|| प्रतिमा कुलकर्णी
माझ्या आयुष्यात ‘गीतरामायण’ आलं खूप उशिरा. कविश्रेष्ठ गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरांची ती जादू.. खरं तर यातल्या ५६ गाण्यांपैकी प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल. भावनांचं ‘रोलर कोस्टर’ ठरणारी ही गाणी, आणि अनेक ‘दृश्य’काव्याने भरलेले संपूर्ण गीतरामायण! यातले प्रसंग चितारण्याची गदिमांची पद्धत मोठी खुबीदार आहे आणि ते स्वरबद्ध करणारा सुधीर फडके यांचा दैवी आवाज. गीतरामायण ऐकत असताना हा राम आपल्या काळजात कधी खोल खोल झिरपत जातो आपल्याला कळतही नाही..
राम, कृष्ण हे लोक आपल्या आयुष्यात कधी आले हे कुणाला आठवत असेल का? बहुतेक नाही. कळायला लागण्याच्या वयापासून ते आपल्या आयुष्याचा भाग असतात. त्यांच्या दैवी ‘स्टेटस’बद्दल मला माहिती नाही, पण ते माझे ‘हिरो’ आहेत हे नक्की. कृष्णाची मी लहानपणापासूनच चाहती होते. यशोदेचा कान्हा, राधेचा कृष्ण, गोपींचा कन्हैया, पार्थाचा सारथी, द्रौपदीचा सखा.. बंसीधर, गोवर्धनधारी कृष्ण सगळ्यांचाच लाडका असतो.
रामाशी मात्र माझी तेवढी ओळख नव्हती. मर्यादापुरुषोत्तम, वडिलांच्या वचनपूर्तीसाठी सिंहासनाचा त्याग करणारा, चौदा र्वष वनवास भोगणारा राजपुत्र एवढी माहिती असली तरी तो राम माझ्या मनात शिरला नव्हता. पण ‘गीतरामायण’ ऐकलं आणि त्या रामाने माझ्या काळजाचा ठाव घेतला. ‘गीतरामायण’ ज्या काळात रेडिओवर गाजलं होतं त्या काळात मी रेडिओ ऐकण्याच्या वयाची नव्हते. त्यामुळे ते माझ्या आयुष्यात आलं खूप उशिरा. नाही म्हणायला काही गाणी माहीत होती- त्यातलं एक म्हणजे ‘पराधीन आहे जगती..’
मला ते अजिबात पटलं नव्हतं. ‘असा कसा पराधीन असेल माणूस..’ ही माझी त्या वयातली प्रतिक्रिया. मागच्या लेखात मोठं होण्याबद्दल लिहिताना मला ही गोष्ट आठवली. मी काही ते गाणं कधी फारसं आवडीने ऐकलं नव्हतं. पुढे एक दिवस पुण्याला अलुरकरांच्या दुकानात चक्कर टाकली तेव्हा गीतरामायणाच्या कॅसेट्सचा सेट दिसला आणि अगदी सहज म्हणून तो घेतला. त्या वेळी अनेक वर्षांनंतर ‘पराधीन आहे जगती..’ ऐकलं तेव्हा कारण नसताना डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. सहज गप्पांमध्ये ती गोष्ट एका मित्राला सांगितली, आणि म्हटलं, ‘‘कमाल आहे नं- ते गाणं मला आधी फार ‘बोअर’ वाटत होतं!’’ तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे, कारण त्या वेळी तुझ्या आयुष्यात इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या नव्हत्या!’’ कदाचित गेल्या लेखात मोठं होण्याबद्दल जे लिहिलं त्या विचाराची ठिणगी तिथेच पडली असेल.
आता जितक्या म्हणून यंत्रांवर संगीत ऐकता येतं, तितक्या सगळ्या रूपात माझ्याकडे गीतरामायण आहे! कधीही आणि कुठेही मनात आलं की ऐकता यावं म्हणून!
गीतरामायणाला दोन आरंभबिंदू आहेत. सुधीर फडकेंच्या आवाजातल्या निवेदनात अयोध्येच्या राजसभेत आलेल्या लव-कुश यांचं वर्णन करून झाल्यावर ऐकू येतात ते बासरीचे हळुवार, पण आर्त स्वर आणि त्यानंतर ‘श्रीराम! श्रीराम!’ हे स्वरबद्ध शब्द. कुणाचंही मन भक्तिभावाने भरून टाकतील असे हे स्वर. मग त्याला श्रीराम म्हणजे काय, कोण हे काहीही माहीत नसेल तरी तसंच वाटेल. ती जादू सुधीर फडकेंच्या स्वराची, त्यातल्या भावाची. अनेक कडव्यांमधून त्या दोन बाळांचं वर्णन आल्यावर येतो तो त्या गाण्यामधला उच्च बिंदू- ‘सोडून आसन उठले राघव..’ आणि आपण तो सोहळा प्रत्यक्ष पाहतो आहोत असा भास होतो.
संपूर्ण गीतरामायण अशा अनेक ‘दृश्य’काव्याने भरलेले आहे. प्रसंग चितारण्याची गदिमांची पद्धत मोठी खुबीदार आहे. महर्षी विश्वामित्र दशरथाकडे रामाला त्यांच्या बरोबर पाठवण्याची मागणी करतात, त्यात ते म्हणतात- ‘येतो तर येऊ दे अनुज मागुता..’ जणू असं वाटतं की एकीकडे विश्वामित्र आणि दशरथ बोलत असताना दुसरीकडे लक्ष्मण रामापाशी हट्ट करतोय- ‘‘दादा मलापण यायचंय!’’ विश्वामित्र राजाकडे मागणी जरी करत असले तरी ती मागणी एका महर्षीची आहे. त्यातले शब्द, गाण्याची चाल आणि बाबूजींचा आवाज या सगळ्यामध्ये एक अधिकार, एक आब आहे. ते याचना करत नाहीत. आपला तरुण मुलगा राक्षसांशी लढण्यासाठी जाणार हे ऐकल्यावर कौसल्या काळजीत पडली आहे असं सूचित होतं – तिला बरंच समजावून झाल्यावर विश्वामित्र असंही म्हणायला कमी करत नाहीत- ‘उभय वंश धन्य रणी पुत्र रंगता..!’
दुसरा आरंभबिंदू आहे लव-कुश कथा सांगायला सुरुवात करतात तो. ‘सरयू तीरावरी अयोध्या..’ मला संगीतातलं तंत्र कळत नाही, पण शब्दांतून आणि सुरांतूनही तिथे एक ‘गोष्ट’ सुरू होते आणि आपण ती ऐकायला सरसावून बसतो. रामायणातल्या अनेक प्रसंगांचे जे वेगवेगळे रंग आहेत, त्याप्रमाणे गदिमांची दृश्य, त्यांचे शब्द ती ती रूपं धारण करतात. ‘जोड झणी कार्मुका, सोड रे सायका, मार ही त्राटिका, रामचंद्रा!’ या गाण्यात एक जबरदस्त फोर्स आहे, अटॅक आहे. शब्दांची निवडही अशी आहे की सतत आघात जाणवत राहावेत. गदिमा-बाबूजी अनेक पात्र होतात-रामच नव्हे तर लक्ष्मण, भारत, सीता, अगदी कुंभकर्णदेखील! कुंभकर्णाच्या तोंडून गदिमा रावणाला चार शब्द सुनवायलाही कमी करत नाहीत!
खरं म्हणजे त्यातल्या ५६ गाण्यांपैकी प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल. एक-एक गाणं एक-एक रत्न आहे. तरीही सलग येणारी तीन गाणी अशी आहेत, की ती एखाद्या नाटकासारखी किंवा एकांकिकेसारखी वाटतात.
वनवासी रामाला भेटायला धाकटा भाऊ भरत येतो, श्रीरामांना अयोध्येला परत जाण्याची विनवणी करतो, राम नकार देतात आणि मग भरत त्यांच्या पादुका मागतो. ही तीन गाणी म्हणजे भावनांचं ‘रोलर कोस्टर’ आहे.
दूरवरून भरत आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या सैन्याची चाहूल लागते. लक्ष्मणाला कुणीतरी शत्रू चाल करून येतोय असं वाटून तो बघायला जातो ते ताल वृक्षावर. जाण्याआधी लक्ष्मण रामाला सांगतोय- ‘आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा- चापबाण घ्या करी सावधान राघवा!’ एखाद्या कॅमेरामनने चित्रण करावं त्या पद्धतीने आधी खूप लांबून दिसणारं दृश्य हळूहळू जवळ येत जावं त्याप्रमाणे आपल्या समोर साकार व्हायला लागतं.
खूप मोठा धुरळा उडतोय, वाद्यांचे हादरवून टाकणारे आवाज येतायत, त्या आवाजाने जंगलात कल्लोळ उडालाय, पशू-पक्षी घाबरून सैरावैरा धावतायत.. रथात उभा राहून कुणी तरी येतोय एवढंच दिसतंय. मग रथ जरा पुढे येतो- तसा लक्ष्मण म्हणतो- ‘सावळी तुम्हा परी दीर्घ बाहु आकृती..’ थोडय़ा वेळात त्याच्या लक्षात येतं की तो भरत आहे. तो शत्रू म्हणून लढायलाच आलाय असा समज झालेला लक्ष्मणही युद्धासाठी त्वेषाने सज्ज होतो- इतका की तो म्हणतो- ‘कैकेयीस पाहू दे छिन्न पुत्र देह तो!’ किंवा ‘क्षम्य ना रणांगणी पोरकेही पोर ते!’ भरत आल्यावर, रामाशी बोलल्यावर मात्र रंग पालटतो आणि एक शांत, शहाणा सूर लागतो- ‘दैवजात दु:खे भरता- दोष ना कुणाचा..’
भरताला रामाचं म्हणणं मान्य करावंच लागतं, पण त्या दु:खावेगात तो म्हणतो : ‘सांगता तेव्हा न आले, चरण जर का मागुती, त्या क्षणी ह्य़ा तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती-’ आणि मग परत एकदा आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं करत गदिमा म्हणतात- ‘ही प्रतिज्ञा ही कपाळी पावलांची मृत्तिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!’
राम वनवासाला गेल्यावर सुमंत जेव्हा दशरथाला भेटतो, तेव्हा दशरथ विचारतो, ‘‘माझा राम काय रे म्हणाला जाताना?’’ हे वाक्य गद्य स्वरूपात फडकेंच्या निवेदनात येतं- कुणाही नटाने अभ्यास म्हणून ऐकलंच पाहिजे असा वाचिक अभिनयाचा धडा आहे ते वाक्य!
सगळ्यांना माहीत असलेली ही रामकहाणी – पण ती ऐकताना राम आपल्या काळजात खोल-खोल झिरपत जातो आणि हा कौसल्येचा राम गदिमा-सुधीर फडकेंच्या मार्गे आपला राम कधी होऊन जातो ते कळतच नाही.
pamakulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com