विजयाबाई आणि माझ्याबद्दल आज अगदी ‘सेंटी’ होऊन काही गोष्टी सांगायच्या असं ठरवलं आहे. जवळजवळ १३ वर्ष बाईंची सहायक म्हणून काम केल्यानंतर मला बाहेर पडावंसं वाटू लागलं; पण बाईंना सोडून जाववत नव्हतं आणि गैरसमज होईल अशी धास्तीसुद्धा वाटत होती. एके दिवशी हिंमत करून त्यांना हे सांगितलं, त्या ताबडतोब ‘हो’ म्हणाल्या, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच बाईंचा फोन आला, मला म्हणाल्या, ‘‘मी तुला फार सहज जाऊ दिलं का?’’ त्या हे म्हणाल्या आणि आम्ही दोघी गलबलून गेलो. एक दिग्दर्शक आणि सहायक याच्यापेक्षा आपलं नातं फार खोल आहे आणि त्यात अंतर पडू शकत नाही, ही सुखद, पण हळवी जाणीव होण्याचा तो क्षण होता..
माझ्या बाई,
हो. या लेखाचं शीर्षक मुद्दाम असं आहे. माझ्या बाई- विजया मेहता. बाईंना कोण ओळखत नाही? की त्यांच्याबद्दल आजवर कमी लिहिलं गेलं आहे? पण या लेखात ज्या बाई दिसतील त्या फक्त माझ्या आहेत. हे अनुभव फक्त मी घेतलेले आहेत!
बाईंशी माझं नेहमी एका गोष्टीवरून भांडण व्हायचं- म्हणजे मी भांडायचे, बाई हसायच्या. माझं म्हणणं असायचं की, त्या नीना (कुलकर्णी), भारती (आचरेकर), सुहास (जोशी) यांचे जास्त लाड करतात आणि माझे करत नाहीत. मग पुढे अनेक वर्षांनी जेव्हा ‘प्रतिमान’साठी नीनाची मुलाखत घेतली तेव्हा ती म्हणाली की, ‘आम्हाला तुझा हेवा वाटायचा- कारण आमच्यापेक्षा तुला बाईंचा सहवास जास्त लाभत होता.’ मला त्या वेळी जो आनंद झाला तो मी शब्दात सांगू शकत नाही!
काय आहे एवढं त्यांच्यामध्ये, की आज चाळीसहून जास्त वर्ष झाली, तरी आम्ही सगळ्या त्यांच्यासाठी- प्रेमानेच- पण बारीकसारीक हेवेदावे करतो? नाटकाव्यतिरिक्त पहिल्यांदा बाईंना बघितलं तो दिवस, ते दृश्य आजही मला आठवतंय. त्या ‘एरॉस’ सिनेमा थिएटरच्या बाहेर पडल्या आणि गाडीकडे चालायला लागल्या. मी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या मागे-मागे चालत गेले! वर्ष १९७३. त्यानंतर कट टू वर्ष १९८८. मुंबई विमानतळ. मी कोलकात्याला जायच्या रांगेत उभी, बाई-दिल्ली. त्यांना पाहिलं आणि मी माझी रांग सोडून त्यांच्याकडे धावले. हे सगळं मी करते त्यावरून माझी भरपूर चेष्टा होते; नाटकाबाहेरच्या वर्तुळात जास्त. मी त्या वेळी त्यांना सांगू शकत नाही, की असं का होतं, कारण त्या वेळचं वातावरण असं काही ऐकून घेण्याचं नसतं. म्हणून आज अगदी ‘सेंटी’ होऊन काही गोष्टी सांगायच्या असं ठरवलं आहे..
एक घटना घडली नसती तर या गोष्टी मी कधीच, कुणालाच सांगितल्या नसत्या, कारण त्या खास माझ्या आहेत, मनाच्या आतल्या कोपऱ्यातल्या आहेत. बाईंना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला, त्या सोहळ्यात त्यांच्याबद्दल मी एक आठवण सांगितली आणि ती ऐकून कमलाकर सोनटक्के सर म्हणाले की, हे मी कुठे तरी लिहायला पाहिजे. ती आठवण अशी होती-
जवळजवळ १३ वर्ष बाईंची सहायक म्हणून काम केल्यानंतर मला आता बाहेर कुठे तरी पंख पसरावेत असं वाटायला लागलं. संधी येत होत्या, पण बाईंना सोडून जाववत नव्हतं आणि मी बाहेर पडतेय, असं सांगितल्यावर त्यांचा गैरसमज होईल अशी धास्तीसुद्धा वाटत होती; पण एक वेळ अशी आली की, हातात आलेली संधी मला सोडवली नाही. डिसेंबर महिना होता. मी ठरवलं, आता हिंमत करून बाईंशी बोलायचंच. नवीन वर्षांत नवीन कामाला सुरुवात करायची. मला त्यांच्याशी काही तरी खास बोलायचं आहे अशी त्यांना आधी कल्पना देऊन रीतसर वेळ घेऊन मी त्यांना भेटायला गेले. हिय्या करून सांगितलं की, एक नवीन संधी आहे, मला जायचं आहे. त्या ताबडतोब ‘हो’ म्हणाल्या. ‘जा, तुला शिकायला मिळेल,’ असं प्रेमाने बोलल्या. मी घरी आले, मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप सहज झालं होतं सगळं. मी खुशीत होते. मला वाटत होतं, मला खूप कारणं द्यावी लागतील, तुम्हाला सोडून जायचं मनात आहे असं नाही हे त्यांना पटवून द्यावं लागेल; पण त्यातलं काहीच न झाल्यामुळे मला खूप हलकं वाटत होतं.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी बाईंचा फोन आला, मला म्हणाल्या, ‘‘मी तुला फार सहज जाऊ दिलं का?’’ त्या हे म्हणाल्या आणि आम्ही दोघी गलबलून गेलो. एक दिग्दर्शक आणि सहायक याच्यापेक्षा आपलं नातं
फार खोल आहे आणि त्यात अंतर पडू शकत नाही, ही सुखद पण हळवी जाणीव होण्याचा तो क्षण होता.
हृषीकेश मुखर्जीच्या ‘नमकहराम’मध्ये एक वाक्य आहे – राजेश खन्ना अमिताभ बच्चनला म्हणतो- तू कधी आपल्या ड्रायव्हरला नावाने हाक मारली आहेस का? एकदा नावाने बोलावून बघ- ‘‘बिक जायेगा ७७!’’ अशी मी ‘विकली’ गेले तो क्षण मला अजून आठवतो.
त्यांच्याबरोबर काही वर्ष काम करून मी जपानला गेले. दोन वर्षांनी परत आले तेव्हा बाई ‘दूरदर्शन’साठी ‘स्मृतिचित्रे’ करीत होत्या. मी ‘दूरदर्शन’ला गेले तेव्हा आमची अचानक भेट झाली. त्या म्हणाल्या, ‘‘तुझी खूप आठवण येत होती.’’ मी फक्त हसले. थोडय़ा वेळाने त्या मला एडिटिंग रूममध्ये घेऊन गेल्या. तिथे दत्ता सावंत नावाचे एडिटर काम करत होते. बाई त्यांना म्हणाल्या, ‘‘दत्ता, ही कोण असेल?’’ त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं, ‘‘प्रतिमा?’’ मी अवाक् झाले आणि ‘विकली’ गेले! त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून परत त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली!
‘स्मृतिचित्रे’ संपल्यावर मी बाईंच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत राहिले. त्या वेळी मी काही वैयक्तिक खाचखळग्यातून जात होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून काहीच करत नव्हते. बाई सगळं बघत होत्या. बरेच दिवस बघितल्यानंतर त्यांनी मला घरी बोलावलं आणि माझं बौद्धिक घेतलं! प्रेमानेच, कारण रागाने बोलण्याचा त्यांचा स्वभावच नाही. ‘‘तुझे आईवडील तुला जे सांगू शकणार नाहीत ते मी तुला सांगते, पण आता काही तरी करायला लाग. आपल्या पायावर उभी राहा!’’ मी ते मनावर घेतलं नाही. मला बाईंच्या पंखाखाली उबदार, सुरक्षित वाटत होतं ते त्यांच्या लक्षात आलं होतं आणि ते बरोबर नाही हे त्या मला सांगू पाहत होत्या!
८५ ते ८७ च्या तीन वर्षांत आम्ही खूप काम केलं- दोन नाटकं, दोन चित्रपट आणि ‘दूरदर्शन’साठी तीन नाटकांचं चित्रीकरण. मी बाईंना मजेत म्हणायचे की, या दिवसाचं वर्णन करायचं तर एकच शब्द आहे- खडतर! पण खरं सांगायचं तर प्रचंड कामाच्या त्या दिवसांसाठी एकच शब्द होता- आनंद! केव्हा तरी कामाच्या धबडग्यात मी कारण नसताना हसायला लागले की त्या म्हणायच्या, ‘‘तू थकली आहेस, आता जरा ब्रेक घे!’’ आपण थकलोय हे माझ्या लक्षातच आलेलं नसायचं! या काळात आम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सवर एकत्र राहायचो. बाई अत्यंत व्यवस्थित आहेत; पसारा, गबाळेपणा त्यांना जराही सहन होत नाही. पॅक-अप झालं की, मी माझ्या वस्तू खोलीत टाकून जरा मित्र-मैत्रिणींबरोबर टाइमपास करायचे. बाई मात्र खोलीत जायच्या आणि झोपायच्या आधी त्यांच्याबरोबर माझ्याही वस्तू व्यवस्थित आवरून ठेवायच्या. रोज मी ठरवायचे, आज आपण खोली आवरल्याशिवाय बाहेर पडायचं नाही; पण माझ्याकडून कधीच ते झालं नाही. बाईंनी मला एकदाही दाखवून दिलं नाही, की मी पसारा टाकते! पहाटे तीनला उठून, स्क्रिप्ट काढून काम करत बसायच्या.
अशा माझ्या बाई!
त्यांच्याबरोबर राहणं हेच माझ्यासाठी इतकं आनंदाचं होतं की, केव्हा तरी आपण दिग्दर्शन करू, तेव्हा आत्ताच बाईंच्या कामाची पद्धत बघून ठेवू असं काहीही नव्हतं मनात; पण तरीही एक दृष्टी तयार होत होती, बऱ्यावाईटाची जाण येत होती.. शिकले मी बहुतेक! आज जर मी दिग्दर्शन करत असेन तर त्याचं कारण एकच आहे, की माझ्या बाईंबरोबर मी अनेक आनंदाचे दिवस घालवले!
pamakulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com