शहरातील प्राध्यापिकेची सुखासीन नोकरी सोडून चिखलगाव या खेडेगावात जायचा निर्णय ‘त्यांनी’ घेतला. पुढचं आयुष्य फक्त तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठीच द्यायचं हे नक्की केलं. ‘सर्वागीण प्रतिकूलता’ हाच कामाचा पाया असलेल्या या ठिकाणी ‘लोकसाधने’च्या माध्यमातून गेली २९ वर्षे शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करणाऱ्या रेणुताई दांडेकरांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत..
स्व त:ला केंद्रस्थानी ठेवून लिहायची ही पहिलीच वेळ. नेहमी ‘आम्ही’ने सुरू होणारे बोलणे आता ‘मी’ने सुरू करायचे म्हणजे.. असं जरी असलं तरी व्यक्तिगत भूमिकाही मांडली पाहिजे, असंही वाटतंय. परवा एका कार्यक्रमात माझा मित्र विलास चाफेकर म्हणाला, ‘आत्मचरित्र वगैरे लिहितेस की काय?’ तेव्हा मी म्हणाले, ‘नाही रे! एवढी कुठं मी मोठी झालेय.’ हा प्रश्न लहान-मोठय़ांचा नाही. जे करताना भूमिका वेगळी होती, धाडस वेगळं होतं, ते मांडायलाच हवं. विशेषत: तरुणाईपुढे तर नक्कीच! कारण सामान्य व्यक्तीही हे धाडस करते. आणि हवं ते घडवू शकते, हा आत्मविश्वास येण्यासाठी हे लिहायलाच हवं. माझ्या आयुष्याचा हेवा वाटावा असंच आहे ते!
आई-वडील गरिबीशी लढत होते, पण त्यांनी सर्व सर्व संधी आम्हाला दिल्या नि आदर्श, मूल्ये शोधायला कुठं बाहेर जावं लागलं नाही. नवा प्रवास सुरू करताना राजाचा (राजाराम दांडेकर) हात धरल्यामुळे बळही आलं. ते आधीच लिहून घेते. आमच्यात मतभेद जरूर होते, आहेत. पण परस्परांशिवाय राहू शकत नाही हे सत्यही आहे. (उशिरानं लक्षात येतं हे!) आपण एकेकटे जगू शकणार नाही नि कामातही तो सारा आनंद मिळणार नाही, हे दोघांनाही माहितेय. आयुष्याचा हेवा अजून अशासाठी वाटतो की, आमच्या मुलांच्या मनात (त्यांना आम्ही मिळालो नाही तरी) जराही राग-आकस नाही.
भरपूर पगाराची प्राध्यापकाची (सुखासीन) नोकरी सोडून, शहरी जीवन सोडून एकदम एका कधीही न पाहिलेल्या खेडय़ात वेगळ्या स्तरावर जाऊन काम करणं हे ते धाडस होतं. कॉलेजला असतानाच मनात हा विचार होता. तेव्हा त्याचं स्वरूप ‘स्वप्न’वत होतं. नक्की काय करायचं हे समजलं नव्हतं. कॉलेजला असताना एक घटना अशी घडली, की जिच्यामुळे ‘शिक्षण’ या शब्दाचा विचार वेगळ्या पद्धतीनं मी करू लागले. प्रत्यक्षात जे करतोय त्यापेक्षा खूप काही वेगळं केलं पाहिजे. या विचाराने अस्वस्थ झाले. जिथं कोणतीही संधी नाही त्या ठिकाणी जाऊन काम करू या. असं काही एकटीला करायचं नव्हतं. एकाच जाणिवेनं, संवेदनेनं भारावलेली दोन माणसं एकत्र आणायचं नियतीच्या मनात होतं. पंचवीस वर्षांत काय करायचं याचं शब्दचित्र अख्खी एक रात्र राजानं रेखाटलं. हे चित्र मला माझं वाटलं नि राजाशी लग्न करायचा विचार पक्का झाला. राजा मूळचा कोकणातला, मी कोकण पहिल्यांदा पाहणारी. राजा वेगळ्या मुशीतून घडलेला. मी वेगळ्या. तरी दोघांच्या काम करण्याच्या प्रेरणा एक झाल्या. अशी किती तरी क्षेत्रं आहेत जिथे शिक्षणच पोचलं नव्हतं. प्राथमिक शाळेतून मुलं मुंबईच्या धुराडय़ात जात होती. ठरवलं, जे शिक्षण मुलांना त्यांच्या मातीत सर्व कौशल्यानिशी समर्थपणे उभं करेल अशा शिक्षणापासून कामाला सुरुवात करायची. जाणीव एकमेकांच्यात ‘पास’ होत गेली नि सर्व जण कमी-अधिक फरकाने कामाला लागले. संवेदना समाजाची, तिनंच कामाला प्रवृत्त केलं. ‘नोकरी’ शब्द नव्हता. फक्त बेभान होऊन काम करणं, वेगवेगळ्या विचारांची माणसं आजूबाजूला होती. वेगळ्या अपेक्षेनं शाळेकडे पाहणारी माणसं होती. मी इतकी आत्ममग्न झाले होते की, हे मला काही जाणवलं नाही. मनापासून मनासारखं मनातल्या ठिकाणी काम करत आहोत याचा आनंद होता – आहे. हे विधान अविश्वसनीय वाटेल. पण काम करताना कधीही निराश-हताश वाटलं नाही. रोजचा दिवस आजही नवा उगवतो.
माझ्या समोरची मुलं मला प्रत्येक वेळी वेगळी जाणवली, त्यांच्यातल्या प्रचंड क्षमतांची जाणीव झाली, त्यांच्या शारीरिक क्षमता लक्षात आल्या नि येणाऱ्या प्रत्येक वेगळ्या अनुभवाला मी माझ्या कागदावर साठवून ठेवू लागले. मुलांनी मला विद्यार्थिपण दिलं नि मी शिकत होते. वस्तू नव्हत्या. भौतिक साधनं नव्हती. नकाराचं मळभ यायचं नि पुन्हा आकाश निरभ्र व्हायचं. सर्वागीण प्रतिकूलता हाच कामाचा पाया होता. प्रतिकूलतेनेच आम्हाला – मला जगायचं कसं शिकवलं. शिक्षण-प्रसिद्धी, व्यासपीठ, वगैरे तथाकथित शब्दांच्या तकलादू जगातून मी केव्हाच बाहेर आले. लोक म्हणतात ‘किती साधी आहेस’. हे वाक्य कदाचित माझ्या राहणीचं होतं की स्वभावाचं हे मला माहीत नाही. पण मी तसं जगायचं ठरवलं, त्यामुळे तसा कोणताच ताणतणाव आला नाही. माहीत नाही मी सारं कसं शिकले! शिकत गेले एवढं खरं! मनापासून!
शाळेत गेले की मीही लहान होते. नव्या नव्या कल्पना सुचतात. अनुभव नवी दिशा देतात. एकदा वर्गात निबंधाचा नेहमीचा विषय मी दिला (कारण मी नेहमीच्या रचनेतून आलेली होते.) ‘मला कोण व्हावंसं वाटतं?’ किंवा ‘मी कोण होणार?’ एका मुलानं लिहिलं, ‘मला सूर्य व्हावंसं वाटतं. माझी आय उन्हातान्हात रानात फिरल, कवळ तोडाया झाडावर जाईल तवा मी ढगामागे जाईन. आईला उन्हाचं चटके नाय देणार. थंडीचं, पावसाचं चिरगुट (साडी) गार पडती तवा जर मी आकाशात असलो तर आईला थंडी नाही वाजायची.’ निबंध वाचून मी शहारून आले. केवढी संवेदनाक्षम असतात मुलं.
ज्या परिसरात आम्ही – मी रोज वावरत होते, तिथली माणसं पाहताना अनुभवताना मला हे जाणवलं की ती त्यांच्या दिशेने विचार करतायत. ती शाळेत शिकलेली नव्हती फारशी. पण त्यांचे विचार ठाम होते. मला ते विरोधदर्शक वाटले तरी विचार बाजूला ठेवता माणूस प्रेमळ, चांगलाच होता. ज्या मातीशी आधीच्या २५ वर्षांत माझा काहीच संबंध नव्हता, नातं नव्हतं त्यांनी मला लगेच आपलं मानणं मला अपेक्षितही नव्हतं. ‘एवढं करतेय त्यांच्यासाठी पण त्यांना त्याचं काहीच नाही,’ असं मी कधीही म्हणाले नाही. तिकडे माझं लक्षच नसतं. मी माझ्या आनंदासाठी नव्या वाटा शोधते, त्या वाटेवरून चालताना मला आनंद मिळतो बस्स इतकंच!
