एशियाटिक सोसायटीतर्फे मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुर्गाबाई भागवत स्मृती व्याख्यानमालेत ‘द्रौपदी : एक निराळी दृष्टी’ या विषयावर झालेल्या व्याख्यानाचा हा संपादित लेख.
आपण भारतीय फार भाग्यशाली माणसं आहोत, कारण रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्यं आपल्याला वारशानं मिळाली आहेत. हे आपल्या सामूहिक कर्तृत्वाचं पारितोषिक नाही की सामूहिक स्वप्नांना आपण प्रयत्नपूर्वक दिलेलं प्रत्यक्ष रूप नाही. आपण या देशात जन्म घेतला एवढय़ा एका कारणानं ही महाकाव्यं आपल्याला मिळाली.
या दोन्ही महाकाव्यांच्या निर्मात्यांनी कदाचित समाजात आधी प्रचलित असलेली कथा उचलली किंवा कदाचित आधी घडून गेलेला इतिहास उचलला; त्यात समकालीन इतर कथांची किंवा ऐतिहासिक घटनांची गुंफण केली आणि प्रतिभाबळानं एकेक महाकाव्य निर्माण केलं.
महाभारत हे तर राष्ट्रीय महाकाव्य म्हणावं असं काव्य आहे. एक राजकीय इतिहास सांस्कृतिक अंगाने विकसित होता होता तत्त्वज्ञानाची जोड घेत घेत धर्मकथेत कसा परावर्तित होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारत. या भारती कथेतले सगळे स्त्री-पुरुष पार्थिव आहेत. त्रिगुणांनी युक्त आहेत. मानवी आयुष्याच्या अनंत रंगच्छटा त्यांच्यात उमटल्या आहेत. रसरसतं सौंदर्य आहे, धगधगीत लालसा आहे, लाजवट प्रेम आहे, उफाळता द्वेष आहे. निखाऱ्यासारखं दु:ख आहे, ओठ मिटणारा शोक आहे आणि हे सगळं समोर आणताना मानवी संबंधांची अफाट गुंतागुंतही विलक्षण ताकदीनं व्यासांनी आपल्यासमोर आणली आहे. जीवनाच्या विराटपणाचं इतकं सजग भान फार थोडय़ा लेखक-कलावंतांनी आजवर प्रकट केलं आहे, म्हणून महाभारत हे केवळ भारतीय भूमीवरचंच नव्हे तर जगातल्या दुर्मीळ साहित्यकृतींमधलं एक आहे.
मराठीत महाभारतविषयक लेखन विपुल आहे. केवळ द्रौपदी या व्यक्तिरेखेपुरता विचार करायचा म्हटला तरी जवळजवळ पाच हजार वर्षांच्या कालखंडातल्या स्त्रीविषयक आणि खरं तर जीवनविषयकही बदलत्या समाजधारणांचा अभ्यास आपल्याला या लेखनाला समोर ठेवून करता येईल. मी इथे महाभारतातल्या द्रौपदीचा विचार करताना दुर्गाबाई भागवत आणि इरावतीबाई कर्वे या दोघींनी केलेलं द्रौपदीविषयीचं लेखनही विचारात घेते आहे. हे व्याख्यान दुर्गाबाईंच्या स्मृतीसाठी आहे म्हणून आणि इरावतीबाई त्यांच्या समकालीन – त्यांचं ‘युगान्त’सारखं लेखन महत्त्वाचं आहे म्हणूनही. या दोघांचे महाभारताकडे पाहण्याचे दृष्टिकोन आधुनिक आहेत पण स्वतंत्र आहेत. ‘व्यासपर्व’ या महाभारतविषयक ललितलेखांच्या अप्रतिम संग्रहात दुर्गाबाईंनी अखेरचा लेख द्रौपदीवर लिहिला आहे.
द्रौपदी त्यांना दिसली ती कामिनी म्हणून. तिच्यातलं पाशवी चतन्य, अनाकलनीय बुद्धिमत्ता आणि अतिशय शुद्ध वासनांची कमालीची उत्कटता त्यांनी नेमकी टिपली. तिच्या सौंदर्याचं – शारीर सौंदर्याचं रहस्य त्यांना तिच्या प्रमाणबद्धतेत जाणवलं. द्रौपदीचा पुरुषांना पडणारा लोभ दुर्गाबाईंनी आवर्जून अधोरखित केला आहे. ती कामिनी आहे. कामकलिका आहे आणि द्रौपदीविषयीच्या त्यांच्या आकलनातलं तेच मुख्य सूत्र आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर तिच्यामधला ‘सकामतेचा तंतू’ भारती कथेत कसा विणला गेला आहे हे त्यांनी उलगडलं आहे. दुर्गाबाईंना तिच्या सकामतेचा मुख्य धागा दिसतो तो तिच्याविषयी सातत्यानं पुरुषांना वाटलेल्या आकर्षणाचा. केवळ पुरुषांनाच नव्हे, स्त्रियांनाही मोहित करणारं तिचं रूप होतं. दुर्गाबाई या मुख्य धाग्याची वीण द्रौपदीच्या पंचपतित्वातही झालेली दाखवतात. समागमाच्या बाबतीत कुंती आणि द्रौपदी यांच्या मनाची जडणघडण एकाच तऱ्हेची होती. कुंतीला मिळालेल्या वरामुळे पाच जणांना कामपूर्तीसाठी बोलावणं तिला शक्य झालं होतं. तिच्या संततीची जोपासना द्रौपदीकडून व्हावी हा दुर्गाबाईंना केवळ योगायोग वाटत नाही. व्यासानं हा अनुक्त संकेत सुचवून सोडून दिला आहे असं त्यांना वाटतं. तारुण्य आणि तारुण्यसुलभ अशा देह-मनात तेवणाऱ्या वासना, यामुळे द्रौपदीनं पाच पतींना वरण्याची खुशी दाखवली. तिच्यासारखी पाच पतींची पतिव्रता जगात कुणी झाली नाही. खरं तर दुर्गाबाईंच्या या विवेचनाला पूरक असा महाभारतकारांचा आणखी एक अभिप्राय जो फारसा उठावदार न करता त्यांनी तसाच सोडून दिला आहे तो असा की, द्रौपदीला घेऊन अर्जुन कुंतीकडे आला तेव्हा पाचही पांडवांची साभिलाष दृष्टी तिच्यावर खिळून राहिली होती. तिच्या आकर्षणाच्या धाग्यानं हे पाचही जण एकत्र नांदतील, राहतील असं जर कुंतीला वाटलं असेल तर ते अगदी अचूक निदान होतं. द्रौपदी सदैव त्या पाचांच्या अभेद्यतेची खूण बनून राहिली.
दुर्गाबाईंनी कामिनी द्रौपदीचं कृष्णाशी असलेलं नातंही याच सकामतेच्या दृष्टीतून उलगडलं आहे. वासना किंवा सकामता ही नेहमीच नकारात्मक नसते. तिची आक्रमक, िहस्र, अश्लील किंवा ओंगळ रूपं सातत्यानं भोवताली दिसतात आणि स्त्री-पुरुष संबंधांमधला सार्वजनिक चच्रेतला तो एक चविष्ट विषय असतो. पण वास्तविक सर्जनाच्या मुळाशी असलेलं वासनेचं हे अस्तित्व आवश्यक, अपरिहार्य आणि हवंसंही असतं. दुर्गाबाईंना द्रौपदीच्या अस्तित्वाच्या मूलकंदाशी असलेली ती तशी वासना – तशी सकामता जाणवली आणि तिची सुंदर वीणही तिच्या आणि कृष्णाच्या नात्यात त्यांना आढळली. त्या नात्याला व्यासांनी विशिष्ट घाट दिलेला नाही. एक अनामिक नाजूक रंग मात्र त्यांनी त्यात भरला आहे. भक्ती, प्रणय आणि सख्य यांचा मिलाफ या नात्यात कसा झाला आहे याचा फार सुंदर उलगडा दुर्गाबाईंनी केला आहे. कृष्णाच्या सान्निध्यात द्रौपदी आपोआप उमलते. पांडवांप्रमाणेच त्याच्यावर विसंबते. पण त्यांची बायको म्हणून नव्हे तर कृष्णाची मत्रीण म्हणून.
द्रौपदीला भारतीय साहित्य परंपरेच्या मोठय़ा पटावर पाहताना दुर्गाबाईंनी तिचा आणखी एक विशेष नोंदवला आहे. ‘तिचा कोणताही चिरसंस्कार मनावर राहू नये असा व्यासांचा संकेत असावा असं दुर्गाबाईंना वाटतं. सीता, सावित्री यांच्यासारखं द्रौपदीला भारतीय मनात चिरंतनत्व मिळालेलं नाही. ती एक दूरची कमनीय नायिकाच राहिली. भारतीय नारीच्या संस्कारजीवनात तिचं स्थान फार गौण आहे. तिचं व्यक्तित्व कमनीय आहे पण प्रेरक नाही.’
इरावतीबाईंनी दुर्गाबाईंप्रमाणे ललित अंगानं, भारतीय कथेची नायिकाप्रमाणे म्हणून द्रौपदीचा विचार केला नाही आणि तिच्या व्यक्तित्वाचा तिच्या जीवनावर झालेला परिणाम तपासत तिच्या नातेसंबंधांची
वीण ज्याच्या आधारे मुख्यत: झाली आहे त्या विशिष्ट सूत्रालाही दुर्गाबाईंनी हात घातलेला नाही.
‘युगान्त’ हा इरावतीबाईंचा महाभारतविषयक लेखांचा संग्रह. दुर्गाबाईंच्या ‘व्यासपर्व’नंतर पाच वर्षांनी १९६७ मध्ये तो प्रथम प्रकाशित झाला. द्रौपदीचा विचार इरावतीबाईंनी केला तो सीतेच्या जोडीनं. रामायण आणि महाभारत ही दोन श्रेष्ठ महाकाव्यं. दोन्ही काव्यांच्या नायिकांचा तुलनात्मक विचार इरावतीबाईंनीच प्रथम मांडला. सीता आणि द्रौपदी-दोघी दोन महाकाव्यांच्या नायिका- दोन आदिग्रंथांच्या नायिका. दोघीही भूमिकन्या. सीता यज्ञासाठी जमीन नांगरताना सापडली तर द्रौपदी यज्ञातूनच वर आली. दोघींची लग्नं म्हणजे पण लावून झालेली स्वयंवरं होती. दोघींनाही वनवास भोगावा लागला. सीतेला चौदा र्वष आणि द्रौपदीला तेरा र्वष. दोघींचंही आयुष्य शेवटी तसं विफलच झालं.
