कोणत्याही गोष्टीशी ‘मी’ला संलग्न न करता त्या गोष्टीविषयी तितकीच आत्मीयता वाटणे शक्य आहे का, जितकी ‘मी’ संलग्न झाल्यावर वाटते? हा एक गहन पण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.
प्रत्येक जिवाची आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी सातत्याने देवाणघेवाण चाललेली असते. या देवाणघेवाणीतूनच प्रत्येक जीव व त्याच्या भोवतालची परिस्थिती यांच्यात परस्परसंबंध निर्माण होत असतात. हे परस्परसंबंध म्हणजेच त्या सजीवाचे जीवन असते. कोणताही जीव सभोवतालच्या परिस्थितीपासून पूर्णपणे वेगळा होऊन जगूच शकत नाही. निसर्गाची रचनाच मुळी अशी आहे, की सजीवांना परस्पर संबंधातूनच जगता येणे शक्य आहे. म्हणूनच जीवन म्हणजे परस्पर संबंध होय.
व्यक्ती-व्यक्तींमधील नातेसंबंधातूनच समाजाची घडण होत असते. हे नातेसंबंध ज्या प्रकारचे असतात त्याच प्रकारचा समाज घडवला जातो. हे नातेसंबंध जर तुलना, स्पर्धा, संघर्ष व स्वार्थाधिष्ठित असतील तर त्यातून घडणारा समाजदेखील त्याच स्वरूपाचा बनतो. सध्या जगात चाललेला संघर्ष, िहसा, युद्ध, आतंकवाद, असुरक्षिततेची भावना, एकमेकांविषयीचा अविश्वास, भ्रष्टाचार हे दोन व्यक्तींमधील नातेसंबंधांचेच द्योतक आहे. मानवी नातेसंबंधातील समस्या अतिशय जटिल स्वरूपाच्या आहेत. मानव या पृथ्वीतलावर गेली हजारो वष्रे अस्तित्वात आहे. तो वैज्ञानिकदृष्टय़ा अत्यंत प्रगतिशील आहे. परंतु तरीही तो आजतागायत या नातेसंबंधातील समस्यांचे निराकरण करू शकलेला नाही. खरेच दोन व्यक्तींमधील नात्यात एवढा संघर्ष, एवढा तणाव का आहे? एक मनुष्य दुसऱ्या माणसाबरोबर शांततेत व सामंजस्याने का जगू शकत नाही?
दुसऱ्या व्यक्तीशी असलेले आपले नातेसंबंध आपण त्या व्यक्तीसंबंधी बनवलेल्या प्रतिमांवर आधारित असतात. या प्रतिमा त्या व्यक्तीशी आत्तापर्यंत आलेल्या आपल्या संपर्कावर व त्या संपर्कातून त्या व्यक्तीबरोबर झालेल्या देवाणघेवाणीवर अवलंबून असतात. मी ज्याप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीसंबंधी प्रतिमा बनवलेल्या असतात, अगदी त्याचप्रमाणे त्या दुसऱ्या व्यक्तीनेदेखील माझ्यासंबंधी अनेक प्रकारच्या प्रतिमा बनवलेल्या असतात. त्यामुळे आमच्या दोघांतील नातेसंबंध म्हणजे आम्ही एकमेकांविषयी बनवलेल्या प्रतिमांमधील नातेसंबंध असतात. म्हणजेच आमच्या दोघांत प्रत्यक्षात कोणतेच नाते नसते. जे काही असते ते आमच्या एकमेकांविषयी असलेल्या प्रतिमांमधील असते. आणि या प्रतिमा खूप विकृत आणि पूर्वग्रहदूषित अशा स्वरूपाच्या असू शकतात. दोन व्यक्ती जेव्हा विवाहित होऊन एकत्रित येतात, तेव्हा त्यांच्यात एका नव्या नात्याचा आनंद असतो, उत्साह असतो; एकमेकांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटत असतो. परंतु एकमेकांसमवेत राहून जसजसे ते एकमेकांशी परिचित होत जातात, एकमेकांविषयी असंख्य प्रतिमा बनवतात, तसतशी त्यांना एकमेकांची सवय होऊ लागते. त्यांच्या नात्यात तोचतोपणा येऊ लागतो. ते एकमेकांना गृहीत धरू लागतात व लवकरच अत्यंत सुंदर व हवेहवेसे वाटणारे नाते कंटाळवाणे बनते; ते एकमेकांना टाळू लागतात. स्वत:च्याच कामात वा एखाद्या व्यासंगात स्वत:ला गुंतवून टाकतात. व्यवहारापुरतेच ते एकत्र असतात, पण त्यांच्यात कोणताही जिव्हाळा, आपुलकी उरलेली नसते. असे का घडते? जे दोन व्यक्तींमधील नात्यात घडते, तेच व्यक्ती व इतर सर्व गोष्टी यांच्या नात्यामध्ये पण घडते. आपल्याला जागेची, वस्तूंची सवय होत जाते व त्यातील नावीन्य संपत जाते. जीवनातील हे नवेपण, हा उत्साह न हरवता जगता येणे शक्य आहे का?
प्रत्येक मनुष्य आपले रोजचे जीवन जगत असताना विविध गोष्टींसंबंधी विविध प्रकारच्या प्रतिमा सातत्याने तयार करीत असतो. या प्रतिमा जाणीवपूर्वक व अजाणतेपणे अशा दोन्ही प्रकारे तयार होत असतात. माणसाने गोळा करून साठवलेले ज्ञान व माहिती या प्रतिमांच्या स्वरूपातच असते व ते त्याच्या रोजच्या व्यवहारासाठी आवश्यकही असते. परंतु बऱ्याचशा प्रतिमा अशाही असतात, की त्यांचे त्या माणसाच्या जीवनात विशेष स्थान असते. त्या प्रतिमांची फारशी व्यावहारिक उपयुक्तता नसेलही, तरीही त्या प्रतिमांच्या विरोधात काही घडले तर मनुष्य चवताळून उठतो. उदाहरणार्थ, एखाद्या खुर्चीकडे बोट दाखवून ‘ही एक खुर्ची आहे’ असे मी म्हणतो, तेव्हा इतर अनेक खुच्र्यापकी ती पण एक खुर्ची असते. परंतु जेव्हा ही ‘माझी’ खुर्ची आहे असे मी म्हणतो तेव्हा लगेचच त्या खुर्चीला एक विशेष स्थान प्राप्त होते. ही ‘माझी’ खुर्ची आहे, ती नीट ठेवली पाहिजे, दुसऱ्या कोणी त्यावर बसता कामा नये, अशा विविध प्रकारच्या प्रतिमा माझ्या मनात तयार होतात. जेव्हा त्या खुर्चीला आदरपूर्वक वागवले जाते तेव्हा मी तो माझा सन्मान समजतो व जेव्हा तिला लाथ मारली जाते तेव्हा ती मला मारलेली लाथ असते. अशा प्रकारे ही माझी खुर्ची आहे, असे म्हणून मी त्या खुर्चीशी एकरूप झालेलो असतो, किंबहुना मी ती खुर्चीच बनतो. अशा प्रकारे माझ्यासाठी विशेष स्थान असलेल्या असंख्य प्रतिमा मी माझ्या मनात साठवलेल्या असतात. माझे घर, माझा मुलगा, माझी बायको, माझा नवरा, माझी संपत्ती, माझी मोटारगाडी, माझा रेफ्रिजरेटर, माझा देश, माझा धर्म, माझा देव, माझी तत्त्वे, माझा क्रोध, माझे भय, माझा स्वभाव अशा अनेक प्रतिमांना माझ्या मनात विशेष स्थान प्राप्त झालेले असते. हे विशेष स्थान त्या त्या वस्तुमाहात्म्यामुळे नसून त्या वस्तूशी झालेल्या माझ्या तद्रुपीकरणामुळे असते. म्हणजेच वस्तू किंवा प्रतिमा मोठय़ा नसतात तर ‘मी’ मोठा असतो व तोच सर्व गोष्टींचे स्थान ठरवत असतो. आपले रोजचे जीवन जगताना वस्तूंशी ‘मी’चे या प्रकारे एकरूप होणे अपरिहार्य आहे का?
एखादी गोष्ट जर माझी नसेल तर त्या गोष्टीसंबंधी माझी वागणूक कशी असते? मग आपले त्या वस्तूशी काहीही देणे-घेणे नसते. केवळ बाहय़ गोष्टींशीच नव्हे तर आपल्या आत चाललेल्या विविध मानसशास्त्रीय घडामोडींशीही हा ‘मी’ संलग्न होत असतो. मला आलेला राग हा महत्त्वाचा असतो व जेव्हा इतर कोणी त्याची दखल घेत नाही तेव्हा मला अधिकच राग येतो. माझा राग हा नेहमीच रास्त असतो. दुसऱ्याने डिवचल्यामुळे तो आलेला असतो. ‘दुसरा कोणीही या परिस्थितीत असता तर त्यालाही असाच राग आला असता,’ असे म्हणून मी त्याचे समर्थन करतो. याउलट दुसऱ्याला आलेला राग हा आपल्याला नेहमीच अनावश्यक वाटत असतो. ‘त्याला एवढे रागवायला काय झाले, त्याने रागवायला नको होते,’ असे म्हणून आपण दुसऱ्याला दोषी ठरवतो. यावरून असे दिसते, की ज्या गोष्टींशी ‘मी’ संलग्न नसतो, त्या गोष्टींविषयी आपल्याला आत्मीयता वाटत नसते, त्या गोष्टींसंबंधी आपल्यात एक प्रकारची अनास्थाच असते.
कोणत्याही प्रतिमांशी ‘मी’ने संलग्न व्हावे तर त्यातून त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते व या प्रतिमांना कोणी पायी तुडवले तर ‘मी’ व्यथित होतो. याउलट प्रतिमांशी एकरूप न व्हावे तर त्यातून त्या त्या गोष्टींविषयी अनास्था निर्माण होते. जीवनात एक प्रकारची नीरसता येते, निरुत्साह वाटतो. म्हणून या ठिकाणी प्रश्न उद्भवतो, की कोणत्याही गोष्टीशी ‘मी’ला संलग्न न करता त्या गोष्टीविषयी तितकीच आत्मीयता वाटणे शक्य आहे का, जितकी ‘मी’ संलग्न झाल्यावर वाटते? हा एक गहन पण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. केवळ होय किंवा नाही या स्वरूपात त्याचे उत्तर देऊन चालणार नाही तर स्वत:च्या आत खोलवर जाऊन शोध घेतल्यावरच या प्रश्नाचे उत्तर प्रचितीच्या स्वरूपात मिळू शकते. ‘मी’ जेव्हा कोणत्याही गोष्टीशी एकरूप नसतो तेव्हा तो तेथे नसतोच. किंबहुना स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच हा ‘मी’ अधिकाधिक गोष्टींशी स्वत:ला संलग्न करीत असतो. या प्रक्रियेतून ‘मी’ला जरी अधिकाधिक सुरक्षित वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तो अधिकाधिक असुरक्षितच होत असतो. या गोष्टीचे जेव्हा पूर्ण भान येते तेव्हा गोळा करण्याची प्रक्रिया थांबलेली असते व पूर्वी गोळा करून साठवलेल्या गोष्टींचा निचरा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. जेव्हा कोणत्याही प्रतिमेशी ‘मी’ संलग्न नसतो त्या वेळी त्या प्रतिमांचे स्थान केवळ व्यावहारिक उपयुक्ततेपुरते असते, त्यात कोणताही मानसशास्त्रीय घटक नसतो. अशा प्रतिमा दोन व्यक्तींमधील संबंधांत अडसर बनत नाहीत. मग त्या दोन व्यक्तींमधील नाते म्हणजे दोन प्रतिमांमधील नाते न राहता दोन मानवांतील नाते असते. अशा नात्यात जिव्हाळा असतो, प्रेम असते, कोणत्याही अपेक्षा नसतात. केवळ एक-दुसऱ्याच्या सहवासातील आनंद असतो. असा निखळ आनंद हेच मानवी नातेसंबंधांचे खरे स्वरूप होय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा