भारतातील स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास लिहिताना पांढरपेशा, शहरी, नोकरदार स्त्रियांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ ग्रामीण, कष्टकरी शेतकरी स्त्रियांपर्यंत नेऊन तिचा परीघ कितीतरी पटींनी वाढवण्याचे काम प्रथम शरद जोशींनी केले. त्यासाठी त्यांच्याबरोबरीने वागून ते संवाद साधायला शिकले. शेतकरी स्त्रीला, लक्ष्मीला बोलतं केलं आणि त्यांनाच त्यांच्या अन्यायाविरुद्ध उभं केलं. शेतकऱ्यांसाठी अविरत झगडणाऱ्या ‘योद्धा शेतकरी’ शरद जोशी यांचे नुकतेच निधन झाले त्यानिमित्ताने ग्रामीण स्त्रियांच्या स्वातंत्र्यातील त्यांच्या योगदानाविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्थळ- चिकोडी तालुका, निपाणी. आंदोलन १४ मार्च १९८१.. चाळीस हजारांवर शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले. एक म्हातारी बाई धावत
शरद जोशींकडे येते. शिडशिडीत बांधा, शरीरावरच्या सुरकुत्यांमध्ये प्रचंड कष्ट केल्याच्या खुणा..
शरद जोशींना ती बाई म्हणते, साहेब, ‘तुम्ही गावांतल्या माय-बहिणींना सत्याग्रहाला यायला सांगितलं म्हणून आलो. नेसूचं धड नव्हतं म्हणून शेजारणीकडून लुगडं घेऊन आलो बघा.’ शरद जोशींना घरी नेऊन लेकीकडून दूध आणून पाजल्यावरच त्या माऊलीला समाधान वाटलं.
शरद जोशी म्हटलं की प्रामुख्याने डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे, शेतकरी संघटना, शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलनं, इंडिया-भारत ही विभागणी आणि अत्यंत सोप्या भाषेत अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय अडाणी शेतकऱ्याला समजावून सांगण्याची त्यांची विलक्षण हातोटी. शरद जोशींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक मितींपकी त्या अत्यंत महत्त्वाच्या मिती आहेत हे खरंच. पण यात अनेकदा त्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या योगदानाकडे दुर्लक्ष होतं ते म्हणजे शरद जोशींचं ग्रामीण स्त्रियांच्या स्वातंत्र्यातील योगदान.
शरद जोशींच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनाचा पट चित्रपटासारखा डोळ्यांसमोर येत होता. ‘युनो’मधली आलिशान आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतणं, त्यानंतर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ात आंबेठाण इथे साडेतेवीस एकर तीही कोरडवाहू जमीन घेणं, शेतीचा प्रत्यक्ष प्रयोग करणं त्यानंतर लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना दिशा देणं हे जेवढं क्रांतिकारक आहे तेवढंच क्रांतिकारक आणि विचार करायला भाग पाडणारं म्हणजे- एका आंग्लाळलेल्या तरीही प्रमाण मराठी बोलणाऱ्या, जिन्स पँट-टी शर्ट घालणाऱ्या या माणसाने अडाणी, कष्टकरी, ग्रामीण शेतकरी स्त्रीचा विश्वास कसा संपादन केला असेल? हे अंतर कापायला त्यांनी काय जीवाचं रान केलं असेल? कसे जोडले गेले असतील ते या सगळ्यांशी?
शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी आंबेठाणच्या कोरडवाहू जमिनीत प्रत्यक्ष शेती करून त्यांनी शेतकरी जीवनाशी सरूपता साधली होती, पण हा शेतकऱ्यांच्या लक्ष्मीशी सरूपता साधण्याचा प्रश्न प्रत्यक्ष शरद जोशींनाही पडला होताच. आम्ही एकदा असंच बोलत बसलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं, ‘‘काका तुम्ही कसं बोलतं केलं हो या बायकांना?’’ त्यावेळी ते म्हणाले, ‘‘बायकांची स्वत:चं मन सांगण्याची शक्ती शेकडो वर्षांपूर्वी खुंटून गेली आहे. आपलं उत्तर कोणाला नापसंत तर पडत नाही ना याचा अंदाज घेत उत्तर देण्याची कला बायकांनी पराकोटीची सिद्ध केली आहे.’’ एक प्रसंग असा आहे की, चांदवडच्या अधिवेशनाच्या तयारीसाठी पहिली बठक झाली ती हळी हंडरगुळी या गावी. १५-२० बायका सतरंजीवर बसलेल्या. सगळ्या शेतात काम करणाऱ्या, उन्हाने काळ्या पडलेल्या, पायांना भेगाच भेगा आणि डोळ्यात कुतूहलासोबत भीती. आपल्या मालकांनी शरद जोशींसोबत बठकीला बसायला सांगितलं, असं कसं? आता ते काय विचारतात आणि आपण काय बोलायचं याचा धाक सगळ्यांच्या नजरेत दिसत होता. पहिल्यांदा शरद जोशींनी बोलायला सुरुवात केली. ‘शेतकरी संघटना आता स्त्रियांचा प्रश्न समजून घेत आहे. तुमची सुखदु:ख तुम्ही बोलून दाखवलीत तर संघटनेला ती समजू शकतील. घाबरू नका, तुम्ही बोललेलं कोणालाच कळणार नाही.वगरे वगरे.’ पण बायका एक शब्द बोलल्या नाही. त्यानंतर काही जोशींना प्रश्न विचारायचं धाडस झालं नाही. मग त्यांनी ‘जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा’ हा अभंग गायला. बायकांनाही त्यांनी जी काही गाणी, भजनं वगरे येत होती ती म्हणावयास सांगितली. हळूहळू त्यांनी गायला सुरुवात केली. त्या मोकळ्या होऊ लागल्या. भजनाचा उत्साह ओसरल्यावर सहज विचारल्यासारखा जोशींनी प्रश्न विचारला. समजा, तुमच्या समोर जर देव उभा राहिला तर तुम्ही काय मागाल? त्यावर ठरलेलं उत्तर आलं. ‘आमचं कुंकू शाबूत राहावं’. कोणी म्हणाली, ‘माजं पोरगं मास्तर होऊ दे’, कोणी म्हणाली, ‘माज्या पोरीचं हात पिवळं होऊ दे’. पण कोणीही मनातलं सांगायला तयार नव्हतं. मग शरद जोशींनी पुढचा प्रश्न धाडसानं विचारला. जन्मापासून आतापर्यंत बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का? लगेच एकीनं उत्तर दिलं, पहिला मुलगा झाला तवा लई आनंद झाला आणि अचानक एका साध्यासुध्या बाईने एक ओळ म्हणून दाखवली.
‘अस्तुरी जल्मा नको घालू शिरीहारी,
रात न दिस परायाची ताबेदारी’
या ओळीतूनच शेतकरी संघटनेच्या स्वातंत्र्याच्या कक्षा या संकल्पनेचा पाया रचला गेला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शेतकरी संघटनेच्या नैतिक दर्शनात स्वातंत्र्याच्या कक्षा (ीिॠ१ी२ ऋ ऋ१ीेि) ही मध्यवर्ती कल्पना आहे. सगळ्या माणसाच्या आयुष्याची धाव ही स्वातंत्र्याकडे आहे. आयुष्याच्या गुणवत्तेचं मोजमाप स्वातंत्र्याच्या कक्षांनी करावयाचं आहे. ते राष्ट्रीय उत्पादनांच्या आकडय़ांनी होणार नाही. आयुष्यात निवड करण्याची संधी किती वेळा मिळाली, संधी मिळाली तेव्हा समोर किती पर्याय होते आणि या पर्यायांचे क्षेत्र किती लांबरूंद होते. याचं काही मोजमाप करता आलं तर विकासाच्या गुणवत्तेचे मोजमाप करता येणं शक्य होईल. हीच गोष्ट स्त्रियांनाही लागू आहे असं शेतकरी संघटना मानते. स्त्रियांना गरज आहे ती निवडीच्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याची. मला स्त्रीच्या जन्माला घालू नको कारण स्वातंत्र्य नाही. आहे फक्त ‘रात दिस परायाची ताबेदारी’ असं ती स्त्री म्हणते.
या विचाराचाच पुढे विस्तार करत चांदवड अधिवेशनात ठोकळेबाज श्रमविभागणीला विरोध करण्यात आला. ठोकळेबाज श्रमविभागणी न करता प्रत्येक व्यक्तीला आपला निर्णय घेता आला पाहिजे. स्त्री-पुरुष अशा जन्मजात भेदावर आधारित श्रमविभागणीची व्यवस्था जाऊन त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीच्या गुणावगुणांवर अवलंबून असलेली श्रमविभागणी आली तर स्त्रियांचा प्रश्न सुटेल अशी जगावेगळी मांडणी चांदवड महिला अधिवेशनात केली गेली.
शरद जोशींनी जवळपास चार वर्ष ८० ते ८४ सर्व खेडय़ापाडय़ांतली गावं पिंजून काढली. त्यानंतर १९८६ ला नाशिक जिल्ह्य़ातील चांदवड इथे भरलेल्या शेतकरी महिला अधिवेशनाला ५ लाखांहून जास्त स्त्रिया आल्या. भाऊबीज म्हणून तुम्हाला यायचं आहे, असं आवाहन करण्यात आलं. खेडय़ापाडय़ांतून या शेतकरी स्त्रिया इथे स्वयंस्फूर्तीने आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १०० टक्केस्त्रियांनी निवडणुका लढवाव्यात हा ठराव तसंच स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच पत्रुक मालमत्तेत वाटा मिळावा आणि पित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वकष्टार्जित संपत्तीतही वाटा मिळावा ही मागणी याच अधिवेशनात करण्यात आली. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात स्त्रियांच्या शृंगारललित रूपास प्रोत्साहन देण्याच्या प्रवृत्तीचा धिक्कार करण्यात आला होता.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना सातत्याने शरद जोशी एकच गोष्ट सांगायचे, ‘‘मी करुणेपोटी आलेलो नाही. मी सत्यशोधनासाठी आलेलो आहे आणि या कामात आनंद मिळतो म्हणून काम करतो आहे. हा आनंद जोवर आहे तोवर काम करणार आहे. परार्थ हा व्यापक स्वार्थच असतो.’’
चांदवड शिदोरी नंतरचा एक प्रसंग फारच बोलका आहे. शेतकरी महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष सरोजताईंनी हा प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, ग्रामीण स्त्रियांमध्ये चांदवड अधिवेशनानंतर खूपच आत्मविश्वास आणि आत्मभान आलं. एका बाईनं सांगितलं की, चांदवडहून घरी आले. एकदा काम करताना मालक म्हणाले, ‘आंघोळीचं पाणी काढ, मी मालकाला म्हटलं, पाणी तुमचं तुम्ही काढा. शरद भाऊंनी सांगितलं आहे की, आपलं काम करत असताना मालकानी काम सांगितलं तर आपलं काम सोडायचं नाही. त्याला त्याचं करू द्यायचं.’
एकदा गप्पांच्या ओघात शरद जोशी सांगत होते, ज्यावेळी स्त्रिया बोलत्या झाल्या त्यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने त्यांच्या बोलण्यात आली. स्त्रिया म्हणत असत.. साहेब, आम्हाला सरकारी योजना नाही दिल्या तरी चालतील, पण दारूबंदी करा. तेवढी एकच गोष्ट जर केली तर आमचं जीवन कितीतरी सुसह्य़ होईल. शेतकरी संघटनेने मग सरकारी दारू दुकान बंदी आंदोलन हाती घेतलं. सगळ्यात पहिलं दुकान अमरावती जिल्ह्य़ातल्या
खल्लार इथलं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भावाचं हे दुकान बंद पाडण्यात आलं.
स्त्रियांचा सहभाग वाढावा म्हणून निरनिराळी पावलं उचलण्यात आली. त्यातलं एक म्हणजे पुरुष कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आला की, आपल्या बायकांना बठकीला आणलंच पाहिजे. ग्रामीण महिलांचे आरोग्याचे, शिक्षणाचे, मजुरीचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी सत्तेत यायला हवं. प्यायचं पाणी बाईलाच भरावं लागतं, पुरुषाला रोज दोन किलोमीटरवरून पाणी आणावं लागत नाही तोवर पिण्याच्या पाण्याचं दु:ख त्यांना जाणवणार नाही. चुलीमध्ये लाकडं सरकवताना होणारा धूर कसा झोंबतो हे तिला माहीत आहे म्हणून सरपणाचा प्रश्न काय हेदेखील तिलाच माहिती आहे. निर्णय घेण्याची सत्ता त्यांना मिळाली तर स्वत:चे प्रश्न त्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील, ही शेतकरी संघटनेची भूमिका होती.
त्यातून संघटनेने मग स्थानिक स्वराज्य संस्थेत शंभर टक्के महिलांनी निवडणुका लढवाव्यात असा कार्यक्रम १९८६ साली हाती घेतला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचा एवढा धसका घेतला की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच लांबणीवर टाकल्या. तेव्हा संघटनेने मग जिल्हा परिषद कब्जा आंदोलन केलं. तिथले प्रशासक हाकलून लावत सत्ता हातात घेतली. त्यावेळी ५ ते ६ ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के महिला निवडून आल्या होत्या. त्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीतील महिला होत्या. त्यानंतर नाइलाजास्तव सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायदा करून महिला आरक्षण आणलं. सर्व प्रकारच्या आरक्षणाला संघटनेचा विरोध असला तरी या कायद्याचं श्रेय बघितलं गेलं तर शेतकरी संघटना आणि शरद जोशींना जातं.
नव्वदच्या दशकातलं ‘लक्ष्मीमुक्ती आंदोलन’ हे शेतकरी संघटनेचं मलाचा दगड ठरलेलं आंदोलन म्हणावं लागेल. घरातली लक्ष्मी म्हणून ज्या बाईचा आपण उदोउदो करतो प्रत्यक्षात चमचाही तिच्या नावावर नसतो. प्रत्येक वेळेला काहीही खर्च करायचा असेल तर नवऱ्यापुढे बाईला हात पसरावा लागतो. शेतकऱ्याला घामाचे दाम हवे असेल तर घामाची मोजदाद होऊन ज्यांनी ज्यांनी घाम गाळला त्यांना त्या घामाच्या प्रमाणात मोबदला मिळायला हवा. सकाळी कोंबडा आरवल्यापासून ते रात्री अंथरुणाला पाठ लागेपर्यंत शेतकऱ्याची लक्ष्मी ही रोज १५ ते १६ तास काम करत असते. यातलं घरकाम सोडलं आणि फक्त शेतीच्या कामाची मोजदाद केली तर स्त्रियांच्या घामाचे जे थेंब मातीत जिरतात त्यांची संख्या पुरुषांच्या घामाच्या थेंबांपेक्षा दुपटीने अधिक असते. म्हणून शेतकऱ्यांना जर घामाचे दाम हवे तर त्याच्या दुप्पट त्यांच्या लक्ष्मीला मिळायला हवे.
शरद जोशींनी अगदी गणिताचा आधार घेऊन हे स्पष्ट केलं. ते शेतकऱ्यांना सभेत प्रश्न विचारत. ‘तुमच्या घरच्या लक्ष्मीच्या कामाचे तास किती होतात? पंधरापेक्षा तर कमी नाहीच नं? मग या सगळ्या श्रमाचं मोल काय? यात ज्या प्रेमाने ती हे सगळं करते त्याची किंमत शून्य धरा, पण किमान रोजगार हमी योजनेवर मातीच्या पाटय़ा टाकणाऱ्या बाईची किमान रोजी तर तुमच्या लक्ष्मीच्या नावाने लावाल की नाही? एका दिवसाचा हिशेब झाला ३० रुपये. २० वर्ष झाली तुमच्या घरात ती आली तर २० वर्षांचा हिशेब करू. २० वर्षांच्या कामाची रोजीच झाली २ लाख १० हजार. तिला काय मिळालं तर अंगावर कापड आणि पोटाला भाकर. सोसायटींचं देणं एवढं थकलं असतं तर आज आठ लाखांवर थकबाकी निघाली असती. सोसायटय़ा, बँका हे ओंगळ सावकार आहेत. घरची लक्ष्मी ही मंगल सावकार आहे. जी कधीच आपल्या पशासाठी तगादा लावत नाही. उलट इतर सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी प्रसंगी अंगावरचे दागिनेसुद्धा काढून देते. या मंगल सावकारचं देणं तुम्ही कधी फेडणार?’
या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
२ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जमिनीचा सातबारा आपल्या बायकोच्या नावे करून दिला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘लक्ष्मीमुक्ती’चा जीआर काढला. भारताच्या इतिहासातील अत्यंत अद्भुत आणि विलक्षण अशी ही घटना म्हणावी लागेल. ज्या समाजात मुलगी जन्माला येण्याआधी तिची हत्या केली जाते, हुंडय़ासाठी मुलींना जाळले जाते, ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हती’ हे ज्या समाजाचं ब्रीद आहे आणि शतकानुशतके जिथे स्त्रीला दुय्यमत्व दिलं गेलं आहे त्या समाजात पुरुषांनी संपत्ती स्त्रीच्या नावावर करणं ही खरंच अविश्वसनीय गोष्ट होती.