सीतेच्या अपहरणाचा दोष सीतेकडेच जातो. राम-लक्ष्मणांकडे नव्हे. तिच्या दु:खाचं स्वरूपही निराळं. तिच्यावर आपत्ती कोसळतात पण त्यांचं निवारण होतं. प्रत्येक आपत्तीतून ती आणि तिची माणसं सुखरूप बाहेर पडतात. नव्हे आणखीच थोर, दैवी होऊन बाहेर पडतात. द्रौपदीचं तसं नाही. तिचं दु:ख मानवी आहे. तिच्या नातलगांनी तिला दु:खं दिली. भारतीय युद्धाचं कारण द्रौपदी होती असं मानलं गेलं आहे पण ते खरं नव्हे. कलहाची बीजं तर कौरव-पांडवांच्या बालपणीच पेरली गेली होती. पण त्या युद्धाची झळ द्रौपदीनं फार सोसली. तिला युद्ध हवं होतं हे खरं, पण त्या युद्धात तिचं माहेर धुवून निघालं. तिची सगळीच्या सगळी कर्ती मुलं गेली. राखेचं राज्य वाटय़ाला आलं. यादवांच्या मातबर कुळाचा अस्त झाला. तो युगान्तच होता आणि इरावतीबाईंनी म्हटल्याप्रमाणे त्या युगान्ताची प्रत्येक यातना द्रौपदीनं भोगली.
महाप्रस्थानाच्या वाटेवर द्रौपदी पडली तेव्हा भाबडेपणानं भीमानं युधिष्ठिराला म्हटलं, ‘अरे बघ रे, ती पडली. का पडली ती?’ त्यावर मागे न पाहता युधिष्ठिरानं उत्तर दिलं, ‘ती पडली कारण तिनं सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर केलं.’ या युधिष्ठिराच्या वाक्यात त्यानं तोपर्यंत उघड न केलेली जखम होती. युधिष्ठिरानं म्हटलं तशी तिनं अर्जुनावर केलेलं अधिक प्रेम ही तिची उणीव होती. पण द्रौपदीला स्वयंवराचा दिवस आठवला. अर्जुनानं तिला जिंकलं पण ती पाचांची झाली तेव्हा तिला झालेल्या वेदना काय युधिष्ठिराला कळल्या नसतील? मन कधीच पुरं मारता येत नाही. कृती समतोल ठेवता येते पण मनाचं तसं थोडंच आहे? पण त्या मनाला आतून चटका लावणारी एक गोष्ट होती. ती म्हणजे अर्जुनावरचं तिचं प्रेम एकतर्फीच असल्यासारखं होतं. द्रौपदीखेरीज त्यानं आणखी पुष्कळ बायका केल्या आणि खरं तर, त्याचं हृदय त्यानं कृष्णालाच दिलेलं होतं. मग तिच्यावर प्रेम करणारं होतं तरी कोण? तिला तेव्हा भीमाच्या प्रेमाची प्रथम जाणीव झाली. भारती कथेमधले द्रौपदी-भीम नात्याचे सगळे प्रसंग, सगळे बारकावे द्रौपदीच्या मनात झरझर उमटून गेलेले इरावतीबाईंनी दाखवले आहेत आणि द्रौपदीला भीमाच्या तिच्यावरच्या उत्कट प्रेमाची जाणीव अखेरीला झाल्याचा प्रसंग रंगवला आहे. द्रौपदी ज्या अर्थानं पार्थिव होती त्या अर्थानं भीमही पार्थिव होता. तिला ते अगदी अखेरीला उमगलं आणि फरफटत कसाबसा तिच्याजवळ येत तिच्यावर सावली धरणारा भीम तिला दिसला. ‘काय करू तुझ्यासाठी?’ त्याही परिस्थितीत त्यानं तो निर्थक प्रश्न विचारला तेव्हा द्रौपदी प्रसन्न हसली आणि म्हणाली, ‘पुढल्या जन्मी पाचांतला थोरला भाऊ हो भीमा! तुझ्या आसऱ्याखाली आम्ही सारी निर्भयपणे आनंदात राहू!’
या दोघींनी महाभारतातल्या द्रौपदीचा आपापल्या दृष्टीनं केलेला पुनर्विचार थोडक्यात तुमच्यासमोर ठेवत असताना त्याचं महत्त्व मराठी ललित गद्याच्या संदर्भातच नव्हे तर आणखीही एका संदर्भात अधोरेखित करावंसं वाटतं. इतिहास-पुराणांचा नवार्थबोध घडवणारे, त्यांचं पुनर्नवीकरण करणारे किंवा त्यांना समकालीन जीवनसंदर्भानी प्राणवान करणारे जे प्रयत्न आधुनिक मराठीत झाले, त्यांत ‘व्यासपर्व’ आणि ‘युगान्त’ या दोन्ही लेखसंग्रहांचा अग्रक्रमानं समावेश करावा लागेल. या दोघींच्या आधी आणि नंतरही असे प्रयत्न – नवार्थबोधाचे प्रयत्न झाले आहेत – होत राहतील. शिवाय महाभारतासारखं माणसाच्या अपुरेपणाचं इतकं परिपूर्ण दर्शन घडवणारं काव्य दुसरं नाही. द्रौपदीचं एक उदाहरण घेतलं तरी हेच प्रत्ययाला येतं. माणूसपणानं इतकी परिपूर्ण आहे द्रौपदी की म्हणूनच ती अपूर्ण आहे.
तिचा जन्म यज्ञज्वाळेतून झाला. यज्ञसेन द्रुपदाची मुलगी म्हणून ती याज्ञसेनी. पण आपल्या मनात मात्र तिच्या नावाची सांगड यज्ञज्वाळेशीच घातली गेली आहे. द्रौपदी यज्ञातून आली, पण तो यज्ञ काही द्रुपदानं तिच्यासाठी मांडलेला नव्हता. द्रोणाशी द्रुपदाचं वैर होतं. द्रोणाचा वध करणारा पुत्र मिळावा या हेतूनं द्रुपदानं यज्ञ मांडला. त्या यज्ञातून धृष्टद्युम्न आला तशी द्रौपदीही आली. अनपेक्षित, अनाहूत आली. शिवाय ती मूल म्हणून, बाळ म्हणून आली नाही. कुमारी म्हणून आली.
यज्ञवेदीतून वर आलेली पांचाली कुमारी होती. सर्व अवयवांनी देखणी होती, लावण्यवती होती. तिचे डोळे मोठे होते. कमळाच्या पाकळीसारखे. रंग सावळा. केस घनदाट, काळे आणि कुरळे. टपोरी तांबूस नखं. सुरेख भुवया. सर्वागी मृदुता आणि कोवळीक भरलेली. स्तन मोठे. असं वाटत होतं की मानवरूप घेतलेली कुणी स्वर्गकन्याच आहे. निळ्या कमळासारखा तिचा देहगंध साऱ्या परिसरात दरवळत होता. तिला या जगात उपमाच नाही. देव, दानव, यक्ष अशा सगळ्यांनीच जिची इच्छा करावी अशी ती देव-रूपा होती. व्यासांनी इतक्या तपशिलांसह रूपाचं वर्णन भारती कथेत एकटय़ा द्रौपदीचं केलं आहे. मुळातली पूर्ण पार्थिवाचा रंग असलेली कथा. मानवी स्वभाव, आयुष्यं आणि संबंध यांच्यात घोळलेली कथा. या कथेतल्या नायिकेचं अवतरण किंवा उद्धरण – यज्ञज्वाळेतून तिचं वर येणं – मात्र अद्भुताच्या प्रकाशानं वेढलेलं. तिचा जन्म यज्ञातून झाला, पण तिचं सगळं आयुष्य म्हणजेच खरं तर एक यज्ञ होता. एक प्रकारे स्त्रीत्वाच्याच प्रतिष्ठेसाठी व्यक्तिगत दु:खाची आणि विटंबनेची सतत आहुती देत चाललेला यज्ञ. शेवटी विझल्यावर राखच मागे ठेवणारा यज्ञ. हा यज्ञ मांडणारी द्रौपदी कायम आतून जागी असणारी स्त्री होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक निकराच्या प्रसंगी तिची आतली जागही दिसते आणि आगही दिसते. स्वत्व न सोडणाऱ्या दुर्मीळ स्त्रियांपकी ती एक होती. ती पांडवांशी बांधली गेली होती म्हणून तिला पुष्कळ काही साहावं लागलं. पण ती मुकाटय़ानं सहन करत राहिली नाही. नाइलाजानं स्वीकाराव्या लागणाऱ्या प्रत्येक नकोशा गोष्टींना दूर करण्यासाठी तिनं तडफडाट केला. प्राण पाखडले.
द्यूतसभा हे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसं आहे. कोणाही स्त्रीच्या वाटय़ाला येऊ नये इतकी विटंबना तिथे तिच्या वाटय़ाला आली. त्या काळच्या प्रथेप्रमाणे रजस्वला असल्यामुळे एकवस्त्रा असलेल्या तिला केसांना धरून खेचत, फरफटत सभेत आणलं गेलं. तिथे राजा होता, कुटुंबामधले आणि दरबारामधले इतर वृद्ध होते, तपस्वी होते, योद्धे होते आणि द्यूतात स्वत:लाही गमावून बसलेले तिचे पाच पती होते. द्रौपदीनं त्या सर्वाच्या मर्यादा उघडय़ा केल्या. स्वत:च्या उघडं होण्याची लाज बाळगून ती शरमेनं आणि दु:खानं चिरडून मोडून पडती तरी ते स्वाभाविकच होतं, पण ती मोडली नाही, कोसळली नाही. तिच्यातून ठिणग्याच बाहेर पडल्या. ‘ही कसली सभा ?’ ती म्हणाली. ‘सभा तीच जिथे ज्येष्ठांची उपस्थिती असते. ज्येष्ठ- वृद्ध तेच, जे धर्माचं निरूपण करतात. धर्म तो, जो सत्याला सामावतो आणि सत्य तेच ज्यात किंचितही कपट नसतं.’ द्रौपदी नकाराच्या भाषेत सभेची, अनुभवी वृद्धांची, धर्माची आणि सत्याचीच व्याख्या करू पाहत होती. हतप्रभ ज्येष्ठांना भानावर आणू पाहत होती. तिचं आवाहन होतं माणसांमधल्या धर्मबुद्धीला, न्यायबुद्धीला, राजकुळाच्या प्रतिष्ठेला आणि करुणेला नव्हे तर सदसद्विवेकाला. तिला सहानुभूती नको होती. दया नको होती. तिला आत्मसन्मान हवा होता. द्रौपदीनं भर सभेत बोलणं आणि युधिष्ठिरानं आधी कुणाला पणाला लावणं असा प्रश्न विचारणं इरावतीबाईंना वेडगळ, नव्हे भयानक वाटलं. ‘पंडिता’ हे अरण्यपर्वात तिला दिलेलं विशेषण उपहासाचं वाटलं. पण खरं तर त्या अत्यंत कठीण प्रसंगातही तिची आत्मप्रतिष्ठेची जाणीव, तिची न्यायाची जाणीव आणि तिची धर्मबुद्धी पूर्ण शाबूत होती. भीष्मांनीही तिच्या त्याच जागृत धर्मबुद्धीचं आश्चर्य व्यक्त केलं, पण ते तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत.
