प्रतिमा कुलकर्णी pamakulkarni@gmail.com

खरोखरच अद्भुत होता तो अनुभव. महालातल्या प्रशस्त दालनांमधून फिरता-फिरता संगीत ऐकतोय! तिथल्या एका सज्जात बसून अगदी हळू आवाजात बोलला गेलेला संदेश दूर अंतरावर असलेल्या चौकीवर ऐकू जातो! विमानतळावर रांगेत उभं असताना मनात आलं- हे चित्र पाहा आणि ते चित्र पाहा! हे कितीही खरं असलं तरी संगमरवरातून अमर होण्याचा अट्टहास काही मला भावत नव्हता. पण आणखीन एक सुखद विरोधाभास समोर येणार होता..

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Devendra fadanvis review meeting for msrdc ambitious Pune Ring Road and Jalna Nanded Expressway projects
पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड महामार्गाच्या भूमिपूजनाला लवकरच मुहूर्त, उद्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता
Viral Video Shows Neighbours daughter Love
शेजाऱ्यांचे प्रेम! चिमुकलीने रेखाटलं गोल्डीसाठी चित्र, मालक झाला खूश अन्…; पाहा Viral Video
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता

काही दिवसांपूर्वी ध्यानी-मनी नसताना अचानक अशी काही माणसं भेटली की, तबियत एकदम खूश होऊन गेली. अनेक विरोधाभासांनी भरलेले दोन दिवस अनुभवले. एका प्रोजेक्टसाठी रिसर्च करायला मध्य प्रदेशच्या मांडू गडावर जायचा योग आला. मांडू म्हटलं की, हमखास मनात येते ती बाज बहाद्दर-रूपमतीची कथा. पण त्या शिवायही तिथे बरंच काही आहे आणि आमची टीम तेच शोधायला गेली होती.

कुठच्याही नवीन ठिकाणी जायचं असलं की, आपल्या मनात काही ठोकताळे तयार होतात. इंदोरहून मांडूकडे निघाल्यावर नेहमीप्रमाणे हॉटेलला फोन केला आणि आम्ही येतोय म्हणून कळवलं. फोन घेणारा कुणी धीरज म्हणून होता. मॅनेजर असेल म्हणून त्याप्रमाणे बोलणं झालं, त्या माणसाबद्दल, त्या हॉटेलबद्दल कारण नसताना मनात एक चित्र उभं राहिलं. आम्ही पोचलो, धीरज काही भेटला नाही, मात्र आमची व्यवस्था चोख झालेली होती. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी सुरुवात केली.

सुरुवातीलाच एक ठिकाण लागलं- तो होता होशंगशहाचा मकबरा. ताज महाल बांधायच्या आधी शहाजहानने आपले कारागीर तिथे पाठवले होते, अशी नोंद आहे. मोठी सुंदर इमारत आहे याविषयी शंकाच नाही. गाइड म्हणाला होशंगशहाने स्वत: हयात असतानाच तो बांधून घेतला होता! पुढे तो म्हणाला, पण नियतीचा खेळ बघा- त्याचा मृत्यू इथे झालाच नाही. तो दूर ठिकाणी रणांगणावर झाला आणि त्याला इथे दफनही करता आलं नाही! आपल्या नावाचा एक मकबरा असावा आणि त्याद्वारे आपण अमर होऊन जावं असं कुणाला का वाटत असेल? जगात आपणच नसताना आपली आठवण राहिली काय आणि न राहिली काय, काय फरक पडतो- हा विचार मनात आलाच!

इंदोरला उतरल्यापासून अनेक ठिकाणी – म्हणजे राजवाडय़ांमध्ये दिसत होतं ते फ्रान्सहून आणलेलं अमुक, इटलीहून आणलेलं तमुक, इंग्लंडहून आणलेला स्थापत्यकार, स्टेण्ड ग्लास आणि बरंच काही. माझं मन काही त्यात रमेना. पण अभ्यास करायला म्हणून गेलो होतो आम्ही- बघणं भागच होतं.

मात्र मांडूला एक-एक ठिकाण बघत गेलो आणि थक्क होत गेलो. सगळीकडे पाणी खेळतं, वाहतं राहील, त्याचं शुद्धीकरण होईल याची केलेली व्यवस्था, संदेश वाहनाची व्यवस्था, व्यापार-उदिमासाठी केलेल्या सोयी हे सगळं स्तिमित करणारं होतं.

आम्हाला जहाजमहालात जायची घाई तर गाइडचा आग्रह आम्ही एको पॉइंट पाहावा. तिथे गेल्यावर लक्षात आलं की, तो नैसर्गिक एको पॉइंट नव्हता! मांडू ते धार यांच्या दरम्यान पोचवण्यासाठी बांधण्यात आलेल्या अनेक संदेशवाहक इमारतींपैकी पहिली इथे होती!! अविश्वसनीय होतं ते! त्या वेळी त्याचं कौतुक वाटलंच, पण त्याहीपेक्षा जास्त नवल वाटलं ते इंदोर विमानतळावर पोचल्यानंतर.

मुंबई विमानतळ शांत विमानतळ आहे. ‘तुमच्या फ्लाइटची घोषणा होणार नाही. तुम्हीच लक्ष ठेवा,’ अशी सूचना (ताकीद) गेल्या-गेल्याच दिली जाते. इथे मात्र खूप गर्दी, भली मोठी रांग.. एकमेकांशी ओरडून बोलावं लागणारे कर्मचारी! त्या वेळी आठवला मांडूमधला बाज बहाद्दरचा महाल. संगीताचा दिवाणा असलेल्या या राजाच्या महालाची रचना अशी होती की, खास संगीतासाठी राखून ठेवलेल्या दोन दालनांत गायलं-वाजवलं जाणारं संगीत महालाच्या कुठच्याही इतर खोलीत ऐकू जावं! महालात, तिकडच्या बगीचात फेरफटका मारत-मारतदेखील त्या संगीताचा आस्वाद घेता यावा. आम्ही ते करूनही बघितलं! खरोखरच अद्भुत होता तो अनुभव. जणू काही आपण एक सिनेमाच आहोत! महालातल्या प्रशस्त दालनांमधून फिरता-फिरता संगीत ऐकतोय!

तिथल्या एका सज्जात बसून अगदी हळू आवाजात बोलला गेलेला संदेश दूर अंतरावर असलेल्या चौकीवर ऐकू जातो! विमानतळावर रांगेत उभं असताना मनात आलं- हे चित्र पाहा आणि ते चित्र पाहा!

हे कितीही खरं असलं तरी संगमरवरातून अमर होण्याचा अट्टहास काही मला भावत नव्हता. आपण मांडूहून काय घेऊन जातोय हा प्रश्न पडत होता. पण आणखीन एक सुखद विरोधाभास समोर येणार होता..

ज्या धीरजशी आम्ही मॅनेजर समजून बोललो होतो, तो भेटला. साधारण पस्तिशीचा धीरज त्या हॉटेलचा मालक होता! त्याची दोन छोटी मुलं आणि तो एकमेकांशी फ्रेंच भाषेत बोलत होती! त्याचे आई-वडील हॉटेलच्या आवारात एका अतिशय पारंपरिक पद्धतीच्या घरामध्ये राहत होते. धीरजची मुलं आपल्या आजी-आजोबांशी मात्र हिंदीत बोलत होती. मग हळूहळू त्याच्या बद्दल एक-एक गोष्ट कळत गेली. धीरजचं कुटुंब काही पिढय़ांपासून मांडूमध्ये राहतंय. तिथे त्यांची जमीन आहे, शेती आहे. धीरज तिकडे गाइड म्हणून काम करत असताना त्याला वाटलं फ्रेंच शिकावं, एखादी परदेशी भाषा आली तर आपल्याला व्यवसायात मदत होईल. तो दिल्लीला गेला, तिथे त्याला त्याची बायको मारी भेटली. दोघांनी लग्न केलं आणि आता दिल्लीत राहायचं असं ठरवलं.

पण कालांतराने त्याला वाटलं की, इथे माझं सगळं आयुष्य फक्त घर करण्यातच जाईल, त्यापेक्षा आपल्या गावाला गेलो तर काही तरी करता येईल. बायकोला घेऊन तो मांडूला आला, त्याच्या पारंपरिक आई-वडिलांना फ्रेंच सून पटवून घेणं थोडं जड गेलं, पण आता सगळे गुण्या-गोिवदानं राहतात. मारी बऱ्यापैकी हिंदी बोलते.

धीरजने त्यांना आणखीन एका गोष्टीसाठी पटवलं- आपल्या जमिनीवर आपण हॉटेल बांधू या! तेही त्यांना सुरुवातीला जड गेलं, पण आता सगळे मिळून ते हॉटेल चालवतायत. धीरजला मांडूची माहिती तर आहेच, शिवाय इतिहासाची बहुआयामी जाण आहे, तिथल्या गड-किल्ले-महालात शूटिंग करायचं असेल तर काय करावं लागतं याची खडान्खडा माहिती आहे. त्याला भेटून आमच्या सगळ्याच टीमला एकामागून एक आश्चर्याचे धक्के बसत गेले. संध्याकाळी गप्पा मारायला म्हणून बोलावलं तर आणखीन काही गोष्टी कळल्या.

त्याची मुलं शाळेत जात नाहीत. मारी त्यांना घरीच शिकवते. आयुष्यभर पॅरीसमध्ये राहिलेली ही मुलगी आता एका गडावर राहतेय. तिचं म्हणणं असं की, शाळेत मुलांवर फार ताण येतो. तिथे ती अभ्यास करतात, पण शिकत नाहीत. म्हणून तिने घरीच पुस्तकं आणून ठेवली आहेत. त्यात िहदीसुद्धा आहे. ती म्हणते, मुलांना शिकवता शिकवता मीही लिहा-वाचायला शिकेन!

मांडूसारख्या ठिकाणी आदिवासी घरं पाहून आपण सिमेंटच्या घरात का राहतो हा प्रश्न त्यांना पडलाय. मातीची घरं उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतात. आपण मातीच्याच घरात का राहू नये असं वाटून त्यांनी पुण्याहून अर्किटेक्ट बोलावला. आधुनिक सुविधांसह मातीच्या घराचा आराखडा बनवून घेतला आणि आता त्याचं घर बांधलं जातंय. वर्षभर त्या घरात राहून काही उणिवा आढळल्या तर त्या दूर करून त्यांना मातीच्या घरांचा रिसॉर्ट बांधायचा आहे!

एकीकडे संगमरवराच्या मृत वास्तू आणि दुसरीकडे हा मातीच्या घरांचा रिसॉर्ट एकीकडे विस्तीर्ण महालाच्या कुठल्याही ठिकाणी संगीत ऐकू येईल अशी रचना तर त्याच वेळी काही पावलांवर असलेल्या माणसाशी बोलण्यासाठी करावा लागणारा आटापिटा-  हे सगळं अनुभवलं फक्त ४८ तासांत. मारीला भेटले, बोलले आणि तिच्या मातीच्या घरांबद्दल ऐकून मृत स्मारकांबद्दलचा माझा सगळा रोष मावळला.. एक आहे म्हणून दुसऱ्याची किंमत आहे आणि तीच तर गंमत आहे!

chaturang@expressindia.com

Story img Loader