या आनंदात एक वाटा वेगवेगळ्या प्रयोगांचाही आहे आणि त्यातून मुलांनी मला घडवण्यातलाही आहे. शिकण्यातले प्रयोग मी सतत करत राहिले. कारण मुलांची काम करायची क्षमता खूप असते. मुलांचे दोन-तीनशे हात काहीही करू शकतात, हे ‘काहीही’ म्हणजे काय यावर वेगवेगळे विचार आमच्या मनात आले. मूलभूत गोष्टींच्या पूर्ततेसाठीही इथला माणूस शहराकडे धावतो. म्हणूनच हिरापासून झाडू बनवण्याचं काम सुरू झालं नि सगळे वर्ग कळभोरच्या कोवळय़ा पालवीनं बहरून गेले. कातळाचं मैदान मातीचं झालं. घरातलं लाईट फिटिंग मुलं करू लागली नि वर्कशॉपमध्ये मुलीही कठीण कामं करू लागल्या. सुरुवातीच्या काळात मुली शाळेतच येईनात, तेव्हा आम्ही शेतात गेलो. शाळेत वाचायला पुस्तकं नव्हती. पुस्तकंच काय साधा फळाही उसना, उधार आणला होता. तोही जेव्हा निघून गेला तेव्हा मला प्रश्न पडला. आता कसं? त्यावर एक मुलगा म्हणाला, ‘फिरता पंखा असतो ना! तशी ही पाटी घ्या हातात. ‘लिव्हा अन् फिरवा.’ खेडय़ातल्या या मुलांमध्ये प्रश्न पटकन सहज सोडवण्याची क्षमता मला अनुभवायला मिळाली.
आणखी एक गोष्ट मला प्रकर्षांने जाणवली, मुलांनी शाळेच्या आत पाऊल टाकलं की त्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण होत होती. मुलांनी माणसांना का घाबरावं? त्यांच्या समोरच्या शिक्षक नावाच्या व्यक्तीला का घाबरावं? शिक्षणातल्या सगळय़ा कृत्रिम गोष्टींची मुलांना भीती वाटत होती. मुलं दंगा करीत नसत की गोंगाट नाही. आधी मला वाटायचं, ‘मुलं शिस्तबद्ध आहेत. खरं तर ती घाबरलेली होती. ही भीती शिकलेली माणसं, पुस्तकं, साधनं, शिक्षण देणारी इमारत, पोशाख या सगळय़ांची होती. ही भीती नाहीशी झाली पाहिजे इतकं आपण मुलात मूल झालं पाहिजे हे जाणवलं. ती भीती ‘मला हे येत नाही’, ‘ते समजत नाही’, ‘इतरांचं मला हसणं’, ‘मला खेडवळ म्हणणं’ अशा अनेक गोष्टींची होती. यातून मुलांना बाहेर काढण्याचे प्रयोग सुरू झाले. त्यांचं डब्यातलं जेवण, त्यांचे पोशाख, भाषा यांच्याशी नातं जुळलं. ‘काय वहिनीबाय पोरगी-बाबू बेस हाय नव्हं’ असं मलाही विचारता येऊ लागलं.
मला आठवतंय, या भीतीनं तोंडातून शब्द न फुटणाऱ्या एका मुलाला इतकं बळ द्यावं लागलं, की एक क्षण असा आला की कोणताही कागद न घेता, कुणीही काही न सांगता तो सर्वासमोर बोलायला उभा राहिला. पाच मिनिटं- दहा मिनिटं तब्बल २०-२५ मिनिटं झाली.. बेल गप्प बसली नि घडय़ाळय़ाचे काटे सरकेनात, तो बोलतच राहिला. या उदाहरणावरून मग मनातलं बोलण्याची संधी देण्यासाठी कुतूहल, अभिव्यक्ती, सजावट, फलक असे उपक्रम सुरू केले. मुलांनी वाचलं पाहिजे, पण पुस्तकं कुठून आणायची? आधी रविवारच्या वर्तमानपत्रातल्या गोष्टी कापून पुस्तकं तयार झाली नि नंतर मुलांच्या अनुभवांची पुस्तकं तयार झाली.
मला प्रयोग करावेसे वाटतात, विशेषत: मातृभाषेच्या संदर्भात जाणीवपूर्वक रचना कराविशी वाटते. मनातला आशय व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असते. आमची सगळी ‘टीम इंडिया’ तशी ‘स्कूल टीम’ अंत:प्रेरणेतून काम करू लागली. जोपर्यंत बघायला येणारा आश्चर्यचकित होत नव्हता तोपर्यंत आम्हाला कळलं नव्हतं की आपण काही वेगळे करतोय ते. नऊ ठिपक्यांचं कोडं आम्हाला केव्हाच सुटलं होतं.
पण मुलांना घडवताना आम्ही घडत होतो. चार भिंतींतून शाळा बाहेर आली पाहिजे. मुलांनी झाडाखाली बसावं, असं मला वाटत होतं, कारण इमारतीत बसून मी कंटाळले होते. पण माझ्या समोरची मुलं झाडाखालीच बसून राहणारी होती. त्यामुळे त्यांना इमारतीत यावंसं वाटत होतं. मी समजून घ्यायला चुकत होते नि मुलं माझ्या चुका दुरुस्त करत होती.
दुसरंही असंच झालं. नेहमीप्रमाणे झाडं मुलांना दत्तक दिली. झाडांना मुलांच्या नावाचे कागद लावले. एक मुलगा म्हणाला, ‘मुलं झाडाला दत्तक कशी घेतील? झाडं मुलांना दत्तक घेणार!’ मला जाणवलं, मुलं कविता लिहीत नसली तरी कविता जगत असतात. शाळेबाहेर बापालाही घाबरत नाहीत की विंचवाला. सापाला बरोबर पकडतात. पाऊस कुठून येईल त्याचा नेमका अंदाज बांधतात. कलापूर्ण जगत असतात. मुलांबरोबरचे विविध प्रयोगच मला त्यांच्याशी बांधून ठेवत होते.  माझ्या या प्रयोगात माझ्या बरोबरीनं माझ्या सोबत्यांनी सोबत केली. मी अधिकाराच्या खुर्चीत बसले. अधिकार वापरले नाहीत असं मला वाटतं. तेव्हा समोरचा ‘तुम्ही आम्हाला समजून घेत नाही,’ असंही म्हणत असतो. काही माणसं अशी होती भोवती, ज्यांना आपल्या विचारांच्या प्रसाराचं केंद्र म्हणजे शाळा वाटली. त्यांना असं वाटलं की हे काम आपल्या विचारांचे नाही. तेव्हा वरून मैत्री पण आतून युद्धच होतं. मजा येते याचीही! माझी मात्र या पलीकडची भूमिका होती.
 माझं विश्व माझ्यापुरतं सीमित होतं. मला मुलं दिसली की सतत नवनवे प्रयोग करायची आजही प्रेरणा मिळते. आजूबाजूची माणसं आपल्याजवळची आहेत, आपल्यावर प्रेम करणारी आहेत. आपल्याला मानणारी आहेत असेच मी मानत आल्यानं प्रत्यक्ष ती कशी हे मी लक्षातच घेतलं नाही. छान झालं. मला वाटतं मुलांच्या पालकांनी विश्वासानं मुलं पाठवली आहेत. त्यांची तीच घडणार. त्यांचं ती ठरवणार.
मी मात्र इथल्या माणसांचे रीतिरिवाज शिकले, भाषा शिकले. शाळा सोडून गेलेली मुलं भेटतात. त्यांच्या डोळ्यातल्या आठवणी मला बळ देतात. त्यांच्यात घडत गेलेल्या माणसानं मला घडवलेलं असतं. मुलांमधून समाजाचे आदर्श उभे राहिले आहेत असं आत्मविश्वासानं मी म्हणते. यात अनेक सहभाग असतात. माझ्या लक्षात आलं. कधी दुपारच्या वेळी भाकरतुकडा घेऊन आलेली मुलाची आई माझी माय असते. माझ्या तोंडावरून मायेनं हात फिरवणारी म्हातारी, तिचा उबदार स्पर्श मला शांत करतो. यंत्रातही जीव असतोच की, ती पण दमत असतील, असं मानणारी बाई भेटते. आपल्या लग्नांना मला आलेले पाहून मुंडावळ्यांच्या आडून मुलं आदराने बघतात. एवढं प्रेम कोण देणार आहे? मला वाटतं हे माझं भाग्य बघूनच..
