प्रतिमा कुलकर्णी pamakulkarni@gmail.com
मला नशिबाने अशा दोघीजणी भेटल्या की ज्यांनी मुक्तीचा अगदी वेगळा अर्थ दाखवून दिला. अशा दोन स्त्रियांच्या सहवासात राहायला मिळालं, ज्या खऱ्या अर्थाने मुक्तहोत्या, विमुक्तहोत्या. होत्या म्हणणं चुकीचं आहे, मुक्तझाल्या असं म्हणायला हवं. त्या दोन व्यक्ती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक आणि कस्तुरबा गांधी!
आम्ही कॉलेजमध्ये असताना स्त्री-मुक्ती चळवळ जोरात होती. मी आणि माझी सख्खी मत्रीण नीना (बांदेकर) राऊत त्या सगळ्याकडे तटस्थपणे पाहायचो. आम्ही थोडय़ा टवाळ होतो हे त्याचं एक कारण होतं, पण हेही तितकंच खरं की आम्हाला त्या प्रश्नांची निकड समजत नव्हती.
‘‘तू मुलगी आहेस म्हणून तू अमुक एक करायचं नाहीस’’, ‘‘मुलीच्या जातीला ..’’, ‘‘सातच्या आत घरात..’’ यातलं काहीही मी कधी ऐकलं नव्हतं. माझे वडील आईला पूर्ण आदराने वागवायचे. दोघंही आपापली स्पेस घेत होते आणि एकमेकांना मोकळेपणी ती देतही होते. त्यांना आपापले छंद होते आणि ते एकमेकांच्या कधीही आड आले नाहीत. शिवाय आपण हे असं काही करतोय याची त्यांना जाणीवही नव्हती. सगळं अगदी सहज. त्यामुळे आम्हा भावंडांनाही घर हे असंच असतं असंच वाटत आलं. कदाचित म्हणूनच एखाद्या गोष्टीकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहिलं की माझी प्रतिक्रिया ‘‘एवढं काय अगदी’’ अशी असायची. आसपासच्या वातावरणात ते उघडपणे बोलून दाखवायची सोय नव्हती, पण मी आणि नीना आपापसात मात्र तसं बोलायचो.
या सगळ्याला पहिला धक्का बसला तो एका कामाच्या निमित्ताने. रत्नाकर आणि प्रतिभा मतकरी यांनी परित्यक्त स्त्रियांवर एक लघुपट केला होता. त्याची इंग्रजी सब-टायटल्स लिहिताना जाणवलं की आपला परीघ म्हणजे अख्खं जग नाही. अनेक बायका केवळ त्या बायका आहेत म्हणून खूप हलाखीचं जिणं जगतात. त्याच सुमाराला एक दिवस नीना भेटली. ती ‘दूरदर्शन’वर काम करत होती आणि काही कामानिमित्ताने एका खेडय़ात गेली होती. ती परत आली आणि डोळ्यात पाणी आणून मला सांगायला लागली- ‘‘आपण ‘माहेरची साडी’ सिनेमाला हसतो, पण अगं, बायका खरंच तशा जगतात गं! खेडय़ातल्या अनेक बायकांची दशा फार दयनीय आहे!’’ माझ्यासाठी तो डबल डोस होता! तेव्हापासून डोक्यातल्या अनेक प्रकारच्या गुंत्यांमध्ये आणखीन एका गुंत्याची भर पडली! नव्याने मिळालेल्या या दृष्टीमुळे मी जिकडे तिकडे त्याच नजरेने पाहू लागले. आम्हा दोघींना नव्याने कळलेली पिचत जगणारी स्त्री आणि शहरी मध्यम वर्गातली स्त्री या दोघींसाठी मुक्तीचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा? त्यातच तेंडुलकरांच्या ‘कमला’ नाटकातल्या पत्रकाराने ‘विकत’ आणलेल्या आदिवासी कमलाने त्याच्या लग्नाच्या बायकोला विचारलं- ‘तुला कितीला विकत घेतली?’ झालं- डोक्यातला गोंधळ वाढतच गेला.
पण नशिबाने अशा दोघीजणी भेटल्या की ज्यांनी मुक्तीचा अगदी वेगळा अर्थ दाखवून दिला. अशा दोन स्त्रियांच्या सहवासात राहायला मिळालं, ज्या खऱ्या अर्थाने मुक्त होत्या, विमुक्त होत्या. होत्या म्हणणं चुकीचं आहे, मुक्त झाल्या असं म्हणायला हवं! त्या दोन व्यक्ती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक आणि कस्तुरबा गांधी!
खास काहीही खटपट न करता मला या दोन आदरणीय स्त्रियांच्या आयुष्यावर नाटकं दिग्दर्शित करायला मिळाली. दोघींची आयुष्य विलक्षण. नुसता त्यांच्या आयुष्याचा आलेख वाचला- म्हणजे त्यातला गाभा काढून- तर त्यांची फरफट झाली असं कुणीही म्हणेल. पण, त्या दोघी मात्र तसं कधीही म्हणणार नाहीत याची मला खात्री- नव्हे दृढ विश्वास आहे. रेव्हरंड टिळक काय किंवा गांधीजी काय- जगावेगळी माणसं होती. त्यांच्या या दोन बायका जन्मत:च तशा होत्या की हळूहळू तशा घडत गेल्या हे कळायला जागा नाही. का त्या गाठीच तशा बांधल्या गेल्या होत्या- जसे महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले. हा एक आयुष्याचा विस्मयकारक भागच म्हणायचा!
लक्ष्मीबाईंचा जीवनकाल १८६८ ते १९३६. टेलीव्हिजन आणि टेलिफोन नसलेला काळ न बघितलेल्या आजच्या पिढीला त्या काळातल्या कर्मठपणाची कल्पनाही करता येणार नाही. ज्या घरात डाव्या हाताने स्वयंपाक करण्याचीही मनाई होती, डावा हात मोडला असल्याप्रमाणे बाजूला ठेवला जायचा, त्या घरातल्या या मुलीचा नवरा ख्रिस्ती झाला. सगळ्या घरावर आभाळ कोसळलं. टिळक ख्रिस्ती झाले हे ऐकल्यावर लक्ष्मीबाईंची पहिली प्रतिक्रिया होती-‘‘होऊ दे झाले तर- हे गेले म्हणजे माझ्या कपाळावरचं कातडं तर ओढून नेलं नाही नं त्यांनी?’’
जणू काही टिळक गेले आहेत, अशा प्रकारे लोक चौकशीला येऊ लागले. सुरुवातीला लक्ष्मीबाईही धक्क्यात होत्या. जीव नकोसा होऊन त्या विहिरीत उडी मारायलाही निघाल्या. पुढे बरंच काही घडून गेल्यानंतर त्या टिळकांना भेटल्या, त्यांच्याबरोबर राहायला गेल्या आणि त्यांच्या सहवासात त्यांना त्यांच्याच शब्दात सांगायचं तर – ‘साक्षात्कार’ झाला. मुसलमानाच्या हातचं पाणी प्यायला लागलं म्हणून रात्र तळमळून काढली आणि सकाळी त्यांना ‘प्रकाश’ दिसला! त्या म्हणतात, ‘देवानी जाती निर्माण केल्या का माणसांनी?.. ब्राह्मण बल, शुद्र बल, वैश्य कावळा, अतिशुद्र कावळा असले भेद पशुपक्ष्यांत कुठे आहेत? ब्राह्मण व शुद्र ह्यत कुठे फरक आहे?.. बस, माझा जातीभेद गेला..’’
तीच कथा कस्तुरबा यांची. त्या म्हणतात, ‘‘(आफ्रिकेतल्या) आश्रमात बापूच नव्हे तर आम्ही सर्व सुताराचं, गवंडय़ाचं, चांभाराचं, कुणब्याचं, भंग्याचं- सगळी कामं आनंदात करायचो. अगदी छोटी-छोटी मुलं देखील. पण त्यामुळे आम्हा सगळ्यांचा मान कमी झाला की वाढला? टिळक महाराज, प्रोफ. गोखले, गुरुदेव टागोर यांच्या सारखी मोठी माणसं यांच्या प्रेमात पडली ती कशासाठी? माणसा-माणसांत फरक न मानता साऱ्यांनाच आपलं मानायची ताकद त्यांच्यात आहे म्हणूनच ना! उशिरा का होईना, बापू काय म्हणताहेत ते मला कळू लागलं.’’
या दोन घटना या दोघींच्या आयुष्याचा एक छोटासाच भाग आहेत. त्यांची चरित्र पहिली की लक्षात येतं की दोघी जिद्दी होत्या, त्यांना आपापले विचार होते. नवरा म्हणतो म्हणजे ते ऐकलंच पाहिजे असं त्या दोघींनीही मानलं नाही. वेळोवेळी त्यांनी वाद घातले, कडकड केली, पटेपर्यंत हट्ट केला आणि पटल्यावर मात्र मोकळ्या मनाने स्वीकारसुद्धा केला. एखादी गोष्ट पटण्यासाठी मोकळ्या मनाने विचार केला. जो विचार केला तो केवळ आपल्या मनाला आणि बुद्धीला साक्ष ठेवून. निल्रेप आणि निर्भीड भावाने.
हे करताना नवऱ्याचाही आदर ठेवला. लोक त्यांना मोठं म्हणतात म्हणून नाही, तर खरोखर ते आदरणीय आहेत हे पटल्यामुळे. त्याच बरोबर दोघींमध्ये मोठी हिम्मत होती हेही तितकंच खरं.
पहिल्यांदा बोटीतून परदेश प्रवास करून आफ्रिकेला पोचलेल्या कस्तुरबा. गेल्या-गेल्याच एक संकट वाढून ठेवलं होतं. बोटीवरून आलेले हिंदी लोक डर्बनमध्ये येऊ नयेत म्हणून गोरे लोक निदर्शनं करत होते. कस्तुरबा कशाबशा एका ओळखीच्या घरी गेल्या. पण गांधीजींवर लोकांनी हल्ला केला, अंडी फेकली- ते घरात आले ते अशा अवस्थेत. पोलिसांनी निरोप दिला की गांधींनी तोंडाला काळा रंग लावून पोलिसाच्या वेशात पोलीस स्टेशनवर यावं, नाही तर चिडलेले लोक या घराला आग लावतील.
पहिल्यांदा परदेशात आलेल्या, आल्याबरोबर हा असला प्रसंग.. पण ज्यांनी आपल्याला आसरा दिला, त्याच्याच घराला लोक आग लावतील हे ऐकल्याबरोबर कस्तुरबा उठल्या आणि त्यांनी स्वत: गांधींच्या तोंडाला काळा रंग लावला!
नवरा ख्रिस्ती झाला म्हणून जीव द्यायला निघालेल्या लक्ष्मीबाई पुढे स्वत: ख्रिस्ती झाल्या, ते त्यांना तसं वाटलं म्हणून. दोघीही मुक्तझाल्या, आपल्याच रिंगणातून, स्वत:च्या मनाला घातलेल्या कुंपणातून..
chaturang@expressindia.com