बाहेरच्या खोलीमध्ये मायलेकीचा संवाद ऊर्फ झटापट सुरू होती आणि आतल्या खोलीत पलंगावर पडल्या पडल्या मायची माय म्हणजे लेकीची आजी कानोसा घेत होती.
‘‘जानूऽ कुठे निघालीएस?’’
‘‘खाली जात्येय ममा. हाईड अॅन्ड सीक खेळायला. बाऽऽय!’’
‘‘खाली जात्येस? अशा कपडय़ात? एवढासा स्कर्ट घालून? खाली सगळ्यांच्यात खेळायला जाताना सलवार, लेगिंग्स, टाइट्स, स्लॅक्स असं काही तरी घातल्याशिवाय जायचं नाही हे ठाऊक आहे ना?’’
‘‘आता राहू दे ना ममा प्लीज.’’
‘‘नो जानू. नो. आता बिग गर्ल झालीयेस ना तू? आता खेळताना आपले उघडे पाय, मांडय़ा, चड्डी हे कोणाला दिसता कामा नये.’’
‘‘उकडतं गं त्यानं!’’
‘‘उकडू दे, बोचू दे, काहीपण होऊ दे. खालती रस्त्यावर खेळायला असं जायचं नाही.’’
‘‘प्लीज.. प्लीज ममा.. ओन्ली फॉर टेन मिनिट्स..’’
‘‘दहा मिनिटांनंतर तुला वर यावंच लागणार आहे गं. कराटेचा क्लास आहे ना?’’
‘‘वाव.. कराटेऽ मज्जा..’’
‘‘मला सांग, ते कराटे शिकवणारे तुमचे सर शिकवताना जास्त अंगचटीला येत नाहीत ना?’’ ‘‘अंगचटीला म्हणजे?’’
‘‘उगाच हात धरणं, जवळ घेणं, खांद्यावर हात टाकणं वगैरे.’’
‘‘काय फनी आहेस तू ममा.. हात धरल्याशिवाय कराटेचे स्ट्रोक्स शिकवता तरी येतील का? सर सगळ्याच गर्ल्सना हात धरून टीच करतात..’’
‘‘ते बरोबर आहे. पण तुला वेगळं काही नाही ना करत?’’
‘‘वेगळं म्हणजे?’’
‘‘कपाळ माझं! हे बघ जानू, काय असतं, कोणी कौतुक करतं, लाड करतं, खाऊ देतं म्हणून आपण त्याच्याजवळ जायचं नसतं. शंभरदा सांगत असते ना मी तुला? पडतोय का डोक्यात प्रकाश?’’
‘‘आमचे रिक्षावाले काका माझा रोज गालगुच्चा घेतातऽ.. मला स्वीट गर्ल म्हणतात..’’
‘‘पुढच्या वर्षी रिक्षा बदलते की नाही बघच तुझी!’’
‘‘तू ऑसचं करतेस.. ऑमॉलॉ कॉयपण फ्रेण्डली वॉटॉयलॉ लागलं की मध्येच धाडकन चेंज करून टॉकतेस.. एवढॉ छॉन तबल्यॉचॉ क्लॉस होतॉ मॉझॉ.. केलॉस बंद.’’
‘‘तबला शिकवणाऱ्या सरांचा मुलगा सारखा तिथे घोटाळायचा. मला त्याचं लक्षण बरं नाही वाटलं.’’
‘‘तो मुकुलदादा होता आमचा.’’
‘‘ते दादा.. काका.. मामा काही सांगू नकोस मला. मला कळतं. आणि तबला बंद केला त्याऐवजी गिटारचा क्लास लावलाच ना आम्ही तुला? केवढी फी भरतोय त्याची? केली का त्याबद्दल तक्रार? पण जिथे सावधगिरी हवी तिथे हवीच ना जानू?’’
‘‘बाय ममा.. लपाछपीचं एक राऊण्ड बुडलं माझं तुझ्यामुळे.’’
‘‘जा. पण एक लक्षात आहे ना? समोरच्या एका फ्लॅटचं नूतनीकरण चाललंय. तिथे लपायला जायचं नाही.’’
‘‘तिथे तर कस्सल्या सॉल्लिड प्लेसेस मिळतात लपायला!’’
‘‘बंद खोलीत, बंद घरात कोणाबरोबर जायचं नसतं मुलींनी. जे काय खेळायचं ते उघडय़ावर.. भर अंगणात..’’
‘‘उघडय़ावर लपायचं कसं ममा?’’
‘‘जास्त शहाणपणा करू नकोस आणि काल कोणाच्या मोटारीतून परस्पर चक्कर मारायला गेलात आपण?’’
‘‘माझ्या फ्रेण्डचा अंकल होता तो. कसली फास्ट गाडी पळवतो..’’
‘‘तुला आपल्या गाडीतून नेतो ना आम्ही? तरी कोणाहीबरोबर का जायचं?.. तू तर मोठी होईपर्यंत मला वेडच लावणार आहेस.’’
‘‘आताच म्हणालेलीस ना? मी बिग गर्ल झालेय म्हणूनऽ’’
‘‘आता जातेस का एक बिग फटका मारू?’’
जानूच्या मम्माचा आवाज चढला. पण मागोमाग फटक्याचा आवाज न येता दरवाजा आपटल्याचा आवाज आला. जानूने दाराबाहेर पळ काढला असावा असा अंदाज आजीने बसल्या ठिकाणी केला. जराशाने तिने तिथूनच पुकारा केला,
‘‘गेली का गं जानू?’’
‘‘गेली एकदाची माझं डोकं खाऊन. प्रत्येक गोष्टीवर हिचं काही तरी म्हणणं असणारच. आगाऊ कुणीकडली..’’
‘‘चालायचंच. लहान आहे अजून. तू तुझं पोरवय आठव म्हणजे झालं.’’
‘‘आमच्या आणि हिच्या पोरपणाची कुठे काही तुलना आहे का आई? चार खेळणी आणि चार कपडे यापेक्षा काही जास्त नव्हतं आमच्याकडे. आताचे आम्ही आई-बाप पोरींवर बरसात करतो वस्तूंची. त्यांना सगळे अनुभव द्यायला बघतो. खेळणी म्हणू नकोस.. कपडे म्हणू नकोस.. डझनभर तरी बार्बी डॉल्स असतील जानूकडे.’’
‘‘खरंय. पैशानं विकत घेण्यासारखं जे आहे ते सगळं देताय.’’
‘‘दृष्टिकोनही मोकळा ढाकळा ठेवतोच की. तबला शिक, कराटे शिक, ट्रेकला जा. आठवतंय? ताई किती चांगलं भरतनाटय़म करायची. वयात आल्यावर बंद केलंत तिचं तुम्ही. तसंच माझं पोहणंही. मुलीच्या जातीला पुढे कुठे वाढवता येणार आहे, असं म्हणून?’’
‘‘हो. पण म्हणजे आम्ही तुम्हाला निदान १३, १४ वर्षांपर्यंत तरी मोकळं सोडलं होतं ना? याच्याबरोबर हसू नको आणि त्याच्यासोबत बसू नको असं तर नाही सांगितलं सहाव्या-सातव्या वर्षांपासून? आज तू जानूला सांगतेस तसं?’’
‘‘आम्हालापण हौस नाही आलीये असं सांगायची.’’
‘‘वेळ तर आलीये! अवेळीच पोरीबाळींना काहीबाही सांगायची!’’
‘‘मग काय करायचं आम्ही? बार्बीच्या जमान्यात तुमच्या वेळची ही जुनी लाकडी ठकी का आणून द्यायचीये पोरींना खेळायला. ठकी कसली? ठोकळाच असणार तो.’’
‘‘हो ना गं. खरंच ओबडधोबड ठोकळाच असायचा तो. काही आकार-उकार नसलेला! चौकटीला खिळा ठोकताना त्याचं टेकण लावावं नाही तर किल्ल्याचा बुरूज म्हणून, सैनिक म्हणून त्यालाच रंग फासून खोचून ठेवावं. आपण देऊ तो आकार! आता जानूची एकेक बार्बी घरात येते तीच मुळी पूर्ण स्त्रीदेह घेऊन. आकार केवढाही असो, मागचे पुढचे उभार तेवढेच ठेवायचे! मग त्यांना उठाव देणारे केस- कपडे- नट्टापट्टा हे ओघाने आलंच.’’
‘‘ठकीला काय नटवलं असतं कोणी.. बिशादच नव्हती.’’
‘‘खरंय! पण म्हणून ठकीशी खेळणाऱ्या पोरीबाळीही बरीच र्वष ठक्याच राहिल्या. सरळसोट! बिनधास्त! अंगचटीला येणं म्हणजे काय, हे त्यांना कोणाला सांगावं लागलं नाही, कोणाला विचारावं लागलं नाही. निदान विशिष्ट वयापर्यंत तर नाहीच नाही. पुढे आयुष्यभर बाई म्हणून जगावं लागतंच प्रत्येकीला. ते कोणाला चुकलंय? पण निदान लहानपणी तरी..’’
‘‘रिकामटेकडेपणी काहीच्या काहीच विचार करतेस तू आताशा. उद्या म्हणशील, घरातल्या सगळ्या बाब्र्या गायब करा.’’
‘‘नाही. इतकं टोकाचं काही म्हणणार नाही मी. म्हणून चालणारही नाही. पण पोटात तुटतं एकेकदा. एवढय़ा एवढय़ा पोरी.. त्यांना अकाली प्रौढ करणारे आपण.. त्यांच्या खेळण्यात बाई.. लोकांनी त्यांच्याकडे बघण्याच्या नजरेत बाई.. जन्माला आल्यापासून प्रत्येकीला थेट बाईच बनवणार आहोत का आपण?’’
आजी चुटपुटत म्हणाली. मम्माने तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एकतर आधुनिक जीवनाचे प्रश्न तिला समजत नाहीत याची मम्माला पूर्ण खात्री होती आणि दुसरं म्हणजे तिला खरंच वेळ नव्हता. तिला १० मिनिटांनी जानूला वर बोलवून तयार करून कराटेच्या क्लासला न्यायचं होतं. जानू क्लासमध्ये असताना तेवढय़ात मार्केटमध्ये जाऊन तिच्यासाठी स्केटिंगचे शूज आणि कराटेचा बेल्ट खरेदी करायचा होता. बाकी किरकोळ कामं होतीच. ती त्रासून आपल्या आईला म्हणाली,
‘‘जाते बाई एकदाची! जानूसाठी बऱ्याच गोष्टी विकत आणायच्या आहेत. तिला काही कमी पडू नये म्हणून मी किती जिवाचं रान करत्ये हे बघत्येस ना तू?’’
आजी मंदसं हसली. मनोमन म्हणाली, पोरीला सगळं सगळं देशील बये तू, पोरपण कसं देणार तेवढं फक्त सांग!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा