बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मध्ये पती-पत्नींच्या पत्रव्यवहाराच्या दृष्टीनेही स्त्री-शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे स्पष्ट केले होते. पत्नी शिक्षित नसल्याने पतीचे पत्र तिला दुसऱ्याकडून वाचून घ्यावे लागणार तसेच लिहूनही घ्यावे लागणार, त्यामुळे त्यांच्या व्यक्त करण्यावर मर्यादा येणार. म्हणून जांभेकर म्हणतात, ‘‘जर ती स्वत: पत्र लिहिती तर त्या पत्रात सारी प्रीतीची व लोभाची भाषणे असती.’’
‘वाचकांचा पत्रव्यवहार’ हे सदर आजही दैनिके, नियतकालिके यामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. वृत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच पत्रव्यवहाराचे सामाजिक दृष्टीने असणारे महत्त्व ओळखून संपादकांनी ‘पत्रव्यवहारास’ खास जागा दिली. लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) वृत्तपत्रांना ‘बृहत्तरजिव्हा’ म्हणायचे. परंतु प्रत्यक्षात ‘बृहत्तरजिव्हा’चे स्वरूप पत्रव्यवहाराचे होते. वाचकांना आपली मते, विचार, अपेक्षा, तक्रारी, क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पत्रांतून समाजमनाची स्पंदने, समाजाच्या जाणिवाच व्यक्त होतात.
समाजमनाच्या जिवंतपणाचा प्रत्यय देणारा ‘पत्रव्यवहार’ स्त्रियांनीही समृद्ध केला. शिक्षण, समाजात हळूहळू सुरू झालेला वावर, सामाजिक सुधारणांसाठी होणारे प्रयत्न इत्यादींच्या प्रभावातून स्त्रीची विचारक्षमता तसेच संवेदनशीलतासुद्धा विकसित झाली. अन्य लेखनाप्रमाणे स्त्रिया ‘पत्रेही’ लिहू लागल्या. ‘पत्रव्यवहाराचे’ महत्त्व जाणून स्त्रियांच्या नियतकालिकांनीसुद्धा पत्रव्यवहाराला स्वतंत्र आणि पुरेशी जागा दिली. पोचपावत्या, स्त्रियांच्या प्रतिक्रिया, सूचना, मासिकांना दिलेला प्रतिसाद संपादकांनी प्रसिद्ध केला.
सामाजिक रूढींनी स्त्री-जीवनाची होणारी कोंडी, व्यक्तिगत सुख-दु:खे, स्त्रियांच्या मनातील वैचारिक गोंधळ, अडचणींचे प्रसंग याबरोबर हळूहळू स्त्रियांना येणारे सामाजिक भान, स्वतंत्र विचार इत्यादींच्या रूपाने स्त्री-मनाची स्पंदनेच पत्रव्यवहारातून उमटत होती.
स्त्रियांनी फक्त स्त्रियांच्या मासिकांतून पत्रे लिहिली नाहीत. ‘ज्ञानप्रकाश’, ‘ज्ञानोदय’, ‘केसरी’मधूनही स्त्रियांनी भरपूर पत्रे लिहिली आहेत. परंतु स्त्रियांसाठी मासिकांचे प्रकाशन सुरू झाले आणि स्त्रियांना स्त्रियांच्या मासिकांबरोबर पत्रव्यवहार करण्यात काहीसा जास्त मोकळेपणा, विश्वास, जिव्हाळा वाटू लागला. म्हणूनच त्या लिहित्या झाल्या. केशवपनाच्या, वैधव्याच्या दु:खाबरोबर अनेक भावना स्त्रियांनी व्यक्त केल्या. दीर्घकाळच्या अंधारातून उजेडाच्या दिशेने स्त्री-मनाची सुरू झालेली वाटचाल स्पष्टपणे दिसते. वैयक्तिक स्वरूपाची पत्रे लिहिताना स्त्रिया ‘एक दुर्दैवी स्त्री’, ‘एक विधवा’ अशी सांकेतिक नावे घेत.
सातारच्या एका विधवेने ‘आर्यभगिनी’ला आपली दर्दभरी कहाणी कळवली. बाराव्या वर्षी लग्न, तेराव्या वर्षी वैधव्य आले. सासरे मायाळू. सुनेचे दुसरे लग्न करून द्यावे, अशा विचारांचे. परंतु सासूचा विरोध. सासरे बाहेरगावी गेल्याची संधी साधून सासूने सुनेचे केशवपन करण्याचे ठरवले. परंतु ऐन वेळी बोलावल्यासारखा मामा आल्याने सून वाचली. मामा भाचीला घेऊन गेला. सर्व हकिकत सांगितल्यावर पत्रलेखिकेने आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. ‘‘मला तर लग्न करण्याची इच्छा आहे, परंतु दुसरा योग्य वर मला मिळत नाही, तर त्याला काय युक्ती करावी हे मला कृपा करून आपण जर सांगाल तर मी आपली फार आभारी होईन. आपण माझ्यासारख्या गरीब-अनाथ स्त्रियांच्या कैवारी आहात म्हणून आपणास मी तसदी देते. कृपाकरून हे माझे पत्र आपण पुस्तकांत छापून प्रसिद्ध करावे. म्हणजे माझ्या दुसऱ्या सुज्ञ भगिनी मला काही तरी युक्ती सांगतील, अशी मला आशा आहे.’’
