आत्तापर्यंत या सदरात पाच लेख प्रसिद्ध झालेले आहेत. बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत, येताहेत. काही जवळची माणसं विचारतात, विषय तरी काय आहे तुझ्या लेख-मालेचा? दर वेळी काही तरी वेगळंच असतं. विषय हाच आहे – लाइफ इज ब्युटिफुल!
याच नावाचा- ‘लाइफ इज ब्युटिफुल’ – चित्रपट एका नाझी छळ छावणीत घडतो. एक ज्यू बाप त्या छळ-छावणीतही आपल्या लहान मुलाला आयुष्याचं सुंदर चित्र दाखवायचा आटोकाट प्रयत्न करतो. तसं नाही केलं तर तो मुलगा लहान वयात कोमेजून जाईल, जगण्याची लढाई न लढताच हरेल, तसं होऊ नये म्हणून तो बाप जिवाचं रान करतो. तशीच एक जपानी कादंबरी – तिचा मराठीतही अनुवाद आहे- ‘मादोगिवा नो तोत्तोचान.’ याचा शब्दश: अर्थ आहे- खिडकीतली तोत्तोचान. पण जपानी संदर्भात त्याचा अर्थ आहे- बिनकामाचा माणूस. काम न करणाऱ्या माणसाला खिडकीलगतची खुर्ची मिळते. कारण त्याला टंगळमंगळच करायची असते. कामाची माणसं खोलीच्या मध्यभागी बसतात. त्या अर्थाने खिडकीतली तोत्तोचान म्हणजे शेवटचा नंबर येणारी, बिनडोक मुलगी.. तोत्तोचान ही एक सत्यकथा आहे. त्यातली नायिका खरी आहे, ती ज्या शाळेत शिकली, ती शाळा खरंच अस्तित्वात होती, पण दुसऱ्या महायुद्धात तिच्यावर बॉम्ब पडून ती बेचिराख झाली.
तोत्तोचानच्या लहानपणीचा तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा, आणि त्यानंतरच्या पराजयाचा. या काळाचे, त्या समाजाचे क्वचित काही पडसाद कादंबरीमध्ये आहेत, पण त्यामुळे तिचे आई-वडील, तिचे मास्तर तिचं मन काळवंडून टाकत नाहीत. तोत्तोचान ही एक ‘ढ’ आणि उपद्व्यापी मुलगी आहे या सबबीवरून तिला पहिल्या इयत्तेतच शाळेतून काढून टाकलेलं होतं. त्यानंतर खूप धावपळ, खटपट करून तिच्या आईने जी शाळा शोधून काढून तिला त्यात घातलं ती ही शाळा- तोमोए गाकुएन. त्या शाळेत आपल्यात काही कमी आहे असं तिला कधीच वाटलं नाही.
जेव्हा जेव्हा तिचे मास्तर तिला भेटायचे तेव्हा तेव्हा तिला म्हणायचे- ‘‘खरं म्हणजे तू एक शहाणी मुलगी आहेस!’’ पुस्तकाची लेखिका – कुरोयानागि तेत्सुको म्हणते की, खूप पुढे मोठ्ठी झाल्यावर तिच्या लक्षात आलं की मास्तर ‘खरं म्हणजे..’ अशा शब्दांनी वाक्याची सुरुवात करत असत. पण तिने फक्त ‘शहाणी मुलगी’ एवढंच लक्षात ठेवलं होतं. आपण शहाणी मुलगी आहोत या विश्वासावर तिने पुढे एवढय़ा गोष्टी केल्या की आज ती युनिसेफची गुडविल अँबेसेडर आहे, वर्ल्ड वाइल्डलाइफचं काम करते, मूक-बधिर मुलांसाठी संस्था चालवते. आणखीही बरंच काही.. तिच्याच शब्दांत सांगायचं तर या सगळ्याचा पाया मास्तरांच्या त्या शब्दात आहे- ‘खरं म्हणजे तू एक शहाणी मुलगी आहेस!’
अशाच अनेक साध्या, सोप्या पण सुंदर गोष्टी वाचकांबरोबर शेअर करणं- एवढाच या लेख-मालेचा उद्देश आहे. हा लेख लिहितेय तो दिवस ८ मार्च आहे. साहीर लुधियानवीचा जन्मदिन. काही झालं तरी आज काही तरी लिहायचंच असं ठरवून हे लिहितेय. साहीरच्या असंख्य सुंदर गीतांपैकी एक नितांतसुंदर गीत म्हणजे ‘वोह सुबह कभी तो आयेगी..’ पण आज वृत्तपत्र वाचताना, बातम्या बघताना त्याच्या वेगळ्याच ओळी आठवतात- ‘आसमान पे है खुदा, और पे हम- आजकल वह इस तरफ देखता है कम..’ आणि म्हणून आवर्जून काही सुंदर, मंगल गोष्टी गाठीशी बांधून ठेवणं गरजेचं आहे.
आपल्या नेहमीच्या जगण्यात असे कित्येक प्रसंग येतात जे आपल्याला काही तरी शिकवून जातात, आपल्या तोपर्यंत उराशी बाळगलेल्या कल्पनांना, विचारांना अचानक छेद देऊन जातात आणि म्हणून कायमचे स्मरणात राहतात. मी पहिल्या लेखात म्हटलं तसं- सुदैवाने माझा प्रत्येक दिवस वेगळा असतो, त्यामुळे असे प्रसंग माझ्या आयुष्यात जरा जास्तच येतात.
मी जे अनेक उद्योग केले त्यात वर्षभर एका प्रतिष्ठित संस्थेत अभिनयही शिकवला. फार आनंदाचे दिवस होते ते. देशभरच्या कानाकोपऱ्यातून मुलं-मुली आली होती. मुंबईत नशीब आजमवायला, चंदेरी दुनियेत आपलंही दान टाकून पाहायला. अशाच एका अनाथ मुलाची ही गोष्ट. ती सांगायच्या आधी तिची पूर्वपीठिका सांगणं गरजेचं आहे. पुलंचे रावसाहेब म्हणतात, ‘उगीच बायकांच्या ऑडियन्सला रडवायला ते पोर मारू-बिरू नका.’ दुर्दैवाचे दशावतार दाखवून लोकांना रडवायला मलाही अजिबात आवडत नाही. तसाच आणिक एक प्रसंग- ‘झोका’ मालिकेचं शूट चालू असताना एक दिवस लंच ब्रेकमध्ये शर्वरी पाटणकर आणि अमृता सुभाष गप्पा मारत होत्या. त्यांच्या बोलण्याचा विषय होता भिकाऱ्यांचा अभिनय, ‘ते इतके अट्टल असतात की जणू काही गाडय़ा थांबल्या की अॅक्शन आणि सुटल्या की कट..,’ शर्वरी म्हणत होती आणि हेही की तिला एकदा तरी भिकाऱ्याची भूमिका करायची आहे! अमृताला जणू एक नवीन साक्षात्कार होत होता.. दोघी तल्लीन होऊन कधी एकदा भिकाऱ्याची भूमिका मिळतेय याची स्वप्न रंगवायला लागल्या. हेसुद्धा मी जरा पॉवर नॅप घ्यायचा प्रयत्न करत असताना! माझ्या दोन मुलींचे ते भिकेचे डोहाळे ऐकून मी धन्य झाले!
अॅक्टिंग स्कूलमध्ये शिकवायला गेले ते हे बॅगेज घेऊनच. मुंबईत वाढलेली, राहिलेली, एक मध्यमवर्गीय मराठी बाई. देशभरच्या तरुण मुलांना भेटणं ही माझ्यासाठी एक रोमँटिक गोष्ट होती. तर, एक दिवस मुलांना एक ग्रुप एक्सरसाईझ दिला. त्यात हा मुलगा होता. तो म्हणाला, मी अनाथ मुलगा होतो, आणि तो एका हॉटेलच्या टेबलावर फडका मारण्याचा अभिनय करायला लागला. मी त्याला विचारलं- ‘‘का रे बाबा?’’ २५ मुलांच्या वर्गासमोर- सगळे हसले. तो मुलगा गंभीर झाला. एरवी तो सतत गोड-गोड हसत असायचा. तो ‘हौशी’ विद्यार्थ्यांपैकी एक होता. करिअर वगैरे काही फार मनात नसावं त्याच्या. त्या दिवशी मात्र तो एकदम गंभीर झाला आणि म्हणाला, ‘मॅम, मी खरंच एक अनाथ मुलगा आहे, किंवा होतो.’ आम्ही सगळे अवाक्, स्तब्ध झालो. तो म्हणाला, वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी असाच उत्तर प्रदेशातल्या एका शहरात हॉटेलमध्ये फडका मारत असताना त्याला एका गृहस्थांनी पाहिलं आणि लगेच आपला मुलगा बनवून घरी आणलं. त्याने त्या गृहस्थांचं नावसुद्धा सांगितलं. एका राजकीय पुढाऱ्याचं नाव. मुंबईच्या राजकारणातलं, सगळ्यांच्या माहितीचं एक नाव आहे ते. त्यांच्याबद्दल नेहमी वृत्तपत्रामध्ये जे छापून येतं, त्यावरून त्यांच्याबद्दल आदर वाटण्याचं काही कारण नव्हतं. पण माझ्या त्या विद्यार्थ्यांसाठी ते देवाहून कमी नव्हते. त्यांनी त्याला घरातला एक म्हणून वाढवलं होतं. हा मुलगासुद्धा अतिशय गोड, नम्र, सांगितलेलं चोख करणारा असा.. पुढे तो जे म्हणाला ते चकित करणारं होतं. तो म्हणाला, मी त्या अनाथ मुलाला आता विसरलोय, पण मला त्याला परत एकदा भेटायचंय. त्याला शोधायचंय. मला प्लीज अनाथ मुलगा होऊ द्या.. मी काय बोलणार- मी एवढी गलबलले होते की, पुढे अनेक दिवस त्याने जे काही केलं ते मला चांगलंच वाटत राहिलं.
असं हे ‘ब्युटिफुल आयुष्य’ कुठच्या दिशेहून, कोपऱ्यातून काही तरी सुंदर समोर येईल सांगता येत नाही.. सभोवतालच्या कोलाहलात ती सुंदरता बघण्याची आपली शक्ती नष्ट होऊ नये म्हणून- जपून ठेवण्याची ही ठेव..
– प्रतिमा कुलकर्णी
pamakulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com