‘कुठल्याही व्यक्तीला गुरू करू नका. गुरू तत्त्व आहे आणि परमात्मा स्वयंगुरू आहेत. लाइफ इज अ मास्टर आणि तुमच्या आतही तो आहे. बुद्धी विकू नका आणि जिथं बुद्धी थकेल तिथं श्रद्धा आहेच.
‘आजच्या समाजामध्ये तरुण पिढीला जीवनाचं ध्येय आत्मोन्नती हे असावं, हे कसं पटवून द्यायचं? धर्म आणि ईश्वर यांचं जीवनात काही महत्त्व आहे असं कसं पटवून देता येईल?
उत्तर – जर प्रतिप्रश्न विचारू द्याल तर मी विचारीन, ‘कोण आहे पटवून देणारा? पटवून देणारं कोण? ज्यांनी आपल्या जीवनाच्या एकेका क्षणाचा उपयोग आत्मोन्नतीसाठी केला असेल तेच पटवून देण्याच्या स्थितीमध्ये असतील ना! धर्म आणि ईश्वर यांचं रहस्य उलगडून त्या सत्तेशी अनुसंधान साधून जगत असतील तेच पटवून देऊ शकतील ना! कारण, शब्दांनी पटवून देता येत नाही. शब्द फार पांगळे. परंतु जीवन असतं ना, तेच पटवून देतं बघा. ज्या शब्दांच्या पाठीमागं केवळ बुद्धीची निष्ठा आहे पण जीवनाची शक्ती नाही त्या शब्दांनी काही अर्थ किंवा भाव संक्रांत होत नसतात; तेव्हा आमच्या शब्दामागं ते तप असलं पाहिजे.
काय म्हणून तरुण पिढीनं धर्म जगावा? ईश्वराच्या किंवा आत्मा-परमात्मा यांच्या गोष्टी काय म्हणून त्यांनी कराव्यात? त्यांनी आत्मोन्नतीला ध्येय कसं मानावं? या देशामध्ये जे शासन आहे, जो शासनवर्ग आहे, जे राजकीय पक्ष आहेत, जे धर्मगुरू आहेत, तथाकथित मंदिरामध्ये, मठामध्ये, गुरुद्वार, देरासर, बौद्धविहार, मशिदी या सगळ्यामध्ये बसणारे जे आहेत ते उत्तान आणि उच्छृंखल भोगवादाचे आणि भौतिकवादाचे शिकार आहेत. देशाचं सगळं वातावरणच त्यांनी दूषित करून टाकलेलं आहे. ज्यावेळेला गरीब बिचाऱ्या तरुणांनीच काय पाप केलेलं आहे की, त्यांनी धर्म, ईश्वर आणि आत्मोन्नतीला आपलं ध्येय मानावं? या देशामध्ये जर खरा धर्म आणि आत्मोन्नती हे जीवनाचं लक्ष्य आहे हे सांगायचं असलं तर पहिल्यांदा सगळ्या राजकीय नेत्यांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना काढून अंदमान-निकोबारला पाठवा. मी खोटं सांगत नाही आणि माझं बोलणं आपल्याला कठोर वाटेल, पण खरोखर विदारक परिस्थिती आहे! सगळ्यांना अंदमान-निकोबारला पाठवा आणि मजुरी करायला लावा, परिश्रम करायला लावा त्यांना. सगळ्या धर्मगुरूंना पाठवून द्या. पुरोहितांना पाठवा. नेत्यांनी, धर्मगुरूंनी तांत्रिकांचा, मांत्रिकांचा आश्रय घ्यावा आणि गरीब बिचाऱ्या घरामध्ये राहणाऱ्या पोरांना आम्ही धर्म, ईश्वर, आत्मोन्नती सांगावी. खरंच याने सुटेल प्रश्न..आपल्यालाच पटवून घ्यायची गरज आहे आणि जर आपण असंच जगू लागलो तर आपल्या घरातल्या मुलांमध्ये ते येणारच. ती विद्यालयं आहेत, महाविद्यालयं आहेत. तेव्हा घरादारामध्ये उच्छृंखल भोगवादाचं वातावरण, प्रदर्शन, बीभत्स प्रदर्शन, हे जर चालू असेल तर तरुण पिढीला ‘तुम्ही आत्मोन्नती हे ध्येय ठेवा’ हे सांगणं म्हणजे त्यांचा उपहास करणं आहे. यू आर इन्स्लटींग देअर इंटलीजन्स.
आम्ही कुठं शिकलो? धर्म म्हणा, ईश्वराबद्दल म्हणा किंवा या आत्मोन्नतीबद्दल, कुठं बरं शिकलो असू? आमचे आजोबा सकाळी तीन-साडेतीनला उठायचे आणि स्नानादिक उरकल्यानंतर मंदिरामध्ये बसायचे, जप करायचे, ध्यान करायचे, पूजा करायचे, छत्तीस गावांचा कारभार सांभाळत असताना आणि हायकोर्टात ते वकील होते, ते सगळं काम असताना रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत; त्यांचा हा जो काही ‘रोमान्स वीथ द अननोन’ चालत असायचा तो आम्ही पाहिला. सकाळी उठून आमचे आई-वडील साडेपाच वाजता दळायला बसायचे की रोज ताज्या दळलेल्या कणकेच्या पोळ्या व्हाव्यात. हॉटेलचं खाऊ नये. बाहेरचं खाऊ नये. खोटं बोलू नये; मुलं जर खोटं बोलली, कुणी जर खोटं बोललं तर आमचे आईवडील एक दिवसाचा उपवास करीत. धर्म जगले ते. जगावा लागतो हं धर्म! भक्ती जगावी लागते; अध्यात्म जगावं लागतं. हा वाणीचा विलास नाही. हा कल्पनेचा शृंगार नाही. नगद जीवन पाहिजे; मग तिथून संक्रांत होते.
तेव्हा माझं आपल्याला असं कळकळीचं सांगणं आहे की, ज्यांना कुणाला वाटत असेल की आपल्या तरुण पिढीमध्ये संक्रांत व्हावा मानवधर्म,- जाऊ देत नं ईश्वर वगरे! मनावोचित धर्म तुला आला पाहिजे हे सांगा. मननात् मनुष्य: मनन केल्याशिवाय, विचार केल्यावाचून, समजल्यावाचून तू पाऊल टाकू नकोस, हे त्याला शिकवता येणार नाही का ? आणि समजल्यानंतर तू पाऊल उचलशील त्याचा जो काही परिणाम होईल तो धीर गंभीर राहून सहन करायचा. तिथून पळून जायचं नाही.
पलायनवादामध्ये जीवन नाही रे. झाली असेल चूक, खाल्ली असेल ठोकर; तर हसत हसत त्याचे परिणाम तू सहन कर; पण पळून जाऊ नकोस. भारतीय संस्कृती मनुष्याला पलायनवादी बनवीत नाही, ती जीवनपरायण संस्कृती आहे, हे नाही का शिकवता येणार ? तुला जे समजलं असेल, तुला जे सत्य समजलं त्याप्रमाणे वाग आणि त्या वागण्यात चुका होतील तर घाबरू नकोस, अपयश येईल तर घाबरू नकोस. यश आणि अपयशानं-यश आणि अपयश तराजूप्रमाणे घालून काही जीवनाची किंमत नाही करता येत. तू जगला की नाही? तुझ्या बुद्धीप्रमाणे डोळे उघडे ठेवून, विचार करून तुझ्या समजुतीप्रमाणं जगलास की नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसऱ्यांची अनुकरणं, अनुसरणं करीत करीत, सेकंड हँड, थर्ड हँड पर्सन बनून जगू नकोस. मुला! तूच तुझा गुरू आणि तूच तुझा विद्यार्थी!
एक दिवस आमच्या वडिलांनी बोलावलं. ते इंडियन रेशनलिस्ट सोसायटीचे सेक्रेटरी. विलक्षण बुद्धिनिष्ठ मनुष्य. त्यांनी बोलावून मला सांगितलं की, ‘हे पाहा, तुम्हाला जी काही साधना करायची असेल, वाचन करायचं असेल आणि ईश्वरार्पण जीवन जगायचं असेल त्याला माझी हरकत नाही. पण एक गोष्ट आमची माना. कुठल्याही व्यक्तीला गुरू करू नका. गुरू तत्त्व आहे आणि परमात्मा स्वयंगुरू आहेत. लाइफ इज अ मास्टर, आणि तुमच्या आतमध्ये पण तो आहे. बुद्धी विकू नका आणि जिथं बुद्धी थकेल तिथं श्रद्धा आहेच; मग प्रणती आहे, शरणागती आहे, पण तो जो जीवनगुरू आहे, जीवनविभू आहे, तो तुम्हाला शिकवील.’
असं कोणी सांगतात का मुलांना? ‘आम्ही म्हटलंच होतं, ऐकलं नाही, तू केलंस, आता भोग.’ असं म्हणणारे निघतात ; पण मुलानं जर स्वत:च्या समजुतीनं केलं आणि ठोकर खाल्ली तर,‘ काही नाही बाबा; उठून उभा हो, चल.’ अशी निर्भयता, अशी सत्यनिष्ठा, स्वत:च्या आकलनावरची श्रद्धा, अशी आत्मश्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तेव्हा सत्यनिष्ठ, जीवननिष्ठ, आत्मश्रद्धेनं युक्त, निर्भय असा तुमचा मुलगा होऊ दे. तो मानवधर्म जगायला लागेल. त्याला एवढंच सांगा,‘ मनुष्य म्हणून जग रे!’ सगळ्या मानवांसाठी धर्म एकच आहे. उपासनांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी घरात मंदिर बनवून, विग्रह ठेवून पूजा करील, कुणी पाच वेळा नमाज पढेल, कोणी हातात बायबल घेऊन बसेल, कुणी वर्धमान महावीरांची वाणी आणि कोणी गौतम बुद्धाची वाणी. हा उपासनेचा विषय आहे, पण घराबाहेर पाऊल ठेवलं म्हणजे मनुष्यता हा धर्म आहे, त्याला मनुष्य बनू द्या. ‘डिव्हिनिटी इज नथिंग बट द कन्स्म्पशन ऑफ ह्य़ुमननेस.’
(‘विश्व स्वधर्मसूर्यें पाहो’ या ढवळे प्रकाशनच्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)
आत्मोन्नती
‘कुठल्याही व्यक्तीला गुरू करू नका. गुरू तत्त्व आहे आणि परमात्मा स्वयंगुरू आहेत. लाइफ इज अ मास्टर आणि तुमच्या आतही तो आहे. बुद्धी विकू नका आणि जिथं बुद्धी थकेल तिथं श्रद्धा आहेच. ‘आजच्या समाजामध्ये तरुण पिढीला जीवनाचं ध्येय आत्मोन्नती हे असावं, हे कसं पटवून द्यायचं? धर्म आणि ईश्वर यांचं जीवनात काही महत्त्व आहे असं कसं पटवून देता येईल?
आणखी वाचा
First published on: 26-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life is a master do not blindly make anyone your guru