घटनांकडे बघण्याची, त्याची कारणमीमांसा शोधण्याची अत्यंत वेगळी दृष्टी शरद जोशींकडे होती. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘स्त्रियाचं जीवन सुखकर करण्यामध्ये सगळ्या चळवळींपेक्षा कितीतरी जास्त वाटा हा आधुनिक तंत्रज्ञानाने उचलला आहे. शिवण यंत्र, मिक्सर किंवा वॉशिंग मशीनमुळे सर्वसामान्य स्त्रीचं जीवन जितकं सुखकर झालं तेवढं कुठल्याही चळवळीमुळे झालं नसतं. तंत्रज्ञानाने एकूणच कुठल्याही चळवळीपेक्षा मानवी जीवनात जास्त आनंद निर्माण केला आहे. नाशिकची द्राक्षे पॅरिसमधल्या डायिनग टेबलवर पोहोचली याचं श्रेय मालाची वाहतूक विमानाने करण्याची तंत्रज्ञानाने केलेली सोय आणि द्राक्षं खरेदी करणारे ‘मार्क्स अँड स्पेन्सर’ यांसारखी सुपर मार्केट्स.
शरद जोशींचं वर्णन ‘योद्धा शेतकरी’ असं केलं जातं. ते योग्यच आहे, पण त्यांच्यात स्त्रियांमध्ये आढळणारे भावुकता, करुणा आणि प्रेम हे गुणसुद्धा तितक्याच प्रकर्षांने दिसून येत. त्या अर्थाने ओशोंच्या भाषेत सांगावयाचे तर ते ‘स्त्रण’ होते. त्यांच्या एका लेखात त्यांनी म्हटलं आहे की, ‘‘मोठय़ा माणसांच्या, विशेषत: वयात आलेल्या पुरुषांच्या दु:खाचं मला फारसं काही वाटत नाही. पण स्त्रिया आणि लहान मुलं यांचं दु:ख खरंच सहन होत नाहीय म्हणून आम्ही आकडेवारी मांडतो. इंद्रजित भालेराव यांची एक कविता आहे. त्यात एक लहान पोर चिटाच्या कापडाचा सदरा हवा म्हणून हट्ट करतं. मग आई त्याला सल्ला देते, की तुझा तू सदरा कमव. गुरं राखताना जी काही बोंदरं झाडाला लागली असतील ती गोळा कर, वेगळी विक आणि तुझा चिटाचा सदरा घे. पण जेव्हा कवितेत पोराचा बाप पोरानं जमवलेल्या कापसाला भाव न आल्याने पोराला पसे देऊ शकत नाही म्हणून संतापून उठतो, पोराची पाठ बडवतो. त्या जागी मी तिन्ही वेळा अक्षरश: रडू लागलो. निर्विकारपणे दु:ख पाहण्याचं मन माझ्याकडे नाही. तुम्हा साहित्यिकांच्या सहजतेने व्यक्त करण्याची ताकद नाही. मग आम्ही काय करतो? आकडेवारीच्या आणि अर्थशास्त्राच्या आलेखांमागे लपतो. शेतकऱ्याचं दु:ख आमच्या तब्येतीला काव्यात सांगणं झेपत नाही. स्वत:च्या घामाने मिळणे शक्य असलेल्या पण ‘न मिळणाऱ्या सदऱ्या’बद्दल बोलू शकत नाही म्हणून आम्ही ‘उणे सबसिडी’ची गोष्ट करतो. म्हणून मी साहित्यिक नाही, असं मी म्हणतो.’’ या लेखातून हे स्पष्ट होतं की शरद जोशींची सर्व चिंतनशीलता ही त्यांच्या आत्यंतिक संवेदनशीलतेतून आणि भावुकतेतून आली होती.
शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचे जे आर्थिक शोषण होतं त्या शोषणाचाच अपरिहार्य परिणाम ग्रामीण शेतकरी महिलेचं शोषण आहे ही नवी मांडणी शरद जोशींनी केली. त्यांची ही मांडणी स्त्री चळवळीला नवी दिशा देणारी ठरली. आणि हेच भान त्यांनी शेतकरी स्त्रीला देऊन तिला शोषणाविरुद्धच्या लढय़ात उभं केलं.
भारतातील स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास लिहिताना पांढरपेशा, शहरी नोकरदार
महिलांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ ग्रामीण, कष्टकरी शेतकरी स्त्रीपर्यंत नेऊन तिचा परीघ कितीतरी पटींनी वाढवण्याचं काम व्यापक प्रमाणावर प्रथम शरद जोशींनी केलं हे निर्विवादपणे मान्य करावंच लागेल आणि त्यासाठी इतिहास त्यांचा
ऋणी राहील.
– वसुंधरा काशीकर