आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्त रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी हे ‘मूर्त’रूप प्रकट झाले तो दिवस आपण दत्त जयंती म्हणून साजरा करतो.  येणाऱ्या दत्त जयंतीच्या निमित्ताने चला आज थोडा  विचार करू या आपल्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा कशी अबाधित ठेवता येईल, रोजच्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल करून!
पंचतत्त्व म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचं आपल्या आरोग्याशी असलेलं नातं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरातील विविध अवयव (जे पंचतत्त्वांचं प्रतिनिधित्व करतात.) जर योग्य पद्धतीने काम करत असतील तर आरोग्य नक्कीच टिकून राहील आणि त्यासाठी जीवन आणि आहारशैली संतुलित ठेवणं खूप जरुरी आहे.
 शरीरामध्ये असंतुलन होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरातील पित्ताचं प्रमाण (acidity level) जास्त होणे. मग थकवा जाणवण्यापासून ते शांत झोप न लागण्यापर्यंत कोणताही त्रास होणं साहजिक आहे. पित्त वाढवणारे पदार्थ / क्रिया – शिळे पदार्थ, फ्रिजमध्ये ठेवून मंद गरम केलेले पदार्थ, अति प्रमाणात दूध किंवा दुधाचे प्रकार, तेलकट, अति गोड पदार्थ, मैद्याचे प्रकार जसे ब्रेड, बिस्किट्स वगैरे त्याचबरोबर अवेळी खाणे (सकाळचा नाश्ता उशिरा / रात्रीचं जेवण उशिरा घेणे वगैरे), न चावता खाणे, तणावाखाली खाणे वगैरे.
‘पोटाकडून मनाकडे’ –
 हृदय जिंकायचं असेल, तर त्याचा मार्ग पोटातून काढायला हवा, असं म्हणतात. (रुचकर भोजन द्यायला हवं.) मग त्यासाठी
 आहार-विचार :
* अन्न शिजवताना मन शांत असावं. शक्य असल्यास शुचिर्भूत होऊन स्वयंपाक करावा.
* निसर्गरूपी भगवंतामुळे आपल्याला हा दिवस दिसला. त्याच्यामुळेच शेतामध्ये पिकं येतात आणि फळं मिळतात, ही कृतज्ञतेची भावना मनामध्ये असावी.
* अन्नाविषयी वाईट शब्द काढू नये. अन्नाचा आदर करावा.
* अन्नामध्ये मधुर, तिखट, कडू, तुरट, खारट, आंबट अशा सर्व रसांचा समावेश असावा.
रस्त्यावर सिग्नल बंद पडला, की ‘ट्रॅफिक जाम’ ठरलेला. मग ट्रॅफिक हवालदाराला शोधण्यापेक्षा आपणच बेशिस्तपणा कसा थांबवू शकतो ते बघणं जास्त फायद्याचं! अशी एक सिग्नल सिस्टीम आपल्या मनामध्ये ‘प्रोग्राम’ केली तर? म्हणजे- आरोग्यदायी जीवनशैली – हिरवा सिग्नल – चालत राहा
चुकीचा आहार / विहार / निद्रा – लाल सिग्नल – लगेच थांबा
थोडी गडबड इकडे – तिकडे – पिवळा सिग्नल – जरा  जपून    
तामसी जेवण रागीट बनवते, राजसी जेवण आळशी बनवते आणि सात्त्विक जेवण प्रेम वाढवते.
खूप कठीण वाटतंय? इच्छा तिथे मार्ग! थोडेसे प्रयत्न केले आणि नीट नियोजन असेल तर काहीच कठीण नाही. बघा तुमच्या मनाला पटतंय का?अन्नातील प्राणामध्ये एवढी ताकद असते, कीज्यामुळे मानसिक, शारीरिक आणि आत्मिक शांती नक्कीच मिळू शकते. चला तर मग  मनोमन प्रार्थना करून आरोग्य संकल्प करू या!
पुढील लेखामध्ये आपण बोलू ‘संवाद शरीराशी’ या विषयावर.

Story img Loader