काय जमाना आलाय बघाना. पूर्वी नवीन काही वस्तू म्हणजे फ्रिज, टीव्ही सदृष्य काही चिजा घ्यायच्या झाल्या तर जुन्या जाणत्या लोकांना विचारून चौकशी करून घेतल्या जात. आणि आता मोबाइल, संगणक, लॅपटॉप इतकेच कशाला साधे इंटरनेट जरी घ्यायचे झाले तरी घरातल्या टीन एजर्सचा सल्ला घ्यावा लागतो.
त्या दिवशी मी अलकाला, माझ्या बहिणीला म्हटले की तू तुझा स्वत:चा ई मेल आय डी बनवून घे म्हणजे मला तुला काही बाही पाठवता येईल. त्यावर ती हसून म्हणाली, ‘अगं माझी गुरू (तिची मुलगी) नाहीय ना आता माझ्याबरोबर, ती होस्टेलवर राहायला गेल्या पासून माझी चांगलीच गोची झाली आहे. मलाही तिचे म्हणणे मनोमन पटले, कारण माझीही गाडी माझ्या मुलाशिवाय सुरळीत चालत नाही. मोबाइल, लॅपटॉप यातील ‘डिफिकल्टीज’ सोडवायला त्याच्याशिवाय माझा कोण त्राता!
काय जमाना आलाय बघा ना. पूर्वी नवीन काही वस्तू म्हणजे फ्रिज, टीव्ही सदृश काही चिजा घ्यायच्या झाल्या तर जुन्या-जाणत्या लोकांना विचारून चौकशी करून घेतल्या जात. आणि आता मोबाइल, संगणक, लॅपटॉप इतकेच कशाला, साधे इंटरनेट जरी घ्यायचे झाले तरी घरातल्या टीन एजर्सचा सल्ला घ्यावा लागतो. कारण त्यांना त्यातले जे बारकावे कळतात ते आपल्या डोक्यावरून जातात, काय करणार!
मला आठवतंय घरी नुकताच पी. सी. आणला होता. मला ई-मेल पाठवायला शिकायचे होते. माझा मुलगा तेव्हा खूपच लहान होता, त्यामुळे त्याला विचारायचा काही प्रश्नच नव्हता. नवऱ्याच्या मागे लागून काम झाले असते तर अखिल स्त्री जातीला केवढा आधार मिळाला असता नं. मी सरळ नवऱ्याच्याच ऑफिसातील एकाला गाठले आणि त्याला विचारून स्टेप बाय स्टेप सगळे लिहूनच घेतले. मग त्याबरहुकूम जेव्हा पहिला मेल पाठवला तेव्हा कोण आनंद झाला. लिहून ठेवल्याने विसरण्याचा प्रश्नच मिटला. उगीच कोणी म्हणायला नको, सारखे तेच तेच किती वेळा विचारतेस म्हणून.
सगळ्यात मोठा विनोद तर आम्ही पहिला फ्लॅट स्क्रीन टी. व्ही. घेतला तेव्हा झाला. टी. व्ही.चा मनुष्य घरी सेट बसवून द्यायला आला तेव्हा तो काय काय करतो ते नीट लक्ष देऊन माझा त्यावेळी शाळेत जाणारा मुलगा बघत होता. मी काही त्यात विशेष लक्ष घातले नव्हते. त्या मनुष्याने टी. व्ही. कसा लावायचा, त्यात काय काय सोयी आहेत, कुठले बटन कशासाठी वगरे सांगताना त्यातल्या ‘चाईल्ड लॉक’बद्दलही सांगितले होते, लहान मुलांनी पाहू नये असे काही चॅनल्स लॉक करायची ती सोय होती, तेवढेच माझ्या लक्षात होते. मुलं सारा वेळ कार्टून चॅनेल लावून बसायला लागल्यावर माझ्या मनात आले की ही चॅनल्सच लॉक करावी. पण गंमत म्हणजे ते चाईल्ड लॉक कसे ऑपरेट करायचे ते फक्त माझ्या मुलालाच (घरातला सगळ्यात लहान मेंबर) माहीत होते. आली का पंचाईत!