गांधारी सभेत आली, तिनं धृतराष्ट्राला जागं केलं आणि त्यानं द्रौपदीची विटंबना थांबवून तिला तीन वर देऊ केले. या प्रसंगात द्रौपदी अगदी अंतर्बाह्य़ उजळून निघाली आहे. पहिल्या वरानं तिनं युधिष्ठिराची दासपणातून मुक्तता केली. त्याचा मुलगा- पांडवांचं कुळ पुढे नेणारा एक मुलगा तरी दासपुत्र असू नये अशी व्यवस्था तिनं केली. दुसऱ्या वरानं तिनं चारही पांडवांची शस्त्रसहित मुक्तता केली आणि तिसरा वर तिनं मागितलाच नाही. इरावतीबाईंनी कर्णाचे त्या वेळचे उद्गार नेमके अधोरेखित केले आहेत. ‘द्रौपदीनं पांडवांना अप्रतिष्ठेपासून वाचवलं, गत्रेतून वर काढलं, बुडताना किनाऱ्याला पोचवलं.’ असं कर्ण म्हणाला. पण त्याहीपेक्षा अधिक तिनं आपल्या पराभूत आणि हतप्रभ पतींवरचा विश्वास व्यक्त केला. त्यांची अवहेलना करणाऱ्या त्या सभेत त्यांच्या पुरुषार्थावरचा दृढ विश्वास प्रकट करून ती म्हणाली, ‘लोभानं सर्वनाश होतो. मी आता तिसरा वर मागणं अयोग्य आहे. माझे पती गत्रेतून पार झाले आहेत. त्यांचं कर्म जर पवित्र असेल तर पुन्हा आमचं कल्याण होईल.’
विवेक आणि संयम यांचं दर्शन आणीबाणीच्या प्रसंगीही नित्यजागृत माणसांच्या वागण्या-बोलण्यातून होत जातं याचा द्रौपदीनं दिलेला हा अपूर्व अनुभव म्हणायला हवा. तिच्या वस्त्रहरणाचा प्रसंग भांडारकर संशोधन संस्थेच्या संशोधित आवृत्तीत प्रक्षिप्त मानला गेला आहे; पण तो काव्यात्म न्याय माणसांच्या मनाला शतकानुशतकं भावला आहे, आवश्यकच वाटत आला आहे. एका बीभत्स प्रसंगात, जगातलं क्षुद्रपण, हीनपण, नीचपण, कपट, अनिष्ट आणि ओंगळ असं काही जेव्हा सत्याच्या, सद्वर्तनाच्या छातीवर थयथया नाचत होतं, तेव्हाच्या त्या भयकारी प्रसंगात जर देवपणाची- सर्व मंगलकारी शक्तीची सावली मानवी असहायतेवर पडली नसती तर शुभंकराच्या सामर्थ्यांवरचा माणसाचा विश्वासच उडाला असता. प्रत्यक्षात घडला असो-नसो, व्यासरचित असो-नसो, पण अमंगलाच्या नेपथ्यावर ईश्वरी करुणेचा एवढा हृदयस्पर्शी, विराट आणि नाटय़मय आविष्कार एखाद्या प्रज्ञावंताला स्फुरला तरी कसा, याचं नवल वाटत राहतं.
महाभारतातल्या द्रौपदीची इतर अनेक रूपं दुर्गाबाईंनी आणि इरावतीबाईंनी टिपलेली आहेत. पत्नी म्हणूनची, गृहिणी म्हणूनची रूपं. ती सर्व ध्यानात घेऊनही आणखी एक विशेषण सर्वात शीर्षभागी ठेवावंसं वाटतं- हृदयेन अपराजिता! समर्पण आणि स्वतंत्रता, आत्मविलोप आणि आत्मसन्मान, सेवातत्परता आणि स्वयंप्रतिष्ठा यांचा एक अनोखा मेळ तिच्या व्यक्तित्वात आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री कुंभाराच्या घरी, नवऱ्यांच्या पायगती जमिनीवर झोपलेली द्रौपदी, वनवासात असताना अतिथींना पोटभर जेवू घालणारी द्रौपदी, युधिष्ठिराशी वाद घालणारी, त्रागा करणारी, दु:खानं झोडपलेली द्रौपदी, तरी गंधमादन पर्वतावरच्या सुवासिक कमळांचा हट्ट भीमापाशी धरण्याइतका कोवळेपणा हृदयाशी कायम असणारी द्रौपदी, अज्ञातवासात सुदेष्णा राणीची दासी बनून राहिलेली द्रौपदी, अर्जुनानं सुभद्रेशी लग्न केल्यावर दुखावलेली द्रौपदी- एक कधीही न शांत होणारं आणि कधीही न हरणारं हृदय तिला लाभलं होतं. स्त्रीत्वाला योग्य ती ओळख देत तिला माणूस म्हणून प्रतिष्ठेनं स्वीकारण्यात पुरुषाचाही विकास असतो असा पुरुषार्थाचा व्याख्याविचार तिनं घडवला.
