मराठी नाटय़ परंपरेत स्त्री नाटककारांची संख्या सुरुवातीपासून कमीच होती. त्यामागे काही कारणे असली तरी पुढे मराठी नाटककार स्त्रियांनी काळालाही शह देऊन नाटके लिहिली, उभारी धरून मंचस्थ केली आणि गिरीजाबाई केळकरांसारख्या नाटककार स्त्रीने नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा दुर्मीळ मानही मिळवला. काय आहे योगदान स्त्री नाटककारांचं.. आजपासून उस्मानाबाद येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने..
समाजाला नेहमी रहाटगाडग्याची उपमा देतात. समाजचक्र तसेच अविरत फिरत असते. समाजाच्या अंतर्गत ज्या ज्या संकल्पना येतात, त्यात साहित्य आणि कला, या दोनही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी नाटय़कला – जिचा गौरव ‘पंचमवेद’ म्हणून केला जातो, ते साहित्य आणि उपयोजित कला, या दोन्ही संकल्पनांत बद्ध आहे म्हणूनच समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे. या ‘पंचमवेदाचा’ चक्री प्रवास संस्कृत नाटक, पौराणिक, ऐतिहासिक नाटक, पुढे संगीत नाटक (गंधर्व युग), त्यानंतर इब्सेनप्रणीत सामाजिक मराठी नाटक, असा होता होता, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वाहिन्यांच्या जबरदस्त रेटय़ापुढे काहीसा क्षीण होत गेला. काळ पुढे सरकला, वर्तमान दशकात आला आणि नाटय़ प्रशिक्षण देणारी ललितकला केंद्रे अस्तित्वात आली. तशी ही मरगळ झटकण्यासाठी लोकांकिका, पुरुषोत्तम, फिरोदिया अशा एकांकिका स्पर्धा, तसेच राज्यनाटय़ स्पर्धा, संगीत नाटक, संस्कृत नाटक स्पर्धाही सुरू झाल्या आणि प्रशिक्षित किंवा अभिनयात रुची, गती असणारा युवा वर्ग हिरिरीने मंचस्थ झाला आणि रंगमंचाचा लाल पडदा, त्या सूचक तीन घंटा, कधी नांदीचे स्वर, सारे सिंचत रंगभूमीपुढे ठाकले.
एक नाटय़रसिक, नाटय़ अभ्यासक म्हणून मी कधी प्रत्यक्षदर्शी, तर कधी वाचनानुभूती घेत, अशी या ‘आशा किरणांचा’ वेध घेत गेले. अभिनयात मुली अग्रेसर आहेतच. (तशा दुर्गा खोटेपासून – मुक्ता बर्वेपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी रंगमंचाला झळाळ दिला आहेच. कमतरता होती – ती नाटय़लेखिकांची) परंतु ‘संहिता लेखन’ हा अवघड आविष्कार अनेक तरुणींनी खूपच समर्थपणे हाताळला आहे. हाताळत आहेत. त्यांचे कौतुक करताना, पूर्वसुरींची म्हणजेच पूर्वीच्या नाटककार स्त्रियांची ओळख करून द्यावी आणि त्यांनी कुठल्या खडतर वाटा चोखाळल्या; समाजाचा, कुटुंबाचा रोष काय ओढवून घेऊन त्यांनी ज्या उमेदीने नाटय़लेखन केले, त्याचा आढावा घेण्यापूर्वी, तेव्हाची सामाजिक स्थितीही पाहावीच लागेल, तरच त्यांच्या नाटय़लेखनाचे मोल समजेल.
