आधुनिकता आणि चंगळवाद यांच्यामुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या पिढीकडे अगदी दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. उपलब्ध असलेले अनेक पर्याय हे जरी आपल्याला चोखंदळ निवडीचा आनंद देत असले, तरी यामुळे मनाचा गोंधळ उडतोच आणि समाधान मिळत नाही ते वेगळंच. काय करायला हवं अशा वेळी? काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुलांसोबत पिझ्झा खायचा बेत ठरला. कुठल्याशा पिझ्झा ब्रँडच्या हॉटेलात जाऊन बसलो. समोर मेनू कार्ड आलं. ‘‘तुम्हाला कोणता पिझ्झा हवा?’’ मुलांनी विचारलं
‘‘कोणताही चालेल, फक्त नॉनव्हेज नको.’’ मी म्हणालो. ‘‘ठीक आहे. मग इटालियन हवा की निओपोलीटन टाइप हवा?’’

आपण अज्ञानी आहोत असं कोणाला वाटू नये तसेच पिझ्झाचं मूळ इटली देशात आहे, हे माहिती असल्यानं ‘इटालियन पिझ्झा हवा’ असं मी ‘कॉन्फिडन्टली’ सांगितलं, पण माझा हा कॉन्फिडन्स फार काळ टिकला नाही, कारण पुढचे आणखी अवघड प्रश्न मला विचारण्यात आले. ‘‘डबल चीझ हवं का? थीन क्रस्ट हवा की नको? पिझ्झा बेसमध्ये चीझ हवं का? टॉपिंगसाठी काय आवडेल?’’ पुरे … पुरे… पुरे… प्रश्नांचा भडिमार थांबवत ‘‘तुमच्या आवडीचा कोणताही व्हेज पिझ्झा मागवा’’ असं म्हणून मी माझी सुटका करून घेतली. भूक लागली असताना पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तरी प्रत्यक्ष पिझ्झा समोर येईपर्यंत इतके पर्याय निवडण्याची कसरत मला करावी लागेल असं वाटलंही नव्हतं तसंच पिझ्झा खाण्यासाठी एवढे ज्ञान (?) हवं, असंही वाटलं नव्हतं.

concluding article summarizes the writing process about Children and Family
सांदीत सापडलेले…!: समारोप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
deal with extreme loneliness
नव्या वर्षाचं स्वागत करताना…
My friend friendship that spans life
माझी मैत्रीण: आयुष्य व्यापणारी मैत्री
jinkave ani jagavehi
जिंकावे नि जागावेही : सजग जीवनाचं बीजारोपण
Anita Ghai death. Feminist Thought. Feminism,
विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
Loksatta chaturang Fear Reaction Courage Experience
‘भय’भूती: भीती ही प्रतिक्रिया…धाडस हा निर्णय…
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग

हेही वाचा…पडसाद : गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी निधी हवाच

माझा मित्र अभय हा पीएच.डी. करण्यासाठी झेकोस्लोवाकियाला गेला होता. तेव्हा तेथे समाजवादी/ साम्यवादी राजवट होती. तेथील जीवन, संस्कृती याबद्दल तो नेहमी सांगायचा. झेकोस्लोवाकियामध्ये त्या काळी बहुतेक सर्व जीवनोपयोगी वस्तू सरकारी दुकानातच मिळायच्या. एकदा तेथे मोठ्या प्रमाणावर पिवळ्या रंगाच्या कापडाची प्रचंड प्रमाणात आवक झाली. नागरिकांना केवळ दोन पर्याय होते. एक म्हणजे पिवळ्या रंगाचीच वस्त्रं परिधान करणं, दुसरा, पिवळे कापड खरेदी न करणं आणि जुनेच कपडे वापरणं. पंधरवड्यातच सर्व प्राग शहरामध्ये पिवळे कपडे घातलेले लोक दिसू लागले होते. पिझ्झा दुकानातील किस्सा हा अनेक पर्यायांमुळे होणाऱ्या गोंधळाचा तर झेकोस्लोवाकियातील किस्सा हा पर्यायच उपलब्ध नसल्याचा. ही झाली दोन टोकं.

आम्ही लहान असताना कपडे, अन्न, वह्या, सायकली, खेळण्याच्या वस्तू, मनोरंजन इत्यादी गोष्टी जीवन जगण्यासाठी उपलब्ध होत्या; परंतु प्रत्येक गरजेसाठी असे अनेक पर्याय उपलब्ध नव्हते. भाकरी की चपाती, सुधारस की खीर, कोरी वही की आखीव, बुद्धिबळ, पत्ते की कॅरम असे सोपे आणि इतकेच पर्याय असत. असे पर्याय निवडण्यात बुद्धीचा कस लागत नसे तसेच गोंधळही उडत नसे. जो पर्याय आहे त्यातच आनंद मानून समाधानानं जगणारी आमची पिढी होती. लहानपणी दूरच्या प्रवासासाठी एस.टी. बस किंवा रेल्वे असे दोनच पर्याय आमच्यासाठी होते. विमान सेवा काही मर्यादित मोठ्या शहरांसाठीच होती. मोटार फक्त श्रीमंतांकडेच असायच्या. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा प्रवासाचा मुख्य उद्देश असे. प्रवासाला वेळ लागला तरी प्रवास सुखकर आणि आनंदी होणं महत्त्वाचं होतं. उपलब्ध पर्याय गोड मानून घेतले जात असत. बारावीला सर्वात चांगले गुण मिळवणारे डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट किंवा वकील होणार. त्यापेक्षा कमी गुण मिळालेले सरकारी अधिकारी किंवा कारकून होणार, हे ठरलेलं. करिअरमध्येही खूप पर्याय नव्हतेच त्या वेळी. औद्याोगिक क्रांती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे आपली प्रगती अत्यंत वेगाने होताना दिसत आहे. प्रत्येक जण गिऱ्हाईकांना आकर्षित करून आपला माल विकतो आहे. स्पर्धा वाढल्यामुळे प्रचंड प्रमाणात आकर्षक वस्तू उपलब्ध होत आहेत. करिअरच्या अनेक संधी सर्वांना आहेत. अडचण फक्त एकच आहे, आणि ती म्हणजे उपलब्ध असलेल्या पर्यायांमधील कोणता पर्याय स्वत:ला योग्य वाटतो आणि तो कसा निवडायचा? जीवन जगत असताना आयुष्याच्या वाटेवर वेळोवेळी आपल्याला पर्याय निवडत पुढं जावं लागतं. नोकरी करायची की व्यवसाय करायचा? शहरात राहायचं की खेड्यात? बचत करून शिल्लक राहिलेले पैसे मुदत ठेवीत गुंतवायचे की शेअर्समध्ये? असे एक ना अनेक पर्याय आणि त्यातून करण्यात आलेल्या निवडींवरच आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. पर्यायांची चुकीची निवड ही चुकीच्या परिणामांना आमंत्रण देते. सध्या उपलब्ध असलेले अनेक पर्याय हे जरी चोखंदळ निवडीचा आनंद देत असले, तरी यामुळे एक प्रकारचा गोंधळ होतो एवढं मात्र नक्की. जेवढे पर्याय जास्त तेवढा गोंधळ अधिक होतो. मानसशास्त्रात याला ‘निवडीचा विरोधाभास’ (Paradox of choice) असं म्हटलं जातं.

छोटे छोटे पर्याय निवडणं ही वर वर वाटते तितकी सोपी बाब नाही. यामध्ये निर्णय घेताना विनाकारण गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावं लागतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन अधिकाधिक सुलभ होईल असं वाटत असलं तरी मानसिक गुंतागुंत वाढत असल्याचं दिसत आहे. आणि खरोखरच आपण जर अत्यंत उत्कृष्ट पर्याय निवडलाच तर या पर्याय निवडीचा आनंद किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. कारण पर्याय निवडीनंतर मनाची होणारी घालमेल, विशेषत: अगदी साम्य असणाऱ्या वस्तूंमध्ये तर गोंधळच होतो. आपण निवडलेल्या पर्यायांपेक्षा न निवडलेल्या पर्यायातील चांगल्या बाबी अधिक दिसू लागतात. परिणाम काय, तर एवढा गोंधळ घालूनही समाधान नाही ते नाहीच. बऱ्याच वेळा आपण एखादी वस्तू आणायला मोठ्या मॉलमध्ये जातो आणि तेथे विक्रीला ठेवलेल्या अनेक वस्तूंमध्येच गुंतून जातो. काही वस्तूंची खरेदीही होते आणि आपण नक्की काय खरेदी करायला आलो होतो तेच विसरतो. यातील गमतीचा भाग वगळा, पण असं का होतं? आपली कमी झालेली एकाग्रता आणि वारंवार विचलित होणारं आपलं लक्ष यामुळे हे घडतं. प्रत्येक ठिकाणी खरोखरच आपल्याला एवढ्या पर्यायांची आवश्यकता आहे का? याबाबत स्वत:ला प्रश्न विचारणं इष्ट राहील.

हेही वाचा…‘भय’भूती : भीतिध्वनी

आपण सर्वजण मानवजातीच्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट अशा टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवनात होणारे बदल अपरिहार्य आहेत. जग थांबणार नाही. आपल्याला स्वत:लाच या बदलांचे चांगले व वाईट परिणाम वेळीच ओळखण्याची कला शिकावी लागणार आहे आणि वाईट परिणामांपासून आपला स्वत:चा बचाव करावा लागणार आहे. ‘डिजिटल मार्केटिंग’च्या या युगात ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना अनेक प्रलोभनं दाखवली जातात. ‘डिजिटल मार्केटिंग’ने ग्राहकांना खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. परंतु एकाच वेळी अनेक पर्याय उपलब्ध असणं हीच ग्राहकांसमोरील खरी समस्या आहे, हे मात्र बहुतेकांच्या लक्षातच येत नाही.

कोणताही निर्णय घेताना आपला मेंदू एका ठरावीक प्रक्रियेतून जातो. मला नक्की काय हवं आहे? माझी नेमकी गरज काय आहे? हे एकदा ठरलं, की मग मला जे हवं ते कोठे उपलब्ध आहे? त्याचा दर्जा काय आहे? आणखी काही पर्याय आहेत का? याचा विचार होतो. एकदा का पर्याय सापडले की प्रत्येक पर्यायाचे फायदे व तोटे यांचा अभ्यास करून त्यातून योग्य पर्याय निवडणं अशी ही निर्णय प्रक्रिया असते. विवाह ठरवणं, नवीन घर खरेदी करणं, वाहन खरेदी करणं, स्थावर मालमत्ता घेणं, करिअर निवडणं असे जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना उपलब्ध पर्यायातून योग्य पर्याय निवडणं ही खरी कसोटी असते. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, विचारविनिमय होतो, सल्ले घेतले जातात आणि मगच सुयोग्य निर्णय घेतले जातात.

परंतु मी आज रात्रीच्या जेवणात काय खाणार? जेवणानंतर स्वीटडिश कोणती घेणार? हे काही जीवनातले फार महत्त्वाचे किंवा जीवन बदलणारे निर्णय नाहीत. त्यामुळे यासाठी फार मोठ्या निर्णय प्रक्रियेतून जाण्याची काहीच आवश्यकता नसते. परंतु अनेक पर्याय समोर उपलब्ध झाल्यामुळे व्यवहारातील हे छोटे छोटे निर्णयसुद्धा फारच क्लिष्ट होऊन बसले आहेत.

हेही वाचा…समजून घ्यायला हवं

बहु पर्यायाच्या समस्येवर तोडगा काढणं शक्य आहे. त्यासाठी विशेष परिश्रमदेखील लागत नाहीत. आवश्यकता असते ती फक्त इच्छाशक्तीची. साधे दैनंदिन निर्णय जाणीवपूर्वक आणि सरावानं स्वयंचलित करता येणं सहज शक्य आहे. आपल्याला मॉलमध्ये किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी नक्की काय खरेदी करायचं आहे, याची यादी आगोदर लिहून काढा. तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपण लिहिलेल्या यादीतून वस्तू खरेदी करा आणि त्यानंतर टाइमपास करा किंवा विंडो शॉपिंगचा आनंद लुटा.

पर्यायांची संख्या कमी करणं हा मनातील गोंधळ कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. कोणती किरकोळ खरेदी करताना त्याची किती माहिती गोळा करायची, यालाही काही मर्यादा हवी. असे छोटे छोटे तोडगे उपाय जर आपण शोधून काढले तर आपल्यामधील उतावळेपणा, काळजी आणि तणाव कमी व्हायला नक्कीच मदत होईल असं वाटतं.चोखंदळ निवडीचं स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. पण पर्यायांची संख्या वाढली तर निवड प्रक्रियाच अवघड होऊन बसते आणि खरेदीचं समाधान मिळणं दुरापस्त होतं. पर्यायांची संख्या जाणीवपूर्वक कमी करून निर्णय घेणं सोपं होतं आणि त्यातून समाधानही मिळतं. म्हणूनच बहुपर्यायाच्या या मायाजालातून स्वत:ची सोडवणूक करून घेतलेलीच चांगली. mohitedcp@gmail.com

Story img Loader