धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जाते आणि गुरू म्हणूनही ज्यांची कारकीर्द भरीव आहे, त्या विदुषी गिरिजादेवी यांना नुकताच पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला, त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठुमरी, चती (म्हणजे चैत्रात गायली जाणारी लोकगीते), कजरी, सावनी, झूला, होरी हे सारे आता हळूहळू लोप पावेल काय, अस्तंगत होणार का काय, अशी शंका यायला लागलेली आहे. हे वाटण्याचे कारण म्हणजे यंदाचा, २०१६ चा पद्मविभूषण सन्मान मिळूनही विदुषी गिरिजादेवी यांच्याबद्दल सगळ्याच माध्यमांनी दाखवलेली अनास्था! आजवर अनेक गायिकांच्या गायकीचा अभ्यास करताना ठुमरीगायक आणि गायकीचा इतिहास आणि वर्तमानकाळ जाणून घेण्याची सुसंधी मिळाली तेव्हा ‘ठुमरीचे ख्यालावरील ऋण’ ही गोष्ट माझ्या अभ्यासाचा विषय झाली. त्यानिमित्ताने गिरिजादेवींच्या कर्तृत्वाचा धांडोळा घेता आला.
पद्मविभूषण गिरिजादेवींची कामगिरी, गायकी आणि कर्तृत्व हे समाजसांस्कृतिक संदर्भातही फार महत्त्वाचे आहे. ठुमरीगायन आणि गायकी जोपासण्याचे काम प्रामुख्याने गायिकांनी केले. विदुषी गिरिजादेवींचा जन्म ८ मे १९२९ चा. त्यानंतरच्या काळात अनेक सामाजिक आणि त्यायोगे सांस्कृतिक स्थित्यंतरे घडून आली. त्या काळात वैचारिकतेला, वैयक्तिक कल्पनाविलासातील विचाराला एकंदर ख्यालगायनात आलेले महत्त्व, त्याला मिळालेली प्रतिष्ठा आणि त्याचा परिणाम म्हणून गायनातील अदाकारी, नखरा यांची कमी झालेली मान्यता यामुळे या काळात ठुमरीगायन मागे पडू लागले होते व कोठा परंपरेला उतरती कळा लागली होती. ठुमरीगायन हे बदलत्या स्वरूपात समोर आले पाहिजे, हे जाणून काही मोजक्याच गायिकांकडून या काळात ठुमरी गायकीत महत्त्वाचे बदल घडविले गेले. त्याचबरोबर ठुमरी गायकीला व गायिकांना या सांगीतिक बदलांमुळे प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केलेला दिसतो.
१८, १९ व्या शतकात व २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोठय़ावर जोपासली गेलेली व आता पांढरपेशा ‘रिस्पेक्टेबल’ समाजात स्थिरावलेली ठुमरी विकासाच्या बऱ्याच टप्प्यांमधून प्रवास करत गेली. सरंजामशाहीचा अस्त, संगीताचे बदललेले आश्रयदाते, बूझ्र्वा समाजाचा आश्रय, त्यातून बदललेली अभिव्यक्तीची परिमाणे, असा हा संक्रमणाचा काळ होता, त्याचे संगीत संस्कृतीवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होणे साहजिकच होते. कोठय़ावर गायिकांचे वर्चस्व होते. शारीरिक भूक भागविण्याचे स्थान, यापेक्षाही कोठा ही एक महत्त्वाचे सांगीतिक अधिष्ठान असलेली संस्था होती. एकीकडे कोठा परंपरेचे सांगीतिक वर्चस्व हे अमान्य करण्यासारखे नव्हते. तरीही त्याविषयीचा सामाजिक दृष्टिकोन दुटप्पी होता. या दुटप्पी सामाजिक नीतीचे परिणाम पचवून या गायिकांनी आपली कला, गायकी वाढवली. गायकांसाठीही कोठा हे गायनाचे महत्त्वाचे ठिकाणही होते. खरे तर अगदी अलीकडेपर्यंतचे अनेक ख्यालगायक हे कोठा संस्कृतीतच वाढले.
