परमात्मा म्हणजे ज्ञान, पूर्णत्व व अखंड एकत्व! परमात्म्यास काहीच मिळवायचे नाही तरी तो कर्म करीतच असतो. परमात्म्याचे कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोग!
गीतेच्या अभ्यासात आपण जसजसे पुढे जातो, तसतसे नवनवीन ज्ञान आपल्या पदरात पडते. आता गीता आपल्याला ‘परमात्मा’ म्हणजे काय? तो अवतार घेतो तो कसा? त्याचे स्वरूप कसे आहे ते समजावते.
कर्माचरण करणाऱ्याने कर्मयोगी कसे व्हावे हे सांगून झाल्यावर भगवंत अर्जुनाला म्हणाले, ‘मी आत्तापर्यंत तुला सांगितलेले तत्त्वज्ञान पूर्वी प्रथम सूर्याला, मग मनूला व नंतर ईक्ष्वाकूला सांगितले होते. मध्यंतरी काळाच्या ओघात ते लोप पावले, पण तू माझा सखा व भक्त आहेस म्हणून मी ते तुला पुन्हा सांगतो.’ ‘‘भगवन्, तुम्ही आत्ता सांगितल्या त्या तर पुरातन काळातील व्यक्ती होत आणि आपण दोघे अलीकडले! मग हे तत्त्वज्ञान तुम्ही त्यांना सांगितलेत हे कसे बरे?’’ अर्जुनाने लगेचच प्रश्न केला.
अर्जुनाचा हा प्रश्न त्याने त्याच्यासमोर असलेल्या भगवंतांच्या स्थूल देहाला बघून केला होता. भगवंत मात्र या ठिकाणी आत्मतत्त्वाला धरून परमात्म्याच्या भूमिकेतून उत्तर देत आहेत.
भगवंत म्हणाले, ‘‘अरे अर्जुना, तुझे नि माझे आजवर अनेक जन्म झाले. तुला ते आठवत नाहीत, पण मला आठवतात.’’
परमात्म्याच्या भूमिकेत शिरून भगवंत आता जे सांगतील त्यातून आपल्याला परमात्मा म्हणजे काय ते कळेल. परमात्मा, अज-(अजन्मा), अव्ययात्मा, भुतांचा ईश्वर आहे. अज म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही असा. जो कधी नव्हता असे नाहीच- तो होताच होता. अव्ययात्मा म्हणजे ज्याचा व्यय होत नाही- जो अविनाशी आहे असा. तो सर्व विश्वाचा नियंता आहे. तो सर्वव्यापक असून स्वत:च्या इच्छेने संकुचित होतो, एक आकार धारण करतो आणि पृथ्वीवर खाली उतरतो-अवतरतो, अवतार घेतो. आपल्या सुप्त ज्ञानशक्तीद्वारा म्हणजेच मायेच्या द्वारा प्रकृतीचा स्वीकार करतो. यालाच अवतार घेणे म्हणतात.
या ठिकाणी, एखाद्याचा निसर्गनियमानुसार जन्म ‘होणे’ आणि परमात्म्याने स्वेच्छेने जन्म ‘घेणे’ यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. परमात्मा, त्याला हवा तिथे, हवा तेव्हा अवतरू शकतो. परमात्म्याचा जन्म हे त्याचे ‘दिव्य-कर्म’ आहे.
भगवंत जन्म घेऊन समाजाला योग्य दिशा दाखवतात. एक नवे तत्त्वज्ञान, बदललेल्या परिस्थितीला पुन्हा दृढ बांधणारी आचारपद्धती, सामाजिक बांधीलकीचे नियम सांगतात. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे? तिथपर्यंत कसे पोहोचायचे हे सर्व प्रश्न सोडवतात. समाजात पुन्हा एक नवीन जाग येते; पण काळाचा महिमा असा आहे की, पुन्हा हळूहळू सर्व विस्मरणात जाते. पुन्हा ग्लानी येते. म्हणूनच भगवंतांनी म्हटले की, ‘संभवामि युगे युगे’. हा भगवंतांचा युगधर्म! परमात्म्याचे हे अवतरण, हे दिव्य जन्मकर्म सर्वसामान्यांना उमजत नाही. जे ज्ञानी हे तेजस्वी जन्मकर्म जाणतात, ते आत्मज्ञानी भक्त होतात. असे आत्मज्ञानी स्थितप्रज्ञ लोक भगवंतांच्या रूपाशी एकरूप होऊ शकतात- भगवंताला जाऊन मिळतात- परममुक्त होतात. ज्ञानदेव अशा लोकांचे वर्णन फारच चपखल शब्दांत करतात-
‘माझे अजन्मे जन्मणे। अक्रियताचि कर्म करणे।
हे आविष्कार जो जाणे। तो परममुक्त।।
परमात्म्याचे दिव्य जन्म-कर्म म्हणूनच जाणून घेतले पाहिजे. परमात्मा म्हणजे ज्ञान, पूर्णत्व व अखंड एकत्व! परमात्म्यास काहीच मिळवायचे नाही तरी तो कर्म करीतच असतो. परमात्म्याचे कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोग!
परमात्म्याचे असे रूप जाणणारे, ज्यांची आसक्ती, भय, क्रोध नाहीसे झाले आहेत असे परमात्म्याची अनन्यभक्ती करणारे भक्त, भगवंतांच्या मार्गाचे अनुसरण करतात आणि प्रत्यक्ष भगवंतही अशा भक्तांना स्वत: भजतात. यानंतर गीता आपल्याला परमात्म्याची कार्यपद्धती सांगते. या कार्यपद्धतीत भगवंतांनी ‘चातुर्वण्र्य’ निर्माण केले. चातुर्वण्र्य पद्धतीने समाजातील लोकांचे त्यांच्यातील कार्यचातुर्य व त्रिगुणांतील कुठल्या गुणाचे प्राबल्य त्यांच्यात आहे या विचाराचा वापर करून चार विभाग केले.
