रजनी परांजपे
मुलांना वाचनाची सवय लावावी, मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी यासाठी निरनिराळ्या संस्था, व्यक्ती, निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. आम्हीही मुलांचे वाचन सुधारावे या उद्देशाने वस्ती पातळीवरील ‘फिरते वाचनालय’ हा प्रकल्प चालवतो. मुले पुस्तके घरी नेतात किंवा जागा असेल तर तिथे बसूनही वाचतात. पण पहिल्या काही वर्षांतच आमच्या असे लक्षात आले, की ज्या उद्देशाने आम्ही ही वाचनालये चालवतो तो उद्देश त्यातून साध्य होत नाही..
मागच्या लेखात (१२ ऑक्टोबर) आपण मुलांना पहिल्यांदा वाचायला शिकवणे आणि नंतर त्यांना वाचन सराव देणे किती महत्त्वाचे आहे ते पाहिले. या लेखावर नेहमीपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या. सरकारी शाळांमधून ग्रंथालये आणि ग्रंथपाल यांची कशी गरज आहे हे सांगणारेही एक पत्र आले. त्यावरून या संदर्भातला आपलाही एक अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवावा असे वाटले म्हणून हे अनुभवकथन.
मुलांना वाचनाची सवय लावावी, मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी यासाठी निरनिराळ्या संस्था, व्यक्ती, निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. आम्हीही मुलांचे वाचन सुधारावे या उद्देशाने वस्ती पातळीवरील ‘फिरते वाचनालय’ हा प्रकल्प चालवतो. मुले पुस्तके घरी नेतात किंवा जागा असेल तर तिथे बसूनही वाचतात. पण पहिल्या काही वर्षांतच आमच्या असे लक्षात आले, की ज्या उद्देशाने आम्ही ही वाचनालये चालवतो तो उद्देश त्यातून साध्य होत नाही. आमचा उद्देश मुलांचे वाचन सुधारावे, त्यांना वाचनाचा सराव व्हावा असा आहे. पण आमच्या वाचनालयात येऊन पुस्तके नेणाऱ्या मुलांना आधीच चांगले वाचता येत असते. तिथे येणाऱ्या मुलांच्या मनात पुस्तक वाचावे अशी इच्छा निर्माण झालेली असतेच. तो अंकुर पाण्याअभावी जळून जाऊ नये, जिवंत राहावा, वाढावा, फोफावावा यासाठी अशी वाचनालये हवीतच, पण आम्हाला निराळ्याच गावाला जायचे होते आणि तेथे पोहोचण्याचा हा रस्ता नव्हता हे नक्की. आम्हाला दुसरा रस्ता शोधणे भाग होते. त्या दृष्टीने आमचे विचार सुरू झाले आणि शोधता शोधता मार्ग सापडलाही.
आम्ही कामाला सुरुवात केली तो काळ १९८८-८९ चा. त्या वेळेस पहिली-दुसरीतच शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण खूप जास्त होते. ते कमी करावे या हेतूने आम्ही निरनिराळे प्रयोग करून बघत होतो. पहिलीतच सर्व मुलांसाठी अभ्यासवर्ग घेणे हा त्यातला एक प्रयोग. सर्व मुले एकाच जागी सापडावी यासाठी वर्ग शाळेतच, शाळा सुटल्यावर किंवा शाळेआधी घ्यावे असे ठरले. मुलांचे लहान लहान गट करायचे. एका गटात पाच-पाच, सहा-सहा मुले आणि एकेक शिक्षिका. शिक्षिकेने वर्गात शिकवलेला अभ्यासच पक्का करून त्यांना शिकवावे असे ठरले. मुलांचा अभ्यास सुधारला किंवा मुलांना अभ्यास येऊ लागला, की मुले शाळेत टिकण्याचे प्रमाण वाढेल ही अपेक्षा, म्हणून अभ्यास घ्यायचा. शिक्षिकेच्या कामाचा तो झाला एक भाग. दुसरा भाग मुलांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्याचा. मूल जर सलग दोन-तीन दिवस शाळेत आले नाही तर शिक्षिकेने ताबडतोब त्याची दखल घेऊन त्याच्या घरी जायचे. गैरहजेरीचे कारण विचारायचे, त्यावर काय उपाय करता येईल ते बघून मुलाला परत शाळेत आणण्याचे हे काम शिक्षिकेचे. आजार बळावण्याआधीच त्यावर उपाय केला तर आजारापासून संरक्षण होते तसेच वेळच्या वेळी गैरहजेरीवर लक्ष ठेवले तर काही प्रमाणात तरी गळतीचे प्रमाण कमी होऊ शकेल अशी कल्पना.
हा प्रकल्प आम्ही राबवला. प्रयोग म्हणून दोन शाळांमधून दोन वर्षे हे काम केले. अपेक्षेप्रमाणे यश आले नाही. कारणे निरनिराळी. अगदी मुलाचा पत्ताच नीट लिहिलेला नाही इथपासून तर कुटुंबच जागेवर नाही, शाळेत वर्ग घेण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली ते अधिकारी बदलून त्या जागी दुसरे आले आणि त्यांचा अशा वर्गाना आक्षेप आहे, मुले शाळेनंतर थांबणे किंवा मुलांनी लवकर शाळेत येणे हे काही पालकांना गैरसोयीचे वाटते वगैरे वगैरे. प्रयोग यशस्वी झाला नाही पण सर्वच व्यर्थ गेले असे नाही. त्यातून आम्हाला एका नव्या प्रकल्पाची कल्पना सुचली. मुलांना वाचन सराव व्हावा यासाठी नियोजनबद्ध, नियमित प्रयत्न कसा करता येईल ते सुचले आणि आम्ही त्याप्रमाणे काम चालूही केले. आज वीस वर्षे झाली ते काम चालले आहे, एवढेच नाही तर आमचा हा प्रकल्प काही दुसऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही स्वीकारला आणि त्याही आज तो प्रकल्प चालवीत आहेत.
त्याचे असे झाले, की शाळांमधे मुलांचे वर्ग घेताना आम्हाला शाळांची, त्यांच्या कार्यपद्धतीची, त्यांच्या वेळापत्रकाची चांगली माहिती झाली. त्यात असे लक्षात आले, की शाळांतून अवांतर वाचनासाठी म्हणून आठवडय़ाच्या दोन तासिका राखून ठेवलेल्या असतात. दोन तासिका म्हणजे ७० मिनिटे. हा वेळ मुलांना वाचन सराव देण्यासाठी वापरता येण्यासारखा होता. वस्तीपातळीवर चालवलेल्या केंद्रामधे येणारी मुले आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे येणार किंवा न येणार. तसे इथे नाही. शिवाय वस्तीवरील वाचन केंद्रात येणाऱ्या मुलांमध्ये मुलींचे प्रमाण कमीच असे. कारण एकदा शाळेतून घरी पोहोचल्या की मुलींचा वेळ घरकामात जाई. त्या दृष्टीनेही शाळेत वाचन केंद्र चालवणे, तेथेच मुलांना घरी नेण्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून देणे आणि वेळापत्रकातल्या ७० मिनिटांचा उपयोग करून मुलांना आपल्या नजरेखाली, आपल्या मदतीने वाचन सरावाची संधी देणे जास्त फायद्याचे होईल असे आम्हाला वाटले आणि रीतसर परवानगी वगैरे काढून शिक्षकांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू केला.
पहिल्या वर्षी वेळापत्रकाप्रमाणे आम्ही आठवडय़ातून दोनदा पस्तीस-पस्तीस मिनिटांचे वाचनवर्ग घेत असू. पण मुलांना पुस्तके देण्याघेण्यातच त्यातला बराचसा वेळ जाई. पुढील वर्षांपासून आठवडय़ातून एकदाच सलग ७० मिनिटांचा वाचनतास घेऊ लागलो. त्या ७० मिनिटांत प्रत्येक मुलाचे पाचदहा ओळींचे प्रकट वाचन, भाषिक खेळ, गाणी, गोष्टी वगैरे आणि वर्गाच्या शेवटी मुलांना घरी नेण्यासाठी पुस्तके देणे, असा उपक्रम चालू केला. पहिलीपासून चौथीपर्यंतच्या सर्व मुलांना घरी पुस्तके द्यायला सुरुवात केली. पुस्तके देताना ती मुलांना पचतील आणि रुचतील अशी म्हणजेच त्यांचे वय आणि मुख्यत: वाचनक्षमता लक्षात घेऊन दिली. निदान तसा प्रयत्न केला. पुढे हीच मुले वरच्या वर्गात गेली. ‘आम्हालाही घरी न्यायला पुस्तके द्या,’ अशी त्यांची मागणी आली. मग तसे केले. आता आठवीपर्यंतच्या मुलांना घरी पुस्तके देतो. सांगायचे विशेष म्हणजे पुस्तके हरवणे-फाटण्याचे प्रमाण पाच-सहा टक्के इतकेच आहे.
आणखी एक गोष्ट. वरच्या वर्गातील मुले आम्हाला अमुक-अमुक पुस्तक आणून द्या, प्रकल्प करायचा आहे, असेही सांगतात. शिवाय टीव्हीवर ऐतिहासिक मालिका लागल्या, की तशा तऱ्हेच्या पुस्तकांचीही मागणी येते. पुष्कळदा ही मागणी घरातील आई, आजी यांची असते. एकदा पुस्तक घरी नेले की घरचे, बाहेरचे ज्यांना वाचता येते आणि वाचावेसे वाटते ते सर्वच वाचतात. मुले वाचायला तर शिकतातच शिवाय लिहूही लागतात. मुलांनी लिहिलेल्या गोष्टींची काही पुस्तकेही आम्ही काढली आहेत. वाचलेल्या गोष्टीवरूनच सुचलेल्या गोष्टीसुद्धा स्वत:च्या शब्दात सांगितल्यात. त्यातलीच ही एक गोष्ट –
लेखिका – साक्षी शेंदाळे, (इयत्ता – तिसरी) कोल्हा आणि कोंबडा
एक कोल्हा असतो, तो रस्त्यावरून चाललेला असतो. बोरीच्या झाडाची सावली रस्त्यावर पडलेली होती. त्या सावलीकडे कोल्ह्य़ाची नजर गेली. कोल्हा खूप छोटा होता. त्याला बोरीच्या झाडाखाली एक कोंबडा दिसला. कोल्हा म्हणाला, ‘‘कोंबडेदादा मला ही बोरं काढून देता का?’’ कोंबडा म्हणाला, ‘‘अरे मला काढता येत नाही, मी तर खूप लहान आहे.’’ कोल्हा म्हणाला, ‘‘मी तुला माझ्या हातावर घेतो. तू पटकन उडी मार. वर गेलास की तूपण बोरं खा आणि मलापण दे.’’ कोंबडा झाडावर गेला. त्याने सर्व पिकलेली बोरं खाल्ली आणि कच्ची बोरं कोल्ह्य़ाला दिली.
मुलांचा हात असा लिहिता होताना पाहणं खूप आनंददायी असतं. यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला एरवी क्वचितच मिळणारी चालना देता येते.
rajani@doorstepschool.org
chaturang@expressindia.com