वास्तविक मराठी प्रतिभावंत स्त्रिया या साहित्य क्षेत्रात पूर्वकाळापासूनच आहेत. ‘मुक्ते’चे ताटीचे अभंग, संत कवयित्रींच्या काव्यरचना, महदंबेचे धवळे, बहिणाबाई चौधरी, लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे आणि अनेक.. त्यांची प्रतिभा काव्य, आत्मवृत्त आणि गद्यांतूनच आविष्कृत होत राहिली. गेले पाऊण शतकभर तरी प्रतिभावंत लेखिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली; परंतु मराठी वाङ्मयाच्या इतिहासात, मराठी रंगभूमीच्या इतिहासात, नाटय़लेखिकांची नावे अगदी अल्प.. अत्यल्प.. असे का? मराठी सामाजिक नाटकांतून अनेक स्त्री प्रश्न हाताळले गेले. त्या समस्यांचे निराकरणही सुचवले गेले, काही स्त्रियांचा गौरव झाला, (काहींचा धिक्कार), पण हे अवघे स्त्री विश्व नाटकांतून चित्तारले ते पुरुष नाटककारांनीच. जी स्त्रीप्रतिभा स्त्री प्रश्नांचा वेध कथा-काव्य- ललित लेखनातून घेऊ शकते, ती नाटय़माध्यमात मागे का असावी? माझी तर्कमीमांसा अशी आहे.
सामाजिक नाटकांचा उदय झाला, तोच मुळातच स्त्रीने अभिनय करायचाच नाही, या तत्त्वावरती! सुरुवातीला प्रेक्षक म्हणून जातानाही स्त्रिया बिचकत. प्रेक्षकगृहात स्त्रियांची स्वतंत्र बैठकव्यवस्था होती आणि मध्ये पडदा असे. त्या परिस्थितीत नाटक ‘रचायचे’ (हेच क्रियापद तेव्हा होते.) धाडस स्त्रिया करणे शक्य होते का? मालतीबाई बेडेकरांना जिथे टोपणनाव घ्यावे लागले, तिथे स्वत:च्या नावे नाटक कोण रचेल? समजा, टोपणनाव धारण केले आणि कुटुंबात कळले तर? कुळाला बट्टा!
‘बट्टा’ हे नाम वापरण्यातही एक पाश्र्वभूमी आहे. मराठीमधील पहिली नाटककार स्त्री म्हणून हिराबाई पेडणेकर यांचा उल्लेख होता. (इथे मतमतांतरे आहेत.) रंगमंचावर सादर होणारे नाटक लिहिणाऱ्या, त्यातील ‘पदे’ रचणाऱ्या हिराबाई या ‘गरती’ (कुलीन) स्त्री नव्हत्या. त्यांच्या जीवनावर
कै. वसंत कानेटकरांनी ‘कस्तुरीमृग’ हे नाटक लिहिले. ते वाचले, तर त्यांच्या जीवनाबरोबरच समाजाच्या मनोवृत्तीवरही प्रकाश पडलेला दिसेल. विस्तारभयास्तव इथे त्याबद्दल अधिक लिहीत नाही. हिराबाईंची नाटके बसवणारे, त्यांचे संगीत नाटकातून वापरणारे निर्माते, कलाकार त्यांची ओळखसुद्धा नाकारत. नाटय़लेखन हा ‘गरती’ स्त्रियांचा प्रांत नव्हे. कलावंतिणी फार तर नाटक लिहितील, ही धारणा स्थिरावली आणि कुटुंब आणि समाजभयाने स्त्रियांनी नाटकांसाठी लेखणी हाती घेतली नाही.
काळाच्या पुढच्या टप्प्यावर, हे भय सुशिक्षित स्त्रियांच्या मनातून सरले, पण ‘नाटक’ हा प्रकार लिहायला अतिशय कठीण आहे, त्यासाठी भरतमुनी, कालिदास – शेक्सपिअर – इब्सेनचा अभ्यास हवाच. संसार, सणवार, मुले, लग्नकार्य यातून स्त्रियांची अभ्यासाची तयारी नव्हती किंवा अनुकूल परिस्थिती नव्हती. बरे, हा साहित्य व्यवहार अशाश्वत! नाटक लिहिले आणि निर्माता नाही भेटला, कलाकार नाही चांगले मिळाले, अपयश आले.. तर.. (मेहनत वाया) हा व्यवहारी विचारही माझ्या एका लेखिका मैत्रिणीने बोलून दाखवला, कारण ती स्वत: अपयशाच्या अनुभवातून गेली. पुढे नाटय़लेखन केलेच नाही.
असे असले तरी मराठी नाटककार स्त्रियांनी त्या काळात, काळालाही शह देऊन नाटके लिहिली, उभारी धरून मंचस्थ केली आणि गिरीजाबाई केळकरांसारख्या नाटककार स्त्रीने नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा दुर्मीळ मानही मिळवला. आजच्या पिढीला त्यांची ओळखही नाही. म्हणून हा लेखप्रपंच. १८८६ मध्ये जन्म झालेल्या गिरीजाबाई या उच्चभ्रू, सुशिक्षित समाजातून पुढे आलेल्या पहिल्या नाटककार. ‘संगीत आयेषा’, हे त्यांचे पहिले नाटक (१९२१). ‘राजकुंवर’ हे ऐतिहासिक नाटक त्यांनी लिहिले, त्या काळाला रुचतील, पचतील, अशा सांकेतिक, ढोबळ, व्यक्तिरेखा त्यांनी चितारल्या. मात्र १९१२ मध्ये त्यांनी लिहिलेले ‘गृहिणीभूषण’ हे पहिले सामाजिक नाटक स्त्री प्रश्न, स्त्री शिक्षण आणि स्त्री सुधारणा या विषयांवर आधारित आहे. तसेच ‘पुरुषांचे बंड’ हे बहुचर्चित नाटक त्यांनी लिहिले. (काकासाहेब खाडिलकरांनी लिहिलेले याच नावाचे नाटक वेगळे आहे.) १९४५ मध्ये बाळूताई खरे (मालतीबाई बेडेकर) यांचे परित्यक्ता स्त्रीचे प्रश्न मांडणारे ‘पारध’ हे नाटक महत्त्वाचे आहे. परित्यक्ता स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘रमा’ या नायिकेच्या रूपात मांडला. त्या काळात ‘बौद्धिक साथ नाही’ या सबबीवरती पत्नीचा त्याग करून पुनर्विवाह केल्याचे अनेक दाखले आहेत. टाकलेल्या पत्नीने (रमेने) कनिष्ठ दर्जाची कामे करून मुलांचे संगोपन केले, तरी समाजाने तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. अशा कथानकाला सामोरे आणताना मालतीबाईंची नाटय़तंत्रावरची हुकमत कमी पडली आणि नाटक यशस्वी झाले नाही. अभ्यासू वृत्तींच्या मालतीबाईंनी पुढे नाटय़अभ्यास केला आणि नंतर ‘अलौकिक संसार’, ‘कलियुग ग बाई कलियुग’, ‘हिरा जो भंगला नाही’ ही दर्जेदार नाटके लिहिली. १९५८ मध्ये दादर भगिनी समाजाने ‘अलौकिक संसार’चा देखणा प्रयोग केला. तीनअंकी, स्वतंत्र, सामाजिक नाटक लिहिण्याचा मान मालतीबाईंचाच.
विनोदी नाटय़लेखन हा प्रकार (परिवार नियोजन संकल्पनेच्या प्रणेत्या) शकुंतला परांजपेंनी हाताळला.( मंगला गोडबोलेंनीही एक एकपात्री स्वतंत्र नाटक लिहिले. त्यात सुहास जोशींनी अभिनय केला; पण त्यानंतर ‘एैलमा पैलमा’ या एकांकिकेखेरीज त्यांनी नाटय़लेखन केले नाही.) प्राचीन ‘भाण’ आणि ‘प्रहसन’ पाश्चिमात्य फार्स यांच्यापासून प्रेरणा घेऊन फ्रेंच नाटकाला ‘देसी पोशाख’ घालून १९३६ मध्ये ‘सोयरीक’ आणि ‘चढाओढ’ ही नाटके लिहिली. विनोदी ढंगाच्या उपरोधिका, असे त्याचे स्वरूप होते. उमाबाई सहस्रबुद्धे यांनी शकुंतलाबाईंना अनुसरून ‘पांघरलेली कातडी’ हे नाटक लिहिले; पण, शकुंतलाबाईंचा वारसा चालवला तो त्यांच्या कन्येने, सई परांजपे यांनी. (त्यांचे ‘सय’ पुस्तक यावर अधिक प्रकाश टाकते.) यशस्वी चित्रपट आणि मालिकांच्या सोबत त्यांनी नाटय़लेखिका म्हणून यशस्वी कामगिरी केली. ‘नांदा सौख्य भरे’, ‘ईडा पीडा टळो’, ‘सख्खे शेजारी’ (मालिका – अडोस पडोस) ‘धिक ताम्’ आणि वेगळेपणामुळे गाजलेले ‘जास्वंदी’. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून मानवी भावनांचा सहजसुंदर खेळ सईंची नाटय़लेखणी खेळत असते. संवाद आणि नाटय़तंत्रावर विलक्षण पकड, हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. त्यांच्या नाटकांची अन्य भाषांत रूपांतरे झाली आहेत.
मराठीतल्या आघाडीच्या लेखिका ज्योत्स्ना देवधरांचे ‘कल्याणी’ नाटक, सुमती क्षेत्रमाडेंचे ‘मीच झाले माझी मृगया’, वसुंधरा पटवर्धनांचे ‘हिरकणी’, सुमती देवी धनवटय़ांचे ‘धुळीचे कण’, रेखा बैजलांचे ‘आकाश ओढ’ अशी नाटके मंचस्थ झाली, पण गाजली नाहीत. साहित्य क्षेत्रातल्या या मान्यवर लेखिकांचे अन्य प्रकारातले साहित्य काळाच्या ओघातही टिकून आहे; पण नाटय़कृतींची नावांपलीकडे नोंद नाही. नाटय़लेखन हा निव्वळ साहित्य प्रकार नाही. त्याला प्रयोगकर्ते, अभिनेते, मंच, प्रेक्षक यांचीही साथ लागते. ती कमीजास्त झाली, तर संहिता चांगली असूनही उपयोग होत नाही. हेही कारण असू शकते किंवा लेखिकांनी नाटय़लेखन, त्यासाठीचा नाटय़अभ्यास या बाबी गांभीर्याने घेतल्या नसाव्यात, जशा मालतीबाई दांडेकरांनी घेतल्या आहेत. १९११ ते १९८६ या काळात मालती दांडेकरांनी त्यांच्या अन्य साहित्य प्रकारांवरच्या मेहनती इतकीच मेहनत नाटय़लेखनातही घेतली. ‘ज्योती’, ‘पर्वकाळ- ये नवा’, ‘सोनेरी नदीचा राजा’, ‘जावई’, ‘संगीत संस्कार’, ‘मावशी- द ग्रेट’ अशी प्रयोगसंपन्न आणि आशयघन नाटके लिहिली. यातली बहुतेक नाटके मी माझ्या लहानपणी सांगलीत (मालतीबाई बुधगाव, सांगली येथील रहिवासी होत्या.) पाहिली आहेत. सहज सोपे संवाद आणि स्त्री जीवनाच्या प्रश्नांची सहृदय जाण, समंजस, वैचारिक बैठक, सुविहित नाटय़रचना अशा गुणांनी युक्त नाटकांपैकी ‘पर्वकाळ- ये नवा’चे प्रयोग अद्यापही केले जातात. कुमुदिनी रांगणेकरांच्या नाटकांची समीक्षकांनी दखल घेतली नाही, तरी ‘आंधळी कोशिंबीर’, ‘बबू’, ‘दारीच्या चिमण्या उडून जा’ या नाटकांचे महिला मंडळातून धडाकेबाज प्रयोग झाले.
१९५० ते १९६० या काळातल्या महत्त्वपूर्ण नाटकांपैकी ‘जुगार’ हे मुक्ताबाई दीक्षितांचे (अभिनेत्री विभावरी देशपांडेच्या आजी) द्विभार्या प्रतिबंधक कायदा संमत होण्यापूर्वी ‘टाकलेल्या’ स्त्रियांच्या जीवनावर भाष्य करणारे नाटक अतिशय दर्जेदार आहे. सरकारपुरस्कृत राज्य पुरस्कार या नाटकास लाभला. आचार्य अत्रे म्हणाले होते, ‘‘नाटय़ वाङ्मयात भर घालणारे हे नाटक आहे.’’ केशवराव दात्यांसारख्या नटश्रेष्ठाने दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. हे नाटक द्विभार्या प्रतिबंधक कायदा संमत होण्यास उपयुक्त झाले.
‘रात्र संपली पण उजाडलं कुठे?’ या नाटकांत लीला फणसळकर यांनी ‘स्त्री ही स्त्रीची शत्रू(च) नसते’ या सूत्राभोवती कुटुंब नाटय़ लिहिले. त्यावरती ‘बसेरा’ (शशी कपूर-राखी-रेखा) हा दर्जेदार चित्रपट निघाला. श्रेयनामावलीत तसा निर्देश आहे. ‘हायकू’ रचनांसाठी प्रसिद्ध कवयित्री शिरीष पै यांच्या प्रतिभेत आचार्य अत्र्यांची नाटय़प्रतिभाही झिरपली होती. प्रिया तेंडुलकरांच्या अभिनयाने संपन्न ‘कळी एकदा फुलली होती’ हे दिल्लीच्या सत्य घटनेवर आधारित नाटक अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्या आध्यात्मिक वृत्तीच्या असून गुरू, भक्ती, पूर्वजन्म यांच्याबद्दल त्यांचे चिंतन असते. ‘झपाटलेली’ या नाटकात पिशाच्चयोनीचे अस्तित्व धाडसाने मांडले; पण प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यापूर्वीच्या कलाकृती ‘सोन्याची खाण’ (१९६९), ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९७३) ही नाटके प्रेक्षकांना भावली. सरिता पदकींचे ‘बाधा’ (१९५६) आणि ‘खून पहावा करून’ (‘पांथस्थ’ आणि ‘सीता’ ही अनुवादित नाटके) ही नाटके पुण्याच्या ‘पी.डी.ए.’ या संस्थेने यशस्वीपणे सादर केली. जोत्स्ना भोळे यांनी ‘आराधना’ हे नाटक लिहिले. एरवी कुठल्या अभिनेत्रींनी नाटय़लेखन केलेले दिसत नाही. एकांकिका लेखनही केलेले दिसत नाही. नाटय़लेखन या साहित्य प्रकारावर पुरुष लेखकांची मक्तेदारी राहिली.
आता काळ पालटला, सामाजिक सुधारणेतही नवी पावले उमटली. नाटय़लेखन करण्यास समाजभय राहिले नाही. समाजाच्या धारणा बदलल्या आणि संहितालेखनाचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रतिभावंत लेखिका मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक, रोहिणी निनावे आणि अभिनय क्षेत्रातल्या अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी,
संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी यशस्वी नाटय़लेखन करून नाटय़ क्षेत्रात एक नवी पहाट आणली. त्यांना यश मिळाले. त्या वाटेवरून चालत आज एकांकिका समर्थपणे लिहिणाऱ्या तरुण मुली ‘नाटक’ या साहित्य प्रकारात लेखन करतील, मेहनत घेतील, अशी आशा निर्माण झाली आहे. वर उल्लेख केलेल्या नाटय़लेखिकाही नव्या जोमाने लेखन करतील, वेगळे फॉम्र्स, (आकृतिबंध) हाताळतील, जीवनस्पर्शी विषय निवडतील आणि लेखक, लेखिका असा सवतासुभा न मांडता निखळ, नाटय़प्रेमाने लेखन करतील, ही आशा आता निर्माण झली आहे. सामाजिक नाटकांना नव्याने ‘अच्छे दिन’ येत आहेत. त्यात या लेखिका लेखनकर्तृत्व करतील. हा लेख संपवताना माझ्या मनात आलेले काही प्रश्न उद्धृत करते.
स्त्रियांनी लिहिलेल्या (पूर्वीच्या नाटकांना निर्माते मिळाले? की स्थानिक पातळीवरतीच ही नाटके रंगली? या नाटकांच्या संहिता आज उपलब्ध आहेत का? असल्यास कुठे? पुण्याच्या लकडी पुलावरच्या जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडे काही प्रती मी पाहिल्या.) त्यांचे जतन झाले आहे का? स्त्री अभ्यासात यांची दखल किंवा विस्ताराने काही लिहिले गेले का? नसल्यास, या विषयावर विस्ताराने संशोधन होण्याची गरज आहे हे प्रतिपादन करून लेखाचे भरतवाक्य म्हणते..!
डॉ. सुवर्णा दिवेकर
drsuvarnadivekar@gmail.com
(संदर्भ साहित्याच्या ऋणासह)