समाजात स्त्री-शिक्षणाला सुरुवात झाली असली तरी रूढीप्रिय घरातले वातावरण स्त्रियांना विरोध करणारेच बरेचदा असायचे. स्त्रियांना विचित्र धाक घातला जाई. शिकणाऱ्या स्त्रियांची टिंगलही कशी होई. अशा अडचणीही स्त्रिया संपादकांना कळवत होत्या. गोवा-फोंडा-भोम इथून ‘एक स्त्रियांचा कळवळा बाळगणारी स्त्री’ लिहिते, स्त्रियांसाठी मुंबई, पुणे इकडे जसे कार्य चालते तसे इकडे गोमांत प्रांतात (म्हणजे गोव्यात) होत नाही. ‘एखाद्या स्त्रीने जर एखादे पुस्तक सहजगत्या हातात घेतले तर त्या घराण्यातील वृद्ध पुरुषांनी आणि ज्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून पुस्तक हाती घेण्याचे सोडले आहे, अशा वृद्ध बायकांनी तिला धमकी देऊन ‘‘बाळे, स्त्रियांनी कधीच शिकू नये, कारण ज्या मानाने शिक्षण वाढत जाते. त्या मानाने शिकत असलेल्या स्त्रीच्या भ्रताराचे आयुष्य कमी होत जाते. असे सांगण्याचा या प्रांतात पूर्वी परिपाठ होता आणि त्यामुळे तिचे पुस्तक हाती घेण्याचे अगदी बंद होत होते.’’
यांसारख्या वातावरणातून स्त्रिया स्वत:ची वाट शोधीत स्वत:चा वैचारिक विकास करवून घेत होत्या. क्वचित स्त्रिया शिकून तुरळक का होईना शिकवण्याचे काम करू लागल्या होत्या, त्यांच्या पत्रांतून वैचारिक विकासाचा दाखला मिळतो. ‘गृहिणी’ मासिकात मार्च १८८८ च्या अंकात पं. रमाबाई व उमाबाई यांचा स्त्रियांच्या उच्च शिक्षणाच्या संदर्भात काल्पनिक संवाद प्रसिद्ध झाला. स्त्रियांच्या शिक्षणाच्या व स्वातंत्र्याच्या संदर्भात पं. रमाबाईंचे म्हणून काही वेगळेच, थोडे विचित्र विचार व्यक्त केले होते. त्या संदर्भात पत्र लेखिकेने ‘आपली एक वाचक’ अशा सांकेतिक नावाने संपादकांना खरमरीत पत्र पाठवले. पं. रमाबाईंच्या ‘स्त्रीधर्मनीती’ पुस्तकातील विचारांचा संदर्भ देत पं. रमाबाईंच्या तोंडी काल्पनिक विचार घातल्याबद्दल संपादकांचा निषेध केला. ‘‘पं. रमाबाई आता ख्रिस्ती झाल्या म्हणून त्या जे काही करतील, ते सर्व वाईट असे म्हणण्यास काही आधार नाही. त्या बाई स्वदेश भगिनींच्या कल्याणाकरिता केवळ नि:स्वार्थ बुद्धीने इतके भगीरथ प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी सुधारक म्हणविणाऱ्या गृहस्थांनी त्यांचा असा फार्स केलेला पाहून कोणाही स्त्री-शिक्षणाभिलाषी बाईस सहज खपणार नाही.’’ महत्त्वाचे म्हणजे संपादकांनीसुद्धा आपली चूक कबूल करून पं. रमाबाईंची क्षमा मागून पत्र जसेच्या तसे प्रसिद्ध केले.
