आज जे विवाह समारंभ होतात त्यातील बहुसंख्य विवाह हे प्रदर्शनीय, प्रतिष्ठा, पैसा, हौस यावर बेतलेले असतात. आजची युवा पिढी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर विवाह करू दे. आजही त्याचा साचा ठरलेला असतो, म्हणजे त्यात मेंदी (सिनेमा स्टाइल), नाच-गाणी, खाणे-पिणे, मौज-मस्ती-धमाल- सारे परप्रांतीयांचे अंधानुकरण. असे दोन दोन दिवस चाललेले असते! या साऱ्यांत संस्काराचा कोणताही भाग नसतो. तसा विचारही संभवत नसतो. फार काय, जमलेल्या ज्येष्ठ मंडळींच्याही मनात नसतो! तेव्हा आता या संकल्पनेचा बाऊ करण्यात काहीच मतलब नाही. रॅशनल विचार करणाऱ्या या पिढीने विवाहाकडे ‘करार’ याच संकल्पनेतून पाहणे पसंत केले आहे. तेथे भावनिकता (इमोशनल) (पूर्वीइतकी) दिसत नाही.
आयुष्यात ‘लग्न’ हे व्हायलाच हवं का, इथपासून तरुणाईची सुरुवात आहे. दोन भिन्न व्यक्तींनी आयुष्यभर एकत्र राहायचे ही कल्पनाच महाकठीण. तडजोड ही तर फार पुढची पायरी, अशी त्यांची विवाहासंबंधीची धारणा. योग्य वेळी लग्न होणं योग्यच आहे, पण ते फक्त पालकांना वाटून उपयोगी नाही. आजच्या जमान्यात मुलीचे लग्न वेळेवर करून दिले तरी नंतर ती संसारात रमेल याची हमी कुणी द्यावी? त्या बिनधास्त परत घरी आल्या तर.. ती भीतीही पालकांनाच! तुमचाच अट्टहास म्हणून केलं लग्न असंही सुनावलं जातं!
मुलगी सासरी गेली की, तिला अनेक नव्या गोष्टींना सामोरे जावे लागते असे सांगत, मोहिनीताईंनी त्यांची एक भली मोठी यादीच सादर केली आहे. ती नीट वाचल्यावर लक्षात येते की, यातल्या बऱ्याच गोष्टी आता कालबाह्य़ झालेल्या आहेत. उदा. ‘सासरचा गोतावळा’ म्हणाल, तर यापुढील राज्य सुनेचे असणार हे लक्षात घेऊनच आजच्या सावध सासवा अशी नाती सांभाळतात. असो.
‘जी जोडपी स्वतंत्र राहतात, त्यांचेही संसार फार सुखाचे होतात असे नाही’ असे लेखिकेला वाटते. मात्र माझ्या मुली, त्यांच्या मैत्रिणी, सून व तिच्या मैत्रिणी यांच्या २०-२२ वर्षांच्या अनुभवातून मी काढलेला हा निष्कर्ष आहे, नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसातील ८-१० तास घराबाहेर राहणे, देशा-परदेशातील वाऱ्या, नोकरांच्या मदतीने घर चालविणे, मुलांसाठी शाळा, अभ्यास, परीक्षा याबरोबरच पालकसभा, सहली, गॅदरिंग, निरनिराळ्या स्पर्धा या सर्वासाठी गुणवत्तापूर्ण सहभाग देण्यासाठीची धडपड यात नवी पिढी कुठेच कमी पडत नाहीत. स्वत:साठी वेळ काढीत असता, जोडीदाराला कंपनी देत त्याला त्याची स्पेस मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असतात. यात अनेक ठिकाणी जोडीदाराची साथ मिळत असते, ज्यामुळे ही कसरत त्यांच्या अंगवळणी पडते.
‘जीवन सुखी, समाधानी होण्यासाठी दोघांजवळ सामंजस्य, सामोपचार, संयम, सहनशीलता, सुवर्णमध्य हे ‘स’सुद्धा असायला हवेत’ या लेखिकेच्या विधानाशी कोणीही सहमत होईल. बदललेली परिस्थिती नवरा-बायको दोघांनीही सामोपचाराने घेतली तर संसार उत्तम होतात, हे विधानही पटण्याजोगेच आहे.
प्रभा हर्डीकर, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा