अकोल्याच्या चैताली राठोडचं लग्न ठरलं. लाडक्या लेकीच्या लग्नाची सारी तयारी झाली. तिच्या आई-वडिलांनी तिच्या संसाराला उपयोगी पडतील अशा वस्तूंनी लग्नाचा रुखवत सजवलाही. पण लग्नाच्या काही दिवस आधी चैतालीला समजले की तिच्या होऊ घातलेल्या नवऱ्याच्या घरी शौचालय नाही. त्यावर मात्र चैतालीचा स्वाभिमान जागृत झाला. उघडय़ावर जाण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. लग्न तर करायचं होतं. मग तिने एक सुवर्णमध्य काढला आणि रूढीपरंपरांना छेद देत आपल्या लग्नातील रुखवतामध्ये नेहमीच्या वस्तूंऐवजी एक ‘प्रिफॅब्रिकेटेड टॉयलेट’ दिले जावे अशी इच्छा वडिलांजवळ व्यक्त केली. तिच्या या इच्छेचे सर्वानी स्वागत केले आणि तिला तो मिळालाही. लग्नाच्या रुखवतात इतर सामानांऐवजी ‘प्रिफॅब्रिकेटेड टॉयलेट’ ही अभिनव संकल्पना आता अनेकींनी उचलून धरली आहे.
विदर्भातील वाशिम जिल्ह्य़ातील सायखेड या गावातील संगीता अव्हाडे. अनेक वर्षांपासून ती तिच्या पतीजवळ घरी शौचालय बांधा, म्हणून आग्रह करीत होती. उघडय़ावर जाणे तिलाही असह्य़ होत होते. शेवटी काहीही झाले तरी शौचालय बांधायचेच हे तिने मनोमन ठरवले. पैशांचा प्रश्न होताच, पण आपल्या अस्मितेपेक्षा तो मोठा नव्हता. तिने स्वत:चे सोन्याचे मंगळसूत्र विकले आणि पैसा उभा केला. आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मंगळसूत्र विकून शौचालय बांधणाऱ्या संगीताच्या या धाडसी कृतीचे नंतर कौतुकही केले गेले.
सुवर्णा लोखंडे. ही खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातील स्त्री म्हणावी लागेल. बाहेर, उघडय़ावर शौचालयाला जाणे तिलाही कदापि मान्य नव्हते. कारण तिच्याही अस्मितेचा तो प्रश्न होता. हाताशी पैसे लगेचच मिळणे शक्य नव्हते. पण ते पैसे आपण नक्की मिळवू याची तिला खात्री होती म्हणून तिने बचत गटातून कर्ज काढले आणि आपल्या घरी शौचालय बांधले. तिचा हा सामंजस्याचा विचार सगळ्यांसाठीच महत्त्वाचा ठरणारा आहे.
या तीनही स्त्रिया. घरात शौचालय नसल्याने रोजच्या रोज होत असलेली कुचंबणा त्यांना असह्य़ होत होती. यावर मार्ग म्हणजे काही धाडसी पाऊल उचलणे त्यांना भाग होते. त्यांनी ते उचलले आणि अनेक शहरी आणि गावपातळीवरील असंख्य स्त्रियांसाठी ते आदर्शभूत ठरले. तिघींच्या या कृतीचा यथोचित गौरव म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर स्त्रियांनीदेखील स्वच्छता व आरोग्य यांना प्राधान्य दिले तर संपूर्ण कुटुंबालाच त्याचा फायदा होईल. स्वच्छ घरे-परिसर, स्वच्छ गाव, स्वच्छ शहर असे हे हळूहळू पुढे सरकणारे कार्यक्रम आहेत.
भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना जी महत्त्वाची आव्हाने भारतापुढे आहेत त्यात ‘स्वच्छता’ हे सर्वात मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण मोठमोठे उद्योग उभारले, धरणे बांधली, रेल्वे, रस्ते, विमानसेवा अशा अनेक बाबींत आपण खूप प्रगती करीत राहिलो आहोत, पण ‘स्वच्छता’ हा आतापर्यंत आपल्या देशात सर्वाधिक दुर्लक्षित विषय राहिला आहे.
संतांची भूमी म्हणवणाऱ्या आपल्या महाराष्ट्राने संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेविषयक उपदेशांना पुस्तकांमध्ये किंवा कथा-कीर्तनांमध्ये गुंतवून ठेवले. प्रत्यक्ष आचरणात मात्र आपण सुधारणेला भरपूर वाव ठेवला आहे. म्हणूनच केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत’ ही योजना सुरू करून ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ टाकण्यास सर्व भारतीयांना प्रवृत्त केले आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या आचरणातून जो स्वच्छतेचा मूलमंत्र सर्वाना दिला त्यालाच पुन: नव्याने उजाळा देत २०१४ मध्ये महात्मा गांधींच्या जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा शंख फुंकला. त्याचबरोबर ही योजना केवळ मोठमोठी मेट्रो शहरेच नव्हे तर भारतातील प्रत्येक जिल्हा, गावे, खेडो-पाडी, वाडय़ावस्त्यांवर, तसेच नद्या, ओढे, नाले आदीसोबतच कचरा व मलनिस्सारण आदी यांसाठीही राबवण्यात यावी असेही निर्देश दिले.
