प्रतिमा कुलकर्णी

‘लाइफ इज ब्युटिफुल’ सदरातील लेखांमुळे एक झालं- मला माझा आवाज सापडला. इतकी वर्ष व्यक्तिरेखांच्या मागे दडून लिहिणारी मी आता ‘मी’ म्हणून लिहायला लागले. कधी कुठे भाषण द्यायचं झालं तर मी म्हणते, प्रश्न कितीही विचारा, मी उत्तरं देईन; पण भाषण नको. कारण मी नक्की कुणाशी बोलतेय? त्यांच्याशी कुठच्या भूमिकेतून बोलायचं आहे? अशा अनेक गोष्टी. नाही म्हटलं तरी आता जरा भीड चेपली आहे. आता दर पंधरा दिवसांनी लेख पाठवायचं दडपण नाही, पण दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या मेल्सही नाहीत, त्याची सवय करावी लागेल! चला तर मग.. आता निरोप घ्यायची वेळ आली..

आज हा शेवटचा लेख लिहिताना सगळ्यात कुणाची आठवण येत असेल तर जिवलग मित्र, पत्रकार सुहास फडके याची. तो आज आपल्यात नाही. ‘चतुरंग’साठी मी लिहिणार म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला. लेखाच्या वर छापलेला फोटो त्याच्याच घरात काढलेला आहे, गेल्या ३१ डिसेंबरला. पहिला लेख आला आणि मित्रमंडळींपैकी पहिली प्रतिक्रिया त्याची आली. ‘गीतरामायण’ लेखात ‘मला संगीतातलं काही कळत नाही’ असं लिहिल्याबद्दल त्याला रागही आला, पण आपल्याला संगीतातलं कळत नाही हे म्हणण्याइतपत मला संगीत कळतं!

२०१७ च्या नोव्हेंबर महिन्याच्या आसपास एकदा फोन वाजला, वर्षभर सदर लिहायचा प्रस्ताव मांडणारा! हो-नाही करता करता शेवटी हो म्हणून बसले. लिहिण्यापूर्वी एका गोष्टीबद्दल आमचं एकमत झालं- की आसपास जे चाललंय, दिसतंय त्यात वाईट भरपूर आहे. त्याबद्दल लिहिणं सोपं आहे; पण या सगळ्या कल्लोळात आपल्याला तग धरायचा असेल, चांगल्यासाठी काही करायचं असेल तर काही सुंदर, मंगल गोष्टींना धरून राहणं गरजेचं आहे. मग आपण त्याविषयीच का लिहू नये? आणि त्यातूनच ‘लाइफ इज ब्युटिफुल’ लिहिलं गेलं.

याआधीही असा अनुभव होताच, की वाईट गोष्टींचा गवगवा जास्त होतो, ते सोपं असतं, त्यात जास्त मजा असते; पण चांगल्याची आवर्जून दखल घ्यावी लागते. ‘लाइफलाइन’ मालिकेच्या काळात हे विशेष लक्षात आलं. वैद्यकीय क्षेत्रात चाललेल्या वाईट गोष्टींची नेहमी चर्चा होते; पण मुंबईतले (आणि बाहेरचेही असतील) किती तरी डॉक्टर्स नियमितपणे खेडय़ात जाऊन वैद्यकीय सेवा देतात, हे मी पाहिलं आहे. त्यांच्याबरोबर तिथे जाऊन पाहिलं आहे. मालिकेत सचिन खेडेकर आणि आसावरी जोशी यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा- सार्वजनिक इस्पितळात नोकरी करून गरिबांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या खऱ्या डॉक्टर दाम्पत्यावर आधारलेल्या होत्या- अनिल आणि भारती तेंडोलकर. त्यांना पाहिलं, त्यांच्यासारख्या इतरांना पाहिलं आणि तेव्हा वाटलं- हे किती जणांना माहीत आहेत? चांगल्याविषयी आवर्जून बोललं, लिहिलं गेलं पाहिजे.

वर्षांच्या सुरुवातीला काही विषय टिपून ठेवले- आपल्याला काय-काय आवडतं याची एक यादी केली. हा लेख लिहिताना सहज ती काढून पाहिली, तर त्यातले अनेक विषय मी घेतलेच नाहीत. जसं- मुंबई, रेडिओ, घर, चहा.. चहाविषयी लिहायचं होतं, कारण मला तो अत्यंत प्रिय आहे. बरेच वेळा सकाळी उठण्यासाठी चहा हे माझं सगळ्यात मोठं मोटिव्हेशन असतं. गवती चहा, पुदिना, आलं घातलेला चहा दिवसभर मला खूश ठेवतो. रेडिओ तर चोवीस तासांचा सखा! त्याने माझा प्रत्येक दिवस सुंदर होतो.

मुंबई – कारण ते एक फार सुंदर शहर होतं. माझ्या घरासमोरून ट्राम जायची. ट्राम १९६० मध्ये बंद झाली. तिथे आता एक मोठ्ठा फ्लायओव्हर आलाय. तरी आम्ही त्या रस्त्याला अजून ट्राम लाइनच म्हणतो. ती दिमाखदार आणि तरीही लोभस मुंबई आता फक्त जुन्या चित्रपटांमध्ये दिसते. शाळा-कॉलेजमध्ये असताना बेस्टच्या डबल-डेकर बसमध्ये वरच्या मजल्यावर बसून मुंबई बघणं हा माझा एक आवडता छंद होता. ६३ नंबरची बस म्हणजे मुंबई दर्शन असायची. अगदी मलबार हिलपासून निघून बॉम्बे सेन्ट्रलवरून बेलासिस रोड आणि मग गिरणगावातून वडाळा.. खूप वेळ असल्याशिवाय त्या बसमध्ये बसण्यात अर्थ नसायचा; पण तो काळ आणि ते वय असं होतं, की कुठे पोहोचण्याची घाई नसायची, प्रवासातच गम्मत असायची.

४ नंबरच्या बसने अंधेरीहून दादरला जाताना रस्त्यात खूप जुनी घरं दिसायची. मोठ्ठाली, कौलारू घरं- त्यांच्या खिडक्या, दारं, व्हरांडे, या सगळ्यात एक प्रकारचा कम्फर्ट असायचा. त्यांचा माझ्यावरचा प्रभाव इतका आहे की, कुठचीही व्यक्तिरेखा रेखाटताना नकळत तिला तशा प्रकारच्या कोंदणात बसवलं जातं. प्रत्येक घरात गेलं, की ते घर आपल्याला काही तरी देतं. काही घरांशी लगेच मैत्री होते, काही घरांचा दबदबा वाटतो.. त्या घरात राहणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या घरातूनही व्यक्त होत असतं; पण मुंबई आणि घर हे दोन्ही विषय राहूनच गेले. तसाच रेडिओ आणि चहाही राहून गेला. कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रमंडळींचा बराच वेळ कॅन्टीनमध्ये जायचा. अनेक विषयांवर गप्पा, चर्चा, वाद करण्यात आम्ही रंगून जायचो. कधी कुणी काही खेळ आणायचे. त्यात एकदा कुणी तरी एक प्रश्नांचा खेळ आणला – त्याच्या उत्तरावरून ओळखायचं, की आपलं व्यक्तिमत्त्व काय आहे. त्या वयात आमचा एकच सिंगल पॉइंट अजेंडा असायचा- काही तरी जगावेगळं बोलून (करून नव्हे!) समोरच्याला नॉन-प्लस करायचं! अशाच एका खेळात कुणी तरी प्रश्न विचारला- तुला काय व्हावंसं वाटतं- मी उत्तर दिलं- पाणी!

चेष्टा म्हणून दिलेलं उत्तर- पण बहुतेक त्याच वेळी कॅन्टीनच्या भिंती ‘तथास्तु’ म्हणाल्या असाव्यात. खरोखरच आयुष्य पाण्यासारखं प्रवाही होत गेलं- त्यामुळे बोलण्यासारखं खूप मिळालं हे खरं- पण डोक्यात विचारांची गर्दी होत गेली. त्यामुळे लिहिणं हे फक्त बसून काही विचार शब्दांत मांडणं इतकी मर्यादित गोष्ट नव्हती. मुळात आपल्याला काय म्हणायचं आहे- अमुक एका गोष्टीबद्दल इतस्तत: विखुरणाऱ्या विचारांना एकत्र करून त्यांना एका सूत्रात गुंफून छानपैकी मांडणं हे खूप अवघड होतं.

सुरुवातीचे काही लेख वाचून जवळचे लोक म्हणाले- विस्कळीत आहेत. मी काळजीत पडले, कारण नक्की काय होतंय हे कळत नव्हतं. त्यामुळे ते दुरुस्त कसं करायचं हे लक्षात येत नव्हतं. शिवाय वाचकांचा प्रतिसाद उत्तम होता. ‘गीतरामायण’च्या लेखाला मात्र एक प्रखर टीका करणारी मेल आली. अर्थातच मी जराशी खट्ट झाले, पुन:पुन्हा त्यांचे मुद्दे वाचले आणि लक्षात आलं की, त्यांची माझी मतं वेगळी आहेत म्हणून त्यांना लेख आवडला नाही.. त्यांना त्यांची मतं मांडायचा अधिकार आहेच की! ‘बॅरिस्टर’ नाटकावर लेख लिहा, असा आग्रह करणारी एक मेल आली. लेख लिहिल्यावर मात्र त्यांची निराशा झाली. त्यांची अपेक्षा काय होती ते माझ्या लक्षात आलं नव्हतं.

आता दर पंधरा दिवसांनी लेख पाठवायचं दडपण नाही, पण दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या मेल्सही नाहीत, त्याची सवय करावी लागेल! या लेखांमुळे मात्र एक झालं- मला माझा आवाज सापडला. इतकी वर्ष व्यक्तिरेखांच्या मागे दडून लिहिणारी मी आता ‘मी’ म्हणून लिहायला लागले. कधी कुठे भाषण द्यायचं झालं तर मी म्हणते, प्रश्न कितीही विचारा, मी उत्तरं देईन; पण भाषण नको. कारण लोकांना काय ऐकायचंय हे मला माहीत पाहिजे. माझ्या ‘मन की बात’ त्यांना ऐकायची असेल कशावरून..! मी नक्की कुणाशी बोलतेय? त्यांच्याशी कुठच्या भूमिकेतून बोलायचं आहे? अशा अनेक गोष्टी. नाही म्हटलं तरी आता जरा भीड चेपली आहे.

तर – आता निरोप घ्यायची वेळ आली. पुढच्या वर्षी नवा लेखक, नवा विचार, नवी गम्मत- तेव्हा- चला तर मग! सगळे मिळून येणाऱ्या नव्याचं स्वागत करू या- मात्र एक लक्षात ठेवू या- की लाइफ इज ब्युटिफुल!

(सदर समाप्त)

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com