एकीकडे आईबद्दलच्या पारंपरिक, वर्षांनुवर्षे मनावर बिंबवल्या गेलेल्या आईपणाच्या कल्पना आणि दुसरीकडे बदलत्या काळानुरूप नोकरी-करिअरच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:ला सिद्ध करत राहावं लागणं. या सगळ्यात ‘आई’ नावाच्या माणसाची प्रचंड ओढाताण होते. ‘आई’ म्हणून सर्व कर्तव्यं उत्तम बजावत असूनही मी मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, इथपासून मुलं मला काही मोकळेपणानं सांगत नाही म्हणजे माझच काही तरी चुकत असणार इथपर्यंत अनेक गोष्टींनी आजच्या अनेक माता अपराधी भावनेनं घेरलेल्या असतात. आणि हाच अपराधभाव त्यांना माणूस म्हणून आनंदाने जगूही देत नाही. कसं पडावं यातून बाहेर.. उद्याच्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त खास लेख.
‘दृश्यम्’ चित्रपटातील तब्बू आठवते? प्रामाणिक तडफदार, कर्तव्यदक्ष नि कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी! एका केसच्या निमित्ताने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या संदर्भातले सत्य समोर आल्यावर आई म्हणून एखाद्या ढेकळासारखी विरघळते; नव्हे अपराधी भावनेने इतकी ढासळते की नोकरीच काय देश सोडून निघून जाण्याचा निर्णय घेते. कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी ते अपराधदग्ध आई हा अभिनयातून, देहबोलीतून तब्बूने दाखवलेला प्रवास लाजवाब. तिने ही एक भूमिका साकारली होती, मात्र आज आई नावाची व्यक्ती मुलांच्या अपयशाने अशी कोलमडून पडताना अनेकदा दिसते, तसंही मुलांसंबंधीची अपराधी भावना कधीच न शिवलेल्या आया दुर्मीळच! विशेषत: भारतात!
आपल्याकडे आईपणाची व्याख्या केव्हाचीच ठरवून टाकलेली आहे. आई म्हणजे मूर्तिमंत सहनशीलता. आई म्हणजे कुटुंब, मुलं यांच्यासाठी कोणत्याही त्यागास तयार असणारी त्यागमूर्ती. कुठल्याही गरजांना कधीही कमी न पडणारी, वेळप्रसंगी स्वत:च्या अडचणी, त्रास, व्यथा, दुखणं-खुपणं सारं बाजूला ठेवून कुटुंब-मुलांसाठी उभी राहणारी आणि बरंच काही. मुलांना ‘वळण लावणं’ हे प्राय: तिचंच काम – मुलं बिघडली तर त्याला ती जबाबदार, म्हणजे ती कठोर राहिली तर तिला स्वत:च्या मुलांबद्दल प्रेमच नाही; आणि ती प्रेमाने, समजुतीने वागली तर तिच्या लाडामुळे, काळजीमुळे, अति प्रेमामुळे मुलं बिघडली वा शिक्षणात-नोकरीत प्रगती करू शकली नाही इत्यादी इत्यादी. ‘आई कशी असावी’ आणि ‘आई कशी नसावी’ याचं आपल्या समाजात वर्षांनुवर्षे ‘कंडिशनिंग’ होत आलेलं आहे!
आयांच्या अपराधी भावनेचा जन्म आपल्या सांस्कृतिक वारशातून आलेल्या पारंपरिक मूल्यांच्या याच दडपणातून होतो, असं आपल्याला वाटतं का? प्रत्येक स्त्रीचा स्वभाव वेगवेगळा आणि त्यामुळे पालकत्वासंबंधीचं वर्तन वेगवेगळे, हे तर खरंच. परंतु, स्त्रियांनी नेहमी दुसऱ्याचे वर्चस्व स्वीकारून परावलंबी भूमिका बजावावी, ही अपेक्षा आजही कित्येक घरांत केली जाते. वयाने वा हुद्दय़ाने लहान असणे म्हणजे वरचढ व्यक्तीच्या अंकित राहणे गरजेचे आहे, असे बरेच लोकांचे मानणे असते. एखाद्याने ते जुमानले नाही तर समाजाच्या दबावापुढे अशा व्यक्तीला ऐकून घेण्याशिवाय पर्याय तरी ठरत नाही किंवा तिनं वेगळा पर्याय निवडल्यास आयुष्यभर ऐकून घेण्याची किंमत तरी मोजावी लागले. परावलंबन -मग ते मानसिक, आर्थिक, वैचारिक कोणतेही असो- सक्तीतून येणारे, सवयीचे झालेले वा लादले गेलेले, ते व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारकच ठरते. अशा भावनिक-मानसिक अस्वास्थ्यातून अपराधी भावनेचा जन्म होतो.
एकीकडे आईबद्दलच्या पारंपरिक चांगल्या-वाईट संकल्पनांचं वर्षांनुवर्षे मनावर बिंबवलं गेलेलं, क्वचित गळीही उतरवलेलं सो कॉल्ड ‘आदर्श’ वागण्याचं ‘कंडिशनिंग’. दुसरीकडे बदलत्या काळानुरूप आलेल्या नोकरीच्या, करिअरच्या मागण्या; विविध प्रकारचे दबाव (प्रेशर) स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत स्वत:ला सिद्ध करत राहावं लागणं; त्यासाठी खर्ची पडणारी शारीरिक, मानसिक, बौद्धिक ऊर्जा; या सगळ्यात ‘आई’ नावाच्या माणसाची प्रचंड ओढाताण होते! बाहेर अत्यंत आत्मविश्वासाने वागणारी, कामात अत्यंत हुशार, चोख, सक्षम असलेली स्त्री, घरात प्रवेश केल्यावर मात्र ‘आई’ म्हणून अनेकदा स्वत:चाच आत्मविश्वास गमावून बसते; ‘आई’ म्हणून सर्व कर्तव्यं उत्तम बजावत असूनही! मी मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यांच्या वेळात मला घरी राहता येत नाही, त्यांना बाईच्या हातचा स्वयंपाक खावा लागतो, इथपासून त्यांच्या अभ्यासात मला पुरेसं लक्ष घालता येत नाही इथपर्यंत कोणत्याही गोष्टीबद्दल तिला अपराधी वाटत राहतं (मुलं परदेशात गेल्यावर अनेक पदार्थ करण्या-खाण्याबद्दल उदासीन झालेल्या स्त्रियाही आहेत!). त्यात मूल आजारी असेल, महत्त्वाच्या मिटिंगमुळे रजा घेता आली नसेल (आणि घरी आल्यावर ते दिवसभर आईची कशी आठवण काढत होतं हे सांगितलं गेलं असेल) तर कित्येकदा या अपराधी भावनेने स्त्रिया शांत झोपूही शकत नाहीत. भरीला मूल अभ्यासात घसरलं, गुण कमी मिळाले, शाळा-कॉलेजमधून गैरवर्तणुकीच्या तक्रारी आल्या तर जास्तीत जास्त वेळा आयांना जबाबदार धरण्याकडे कल असतो. काही घरातून तर ‘बिघडलेल्या’(?) मुलाचं सर्व खापर आईच्या अनेक प्रकारच्या अक्षमतेवर, मुलांकडे दुर्लक्ष करण्यावर, बेजबाबदार(?) वर्तणुकीवर फोडलं जातं. मुलांनी पालकांच्या मनाविरुद्ध लग्न करणं, त्यातही आंतरजातीय-आंतरधर्मीय, भरीला पळून जाऊन किंवा अयोग्य संगत, व्यसन लागणं म्हणजे तर कडेलोटच. व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना याच्या/ हिच्या व्यसनाला ही (म्हणजे आई किंवा पत्नी) जबाबदार आहे, असा सरळसरळ ठपका ठेवला गेलेली कित्येक प्रकरणं बघायला मिळतात.
अनेकदा तर असं आढळतं की कोणी असा ठपका ठेवतं असंही नाही. आया आपल्या आपणच अपराधी भावनेत जगताना दिसतात. आमच्या एका परिचित कुटुंबातल्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं. सारा भावनेचा मामला. मुलगा ना फारसा शिकलेला, ना फारसा कमावता. घरातली पाश्र्वभूमी संपूर्णत: भिन्न. मुलीने कधीच न पाहिलेली व अनुभवलेली. हे नातं पन्नास र्वष निभणं अवघडच वाटत होतं. परंतु मुलगी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. समुपदेशनालाही तिने दाद दिली नाही. हे सर्व प्रकरण वर्ष-दोन र्वष चालू होतं. परंतु तिने घरच्यांपासून लपवलं – या सगळ्याबद्दल मुलीच्या आईला कुणी दोष दिला नाही, परंतु तिने स्वत:वरच याचा इतका आघात करून घेतला की अपराधी भावनेने तिला पूर्णपणे वैफल्यात ढकललं. ‘तिने मला काही सांगितलं का नाही, ती माझ्याशी मोकळेपणाने बोलली का नाही, वर्षभर हे चाललंय नि मला समजलं कसं नाही,’ असे स्वत:लाच प्रश्न विचारत ‘आई’ म्हणून माझंच चुकलं असा समज तिने करून घेतला आहे. या ‘अपराधी गटात’ मोडणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींच्याही कित्येक आया या गटात येतात!
दुसरा गट आहे वडील/ आजी-आजोबा आणि मुलं यांच्यामध्ये ‘सँडविच’ होणाऱ्या आयांचा! नुकतंच एक प्रकरण माझ्यासमोर आलं. वडील म्हणजे पुरुषप्रधान समाजाचं मूर्तिमंत प्रतीक. अतिशय वर्चस्व गाजवणारं, कुणाचंही न ऐकणारे, मी म्हणेन ती पूर्व दिशा! बायको अतिशय मवाळ, त्यांच्यावर अवलंबून. तिने आयुष्यभर त्यांचे ऐकून घेत स्वत:ची घुसमट करून घेतली. मुलं नव्या पिढीची. ती विरोध करू लागली, त्यातील एक जण अतिशय हुशार. पण आक्रमक, बंडखोर होऊ लागला. आपला नवरा कसा आहे हे माहीत असल्याने पत्नीने समजुतीने परिस्थिती सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला. मुलं म्हणायला लागली. ‘तू नेहमी त्यांचं ऐकून घेतलंस, कधीच तुझं मत नोंदवलं नाहीस, त्यांच्या अयोग्य गोष्टींना विरोध केला नाहीस. म्हणून त्यांचा स्वभाव पोसला गेला आणि त्याचा त्रास आता आम्हाला होतोय!’ नवरा म्हणाला, ‘तू मुलांना पाठीशी घातलंस, लाडावलंस म्हणून मला ती उलट उत्तरं करतात.’ माझ्याकडे आली तेव्हा अपराधीपणाच्या ओझ्याने त्या बाईची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली होती! अनंत प्रकारच्या आजारांनी ग्रासली होती. कुणाकडे तरी व्यक्त होण्याची तिला नितांत गरज होती.
एका घरातील आईला वडिलांच्या सतत फिरतीमुळे आणि परदेशातील नियुक्तीमुळे बराच काळ मुलांचं एकेरी पालकत्व करायला लागलं. मुलं हुशार होती. आपल्या मुलांना सर्वागांनी उत्तम घडवायचं ही आईची जिद्द; काहीसं एकांगी ध्येय आणि त्याबद्दल थोडा आग्रहसुद्धा. त्यामुळे सर्व बाबतीतली शिस्त, काटेकोरपणा, त्याविषयी आग्रह हे ओघानेच आले. आई गृहिणी असल्यामुळे (नवऱ्याच्या कामाच्या स्वरूपामुळे) तिने तिचं सगळी ऊर्जा पालकत्वातच ओतली. मुलं मोठी झाल्यावर म्हणाली, ‘तुझी शिस्त आम्हाला जाचक व्हायची. कधी कधी तुझी भीती वाटायची. तू पालक म्हणून चांगली आहेस, पण फारच क्वचित तू आमची आई झालीस.’ मुलांच्या या शब्दांनी तिच्यावर इतका खोलवर घाव केला की आजही त्या अपराधी भावनेतून बाहेर येण्यासाठी तिला स्वत:शीच झगडावं लागतं. आपली इच्छा, हेतू चांगलेच होते, पण ते राबवण्याच्या पद्धती सर्वाना सामावून घेणाऱ्या नव्हत्या. हे आज तिला कळतं; ती तिच्या चुका मान्यही करते; परंतु तेव्हा आपण अशा का वागलो ही भावना तिला अधूनमधून छळत राहतेच.
अशाच एकाअपराधीपणाच्या भावनेने दग्ध अशी एक मुलगी नुकतीच भेटायला आली होती. जोडीदाराची काही मानसिक समस्या होती. तो कोणत्याच उपायांना तयार नव्हता. अत्याचार सोसत तिने काही वर्षे जमवून घ्यायचा प्रयत्न केला. मूलही झालं. नंतर त्रास इतका वाढत गेला की ती घराबाहेर पडली. यातून मार्ग काढण्याचे त्याने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. मात्र मुलाला तो भेटत राहायचा आणि वडील म्हणून त्या थोडक्या वेळात मुलाशी अतिशय व्यवस्थित वागायचा. आपल्या निर्णयामुळे मूल वडिलांपासून दुरावलं, ही अपराधी भावना तिला इतकी खाते आहे की ती दुसऱ्या लग्नालाही तयार नाही. त्यामुळे वडील-मुलाचं उरलंसुरलं नातंही संपेल ही तिची खंत-भीती.
खरं तर फक्त आयाच चुकतात का? सर्वच माणसं चुकत असतात, त्यातून शिकत असतात. अनुभवाने शहाणी होत असतात. परंतु, आई ही आधी माणूस असते, नि मग आई होते हे समजून घेतलं तर ना? आणि माणूस म्हणून ‘आई’ ही तिची एक भूमिका आहे. त्या व्यतिरिक्त मुलगी, बहीण, गृहिणी, पत्नी, सून, सासर-माहेरची इतर नाती, नोकरी करणारी/ व्यावसायिक/ करिअरिस्ट, मैत्रीण अशा तिच्या अनेकानेक भूमिका आहेत. या प्रत्येक भूमिकेची आपली-आपली व्यवधानं, कर्तव्य, जबाबदाऱ्या हे सारं-सारं एकाच आयुष्यात सांभाळायचं असतं. या शिवाय तिचं स्वत:चंही एक अवकाश (२स्र्ूंी) असणं गरजेचंआहे. एक व्यक्ती म्हणून तिची स्वत:ची वेगळी ओळख आहे, स्वत्व आहे. तिचा स्वत:चा व्यायाम, आवडी-निवडी, छंद, विविध कला-कौशल्य, अवांतर उपक्रम या सगळ्यातून ती तिचं मनोस्वास्थ्य, आनंद, समाधान टिकवत असते. तिची बॅटरी ‘रिचार्ज’ करत असते.
स्त्रीने स्वत: आधी हे समजून घेतलं नि त्यानुरूप सुयोग्य वर्तन केलं, तर तिला कुणी फक्त ‘आई’ म्हणून गृहीत धरणार नाही! तिनेही आपल्या स्वत्वावर आक्रमण होईल इतकी भावनिक नि शारीरिक गुंतवणूक कुठल्याच एखाद्-दुसऱ्या भूमिकेत वा नात्यात करू नये. अगदी आईच्यासुद्धा. एकीकडे पारंपरिक मूल्यांचं दडपण, दुसरीकडे बदलत्या जीवनमानाच्या वाढत्या अपेक्षा/ मागण्या/ ताण. तिसरीकडे प्रत्येक गोष्टीला स्वत:ला जबाबदार धरण्यातून वा इतरांचे दोषारोप खरे मानून स्वत:च्या मनाला लावून घेण्याच्या ‘सोशली कंडिशन्ड’ मानसिकतेतून येणारी अपराधीपणाची भावना या सगळ्याचा प्रचंड ताण ‘आई’ नावाच्या स्त्रीवर येतो. तो तिच्या चिडचिडीतून, वैतागून केलेल्या बडबडीतून प्रगट होतो. त्याबद्दलही परत वर ऐकून घ्यावं लागलं की मन व्यथित होतं. असाहाय्य वाटतं. आपल्याला कुणीच समजून घेत नाही, असं वैफल्य यायला लागतं.
भावनांच्या नियोजनात अपराधी भावनेत रुतणं ही सर्वात त्रासदायक आणि एका अर्थाने निरुपयोगी आणि विनाशकारी भावना आहे. तिने कुणाचंच काही भलं होत नाही. उलट घायाळ होते म्हटल्यावर दुसरा वार करतंच राहतो. त्यातून बाहेर येण्यासाठी प्रथम माणूस म्हणून आपल्या स्वत्वाची भावना आधी जागी आणि नंतर समृद्ध करायला हवी. प्रत्येक माणसात गुण-दोष हे असणारच. ते स्वीकारून, स्वत:च्या चुकांसाठी स्वत:ला थोडी सवलतही द्यायला हवी. त्यासाठी दुसरे काय म्हणतात, यापेक्षा स्वत:वरचा विश्वास अधिक महत्त्वाचा. चुकीबद्दल जागरूक जरूर असावं. क्वचित पश्चात्तापही होईल. मात्र मोकळेपणाने त्याची जबाबदारी घेऊन वर्तनात बदल केल्यास आत्मविश्वास दृढावेल. यातूनच स्वत:च्या मताबद्दल, विचारसरणीबद्दल, सुयोग्य असा ठामपणा, सकारात्मकता येईल. मनावर होणाऱ्या आघातांपासून आपणच आपला बचाव करायला शिकू. मधूनमधून आपले गुण, कर्तृत्व, आपण पार पाडत असलेली त्याची ‘फिल गुड’भावनाही असावी. कर्तव्य, निभावत असलेल्या जबाबदाऱ्या याचीही स्वत:ला आठवण करून द्यावी. ‘आदर्श आईपणा’ची झूल उतरवून ठेवावी. मुळात आदर्श असं काही नसतंच!
आपल्या मुलांची नवीन पिढी काळानुरूप खूप व्यावहारिक झाली आहे. त्यांना मिळालेल्या एक्सपोझर आणि संधींमुळे ती स्वतंत्र विचारांची झाली आहे. शिक्षण असो वा करीअर. त्यातील स्पर्धेत टिकून राहताना काहीशी स्वकेंद्रितही झाली आहे. हे लक्षात न घेता आधी २४स्र्ी१-६ेंल्ल २८ल्ल१िेीह्ण ने ग्रासलेल्या बायका नंतरीेस्र्३८-ल्ली२३ २८ल्ल१िेीह्ण ने ग्रासतात. अपराधी भावनेचा प्रकार फक्त बदलतो. आधी ‘मला मुलांकडे पुरेसं लक्ष देता आलं नाही.’ आता ‘मुलं माझ्याकडे पुरेसं लक्ष देत नाहीत!’ शिवाय मुलं मला काही सांगत नाहीत, माझ्यापासून लपवतात अशी ही टोचणी सतत असते. बदलत्या काळात पालकत्व आव्हानात्मक झालं आहे, यात वाद नाही; कारण मुलावर आता पालक, कुटुंब, घर याबरोबरच बाहेरच्या अनेक गोष्टींचा, वातावरणाचा, समवयस्कांचा प्रचंड प्रभाव आहे. कित्येक ठिकाणी मुलं १८ वर्षांपासून घराबाहेर पडतात. स्वतंत्र झाली की स्वावलंबीही होतात. स्वाभाविकपणे त्यांच्या वर्तनात बदल घडतात. ती घराइतकीच किंबहुना जास्तच, घराबाहेरच्या विश्वाशी जोडली जातात. अशा वेळी पालकत्व कुठे पकडून ठेवायचं नि कुठे सोडायचं (लेट गो) याचा विवेकी निर्णय घ्यावा लागतो. विश्वास टाकावा लागतो.
आईसाठी हा एकीकडे पारंपरिकता आणि दुसरीकडे आधुनिकता याचा लढा आहे आणि लढा सोपा नसतोच नाही का? या दोन्हीच्या मधली रेषा पकडता येणं हे आव्हान आहे! ते पेलू यात. अपराधी भावनेत रुतण्यापेक्षा आव्हान स्वीकारून वाढत समृद्ध होत राहणं हेच सशक्त मनाचं लक्षण नाही का? ‘स्वत:च्या या सशक्त, निरोगी मनाकडे होणाऱ्या प्रवासासाठी आपणच आपल्याला शुभेच्छा देऊयात उद्याच्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त आपल्या कुटुंबातील प्रत्येकाकडे नव्याने बघायला शिकूयात. आणि मुख्य म्हणजे स्वतकडेही..
vankulk57@yahoo.co.in