हे सारं ठीक आहे. पण काळ बदलतोय. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाही. मलाही बदलायला हवं. काळाच्या पाश्र्वभूमीवर आपली मुलं जगायला लायक बनतील अशी नवी वाट शोधायला हवी, असं मला जाणवत असलं तरी कदाचित पुढची पिढी माझ्यापुढे निघून गेली असेल. कधी मी त्यांचं बोट धरते. कधी मी माझी चालेन. वाट मी केलेली असेल, शोधलेली असेल. यासाठी किती वेळ मिळेल हे नियती ठरवेल.
काम उभं करताना घडलेल्या प्रेरक गोष्टी, आठवणी मी मुलांबरोबर शेअर करते. परवाच मुलांशी बोलताना मी म्हणाले, ‘पंचवीस वर्षांपूर्वी काम सुरू करताना परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे. पुन्हा नव्यानं वेगळं काही इथंच सुरू करायला हवं.’ मग मला वाटतं कदाचित कुणाला वाटेल, ‘पंचवीस-तीस र्वष काम करताय. पण मला वाटतं, फक्त पाच तास काम झालंय. इतकं काम बाकी आहे.’
औपचारिक दृष्टीनं विचार केला तर एका शासनमान्य अनुदानित शाळेत मी मुख्याध्यापक आहे. चौकटीबाहेरचं विस्तारलेलं क्षितिज मी नेहमीच या चौकटीतून आत आणायचा प्रयत्न केला. कोणत्याच नियम-अटींनी मी बांधले गेले नाही. मुलांसाठी काय करावं हे मुलांनीच करायला लावलं. ते केलं. करत आहेत. यालाच कुणी प्रयोग म्हणेल, कुणी उपक्रम म्हणेल. त्यामुळे कामाची नोकरी झाली नाही. मी स्वत:ला ताजीतवानी ठेवत गेले. किती छान आहे ना!
आता तीस र्वष होतील. कशी गेली! अगदी काल काम सुरू केल्यासारखं वाटतंय. मुलं शहराकडं धावतायत. विकासाची साधनं आणि विकास यात त्यांचा गोंधळ झालाय. तंत्रज्ञानाचा गैरवापरही होतोय. शारीरिक क्षमता कमी होतायत की काय? खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी बदलल्यात. घरं बदलली आहेत. मुलांनी जे करावंसं वाटतं ते मुलं करत नाहीत. इतका छान देखणा निसर्ग सोडून शहराकडे पूर्वीपेक्षा वेगानं धावतायत. पूर्वीही शेती करायला नको वाटू लागली होती. आता जमिनीच नकोशा झाल्यात. पुन्हा नव्यानं नवे बदल लक्षात घेऊन काम करायला हवं. नव्या पिढीशी मिळतंजुळतं घेऊनच! वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत. उत्तरं शोधली की सापडणारेत. नवीन काय? असा प्रश्न विचारतात तेव्हा कधी मी उत्तर देते,‘सगळंच नव्यानं अन्   नवीन!’ हे उत्तर मी मनापासून देते. या उत्तरानं पुन्हा ताजेपणा येतो. प्रश्न असणारच, ते समजून सोडवले की मजा येते. आपल्या पद्धतीनं नि परिसराच्या कागदावर सोडवायचे. मग मजा येते!
आज मी आनंदात आहे, मजेत आहे. अनेक ठिकाणी जाते. चांगली माणसं खूप आहेत. लिहिते. लोकापर्यंत पोचवते. याचाही मला अट्टहास नव्हताच. सहज घडत गेलं सगळं. सगळ्या भूमिका बजावताना मी वेळ कमी देऊ शकले, पण ज्यांच्यासाठी बजावते त्यांना त्या आवडतात. अधिक काय हवं?
संपर्क- डॉ. रेणू व राजाराम दांडेकर, लोकसाधना, चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी,
पिन कोड – ४१५७१२. दूरध्वनी- (०२३५८) २०५५७७ मोबाईल ९८२२४४३८५३
वेबसाइट – ँ३३स्र्://’‘२ंिँंल्लं.१ॠ
ई-मेल- ूल्ल३ूं३@’‘२ंिँंल्लं.१ॠ

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
Story img Loader