देहत्याग कधी होणार हे ठाऊक नसणं हेच जीवनाचं रहस्य. देहत्यागाच्या वेळी चांगली भावना, चांगला संस्कार बरोबर असावा हे म्हणणं सोपं, पण अत्यंत गूढ आहे. तत्त्वचिंतक याचं उत्तर असं देतात की, कायमच आपलं मन शुद्ध, सुसंस्कारित ठेवावं म्हणजे झालं. मग केव्हाही मृत्यू आला तरी चालेल त्याने शेवटच्या दिसाची गोडी नकळत साधली जाईल.
‘वाचाल तर वाचाल’ ही वाचनाची महती सांगणारी उक्ती हल्ली आपण नेहमी ऐकतो. त्याचप्रमाणे ‘आठवा तर आठवाच’ असं गीतेच्या आठव्या अध्यायाबद्दल म्हणायला हवं. कारण या अध्यायात सांगितलेलं तत्त्वज्ञान इहलोकी मनुष्याचा उद्धार करतंच, पण परलोकीचीही सोय करतं, इतकं महत्त्वाचं आहे.
‘याचसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड व्हावा।’ असं माणूस सदा म्हणत असतो, पण तो दिवस गोड होण्यासाठी आपल्या हातात करण्यासारखं काही असेल का, याचा विचारही तो करू इच्छित नाही. कारण मनुष्य शेवटच्या दिसाची, म्हणजे मरण या अटळ व निश्चित असलेल्या गोष्टीची आठवणही सतत टाळत असतो. मृत्यू ही घटना नकोशी वाटते. याचाच सकारात्मक विचार करायला हवा, या आठव्या अध्यायातलं तत्त्वज्ञान सांगतं. कारण ते माणसाचं जीवन परिपूर्ण करणारं आहे.
हा अध्याय महत्त्वाचा सिद्धांत सांगतो. तो म्हणजे, मनुष्य अंतकाळी ज्या भावभावनांचं, संस्कारांचं, विचारांचं स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याच शिदोरीचं गाठोडं घेऊन त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. जड देह पडतो. मन-बुद्धी-अहंकार ही त्या देहातील ‘अहम’ची सूक्ष्म द्रव्यं आहेत. ती वाफेप्रमाणे बाहेर पडतात. त्यात जे संस्कार साठवलेले असतात ते घेऊनच अहं-बीज पुन्हा नवा देह घेऊन अंकुरतं. आपल्या आजूबाजूची सतत बदलत असणारी सृष्टी अव्यक्तातून व्यक्तात व व्यक्तातून अव्यक्तात अशी रहाटगाडग्यासारखी चक्राकार फिरत असते. यातूनच जन्म-मृत्यू-पुनर्जन्म ही योजना दिसते.
देहत्याग कधी होणार हे ठाऊक नसणं हेच जीवनाचं रहस्य. देहत्यागाच्या वेळी चांगली भावना, चांगला संस्कार बरोबर असावा हे म्हणणं सोपं, पण अत्यंत गूढ आहे. तत्त्वचिंतक याचं उत्तर असं देतात की, कायमच आपलं मन शुद्ध, सुसंस्कारित ठेवावं म्हणजे झालं. मग केव्हाही मृत्यू आला तरी चालेल. हे मनात ठरवून जिवंतपणी अशी सवय लावून घेतली पाहिजे की, अंतकाळी आपसूकच तो संस्कार जागृत होईल. यास्तव सदैव मरणाचं स्मरण राखून जीवन जगायला हवं. त्या जगन्नियंत्याचं, परमेश्वराचं अखंड भान ठेवून ध्यान करीत मार्गक्रमणा घडली की, शेवटचा दिस गोड होईल. गीता सांगते, अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश। फक्त परमेश्वराचं चिंतन- दुसरा कुठलाही भाव मनात नसणे म्हणजे अनन्यचेता: आता प्रश्न असा पडतो की, परमेश्वराचं चिंतन करीत देह का सुटावा? मागील जन्म आठवत नाही, मृत्यूची गूढता कायम आहे. पुढील जन्म माहिती नाही. अशा परिस्थितीत या सर्वाचा विचारच का करायचा? मृत्यूची अटळता जर पटली असेल तर हा विचार करायला हरकत नाही. तो परमेश्वरच आपल्या जन्म-जीवन-मृत्यू याचं मूळ आहे. तो सर्व सृष्टीचा नियंता आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचंही मूळ तोच आहे. संपूर्ण जगाचा डोलारा त्याच्याच पायावर उभा आहे. तो म्हणजे देवळातली किंवा देवघरातली मूर्ती एवढंच त्याचं स्थान नाही. तर चराचर सृष्टीतील सर्वत्र व्यापून, ठासून भरलेलं चैतन्य- त्यालाच आपण नाव दिलं परब्रह्म-परमात्मा-परमेश्वर. ज्ञान-विज्ञानाच्या सिद्धांताचा गाभा, ज्याला आपण अजूनही पूर्णपणे जाणू शकलेलो नाही अशी एक अज्ञात सर्वोच्च शक्ती. त्याची कृपा झाली तर अधिक काय हवे?
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आठव्या अध्यायात सांगितली आहे ती म्हणजे कोणत्या काळात शरीर त्याग होणं चांगलं हे गीता आपल्यासमोर मांडते. विशेषत: योगी किंवा सिद्धपुरुष यांना मोक्ष हवा असतो व पुनर्जन्म नको असतो. त्यांच्यासाठी खास गीता सांगते- ज्योतिर्मय अग्नी असावा, शुक्ल पक्षातील दिवस असावा, उत्तरायण असावं अशा वेळी जो देह सोडतो तो योगी ब्रह्मास प्राप्त होतो. याउलट धूर आहे, रात्र आहे, कृष्ण पक्ष आहे, दक्षिणायन आहे अशा काळी देह सोडल्यास योग्यालासुद्धा परत जन्म मिळतो. पण हे सर्व सांगणं तसं रूपकात्मक आहे. अग्नी म्हणजे कर्म करत असणं. उत्तरायणातील सूर्य म्हणजे बुद्धीचं तेज झगझगीत असणं. शुक्ल पक्षातील चंद्र म्हणजे मनातील प्रेम, उत्साह, भक्ती जागृत असणं, निरभ्र आकाश म्हणजे आसक्तीचे ढग नसणं. थोडक्यात, चालता-बोलत, बुद्धी शाबूत असता, कर्म करता करता मृत्यू येणं- याला उत्तरायणातला मृत्यू म्हणता येईल. दक्षिणायनातील मत्यू म्हणजे न कळणाऱ्या अवस्थेत, गुंगीत, बेशुद्धावस्थेत मृत्यू येणं. यातला हा गूढार्थ समजून घेतला की, ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घ्यायच्या वेळी कार्तिक वद्य त्रयोदशी कशी काय निवडली हा प्रश्न मनात येणार नाही.
या इह-परलोकीच्या मार्गात हरिनामजपाची शिदोरीच कामी येईल तेव्हा नाम जपत जीवन जगा- जपयज्ञ करा व पुढची तरतूद करा. या हरिनामस्मरणाची थोरवी गातच नववा अध्याय समोर येतो. या अध्यायाचं नाव आहे- राजविद्याराजगुह्य़ योग. विनोबाजी याला समर्पण योग म्हणतात. महाभारताच्या मध्यावर गीता आणि गीतेच्या मध्यावर हा नववा अध्याय. हाच अध्याय जपत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली.
तुलसीदासजी म्हणतात, मेल्यानंतर स्वर्गात कोण जातो, नरकात कोण जातो हे कोणी सांगावे? त्यापेक्षा आपल्या वाटय़ाला आलेले जीवनाचे चार दिवस रामाचा गुलाम होऊन राहणं मला आवडेल. रामाचा गुलाम होऊन राहण्यातली गोडी प्रत्यक्ष अनुभवास येईल, असा अनुभव देणारी ही विद्या म्हणजेच राजविद्या. ज्या विद्येने जीवन कळतं, जीवनाच्या शिल्पकाराची माहिती होते, ज्याचं दर्शन होतं त्या विद्येमुळे माणसाची शोभा वाढते ती राजविद्या. ती पवित्र आहे कारण ही विद्या जे ज्ञान देते ते विज्ञानासहित ज्ञान आहे.
इथे भगवंत एक सिद्धांत सांगतात, मी निराकार परमात्म्याने सर्व जग व्यापलेलं आहे. जीवसृष्टी माझ्या संकल्पाच्या आधारावर उभी राहिलेली आहे, या सर्व भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचं धारण पोषण करणारा मीच आहे. पण तरीही मी त्यांच्यात नाही तसंच ती भूतंही माझ्या ठिकाणी नाहीत. म्हणजेच इंद्रियांनी न जाणता येणारं ब्रह्म, इंद्रियांनी जाणता येणाऱ्या विश्वात व्यापून आहे. डोळ्यांनी आपण जे जग, जे विश्व पाहतो त्यामागे एक अमूर्त, अव्यक्त, अखंड अशी सत्ता काम करते पण तो डोळ्यांनी दिसत नाही. इंद्रियातील ब्रह्माचं इंद्रियगोचर विश्व हे ऐश्वर्य आहे. हीच गुह्य़ गोष्ट आहे. हे ज्ञानगम्य आहे. बुद्धीनेच जाणता येईल. चराचरात लपलेला परमेश्वर शोधून काढायची सोपी युक्ती आहे, ती म्हणजे त्याच्या या ऐश्वर्यावरची श्रद्धा. हे समजावून सांगताना ज्ञानेश्वर माऊली खूप सोपी उदाहरणं देऊन हा विचार समजावून सांगतात. ते म्हणतात, दुधापासून तूप बनतं, पण तुपात दूध नसतं. पाणी भरलेल्या ढगांमुळेच वीज निर्माण होते, पण विजेत पाणी नसतं. तसंच ही सर्व भूतं निर्माण करणारा मी असूनही माझ्यात ती नाहीत आणि त्यांच्यात मी नाही. त्या परमेश्वराला जाणण्यासाठी श्रद्धापूर्वक तू जे जे काही करशील ते ते परमेश्वराचं स्मरण करून त्यालाच अर्पण कर. हेच समर्पण! असं केल्याने आपोआपच हरिनाम घेतलं जाईल.
विनोबाजी म्हणतात, या अध्यायात कर्मयोग व भक्तियोग यांचा सुंदर मिलाफ झाला आहे. कर्म करण्याचं फळ त्यागायचं हा झाला कर्मयोग. श्रद्धापूर्वक ईश्वराशी जोडलं जाणं हा झाला भक्तियोग आणि त्यागण्याऐवजी फळ परमेश्वरालाच अर्पण करायचं हा राजयोग.
आपली सर्व र्कम यज्ञरूप करायची हा राजमार्ग. यज्ञरूप करणं म्हणजे ‘इदं न मम’ असं म्हणून त्यागणं. सध्या कर्मानेच परमात्मा गाठला जाईल. असा हा राजमार्ग प्रत्येक क्रिया ईश्वराशी जोडल्यावर सारं अंतर्बाह्य़ परिवर्तन होईल. जीवनातील ‘अहं’चं ओझं उतरल्यामुळे अद्भुत शक्ती येईल. कर्मात सामथ्र्य येईल. परमेश्वराची अशी भक्ती साधली, सतत नामस्मरण होऊ लागलं की, भक्तियोग साधला जाईल. शेवटच्या दिसाची गोडी नकळत साधली जाईल. परमेश्वर तुमच्याकडे काहीच मागत नाही. पानं, फुलं, फळं, इतकंच नव्हे तर नुसतं पाणी दिलं तरी चालेल. काय दिलं, किती दिलं यापेक्षा कुठल्या भावनेने दिलं हा खरा मुद्दा. तुम्ही तुमचं कर्म ईश्वरार्पण करून जणू ते कर्म पेरलंत. त्यातून भरपूर आनंद निश्चित रुळेल.
आतापर्यंत या वर्षांतील १० लेखांतून आपण अर्धा, म्हणजे ९ अध्यायांचा अभ्यास केला. खूप तात्त्विक, गंभीर अशा तत्त्वज्ञानात न शिरता जमेल तेवढं सोपं करून सांगितलंय. एका वर्षांच्या कालमर्यादेमुळे वाचकांना अभिवादन करून इथेच विरामते. (सदर समाप्त)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा