तुलसीदासांचं ‘रामचरितमानस’ कालजयी आहे. व्यक्तिगत प्रज्ञा आणि सामूहिक चेतना यांच्या प्रयागतीर्थातून वर आलेलं, व्यापक मानवी सहानुभूतीने भिजलेलं आणि शाश्वत जीवनमूल्यांची ओंजळ भरून आणणारं साहित्य आहे.
समाज- कोणताही समाज, श्रीमंत होतो तो केवळ भौतिक सुखसाधनांच्या विपुलतेमुळे नव्हे. सर्वकल्याणाच्या दिशेनं आंतरिक गतिशील असण्याचा उत्साह, चारित्र्यसंपन्नतेचा व्यक्तिमात्रांमध्ये असणारा आग्रह आणि सर्जनशीलतेचा सार्वत्रिक उत्कर्ष ही समाजाच्या ऐश्वर्याची खरी खूण आहे. ऱ्हासकालीन समाजात याचं भान हरवतं आणि मग समाजजीवनाची अंतर्बाहय़ पडझड सुरू होते. तशा पडझडीच्या दीर्घ अशा मध्ययुगीन कालखंडात देशाच्या विविध प्रांतांमधून वेगवेगळे भक्तिसंप्रदाय आणि थोर संतमहात्मे उदयाला आले आणि आपापल्या सांप्रदायिक मतांना सहजपणे भेदातीत अशा व्यापक आध्यात्मिक अवकाशात त्यांनी लोककल्याणासाठी फलद्रूप बनवलं.
गोस्वामी तुलसीदास हे अशाच संतांपैकी एक होते. त्यांचा सोळाव्या शतकाचा काळ म्हणजे उत्तरेतला सम्राट अकबर आणि अकबर पुत्र जहांगीर यांचा काळ. फार मोठय़ा नव्हे, पण लहान लहान युद्धांचा आणि संघर्षांचा काळ. छोटय़ा छोटय़ा राजवटींचा आणि एका सबळ नेतृत्वाअभावी खंडित शक्तीचा काळ. अत्यंत अस्थिर आणि सतत अस्वस्थ असणारा काळ. पुढे तुलसीदासांनी आपल्या काळाचं वर्णन करताना म्हटलं आहे.
खेती न किसान को, भिखारी को न भीख
बलि वनिक को न बनिज, न चाकर को चाकरी
शिवाय समाजधारणेला आवश्यक असे काहीच उरलेलं नाही. लोक शिस्त मानत नाहीत, वासनेच्या विळख्यात ते सापडलेले आहेत. असहिष्णुता वाढते आहे, दारिद्रय़ वाढतं आहे. तुलसीदासांनी अशा काळात रामराज्याच्या निमित्ताने आदर्श समाजाचं स्वप्न रंगवलं. जे जन्मले सोळाव्या शतकात आणि त्यांचं देहावसान झाले सतराव्या शतकात. ढोबळपणानं इतकं च म्हणता येतं, कारण त्यांच्या जन्म-मृत्यूच्या वर्षांची निश्चिती नाही आणि त्यांच्या जन्म-मृत्यूच्या स्थळाविषयीही विद्वानांमध्ये एकमत नाही. उत्तरकाळातली वेगवेगळी प्रमाणे आणि त्यांच्या काव्यातून मिळणारी अंत:साक्ष यांच्या आधारे म्हणता येतं की, ते बाँदा जिल्ह्य़ातल्या राजापूर नावाच्या गावी जन्मले. असंही सांगतात की, त्यांच्या लहानपणीच त्यांचं मातृछत्र हरपलं. पाठोपाठ पित्याचंही निधन झालं आणि जिने त्यांना सांभाळलं ती चुनिया नावाची दासीसुद्धा मरण पावली.
तेव्हा ते जेमतेम पाच वर्षांचे होते. त्यांचं नाव तेव्हा रामबोला असं होतं. अनाथ दरिद्री मूल म्हणून ठेचा खात, दैवाचे तडाखे सोसत ते सूकर नावाच्या तीर्थक्षेत्रात पोहोचले आणि स्वामी रामानंदांचे एक शिष्य नरहरीदास त्यांना तिथे भेटले. त्यांनी रामबोलाला काशीचे प्रसिद्ध विद्वान शेषसनातन यांच्या पाठशाळेत दाखल केले. तिथं तुलसीदासांचं अध्ययन झाले आणि राजापूरला कथा-पुराण सांगत त्यांनी उपजीविका सुरू केली. एक कथा अशी आहे की, रत्नावली नावाची एक देखणी विदुषी त्यांची पत्नी होती आणि तारापती नावाचा त्यांचा मुलगा होता. असे म्हणतात की, रत्नावलीत त्यांचं मन इतकं आसक्त होऊन गुंतलं होतं की, एकदा ती माहेरी गेली असताना तिच्या विरहानं बेचैन होऊन नदीच्या तुफान पुरात उडी घेऊन ते तिच्या घरी पोहोचले होते आणि सापाच्या दोरावर चढून तिच्या माडीवर पोहोचले होते. त्यांचं ते अचाट साहस पाहून रत्नावली मात्र खेदानं आणि क्षोभानं म्हणाली, ‘‘हाडामांसाच्या माणसावर इतके प्रेम करता, मग त्या श्रीरामासाठी इतके व्याकूळ झाला असता तर भवपाशातून सुटले तरी असता.’’ तुलसीदास मर्मज्ञ होते. तिच्या उद्गारांचा फार खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि मुळात हृदयतळाशी रामभक्तीची जी ठिणगी होती ती विलक्षण धगधगून उठली. ते घर सोडून निघाले. अनेक धर्मस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. अनेक संत-पुरुषांना ते भेटले. त्यांनी विखुरलेला, सभ्रांत आणि बलहीन समाज पाहिला, त्यांनी निर्थक कर्मकांडांत गुरफटलेली आणि वेगवेगळ्या दैवतांची आंधळी उपासना करणारी भाबडी, साधी माणसे पाहिली आणि त्यांच्या अनुभवाच्या कक्षा विस्तारत गेल्या.
त्यांचे प्रिय दैवत होते राम. त्याची अनन्यभक्ती हेच त्यांचे जीवननिधान होते. अयोध्येत त्यांनी ‘रामचरितमानस’ या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाच्या रचनेला आरंभ केला आणि पुढे काशीच्या वास्तव्यात तो लिहून पूर्ण केला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी काशी क्षेत्रातच घालवले. इतर अनेक संतांप्रमाणेच त्यांच्या आयुष्याशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या. त्या सगळ्यापलीकडचं तथ्य असं की, त्यांनी आपलं विरक्त जीवन रामानुरक्तीनं सफल केलं आणि लोकनुरक्तीनं त्याला बहुजन कल्याणाचं साधन बनवलं.
त्यांचं अत्याधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय काव्य म्हणजे अवधी भाषेतलं ‘रामचरितमानस’. पण त्याशिवायही अनेक ग्रंथ त्यांच्या नावे आहेत. बहुतेक प्राचीन ग्रंथकृतींच्या रचनाकारांच्या श्रेयाविषयी जशी मतमतांतरे असतात तशी त्याही ग्रंथांबद्दल आहेत, पण विद्वानांनी बारा ग्रंथांचे कर्तृत्व तरी बहुमतानं त्यांना दिलं आहे. त्यामध्ये शृंगार आणि भक्तीचे रंग असलेली ‘बरवै रामायणा’सारखी कृती आहे. ‘त्रिलोक शोभा’ म्हणून जिचं वर्णन केलं जातं ती ‘पार्वती मंगल’सारखी रचना आहे. लोकपरंपरेचा हात धरून आलेलं श्रुतिमधुर असं ‘जानकीमंगल’ आहे. ब्रजभाषेतली ‘दोहावली’, ‘गीतावली’ आणि ‘कवितावली’ आहे आणि ‘विषयपत्रिके’सारखी जीवनसार्थकाचा बोध घडवणारी, भक्तीनं परिपूर्ण अशी आध्यात्मिक मुक्त रचना आहे. तुलसीदासांची पदे फार श्रुतिमधुर आहेत, भावसधन आहेत आणि संपूर्ण उत्तर भारतावर त्यांचा अद्यापही प्रभाव आहे.
उत्तम संस्कृत रचना करण्याचं सामथ्र्य असतानाही लोकभाषेत रचलेलं हे काव्य म्हणजे तुलसीदासांच्या काव्यसंभारात शिरोभागी शोभणारं आहे ते त्यांचं ‘रामचरितमानस’. त्यांच्या प्रतिभेचाच नव्हे, तर साऱ्या आंतरविश्वाचाच तो विलास आहे. समकालीन समाजाचा सार्वत्रिक ऱ्हास पाहता- अनुभवताना आणि नेतृत्वहीन, मूल्यहीन अशा कालखंडातल्या सर्व विपरीत परिस्थितीतून निर्माण झालेल्या हताशेला, वेदनेला आणि निर्बलतेला सामोरे जाताना रामायणासारख्या एका उदात्त महाकाव्याचा आशय त्यांना पुनर्कथित करावासा वाटला आणि त्या काव्यातून त्यांनी भारतीय समाजाच्या आंतरिक चेतनेचं पुनर्जागरण घडवण्याचा एक उत्कट आणि प्रभावी प्रयत्न केला. मुसलमान राज्यकर्त्यांच्या शासन क्षेत्रात प्रजा जे जे म्हणून दु:ख भोगत होती, त्या त्या दु:खांचा परिहार करणारं एक शासन- एक राज्य त्यांनी आपल्या काव्यातून लोकमानसात प्रतिष्ठित केलं. ते ‘रामराज्य’ होतं.
रामराज बैठे त्रय लोका
हरषित भये, गये सब शोका
वैरू न कर काछु सज कोई
रामप्रताप विषमता खोई।।
अशा शब्दांनी त्यांनी रामराज्याचं वर्णन करण्याचा आरंभ केला आहे. हे रामराज्य दोन स्तरांवरचे राज्य आहे. एक भौतिक स्तर आणि दुसरा आंतरिक स्तर. संयमी, विवेकी, गुणवान, उदार आणि चारित्र्यसंपन्न नागरिक हा रामराज्याचा बळकट पाया. या नागरिकांचं जीवन परस्परप्रेमानं बांधलेलं स्वधर्मनिष्ठा हा भावनिक एकात्मतेचा धागा. शासन आणि प्रजाजन यांचे आदर्श तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’मध्ये फार तन्मयतेनं रंगवलं. भक्ती हे लोकमंगलाचं एक समर्थ साधन कसं होऊ शकतं याचा वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला. नीतीचं मानवी जीवनातलं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि एका आदर्श समाजव्यवस्थेचं स्वप्न नीतीच्या बैसकेवर उभे केलं. व्यक्ती, समाज आणि सृष्टी यांच्यात सामंजस्य असणं हे त्यांच्या रामराज्याचे प्रमुख लक्षण होतं.
दैहिक, दैविक, भौतिक तापा।
रामराज नहिं काहुहि व्यापा।।
समाजसंघटनेचा एक थोर आदर्श त्यांच्या रामराज्यानं उभा केला. समर्थ रामदासांच्या रामराज्याच्या संकल्पनेत तुलसीदासांच्या याच आदर्शाचा प्रतिध्वनी धनुष्याच्या टणत्कारासारखा महाराष्ट्रानं ऐकला आहे.
उत्कट भक्तीच्या संपुटात, अंत:करणातली सगळी मधुरता घेऊन तुलसीदास उभे राहिले आहेत आणि त्यांच्या डोळ्यात समकालीन मोडलेल्या दु:खी माणसांना अभय देणारं रामराज्याचं स्वप्न तरळतं आहे हे दृश्य भारतीय भक्तिपरंपरेच्या पटावरचे मोठं विलोभनीय दृश्य आहे.
‘ओ वूमनिया’ हे सदर आजच्या अंकात प्रसिद्ध झालेले नाही.
डॉ.अरूणा ढेरे – aruna.dhere@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा