कुठलीही गोष्ट १० वर्ष सांगत राहणं फार अवघड काम आहे. त्यातला ताजेपणा टिकवून ठेवणं त्याहून कठीण. पण या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ने ते करून दाखवलं आहे. ही माणसं खरी आहेत. त्यांना खऱ्या माणसांसारखे राग-लोभ आहेत, ते एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढतात, एकमेकांना पिडतात, छेडतात, भांडतात आणि परत एक होतात. ‘..उलटा चष्मा’मध्ये या व्यक्तिरेखा अस्सल उतरल्या आहेत.
हे सदर लिहायचं ठरलं तेव्हाच एक विषय माझ्या मनात पक्का होता- ‘तारक मेहता का उलटा चष्मा’- ही मालिका! गेली दहा वर्ष सुरू असलेल्या या मालिकेचे नुकतेच अडीच हजार भाग पूर्ण झाले, अलीकडेच त्यांच्यातला एक भिडू (कवी कुमार ऊर्फ डॉ. हाथी) अकाली आपल्यातून निघून गेला. या मालिकेत नेहमी दिसणारी पात्रं साधारण २५ आहेत. चार जण सोडले तर बहुतेक सगळे नट तेच आहेत, जे सोडून गेले त्यातले दोघं परतही आले आहेत. पण या सदरात हा विषय निवडण्यामागे यापैकी कुठलंच कारण नाही.
खऱ्या अर्थानं ‘लाइफ इज ब्युटीफुल’ असं वाटायला लावणारी ही मालिका आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यातली माणसं! खरं तर व्यक्तिरेखा, पण अनेक वर्ष त्यांना बघत, भेटत राहिल्याने आता ती खरीखुरी माणसं वाटायला लागली आहेत. ‘गोकुळधाम’ (या मालिकेतल्या हाऊसिंग सोसायटीचं नाव) मधल्या पोरांनी भिडेची स्कूटर पळवून अपघात केला की मला टेन्शन येतं, जेठालाल अनवधानाने ज्या अनेक भानगडी, घोटाळ्यांमध्ये अडकतो ते बघून त्याला मदत करावीशी वाटते. पोपटलालसाठी मुली बघण्याचा मोह होतो.. जे ही मालिका बघत नाहीत त्यांना मी काय म्हणतेय ते कळणार नाही, पण जे बघतात ते मात्र माझ्याशी सहमत होतील.
कुठलीही गोष्ट १० वर्ष सांगत राहणं फार अवघड काम आहे. त्यातला ताजेपणा टिकवून ठेवणं त्याहून कठीण. पण या ‘..उलटा चष्मा’ने ते करून दाखवलं आहे. ही माणसं खरी आहेत म्हणजे नेमकं काय आहे- तर त्यांना खऱ्या माणसांसारखे राग-लोभ आहेत, ते एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढतात, एकमेकांना पिडतात, छेडतात, भांडतात आणि परत एक होतात. प्रत्येक माणसात असतात तसे त्यांच्यात गुणदोष आहेत. वेगवेगळ्या मालिकांची लेखक म्हणून माझ्या समोर नेहमी एक आव्हान असतं ते हे की सर्वगुणसंपन्न नसलेली पात्र निर्माण करणे, त्यांच्यात दोष असणे आणि तरीही त्यांच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात आत्मीयता निर्माण करणे. ‘..उलटा चष्मा’मध्ये हे उत्तम जमून आलंय. यातल्या जेठालालला शेजाऱ्याच्या बायकोचं जरा ‘जास्तच’ कौतुक आहे. ते कौतुक तिला तर दिसतंच, पण तिच्या नवऱ्यालाही दिसतं! त्याला अर्थातच ते आवडत नाही, पण तो ते सहन करतो कारण जेठालाल कधीही ‘पातळी’ सोडून वागत नाही. जेठालालचं कौतुक चोरटं नाही. तो ते खुलेपणाने, भोळसटपणाने व्यक्त करतो, खुलेपणानं तिच्या नवऱ्यावर खार खातो!
ही एक विनोदी मालिका आहे इतकं तर ‘लोकसत्ता’च्या वाचकांना नक्कीच ठाऊक असेल. पण यातला विनोद निरोगी, निकोप आहे. मध्यंतरी एक काळ असा आला होता की विनोद म्हणजे समोरच्या माणसाचा अपमान! ‘..उलटा चष्मा’मध्ये हे कधीच होत नाही. ज्या काळात ही मालिका सुरू झाली, त्या काळात बायकांच्या कृष्णकृत्यांची चलती होती. बायकांना आवडतं, आमचा प्रेक्षक बायका आहेत, अशा सबबी सांगत एकमेकांच्या उरावर बसणाऱ्या बायका, अष्टोप्रहर भडक मेकअप करून शिकारीला सज्ज असणाऱ्या बायका सर्वत्र दिसत (शुभांगी गोखलेच्या भाषेत सकाळी उठताना पण लाल लिपस्टिक लावून उंदीर खाल्लेल्या मांजरासारख्या दिसणाऱ्या बायका!). या मालिकेत अनेक बायका आहेत, एकीसारखी दुसरी नाही, पण त्या गुण्यागोविंदानं नांदतात. आपण एक कुटुंब आहोत, या भावनेला एका बाजूला ‘गोकुळधाम’मधले पुरुष आणि दुसऱ्या बाजूला या बायका- सगळे मिळून खतपाणी घालतात. मुंबईच्या गोरेगावात असणाऱ्या या सोसायटीत राष्ट्रीय एकात्मता पण आहे, पण कुणी त्याचे झेंडे मिरवताना दिसत नाहीत. कधी नव्हे ते त्यात जो तो माणूस सूक्ष्मपणे आपापल्या प्रांताचा स्वभावविशेष, गुण मिरवताना दिसतो.
यातल्या मराठी माणूस- आत्माराम तुकाराम भिडे- हा शिस्तीचा आहे, पैशाला जपून आहे पण विचारी आहे, हुशार आहे. हाडाचा शिक्षक आहे, बायकोला मदत करण्यात त्याला कमीपणा वाटत नाही. यामुळेच की काय पण तो या सोसायटीचा तहहयात ‘एकमेव सेक्रेटरी’ आहे. या उलट जेठालाल कच्छी आहे, चलाख आणि चतुर आहे, पण फारसा शिकलेला नाही. त्याच्या दुकानात त्याच्या हाताखाली काम करणारी माणसं त्याच्यापेक्षा चांगलं इंग्लिश बोलतात, जास्त धोरणी आहेत. त्यातली मुलं मालिकेबरोबरच मोठी झाली आहेत, त्यांच्या गोष्टी, त्यांचे प्रश्न त्यांच्याबरोबर वाढलेले आहेत. एका वयात ते झाडावरून कैऱ्या पाडल्याने गोत्यात येत होते तर आता चोरून स्कूटर चालवून गोत्यात येतात. ती मुलं व्रात्य आहेत, सतत उचापती करत असतात, मोठय़ांना निरुत्तर करत असतात. पण त्यांच्या खोडय़ांना कुठेही उर्मटपणाचा वास नाही. तसाच प्रसंग आला की त्यांचे मध्यमवर्गीय संस्कार जागे होतात आणि ते योग्य तेच करतात. मालिका सुरू झाली तेव्हा ही सगळी मुलं इतकी लहान होती की त्यांच्याकडून अभिनय कसा काय करून घेतला असेल, त्यांना त्यांची व्यक्तिरेखा कशी काय समजावून सांगितली असेल याचं मला फार कुतूहल आहे.
मध्यंतरी एका विशेष मुलांसाठी असलेल्या कार्यक्रमात मी त्यातल्या नव्या ‘टपू’ला पाहिलं. खास सांगण्यासारखी गोष्ट अशी की त्याच्या वागण्यात एक ऋजुता, नम्रता, त्या विशेष मुलांबद्दल जिव्हाळा दिसत होता. कुठेही स्टारगिरी नव्हती. ही माणसं ज्याच्या लेखणीतून उतरली त्यांना सलाम. अर्थात, नावावरून ही सगळी तारक मेहता या गुजरातीतल्या गाजलेल्या लेखक महाशयांच्या लेखणीतून उतरली आहेत. पण त्यात नक्कीच खूप बदल झालेले असावेत. मूळ गुजराती पुस्तकात अखिल भारतीय व्यक्तिरेखा असण्याचा संभव फार कमी आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा रंगवताना नवीन लेखकाचं योगदान नक्कीच असणार आणि त्या पात्रांना माणसं बनवण्याचं जे यश आहे, ते निर्विवादपणे त्या नटांचं आहे. आता १० वर्षांनी तर ते सगळे नट आपापल्या पात्रांमध्ये इतकी मुरलेली आहेत की त्यांचा अभिनय आता कधी चुकू शकत नाही. निदान प्रेक्षक म्हणून बघताना तरी तसं वाटतं.
ज्याला कॅमेऱ्याच्या भाषेत ‘टेकिंग’ म्हणतात ते काही फार तंत्रबंबाळ नाही. साधे अँगल्स, साधे शॉट्स, सगळे नीट दिसतील आणि काय चाललंय ते कळेल इतपत तंत्र. अशा टेकिंगमध्ये नटांची जबाबदारी वाढते. मोठ-मोठ्ठाले सीन सलग शूट होतात तेव्हा त्यांना सतत सतर्क राहावं लागतं आणि कायम ‘भूमिकेत’ असावं लागतं. त्यांच्या भूमिकेत राहून त्याप्रमाणे रीअॅक्ट व्हावं लागतं. त्यांचा अभिनय आता ‘चुकू’ शकत नाही हे वर म्हटलं ते या अर्थाने.
कॉमिक टायमिंग असं जिथे-तिथे बोललं जातं. पण- फक्त विनोदालाच टायमिंग लागतं का? आणि फक्त टायमिंगने विनोद साधतो का? असे प्रश्न मला पडतात. मी जे इतके वर्ष पाहत आले त्यावरून मला असं लक्षात आलेलं आहे की टायमिंग हे सतत, प्रत्येक क्षणी महत्त्वाचं असतं. अंधारलेला मंच नक्की किती उजळला की त्यावर एन्ट्री घ्यायची, संगीत सुरू झाल्यानंतर किती वेळाने वाक्य घ्यायचं- या सगळ्यामध्ये टायमिंग लागतंच. विनोदनिर्मितीमध्ये त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती व्यक्तिरेखा. ‘..उलटा चष्मा’मध्ये या व्यक्तिरेखा अस्सल उतरल्या आहेत एक आणि आपल्या कार्यक्रमाला एक विनोदी मालिका याच्यापेक्षा खूप अधिक उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
pamakulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com