अनेक माणसं अव्याहत, अकारण बोलत असतात. कुठेही, कितीही आणि काहीही! आपण कुणाशी बोलतो आहोत, किती वेळ बोलतो आहोत, त्यांना ते ऐकायचं आहे का? याचंही भान त्यांना राहात नाही. त्यात कुणी नामवंत व्यक्ती समोर आली की, कारण नसताना त्यांच्या व्यवसायावर घसरणारीही अनेक जणं असतात. चुकीच्या माणसांसमोर, चुकीच्या वेळी, चुकीचे शब्द वापरून बोलण्यामुळे वाईटच परिणाम होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही का?

केस कापायला गेले होते. बऱ्यापैकी बरं पार्लर. सलोन वगैरे म्हणतात तसं. बाकायदा अपॉइंटमेंट घेऊन गेले होते, माझी वेळ आल्यावर खुर्चीवर बसले. शांतपणे काम चालू होतं. मंद संगीत सुरू होतं. सगळा मामला सुखद होता. आणि अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. माझे केस डोळ्यांवर आणि मान खाली असल्यामुळे कोण आहे ते मला दिसणं शक्यच नव्हतं. त्यामुळे कानाशी एका बाईंचा आवाज ऐकू आला तेवढाच मला कळला. ‘तुम्ही मुग्धा गोडबोले ना, मगाशीच मी बघितलं. परवाच तुमच्या नाटकाला आले होते, नातीला घेऊन. आवडलं बरं का नाटक.’ मी जमेल तेवढी मान हलवली, ‘थँक यू’ म्हणाले.

बाईंना नाटकाबद्दल भरभरून बोलायचं होतं, नातीला नाटक किती आणि कसं आवडलं ते सांगायचं होतं. माझ्याच नाटकातला एक प्रसंग तर कसा अगदी त्यांच्या घरातलाच आहे हे सांगायचं होतं. या सगळ्यात मी डोळे उघडले की डोळ्यांना केस टोचत होते त्यामुळे मला त्यांच्याकडे बघताही येत नव्हतं. मग माझ्यावर टाकलेल्या काळ्या डगल्याच्या आतून बाईंनी माझा हात शोधून काढला आणि मला शेकहँड केला. मला कळलं की, बाई शेजारच्याच खुर्चीवर बसणार आहेत. त्यांच्या केशकर्तनाची तयारी सुरू झाली. आता आमच्यात थोडं अंतर निर्माण झालं त्यामुळे ‘झालं त्यांचं बोलून’ असं मला वाटलं, पण नाही! हल्ला पूर्ण परतला नव्हता. उलट आता आवाज मोठा झाला होता. बाईंच्या घशाला ध्वनिनियंत्रणाचं बटणच नव्हतं. ‘‘हल्ली तुम्ही टीव्हीमालिकांमध्ये दिसत नाही’’.

आता मी डोळ्यांवरच्या तीन केसांच्या फटीतून बघत ‘‘नसते फारशी’’ एवढंच तुटक उत्तर दिलं.

‘‘काय त्या अमुक तमुक मालिकेत सध्या दाखवतायत. तुमच्या ओळखीचे असतील ना, त्यांना सांगा…’’ नेमका त्याच वेळी माझ्या कानात हेयरड्रायरचा झोत आला त्यामुळे मी नेमकं कुणाला काय सांगायचं आहे ते मला ऐकू आलं नाही. तेवढ्यात ज्याच्या हातात माझं डोकं होतं त्यानं ते डावीकडे वळवल्यामुळे मला बाई पहिल्यांदा नीट दिसल्या. कपडे तरी मॉडर्न आणि स्मार्ट होते. एकजण त्यांच्या केसांना चार-पाच रंगीबेरंगी पिना लावत होता, त्यात त्यांचं डोकं हलत होतं, पण बाईंचं बोलणं थांबायला तयार नाही. कधी त्यांच्या डोक्यावर टॉवेल, कधी त्यांची मान खाली असल्यामुळे त्यांचा दाबलेला आवाज. कधी माझी मान एवढी मागे टाकलेली की मला डायरेक्ट देवच दिसायचा शिल्लक आहे, कधी त्यांच्या केसांना फेस, या सगळ्यात बाई मात्र बोलतच होत्या आणि माझ्या तोंडाला फेस आणत होत्या.

त्यांच्या सासूबाईंचं वय किती, मुलगा कुठे नोकरी करतो, सून किती डाएट करते, नात कशी फक्त त्यांचंच ऐकते, दुसऱ्या मुलाच्या लग्नाचा मेन्यू काय ठरलाय, सगळं त्यांना मला तिथे त्या अवस्थेतच सांगायचं होतं. कबूल आहे, आम्ही बाहेर कुठे भेटण्याची शक्यता कमी होती, पण मला हे सगळं ऐकायचं होतं का, हा प्रश्न त्यांना पडलाच नव्हता. त्यांना सांगायचं होतं, झुप्पे!

माझी निघायची वेळ झाली आणि मग ‘सेल्फी’ आलाच. एका बाजूचे केस पिना लावून वर बांधलेले आणि दुसऱ्या अर्ध्या बाजूला चंपी केल्यासारखे ओले केस, अशा अवस्थेत त्या माझ्याशेजारी सेल्फी काढायला उभ्या राहिल्या. मलाच कसंतरी झालं, पण ‘मी थांबते’ असं म्हटलं असतं तर बाईंनी मला त्यांच्या आयुष्याचा साधारण इयत्ता पहिली ते वय वर्षे पंचावन्न एवढा आलेख वगैरे ऐकवला असता. त्यामुळे असा काही चांगुलपणा वगैरे न दाखवता मी निघाले. निघताना मला त्यांची दया, राग, त्यांच्या बेधडकपणाचं कौतुक, अचंबा असं सगळंच वाटत होतं. यातला गमतीचा भाग सोडा, पण अनेकदा हा असा अनुभव येतो. बोलणं ही नैसर्गिक ऊर्मी आहे वगैरे ठीक आहे, पण कुठे, काय आणि किती बोलावं हेही कळायला हवं ना!

मध्यंतरी, एकदा आमच्या घरी एक घरगुती धार्मिक कार्यक्रम होता. जवळचे, दूरचे मित्र नातेवाईक येत होते. दारावरची बेल वाजली. मी गृहिणीच्या भूमिकेत असल्यामुळे लगबगीनं दार उघडलं. दूरचे मावस, चुलत, आत्ते असे कुणीतरी आले होते. वयस्कर मंडळी होती, नमस्कार वगैरे झाले आणि ते गृहस्थ पहिलंच वाक्य मोठ्या आवाजात बोलले, ‘‘कसली तुमची ती घाणेरडी सिरियल! बंद करा की!’’ क्षणभर सगळेच गप्प झाले. अर्थातच एकाने तो विषय पटकन बदलला, मीही त्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला. पण मला आश्चर्य वाटलं. माझ्याच घरी, दारात आल्या आल्या माझ्या पोटापाण्याच्या व्यवसायाबद्दल अपमानास्पद बोलताना त्यांना काहीच चूक वाटलं नसेल? माझ्या कामाबद्दल कुणीही बोलू शकतं, सगळ्यांच्या मताचा आदर आहे, मान्य. पण कुठे, काय आणि किती?

एकदा एका बसस्टॉपवर मी बसची वाट बघत उभी होते. माझ्या अवतीभवती विविध वयोगटांतली अनेक माणसं होती. मी कानात यंत्र घालून गाणी ऐकत नव्हते, त्यामुळे मला आजूबाजूच्यांचं बोलणं ऐकू येत होतं. आणि एका क्षणी माझ्या लक्षात आलं की, शेजारच्या साधारण तिशीच्या दोघी एकमेकींशी आपले आपल्या जोडीदाराबरोबरचे शारीरिक संबंध याबद्दल बोलत होत्या. त्यांना वाटत असेल त्या हळू आवाजात बोलत होत्या, पण मला आणि अर्थातच शेजारच्या दोन-चार पुरुषांनाही ते ऐकू जात होतं. या विषयावर मैत्रिणीशी बोलू नये, असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण सार्वजनिक ठिकाणी एवढी खासगी गोष्ट बोलणं इतकं गरजेचं होतं का, हा प्रश्न मला नक्की पडला. त्यांना जगाचा विसर पडला होता, पण जगाला त्यांच्या खासगी आयुष्याची इत्थंभूत माहिती मिळत होती.

असेच अनेकदा, नाटकाच्या प्रयोगाच्या आधी मेकअप रूममध्ये येऊन प्रचंड हास्यविनोद करणारे किंवा मध्यंतरात कलाकारांची लगबग सुरू असताना तिथेच थांबून अवांतर बोलणारे अनेक ‘स्नेही’सुद्धा फार अडचणीत टाकतात. ते स्थळ कामाचं आहे, तिथली माणसं काहीच वेळात रंगमंचावर जाऊन आपली सगळी शक्ती पणाला लावून काम करणार आहेत, त्यांना एकाग्रतेची गरज आहे, तर आपण आत्ता त्यांच्याशी हवापाण्याच्या गप्पा मारण्याचा मोह टाळूया, असं यांना वाटत नाही. एखाद्या पार्टीत किंवा गेटटुगेदरमध्ये ‘सगळं लक्ष आपल्याचकडे असावं’ म्हणून सतत एकावर एक किस्से सांगत बसणारी, गात बसणारी मंडळी फार कंटाळा आणतात. वीस-पंचवीस माणसांमध्ये आपण एकट्यानेच किती बोलत बसावं, याचं त्यांचं भान पूर्ण सुटलेलं असतं. अनेकदा इतरांना त्यांच्या या एकपात्री प्रयोगांपेक्षा वेगळं काहीतरी ऐकायचं असतं, बोलायचं असतं. पण समाजाच्या मनोरंजनाची सगळी जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या आविर्भावात ही मंडळी असतात. आणि इतरांकडे त्या क्षणी शरण जाण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. मध्यंतरी, एका जाहीर कार्यक्रमात एक प्रमुख पाहुणे लोकांचे आभार मानताना स्वत:च्या कुटुंबीयांबद्दल इतका वेळ बोलत बसले, की चुकून आपण त्यांच्या बायकोच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला आलोय की काय, असं वाटायला लागलं. त्यांचा मुलगा, मुलगी, घरातला कुत्रा इथपर्यंत सगळ्यांचं देदीप्यमान यश, कर्तृत्व आणि जिव्हाळा याविषयी बोलण्याची ती जागाच नव्हती. पण… भान सुटलं!

घरी पाहुणे आले की, त्यांच्यासमोर मुद्दाम मुलांना किंवा घरातल्या मदतनीसांना अक्कल शिकवणारे, बोलणारे नग अनेक असतात. ‘जिम’मध्ये ट्रेडमिलवर शेजारच्या माणसाने काल पाहिलेल्या सिनेमाची गोष्ट सांगायला सुरुवात केली की, व्यायाम प्रकार बदलणं हा एकच पर्याय असतो… आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा खालच्या आर्थिक वर्गातले लोक असताना आपण आपल्या मोठमोठ्या महागड्या खरेद्यांबद्दल बोलत बसणं, ही तर असंवेदनशीलता आहे.

हे झालं प्रत्यक्ष बोलणं, फोनवर बोलणं हा तर एक वेगळाच गंमतशीर प्रकार आहे. ‘त्यात काय एवढं, चालतं की’ असं म्हणून धाडकन फोन करून अर्धा अर्धा तास बोलणारी अनेक माणसं मला माहीत आहेत. तो अर्धा तास त्यांना वेळ असतो, ज्याला फोन केलाय त्याला तेवढा वेळ आहे का, असं विचारण्याची गरज त्यांना वाटत नसते. आणि समोरच्यालाही अनेकदा यांना कसं थांबवावं कळत नाही. एकूणच बोलताना आपण समोरच्याचा विचार कमीच करतो बहुधा. मन दुखावणारं किंवा बोचणारं बोलणं या अर्थाने मी म्हणत नाहीये. आपण समोरच्याचा किती वेळ घेतो आहोत, याचा कमीच विचार केला जातो.

हल्ली झालंय असं, की ‘बोला’, ‘व्यक्त व्हा’, ‘आत दाबून ठेवू नका’, ‘मोकळे व्हा’, याचा इतका प्रचंड प्रचार आणि प्रभाव झालाय, की सगळ्यांना सतत सगळ्यांशी सगळं बोलायचं असतं. मेंदू आणि जीभ यांच्यामध्ये काही फिल्टर किंवा चाळणीच उरलेली नाहीये. भान राखा, बोलताना चौकट पाळा, असं म्हणणं म्हणजे तर थेट व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यापर्यंत जातात मंडळी. पण कधी कधी आपण बोलून आणि ऐकायला लावून समोरच्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणत असतो, हेही लक्षात घ्यायला हवं!

मुळात आपल्या मनातलं सगळं कुठेतरी उघडं करण्याची गरज का भासते? किंवा निदान योग्य व्यक्ती, स्थळ, वेळ येईपर्यंत थांबता का येत नाही? भवतालाचा ताल ओळखून बोलता आलं, तर आपलंच बोलणं किती जास्त परिणामकारक होईल. चुकीच्या माणसांसमोर, चुकीच्या वेळी, चुकीचे शब्द वापरून बोलण्यामुळे आपण आपलं हसं करून घेतो. नाती बिघडतात, प्रतिमा डागाळतात, गैरसमज होतात. प्रश्न सुटत नाहीत, ते वाढतात.

घरंगळणारे शब्द, फापटपसारा घालत, अव्याहत बोलणारी माणसं माझ्या तरी नजरेला फार केविलवाणी दिसतात. अवेळी, अस्थानी आणि अकारण… खरंतर काहीच नको, पण त्यातही बोलणं तर अजिबातच नको.

godbolemugdha2@gmail.com