वेदांतील पुरुषसूक्तांतही अशा प्रकारची व्यवस्था सांगितली आहे. एका समाजपुरुषाचे मस्तक, हात, धड (पाठ वगैरे), पाय असे चार भाग करून त्यांना स्वतंत्र कार्य वाटून देणे खरे तर खूपच योग्य आहे. मस्तक म्हणजे शिक्षण. ज्ञान, बुद्धी यासाठी सात्त्विक गुणांचे प्राबल्य लागते, हे ब्राह्मण! हात म्हणजे रक्षण. शस्त्रधारी हात समाजाचे रक्षण करतात, ते क्षत्रिय! पोट म्हणजे भक्षण. त्यासाठी रजोगुणाचे प्राबल्य असावे लागते. या भागांत व्यापार, उद्योग, शेती या गोष्टी येतात, हे वैश्य! आणि पाय- ज्यावर समाजपुरुषाचा डोलारा नीट उभा राहू शकतो ती बाब म्हणजे स्वच्छता. सध्याच्या नगरपालिकेचे स्वच्छता खाते, आरोग्य सर्वात महत्त्वाचे. हे नम्र, लीन, सेवाव्रती असे शूद्र! प्रत्येक विभागाने आपल्याला नेमून दिलेले कार्य व्यवस्थित पार पाडले तर समाजपुरुष ताठ उभा राहू शकतो. एकाच पुरुषाचे हे भाग असल्याने त्यात भेद पाडण्याचे काम गीता करते असे न मानता ही सर्वागीण विकासाची व्यवस्था आहे असेच म्हटले पाहिजे.
या चातुर्वण्र्य पद्धतीत जातिभेदाचे उगमस्थान दडलेले आहे, असा आरोप काही विचारवंतांनी केला आहे; परंतु समाजाची असे गुण व कर्म यांचा विचार करून नीट कार्यपद्धती आखून देणे व एकूण कार्याचे व्यवस्थित वाटप करणे यात कुठलाही भेद पाडण्याचा विचार नव्हता, तर उलट ही एक सर्वागीण उन्नतीची व्यवस्थाच होती. त्याशिवाय एकत्व भंग न पावू देता कार्याच्या सोयीसाठी चार विभागांत वाटून देऊन कार्य करण्याची पद्धती ही अलीकडच्या काळातील ‘डिव्हिजन ऑफ लेबर’ या कार्यपद्धतीशी सुसंगतच आहे. तसेच फलाची अपेक्षा न ठेवता कार्यातूनच आनंद घेण्याची जीवनदृष्टी सध्याच्या काळातही उपयुक्तच आहे.
कुठलेही काम करायला घेतले की, त्याच्या पूर्ततेसाठी ज्ञानाच्या चार पायऱ्या चढाव्याच लागतात. समजा, एखाद्याला घर बांधायचे आहे किंवा एखाद्या शिल्पकाराला शिल्प उभे करायचे आहे तर पहिली पायरी म्हणजे त्याच्या मनात उभे राहिलेले घराचे किंवा शिल्पाचे चित्र! मग ते चित्र कागदावर व्यवस्थित उतरवले जाईल ही दुसरी पायरी. तिसरी पायरी म्हणजे लागणारे सर्व सामान, उपकरणे इत्यादी नीट हिशोब करून आणले जाईल. शेवटी त्या चित्रानुसार आणलेले सामान वापरून घर अस्तित्वात येईल. अशा तऱ्हेने चार पायऱ्यांनीच त्या माणसाच्या मनातील गोष्ट प्रत्यक्षात येईल. अशा तऱ्हेने ठरवलेले कार्य दृश्य स्वरूपात आपल्यासमोर उभे राहते, डोळ्यांना दिसते; परंतु त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या मागे कर्माच्या किती तरी मानसक्रिया पार पाडल्या जातात हे कर्त्यांशिवाय इतरांना जाणवत नाही. शेवटी कर्माचे स्थूल रूप समोर आले तरी त्यामागील सूक्ष्म रूपाचे ज्ञान कठीण असते.
ज्ञान असे चार पायऱ्यांनी स्थूल आकारांत येते, समूर्त होते. परमात्म्याची ही अशी कार्यपद्धती आहे. त्यात विचार, सुनिश्चित संकल्पना, सर्वाना कामाला लावण्याची वृत्ती, योजना आहे. कुणालाही उच्च-नीच मानण्याची इच्छा नाही. ‘एकचि चहुवर्णि फांकले’ असे हे एकात्म पुरुषमूर्तीचे भान होणे म्हणजेच परमात्म्याच्या कार्यपद्धतीचे व प्रत्यक्ष परमात्म्याचे ज्ञान होणे होय. आपणही आपल्या जीवनाची रचना अशी केली तर भगवंताचे जन्मकार्य जाणून केली असे होईल.
गीताभ्यास – परमात्म्याचे स्वरूप
परमात्मा म्हणजे ज्ञान, पूर्णत्व व अखंड एकत्व! परमात्म्यास काहीच मिळवायचे नाही तरी तो कर्म करीतच असतो. परमात्म्याचे कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोग!
आणखी वाचा
First published on: 28-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lessons from bhagavad gita formats of god