‘आर्यभगिनी’चे संपादन करण्यास एका स्त्रीने पुढे यावे, ही एक घटनाच होती. संपादिका माणकबाई लाडांविषयी स्त्रियांना वाटणारे कौतुक, आनंद, कृतज्ञता स्त्रियांनी विविध प्रकारे व्यक्त केली. स्वरचित कवितेतूनसुद्धा रमेतबाई मानकर कौतुकाने लिहितात,
‘‘माणकबाईंचे उपकार किती मानू।
तिच्या मासिकाचे गुण किती वानू।
आर्यभगिनी हे नाम नयां साजे।
देश सखिना ते विद्यामृती पाजे।’’
खेतवाडीच्या लानीबाई व्यवहारकर यांनी आपला प्रतिसाद मार्मिकपणे व्यक्त केला आहे. ‘‘या प्रियकर मासिकावर आम्हा, भगिनींची एकसारखी निष्ठा व पूज्य बुद्धी आहे. ‘आर्यभगिनीने आपल्या मैत्रिणींस महिनाअखेर दर्शन देण्यास जर का विलंब लावला तर त्यास बिलकूल चैन पडेनासे होते. त्या एकमेकींस प्रश्न करितात. ‘काय हो, तुमच्या येथे ‘आर्यभगिनी’ आली का?’ तिची भेट होताच जसे एखादे आपले आवडते मनुष्य फार दिवसांनी भेटावे तसे जणू काय होऊन त्या तिला हाती घेतात.’’ लीनाबाई लिहितात, ‘आर्यभगिनी’चे तिसरे वर्षे पूर्ण होऊन तिला वर चार महिने झाले असता ती अंगाने जन्मल्यापासून आजपावेतो जशीच्या तशी आहे. किंचितही वाढत नाही. हे पाहून मला व माझ्या इतर भगिनींना मोठी चिंता पडली आहे.’’
बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मध्ये पती-पत्नीच्या पत्रव्यवहाराच्या दृष्टीनेही स्त्री-शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले होते. पत्नी शिक्षित नसल्याने पतीचे पत्र तिला दुसऱ्याकडून वाचून घ्यावे लागणार. तसेच पतीला पत्र पाठवतानासुद्धा दुसऱ्याकडून बायको लिहून घेणार त्यामुळे त्यांच्या खासगी भावना,विषय, प्रेम व्यक्त करण्यावर मर्यादा येणार. म्हणून जांभेकर म्हणतात, ‘‘परंतु जर ती स्वत: पत्र लिहिती तर त्या पत्रात सारी प्रीतीची व लोभाची भाषणे असती. तो लोभ ती प्रीती बहुत दिवस राहिले असताही तिळप्राय कमी होत नाही.’’
स्त्रियांनी शिक्षण घेऊन लेखनास तयार होण्याविषयी बाळशास्त्री जांभेकरांना किती दूरदृष्टी होती, खात्री होती. याचा प्रत्यय देणारी पत्रे एकोणिसावे शतक संपण्यापूर्वीच प्रसिद्ध झाली. रत्नागिरीतील जानकीबाई मराठे व पुण्यात फग्र्युसन कॉलेजमध्ये असणारे त्यांचे पती सदाशिव मराठे यांचा पत्रव्यवहार ‘आमची पत्रे’ नावाने ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाला. मराठे पती-पत्नींचे केवळ प्रेमच नव्हे तर जानकीबाईंच्या शिकण्याची सगळी प्रक्रियाच या पत्रठेव्यातून व्यक्त होते. त्यांना प्रथम वाटणारा संकोच. हळूहळू त्यांची होणारी प्रगती, त्यांच्या लेखनातील चुका दाखवून पतीने त्यांना सूचना दिल्या आहेत. वाचनासाठी पुस्तके सुचवली आहेत. प्रथम पत्र लिहिताना झालेली गडबड इत्यादी सर्व भावना पत्रांतून डोकावतात. पत्नीने लिहिलेले पत्र वाचून झालेला आनंद सदाशिवराव मराठे यांनी लपविला नाही.
‘तुझे दि. ३ नोव्हेंबरचे पत्र पोचले. तुझ्या सुकुमार हातांनी लिहिलेले पत्र. पोस्टाच्या शिपायाने माझ्या हाती आणून देताक्षणी मला जो आनंद झाला. असा आनंद आजपर्यंत कधी झाला नव्हता.. तू इतक्या लवकर पत्र पाठवशील अशी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती. तुझे चिमुकले सुंदर पत्र मी पुन:पुन्हा किती तरी वेळा वाचले व दर वेळी मला आनंदच वाटला.’
एकोणिसावे शतक संपत आले होते, ‘आर्यभगिनी’ने निरोप घेतला. पण कृष्णाबाई भाळवंणकरांनी ‘सीमंतिनी’ सुरू केले. का. र. मित्र यांचे ‘मासिक मनोरंजन’ सुरू झाले. काळ तर बदलत, कूस पालटत होताच,
त्याप्रमाणे स्त्री मनाशी होणाऱ्या संवादाची लयही बदलू लागली.
डॉ. स्वाती कर्वे