महाराष्ट्राने ‘एक कदम स्वच्छता की ओर’ यापलीकडे जाऊन ‘सप्तपदी स्वच्छतेची’ ही योजना सुरू केली ती १५ मे २०१५ रोजी. स्वच्छता हे एका दिवसापुरते ‘फॅड’ नसून सतत करत रहावी लागणारी प्रक्रिया आहे, हे यातून सूचित केले गेले. गेल्या मे-जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय पातळीवर कार्यशाळा घेतल्या आणि सर्व नगराध्यक्षांना व मुख्याधिकारी यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि ही योजना जोमाने कार्यान्वित झाली. ३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत सुरू असलेल्या या योजनेत संपूर्ण महाराष्ट्रातूनच उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. आज राज्यातील ५२ शहरे आणि संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त झाली आहे. या यशस्वीतेची पोचपावती म्हणून राज्य सरकारने आयोजित केलेल्या कौतुक समारंभात स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्या नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी एक अचंबित करणारी गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे या एकूण नगराध्यक्षांपैकी ६५ टक्के या महिला नगराध्यक्षा आहेत आणि त्यांनी आपापल्या परिसरात ही योजना यशस्वीपणे राबवून स्त्रियांच्या हाती सत्ता आली की ती काय चमत्कार घडवू शकते हे दाखवून दिले. खरं तर राजकारणात स्त्रियांना आरक्षण देण्याला सुरुवात झाली त्याला २० पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत, तरीही आज अनेक जण त्याचा फायदा काय झाला असं विचारून महिला आरक्षणाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. त्यांना या सगळ्या नगराध्यक्षांनी आपल्या कृतीने सक्षमपणे उत्तर दिले आहे. समर्पक चपराकच म्हणू या ना.
थोडं विषयांतर करत एक किस्सा इथे मुद्दाम सांगावासा वाटतो. अमरावतीला मी १९९७ साली महानगरपालिका आयुक्त म्हणून काम करत असताना एका नगरसेविकेचा पती मला भेटायला आला. आपल्याच गुर्मीत त्याने मला सांगायला सुरुवात केली की वार्डात आरक्षण लागल्याने त्याने पत्नीला त्याच्याऐवजी निवडणुकीत उभी केली आणि म्हणून ती नावापुरती नगरसेविका आहे. सगळे काही त्याच्याच हाती आहे. खरे तर ही बाई अतिशय कष्टाळू आणि बुद्धिमानही आहे. नंतर ती स्थायी समितीची अध्यक्षही बनली. ती एकदा मला मुंबईत भेटली. नवरा सोबत नसल्याने मोकळी बोलली. म्हणाली, ‘‘मी तर म्हटले नवऱ्याला की सगळे मीच पाहतो असे सांगत फिरता तर आता मी मुंबईला परिषदेसाठी जाते आहे, मुलीचा अभ्यास तेवढा घ्या. तर तो धांदरला. मी गेली कित्येक वर्षे घर आणि बाहेरची दोन्ही ठिकाणची कामे करते, पण याला साधा मुलीचा अभ्यास घेता येईना!’’ तिचं खरंच कौतुक वाटलं.
येत्या महिला दिनाच्या निमित्ताने अशा स्त्रियांचं कौतुक करायला हवेच. कारण हा प्रवास आता अधिक जोरकसपणे होण्याची गरज आहे.
आपल्या राज्यात १५ मे पासून जे स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबवले जातेय त्यातूनही काही रोचक तथ्ये पुढे आली. त्यातही अनेक स्त्रियांचा सहभाग मोलाचा ठरला आहे. हे अभियान यशस्वी करून दाखवण्यामागे स्त्रीशक्ती वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर हिरिरीने उभी ठाकली आहे. सरकारी पातळीवरही स्त्रियांचा स्वच्छता अभियानातील सहभाग कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्रातले महाबळेश्वर-पाचगणी हे पर्यटकांचे आवडते स्थान. इथला टेबल पॉइंट, पारसी पॉइंट, सिडनी पॉइंट जसा प्रसिद्ध तसाच कचरा पॉइंट कुप्रसिद्ध! वर्षांनुवर्षे इथे गावातील कचरा सव्वा एकर जागेवर आणून टाकला जात होता. पण मे २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानाअंतर्गत या कचऱ्याला संपत्ती मानून त्याचे वर्गीकरण, विघटन आणि प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत बनवले जाते. नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर आणि मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ या दोघींच्या परस्परांतील सामंजस्य व समन्वयाने इथल्या कचरा पॉइंटचे रूपडे असे काही पालटले की तो ‘स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र’ पॉइंट म्हणून प्रसिद्ध झाला असून पर्यटक त्याला अवश्य भेट देतात.
उमरेडच्या नगराध्यक्षा कुंदाताई पवनीकर आणि राजापूरच्या नगराध्यक्षा मीनल मालतेकर व मुख्याधिकारी रंजना घगे यांनी तर उघडय़ावर शौचाला जाणाऱ्यांना जरब बसावी म्हणून एक अभिनव संकल्पना राबवली. गुलाबाचे फूल देऊन ‘गेट वेल सून’ अशा सदिच्छा देत समोरची व्यक्ती शरमेने ओशाळवाणी होईल आणि कदाचित योग्य मार्ग निवडेल असा एक फंडा ‘मुन्नाभाई’ राबवतो. त्याचेच अनुकरण करत कुंदाताई आणि मीनलताईंनी भरारी पथकाच्या माध्यमातून उघडय़ावर शौचास जाणाऱ्यांवर नजर ठेवून एक गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला आणि ‘गेट वेल सून’च्या सदिच्छाही दिल्या. या लोकांना आपली चूक उमजून आली आणि आता इथे कोणीही उघडय़ावर शौचास जात नाही. कुंदाताईंनी तर यापुढे जाऊन अशा लोकांना चक्क दंड ठोठावला आणि ६० हजार रुपये दंड वसूल करून याच योजनेसाठी तो खर्च केला.
कागलच्या नगराध्यक्षा संगीता गडेकर यांनी हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केलेच, पण त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण करून ऊर्जानिर्मितीचा उपक्रम सुरू केला. त्यांनी आपल्या गावाला स्वच्छता अभियान उत्कृष्टपणे राबवणारे आदर्श शहर बनवले आहे.
येत्या महिला दिनाच्या निमित्ताने या सर्वाचे कौतुक करत असताना महिला दिन हा केवळ औपचारिक दिन राहू नये याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. २००१ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तिथल्या महिला सरपंचांनी केलेली मार्मिक टिपणी आठवते आहे. तिच्या मते ‘हा दिवस म्हणजे ‘बैलपोळा’ असतो. एक दिवस कोडकौतुक आणि बाकी वर्षभर राबण्यासाठी!’ किती खरे होते तिचे! पण आज स्वच्छता अभियानातील सिंहाचा वाटा उचलणाऱ्या स्त्रियांचं कौतुक करताना या स्त्रिया महिला दिनाच्या कितीतरी पुढे गेल्या आहेत याची खात्री पटते. १९७० च्या दशकापासून स्त्रिया राजकारणात उतरल्या. समाजकारणात उतरल्या. सुरुवातीला त्यांचाही प्रवास चाचपडत जाणाराच होता, मात्र आज शहरपातळीवर असो वा गावपातळीवर, सर्वच मागे राहिलेल्या स्त्रियांचा प्रवास सक्षमपणे होताना दिसतो आहे.
‘स्वच्छतेची सप्तपदी’ ही योजनाही पुढच्या पाच वर्षांत म्हणजेच २०१९ पर्यंत आपले उद्दिष्ट गाठेल. केवळ हागणदारीमुक्ती हे आपले उद्दिष्ट नाही. कचरा निर्मूलन करत असताना त्यावर प्रक्रिया करून त्याचा खते, जैविक इंधन आदी स्वरूपात पुनर्वापर करणे हेही उद्दिष्ट आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. परंतु सर्वात मोठे आव्हान हे आपल्या मानसिकतेला बदलवण्याचे आहे. सर्वत्र कचरा आणि घाण पसरवणाऱ्या प्रवृत्तींना बदलवणे, एका सकारात्मक दिशेने त्यांच्यात परिवर्तन घडवून आणणे हे काही एका रात्रीत घडून येण्यासारखे नाही. स्वच्छता आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्याकडे अजूनही वैयक्तिक स्वच्छतेलाच फार महत्त्व दिले जात नाही तिथे सार्वजनिक स्वच्छता ही केवळ सरकारी, गैरसरकारी संस्थांची जबाबदारी बनून राहते.
आपले कुटुंब, गाव, जिल्हा, राज्य आणि पर्यायाने देश प्रगतीकडे जायला हवा असेल तर ‘स्वच्छता’ या प्राथमिक निकषाकडे आत्यंतिक लक्ष पुरवणे आवश्यक आहे. ‘स्वच्छ महाराष्ट्र’ हे अभियान यशस्वी करण्यात या सर्वसामान्य महिला, महिला नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांचा सर्वात मोठा सहभाग दिसून येतो आहे आणि हे गौरवास्पद आहे. यापुढे जाऊन म्हणावेसे वाटते की स्वच्छ महाराष्ट्र ही आता केवळ एक शासकीय योजना राहिलेली नसून महाराष्ट्रातील स्वच्छतेची ती लोकचळवळ झाली आहे. आणि या महाराष्ट्रातील नगराध्यक्ष स्त्रिया त्याचं प्रतिनिधित्व करीत आहेत. आता त्यांच्या साथीने सरकारी आणि व्यक्तिगत पातळीवर स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही ही स्वच्छतेची सप्तपदी एकत्रित चालायची आहे.
– मनीषा म्हैसकर
(मनीषा म्हैसकर या राज्याच्या नागरी विकास विभागाच्या सचिव आहेत. )
(शब्दांकन-शर्वरी जोशी)