तिच्याकडे पाहण्याची लोकपरंपरेची दृष्टी मात्र फार वेगळी, वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अभिजात वाङ्मय परंपरेपेक्षा अगदी स्वतंत्र आहे. द्रौपदी यज्ञज्वाळेतून प्रकट झाली. तेव्हाचं तिचं रूप यौवनभरातल्या एका कुमारिकेचं रूप होतं. व्यासांनी तिच्यासाठी वापरलेल्या दोन विशेषणांमध्ये लोकपरंपरेची कडी अडकलेली आहे. व्यास तिला अमरवर्णिनी म्हणतात आणि देवरूपिणीही म्हणतात. देव, दानव आणि यक्ष यांनाही जिची अभिलाषा वाटावी अशी देवी म्हणजे द्रौपदी. कुमारिका द्रौपदी.
द्रौपदीचं तरुण सुंदर कुमारिका म्हणून जन्माला येणं, देव, दानव, यक्षांनाही काम्य अशा देहस्विनीचं रूप तिला लाभणं, यज्ञीय अग्नीशी तिचा संबंध असणं, तिच्या तेजापुढे अनेकदा तिचे पतीही निष्प्रभ वाटणं, वरारोहा असं विशेषण तिच्यासाठी वापरलं जाणं, तिला युद्ध हवं असणं, तिच्या स्वभावात न शमणारी जळती आग असणं यामागे केवळ व्यासांचा प्रतिभाविलास असावा असं वाटत नाही. पण मग द्रौपदीचं हे रूप असं का, याचं उत्तर अभिजात परंपरेत सापडत मात्र नाही. उत्तरासाठी वळावं लागतं ते लोकपरंपरेकडे आणि या देशाच्या दक्षिणभूमीवर आजही जिवंत असणाऱ्या देवी द्रौपदीच्या उपासनेकडे. महाराष्ट्रात पांडवांनी खोदलेली म्हणून मानली जाणारी पांडवलेणी, पांडवांनी उभी केलेली म्हणून मानली जाणारी मंदिरं दाखवता येतात. ज्यांचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही अशी अनेक मंदिरं पांडवकालीन म्हणून दाखवली जातात.
पण अद्याप सुस्थितीत असलेलं पाच पांडव आणि द्रौपदी यांचं एकमेव मंदिर आहे ते पुण्याजवळ तळेगावला आहे. लोकशैलीतले बठय़ा आसनातले पाच पांडव आणि त्यांच्या मागे देवळाच्या मध्यिभतीपलीकडे आडवी झोपलेली द्रौपदी असं ते मंदिर आज पूजेत नाही. नांदत्या उपासनेत नाही. उपेक्षित असं ते आडबाजूला असलेलं एकमेव मंदिर आहे. द्रौपदीची देवी म्हणून उपासना दक्षिणेकडे मात्र आजही टिकून आहे. मुख्यत: तामिळनाडू आणि त्याच्या सीमांना लागून असलेल्या आंध्र, कर्नाटकात द्रौपदीची अनेक देवळं आहेत. चेन्नईजवळचं जिंजी हे तिचं मुख्य ठाणं. तिथून दक्षिणेला वैगाई नदीच्या पलीकडे अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वसमुद्रापासून थेट केरळच्या सीमेपर्यंत तिची देवळं आहेत. जिंजी, महाबलीपुरम्, चेन्नईच्या आसपास ती अधिक आहेत, पण इतरत्र कावेरी, चेय्यार, पालार अशा नद्यांच्या काठानं ती विखुरलेली आहेत. या देवीचे भक्त हजारोंच्या संख्येनं आहेत. त्यांत मुख्यत कोनार आहेत. ते यादव आहेत. कृष्णाच्या कुळातले आहेत. म्हणून त्यांचा मान उपासनेत मोठा आहे. वण्णियार आणि मुतलीयारही या भक्तांमध्ये सामील आहेत. या भक्तांनी द्रौपदीचे वार्षिक उत्सव मोठे गाजते ठेवले आहेत. मस्तकावर करगा म्हणजे घट घेऊन आगीवरून- निखाऱ्यावरून चालत जाणारे देवीचे पुजारी द्रौपदीच्या उत्सवांमधून पाहायला मिळतात.
या देवीचा अभ्यास करणाऱ्या हिल्टबीटलसारख्या अभ्यासकांना वाटतं की द्रौपदी ही एकेकाळची मातृदेवतांपकी एक देवता असावी. संस्कृतीच्या आदिपर्वातली देवता. पुरुष देवांवर वर्चस्व गाजवणारी, अनियंत्रित सत्ता असणारी, सर्जनाची अमर्याद शक्ती असणारी देवता. तिच्या उपासनेत पुरुष गौण होता. कित्येकदा तर तिचा बळीही तोच होता. काळाच्या ओघात पितृप्रधान संस्कृतीनं या देवतांची निरंकुश सत्ता संपुष्टात आणली. मातृदेवतांचं स्वतंत्र महत्त्व संपलं आणि त्या पुरुष देवांच्या सहचरी म्हणून गौण स्थानावर गेल्या. मात्र काही देवतांनी स्वत:ची मूळ ओळख दूर ठेवण्याला नकार देत आपलं आदिम रूप कायम राखलं. त्यांच्या उपासनांना संपूर्ण संस्कृत रूप देणं अभिजनांना शक्य झालं नाही. त्यांच्या उपासनांमध्ये, विधिविधानांमध्ये, क्षेत्रमाहात्म्यांमध्ये, यात्रा-जत्रांमध्ये आणि त्यांच्या चरित्रकथांमध्येही त्या देवतांचं प्राचीन, उग्र आणि स्वतत्र रूप कायम राहिलं. याचं आपल्याकडचं परिचित उदाहरण रेणुकेचं आहे. रेणुकेप्रमाणेच तामिळनाडमध्ये ते द्रौपदीचं आहे. खरं तर आपल्याकडच्या महाकालीची रेणुका ही बहीण मानली जाते आणि गडचांद्याच्या महाकालीचे उपासक जी गाणी म्हणतात, त्यांत महाकाली, रेणुका आणि धुरपतामाय ही एकाच देवतेची रूपं मानून त्यांचा जयजयकार करतात. जिंजीचे पुजारी द्रौपदीसाठी जी तमिळ स्तोत्रं म्हणतात त्यात ते तिला आई म्हणतात आणि तिने जसा पांडवांचा सांभाळ केला तसा आमचाही करावा, अशी विनवणी करतात. एका गाण्यात ती ‘पाच पतींनाही अस्पर्श असलेली कुमारिका’ आहे आणि ‘आदिअरण्यात नांदणारी आदिमाता’ही आहे.
द्रौपदीचं हे ‘आई’चं रूप महाराष्ट्रात फक्त गडचांद्याच्या महाकालीच्या उपासनेत मौखिक गाण्यांत आढळतं आणि कृष्णदास दामा नावाच्या सोळाव्या शतकातल्या एका कवीनं रचलेल्या महाभारताच्या आदिपर्वात, त्यानं गुंफलेल्या एका लोकपरंपरेतल्या कथेत आढळतं. कथा अशी आहे की द्रौपदीसह पांडव वनवासात असताना भीमाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात तो द्रौपदीला देवी म्हणून मंचकावर बसलेली पाहतो. त्या स्वप्नात युधिष्ठिर तिचे पाय चेपत असतो. भीम ते स्वप्न युधिष्ठिराला सांगतो आणि त्या स्वप्नाचा अर्थ विचारतो. तेव्हा मध्यरात्री रानातल्या एका विशाल वटवृक्षाजवळ लपून राहण्याची आणि प्रत्यक्षपणेच सत्य जाणून घेण्याची युक्ती युधिष्ठिर त्याला सांगतो. त्या मध्यरात्री भीम पाहतो ती एका भव्य स्वागताची तयारी आणि मग अवकाशातून, एका दिव्य सिंहासनावर बसून अवतरलेली देवी- द्रौपदी. तिच्यापुढे युधिष्ठिरच नव्हे तर कृष्णासह सारे देव हात जोडून उभे राहतात. तिची स्तुती गातात आणि तिचा आशीर्वाद मागतात. कृष्ण मागतो ते भारती कथेतल्या पांडवांचं प्राणरक्षण. पण ती त्याला तयार होत नाही. तिचा रक्तघट तिला भरून हवा असतो. पांडवरक्षणाच्या बदल्यात रक्तघट पुरा भरण्याचं वचन कृष्ण तिला देतो. त्यानुसार युद्ध घडवतो, कौरव संहार होतो पण रक्तघट पुरा भरत नाही. शेवटी कृष्ण यादव कुळाचा संहार घडवतो आणि स्वत:चं आयुष्य अर्पण करून तो घट काठोकाठ भरून देतो. भीमाला द्रौपदीचं आदिमायेचं रूप उलगडतं आणि आपल्यालाही द्रौपदीच्या मूळ मातृदेवता रूपाचं दर्शन होतं. रक्तघटाची तहान लागलेली ही उग्र देवी, आदिमाता, आदिपुरुष कृष्णाचा बळी घेऊन तृप्त होते.
तामिळनाडमधली द्रौपदी जशी आदिमाय आहे तशी ती कुणाही पुरुषदेवाची सहचरी नाही. कुणाचीही अंकित नाही. ती कुमारी आहे. तिच्याशी रतिसंबंध ठेवायचा, तर मत्स्यभेद करूनच तो अधिकार मिळवायचा. तो अर्जुनानं मिळवला. कर्नाटकात कोलार नावाच्या गावी द्रौपदी मंदिराच्या नवरात्रोत्सवात या कथेचं सादरीकरण होतं.
द्रौपदीच्या व्यक्तित्वातला सकामतेचा तंतू दुर्गाबाईंनी जसा तिच्या आकलनातलं मुख्य सूत्र म्हणून भारती कथेत सूक्ष्मपणे विणला गेलेला पाहिला, तसा तो लोकपंरपरेत अधिक स्पष्टपणे विणलेला आहे. तिचं पंचपतित्व त्याच सकामतेचा एक परिणामस्वरूप भाग आहे. कथा अशी सांगितली जाते की शंकर-पार्वती सारीपाट खेळत असताना माजावर आलेली कामधेनू त्यांनी धावत जाताना पाहिली. तिच्यामागे पुष्कळ गोऱ्हे लागले होते. पार्वती तिला पाहून हसली, तेव्हा रागावून कामधेनूनं शाप दिला की तूही पृथ्वीवर जाऊन पडशील. तुला एकापेक्षा जास्त नवरे मिळतील आणि शंभर कौरव तुझ्यामागे लागतील.
पार्वती ही आदिमाता मानली गेली आहे. तिचं आणि द्रौपदीचं एकरूपत्व या कथेनं स्पष्ट केलं आहेच, पण द्रौपदीच्या व्यक्तित्वातली सकामता आणि त्यामुळे तिच्यावर येणारी संकटं यांचीही सांगड घातली आहे. दुर्योधन-दु:शासनानं तिची स्त्री म्हणून विटंबना करू पाहणं, कर्णानं तिला पाहून गाय गाय म्हणून ओरडणं, तिच्या पंचपतित्वामुळे तिचं चारित्र्य कायम आक्षेपार्ह ठरणं आणि तिच्याशी गरवर्तन करण्याचा मोह पुरुषांना वारंवार होणं या सगळ्याचं मूळ लोकपरंपरेनं घातलेली ही जी सांगड आहे, तिच्यातच आहे. पाच इंद्र आणि इंद्राणी यांनी पांडव आणि द्रौपदी यांचं रूप घेतल्याची कथाही लोकपरंपरेतली याच सारणीची कथा आहे.
महाभारतातली द्रौपदी मुक्तकेशा आहे. तिच्या उपासनेतही मोकळ्या केसांना महत्त्व आहे. दु:शासनाच्या रक्तानं माखलेल्या हातांनी भीमानं तिचे केस पुन्हा बांधले आहेत. रक्त हा मातृदेवता उग्र द्रौपदी देवीच्या संदर्भात अपरिहार्य घटक आहे. ती स्वत: रक्त माखल्यासारखीच आहे. तिला संहाराची, रक्ताची तहान आहे. दुष्टसंहार करावा आणि ते रक्तसिंचन स्वत:वर करून घ्यावं अशी तिची मागणीच आहे. अनेक उग्र देवतांच्या उपासनेत देवतेवर बळीचं रक्त िशपडलं जातं. द्रौपदीच्या भारती कथेत त्या रक्ताचा संदर्भ फार अर्थपूर्णतेनं ओवला गेला आहे.
अभिजात परंपरेनं कदाचित तिला उग्र अशा उपासनेच्या लोकपरंपरेपासून दूर करण्यासाठी काही कथा रचल्याही असाव्यात. एका मुनिकन्येनं तप केलं. शिव तिला प्रसन्न झाला तेव्हा अत्यानंदानं ती त्याला पाच वेळा ‘तूच माझा पती हो’ असं म्हणाली. ती मुनिकन्या पुढे द्रौपदी झाली आणि शिवानंच पाच पांडवांचं रूप घेतलं, अशी एक शोभन कथा आहे.
लोकपरंपरेतली द्रौपदी ही साक्षात् भूदेवता. तिचं मूळचं रूप िहस्र आणि धगधगतं. पुरुषांना आकर्षति करणारं आणि प्रसंगी गिळंकृतही करणारं. महाभारतातल्या द्रौपदीमध्येही तो धगधगता संताप उतरून आलेला आहे. लोकपरंपरेतल्या एका उग्र, आदिम देवतेचा भारती कथेशी असा संबंध पाहिला की एखादं धार्मिक वास्तव साहित्यरूप कसं घेत असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते.
व्यास तर प्रज्ञावंतच होते. सीता म्हणजे नांगरलेली जमीन, पांढर! आणि द्रौपदी म्हणजे न नांगरलेली कुंवार जमीन! जंगली, स्वयंतंत्र. काळी. असाही एक अर्थ या दोघी भूदेवतांचा विचार करताना लागू शकतो.
भूदेवी सीतेला उचलताना समकालीन आदर्शाच्या मुशीत तिला घालण्याचा प्रयत्न वाल्मिकींनी केला. द्रौपदीला मात्र व्यासांनी कोणत्या एका मुशीत घातलं नाही. त्यांनी तिला उचललं ते तिच्या मुळांसकट. म्हणून ती पूर्ण आदिम प्रेरणांनी भरलेली राहिली. तिच्या आदिरूपाचे, त्या रूपांच्या उपासनेचे किती एक घटक तिच्या व्यक्तित्वात आणि आयुष्यकथेत काही तसेच आणि काही थोडय़ा बदलत्या स्वरूपात उरून राहिले. परिणतप्रज्ञ व्यासांच्या प्रगल्भ कृतीत लोक आणि अभिजाताचा अनोखा मेळ जिच्यामुळे घातला गेला ती अस्पर्श द्रौपदी मात्र अजून स्त्रीत्वाच्या रहस्यासारखी दोन्ही परंपरांना भूल घालत सर्वापलीकडे सर्वापासून दूर आणि गूढच राहिली आहे.
– डॉ. अरुणा ढेरे
aruna.dhere@gmail.com