध विरघळून गेला. आणि तिच्यासाठी तो उरला फक्त एक माणूस आणि म्हणूनच तो आज तिच्या खांद्याला खांदा लावून उभा ठाकलाय, पुरुषांमधल्या बलात्काराच्या मानसिकतेविरोधात! आणि तीही उभी आहे बलात्कारित स्त्रियांसाठी, खणखणीतपणे.. त्या क्षमेचा हा अर्थ म्हणूनच या घटनेला खूप खूप वेगळं करून टाकतो..
आरती कदम arati.kadam@expressindia.com