विसाव्या शतकातील गायक अमीर खाँ, अब्दुल करीम खाँ, बडे गुलाम अली खाँ यांच्या गायकीवर ठुमरीचा प्रभाव होता. अब्दुल करीम खाँसाहेबांच्या गाण्यातील आर्तता, पुकार, अमीर खाँसाहेबांच्या गाण्यातील लालित्य, बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या गायकीतील भाववाद हे सर्व ठुमरीचे आणि स्त्रीगायकीचे परिणाम! तरीही ठुमरीतील स्त्रीगायकीची व गायिकांची ही कामगिरी उपेक्षितच राहिली. दुसरीकडे पं. वि. दि. पलुस्करांनी आणि पं. वि. ना. भातखंडे यांनी संगीताला लोकशाही परिमाण देऊन ते समाजाभिमुख करण्याचे, त्याला प्रतिष्ठा देण्याचे मोठेच काम केले. पण व्हिक्टोरिअन संस्कृतीचा आणि पलुस्करप्रणालीचा परिणाम काही वेगळाही झाला. संगीतातील शृंगारभावना आणि ठुमरी गायन बाजूला सारले गेले, त्याज्य, वाईट ठरविले गेले. ठुमरी गायिकांनी संगीत बिघडविले असे चित्रण झाले. काय आणि कसे गाते यापेक्षा कोण गाते हे महत्त्वाचे ठरले. स्त्रीने गायचे, पण त्याला कुलीन- शालीनतेचे तत्कालीन समाजमान्य संकेत दिले गेले. त्याच वेळी तांत्रिक क्षेत्रातील प्रगती, ध्वनिमुद्रण, रेडिओसारखी माध्यमे यांनी िहदुस्तानी संगीतात आणि पेशकारीत आणि एकंदरीत संगीत संस्कृतीतच परिवर्तन झाले. गायिकांसाठी हा महत्त्वाचा बदल ठरला. त्यांचे गाणे अशारीरी होऊ शकले.

कालानुरूप स्त्रीवादी चळवळ, स्त्रियांसंबंधीचे कायदे, रीती यात सावकाश बदल होत होते. तांत्रिक सुधारणांमुळे आणि स्त्रीविषयक जागृतीमुळे त्यांच्या गाण्यात बुद्धिप्रधानता येणे किंवा ती वेगळ्या स्वरूपात बाहेर येणे हे स्वाभाविक होते. यातून ख्यालाला जवळ असणाऱ्या बनारस ठुमरीचा हळूहळू उदय व विकास झाला. त्यातही स्त्री कलाकारांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांपकी महत्त्वाचे नाव आहे ते विदुषी गिरिजादेवी यांचे!
तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य मला चक्क पुण्यात एका खासगी बठकीत मिळाले. त्यानंतर कोलकात्यात संगीत रिसर्च अकादमीत त्या गुरू म्हणून नियुक्त असताना त्यांची प्रत्यक्ष मुलाखतही घ्यायची संधी मिळाली. ठुमरीगायनात आपले घराणे अभिमानाने सांगणाऱ्या गिरिजादेवी बहुदा एकमेव गायिका असतील. बिहार-उत्तर प्रदेशचे लोकसंगीत आणि रागसंगीताचा मिलाफ त्यांच्या गायकीत दिसतो. त्यामुळे स्वरस्थानांचे विविध लगाव आपल्याला ऐकायला मिळतात.
वाराणसी येथे जन्मलेल्या गिरिजादेवींना संगीताचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. वडील हार्मोनियमवादक होते. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच त्यांनी गिरिजादेवींना पं. सरजूप्रसाद मिश्र यांच्याकडून गायनाचे शिक्षण दिले. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मदानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या. पं. सरजूप्रसाद मिश्र यांच्यानंतर त्या पं. श्रीचंद मिश्रा यांच्याकडे शिकल्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मफलींमध्ये त्यांच्या चतुरस्र गायकीचे यथार्थ श्रवण घडलेले आहे. त्यांच्या काही ध्वनिमुद्रणांमधून आणि मफिलीतून मिश्र तिलंग, मिश्र काफी, मिश्र पिलू, भरवी, मिश्र देस- ठुमरी, मिश्र गारा दादरा, चती, कल्याण ख्याल, रामकली ख्याल हे राग व ठुमरी- दादरा ऐकायला मिळाले. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची आहे. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात. ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात.
त्यांच्या ठुमरीची लय संथ आहे. लय-तालाचा जाणीवपूर्वक वापर आहे. बोलबनावात खेचकाम आहे. बोल-बाँटची बांधणी वैविध्यपूर्ण आहे. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असते- संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेतात. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजते. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करतात. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात.
धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गातात.
पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या आहेत, अजूनही गातात. त्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेच म्हणतात. घराण्याबद्दल त्या म्हणतात, ‘‘घराण्याची शुद्धता राखावी आणि स्वतचा विचार आणि निर्मितीलाही महत्त्व द्यावे. माझ्या घराण्यानुसार मी पिलू, तिलक कामोद, पहाडी या रागांचा सराव तर करतेच, पण माझ्या ठुमरीमध्ये मी फारसे प्रसिद्ध नसलेले सिंधुरा, गांधारी बहार, देव गांधार असे रागही वापरले आहेत. ‘आली री आयो बसंत सुहावन’ ही पारंपरिक ठुमरी मी खमाज, परज, बसंत, काफी आणि बहार अशा पाच रागांत बांधली आहे.’’
ठुमरीला योग्य दर्जा मिळाला नाही असं त्यांना वाटतं. त्यातील भावदर्शन योग्य प्रकारे झालं नाही म्हणून असं झालं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. ‘‘मीराबाई, सूरदास, तुलसीदास यांच्या भक्तिरचना मला आवडतात, त्या मी गाते, पण स्त्रीचे अंतकरण खुले करणारी मीराबाई मला अधिक भावते.’’ असे त्या म्हणतात.
मी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी परखड असे सांगीतिक आणि सामाजिक विचार प्रकट केले. स्त्री-पुरुष गायकीत फरक आहे तो एकंदर मिजाजमध्येच आहे. कोमलता, नजाकत हे स्त्रीसुलभ आहे तर जोरदार खर्ज, जोरदार गमक हे पुरुषी असते असे त्या म्हणतात. साहित्य आणि संगीताला जोडणे हेच शब्दसंगीतात करायचे असते असा मार्मिक विचार त्या ठुमरीसंगीताबाबत करतात. स्वत: ठुमरीगायनासाठी विशेष प्रसिद्ध असूनही; रागमिश्रणामुळे, मर्यादित तालांचा वापर यामुळे ठुमरी उपशास्त्रीयच हे वस्तुनिष्ठपणे सांगतात. पुरुषात कितीही कोमलत्व असले तरी कठीणता जास्त असते. स्त्रीत मात्र मुलायमता, नरमपणा असतो. अब्दुल करीमखाँ, बडे गुलाम अली खाँयांनी ठुमरी गायली, तरी त्यात स्त्री जे गाते ते येत नाही.
पुरुषांच्या बरोबरीने मला नेहमी मान मिळाला आहे हे त्या अभिमानाने सांगतात. संसार आणि संगीताचा व्यासंग याचा मेळ कसा साधलात, या प्रश्नाला त्यांनी मार्मिक उत्तर दिले. ‘‘आठ-नऊ तास घरकाम आणि उरेल तो वेळ गाणे. ते दिवस मला आठवायचे देखील नाहीत.’’ तरीही संसाराचा अनुभव, त्यातील भाव-भावनेचे खेळ हे गायनाला पूरक ठरतात त्याशिवाय जीवन अधुरे राहते हेही त्यांनी आवर्जून सांगितले. नवऱ्याचा पािठबा होता, पण खासगी मफली करण्यास विरोध होता. जाहीर मफिली करायच्या असे सांगितले होते. सुशिक्षित, सुसंस्कृत घरातल्या मुली गायला लागल्या तेव्हाच संगीताला प्रतिष्ठा मिळाली हे त्यांनी नमूद केले.
वाग्गेयकार आणि मफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटते, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले आहे. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलतात. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणतात की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही.
त्यांना अनेकानेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. पद्मविभूषणशिवाय तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी आहेत.
गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. आजही त्या शिकवतात. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आम्हाला शिकवले असे त्यांच्या शिष्या सुनंदा शर्मा सांगतात. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करताहेत. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जातो.
घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे असे आपल्या शिष्यांना त्या सांगतात. घरकामही रंगतदार आणि मन लावून करावे असे त्यांना वाटते. त्यांचा हा वारसा त्यांच्या अनेक शिष्या आणि वि. शुभा जोशी, वि. धनश्री पंडित राय, वि. अश्विनी टिळक, वि. शुभा मुद्गल असे कलाकार जपतील अशी आशा करायला आपल्याला वाव आहे, असे सद्य:स्थितीवरून दिसते आहे.

संदर्भ :
१. Women and Music: A case of North India : Amlan Dasgupta: Jadhawpur University kolkata.
2. Girija A journey through Thumri: Yatindra Mishra: translated by Madhu B. Joshi 2006 Roopa & Co, New Delhi.
३. गायिका अन् गायकी : डॉ. शुभदा कुलकर्णी, अमलताश पब्लिशर्स, पुणे- २०११

shubh. sangeet@gmail. Com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thumri singer and guru girija devi