आजकालच्या तऱ्हेतऱ्हेच्या मोबाइल्सने तर वेड लागायची वेळ आली आहे. ३ जी आणि ४ जी यातला नक्की फरक काय आणि ते घेतल्याने मोबाइलच्या वापरात मला नक्की कशी नि काय मदत होणार आहे ते मला अजून समजले नाहीये. तरी आता व्हॉट्स अॅप आणि फेसबुकची बरीच सवय झालीय. पूर्वी व्हॉट्स अॅप नवीन असताना (म्हणजे माझ्यासाठी) ते हसणारे आणि रडणारे चेहेरे (त्यांना इमोटिकॉन्स म्हणतात, बाहुले काय म्हणतेस, असे मुलाने ऐकवले होतेच) मेसेजच्या खाली-वर आणि मधे मधे कसे टाकायचे ते माहीत नव्हते. दुसऱ्या कोणी ते टाकले की त्या टाकणाऱ्याचा हेवा वाटायचा. मग हळूहळू ते जमायला लागले आणि ते किती सोपे असते तेही समजले ही गोष्ट वेगळी. पण अजूनही माझ्याच मोबाइलवरच्या सर्व सोयी मला माहिती आहेत असे म्हणता येणार नाही. त्यात त्या सोयीच त्रासदायक ठरल्या की मग फजिती विचारायला नको. सुरुवातीला तर मीटिंग चालू असताना किंवा व्याख्यानात बसले असताना एकाएकी मोबाइल वाजायला लागला की तो बंद करताना अशी काही तारांबळ उडायची की विचारूच नका. नवशिक्यांना तर सांगायला नकोच, कारण प्रत्येक नवीन फोनची चालू बंद करायची तऱ्हा निराळी. शिवाय इतरांच्या खवचट नजरांना तोंड द्यावे लागते ते निराळेच. त्याच्याच तोडची अजून एक सोय कम छळवाद म्हणजे तो मोबाइलमधला झगझगीत टॉर्च. तो मेला विनासायास आपोआप लागतो, पण बंद होताना मात्र नाकी दम आणतो. परत आपण शरिमदे.
एकंदरीतच टेक्नोसॅव्ही पण वयाच्या व्यस्त प्रमाणात वाढते त्याला काय करणार! मला माझ्याच मोबाइलमधली सगळी अॅप्स माहिती नाही, पण इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांला असलेला माझा मुलगा कुठलेही मोबाइल दुरुस्त करू शकतो हे कळल्यावर मला तर गहिवरूनच आले. तसेही दुकानातून इलेक्ट्रॉनिक्सचे छोटे छोटे पार्टस् आणून ते एकत्र करून कसली कसली सíकट्स बनवून तो जे काय करत असतो ते तोंडाचा चंबू करून बघण्या पलीकडे मी काही करू शकत नाही. समजणे ही फार पलीकडची क्रिया झाली. ही मुलं ज्या गोष्टी वापरतात त्यांची साधी नावंसुद्धा आपण बापजन्मात ऐकलेलीही नसावीत!
एक दिवस मुलगा म्हणाला, ‘‘आई मी आरडूइनो ऑनलाइन मागवू का? खूप चांगली ऑफर आहे, इतक्या कमी किमतीत परत मिळणार नाही. माझ्या मित्राला याच्या दुप्पट किमतीत मिळाले होते. ऑनलाइन मागवतो आहे म्हणून एवढे स्वस्त मिळतंय.’’ आता हा काय मागवायचे म्हणतो ते मला कळले तर मी हो म्हणीन ना! उद्या हा ऱ्हिनोसेरॉस किंवा डायनॉसॉर ऑनलाइन मागवतो म्हटला तरी कदाचित मी हो म्हणेन. कारण न जाणो, या नावाचे काही तरी इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट असायचे.
गंमत अशी आहे की सध्या जे ५० ते ६० या वयाच्या दरम्यानचे आहेत ते थोडे फार तरी टेक्नोसॅव्ही आहेत, म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी याच कॅटॅगरीतले, पण तरी ते सत्तरी पंचाहत्तरीच्या मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन घेतात. कारण त्या बिचाऱ्यांची तऱ्हा तर अगदी ग्रामीण भागातल्या एखाद्या पोस्टात लेखनिकाकडून पत्र लिहून घेणाऱ्या पाव्हण्यासारखी दयनीय असते. पण ते निदान सरळसरळ मान्य करून मोकळे होतात, पन्नाशीतल्यांसारखे लपवत नाहीत. मोबाइलवर फोन घेता येणे आणि करता येणे एवढय़ा कला जमल्या तरी ते समाधानी असतात. त्यांच्या डिफिकल्टीज सोडवणे तसे सोपे असते. आलेले किंवा येऊन गेलेले फोन कुठे बघायचे, मेसेज बघण्यासाठी काय करायचे, ते फॉरवर्ड करायचे तर काय करावे लागते, आपल्याला मेसेज लिहायचा असेल तर काय करायचे, तो डिलीट कसा करायचा इ.त्यांच्या दृष्टीने गहन प्रश्न सोडवणे तसे सोपे असते. पण..पण मुलं एकदा का संगणकाच्या क्षेत्रातली भाषा वापरायला लागली की मात्र आपली विकेट पडलीच म्हणून समजावे. काही विचारायला गेलो तर मुलं आजकाल चक्क, ‘आई तुला ते समजणार नाही म्हणून करूनच ठेवले आहे, त्याच्या पुढे सुरू कर’ असे म्हणतात. पूर्वी आपण लहान असताना मोठी माणसे आपल्याला हे ऐकवायची आता मुलंही ऐकवतात. असो. कालाय तस्म नम:!
lee.dams@gmail.com
टेक्नोसॅव्ही मुलांचे ‘अशिक्षित’ पालक
साधे इंटरनेट जरी घ्यायचे झाले तरी घरातल्या टीन एजर्सचा सल्ला घ्यावा लागतो
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2016 at 01:40 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Techno savvy generation and their parents