मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

why asha bhosle and lata mangeshkar always wore white saree
मी आणि दीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो कारण…; आशा भोसलेंनी सांगितली आठवण, म्हणाल्या, “रंगीत साड्या नेसल्या तर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार

‘‘ही खीर इतकी चवदार, पौष्टिक बनते की कितीही पिली तरी चालते.’’  ही ‘पिली’ मात्र मावशींच्या डोक्यातच गेली. काय चाललंय आपलं? कसल्या भयाण भाषेसह जगतोय आपण? आपल्याला केस – कपडय़ांपासून दरवाजे – खिडक्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट इतकी टापटीप चकचकीत नटवी लागत्येय. फक्त भाषेबद्दल एवढी उदासीनता का? तीही मातृभाषेबद्दल? या ‘लिंग्विस्टिक व्हायोलन्स’च्या प्रश्नाला तोंड तरी कुठे फोडणार?.. इतक्यात मावशींना एकदम ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ अर्थात ‘व्वाऽऽ’ या नव्या हेल्पलाइनची आठवण झाली..

दिवस उजाडला. रोजच्या वर्तमानपत्राबरोबर ‘हट्टी डाग’ अलगदपणे मावशींच्या घरात येऊन पडले. गेले खूप दिवस ही रंजक जाहिरात चकचकीत, बहुरंगी कागदातून, वर्तमानपत्राच्या घडीत लपून घरात यायची. बादली, पाणी, साबण, फेस आणि भलामोठा डाग यातून वाक्यं झळकायची, ‘फक्त एक बादली पाणीमध्ये दोन टॅबलेट्स टाकून ढवळवा. हट्टी डाग असलेला कपडा या पाणीमध्ये १० मिनिटं बुडवून ठेवा. डाग गायब.’  ‘नीलो फ्रेश ज्यांचे घरी.. त्यांना डागांची ‘नो वरी’!’

हातात हा चिटोरा आला की मावशींना रोज काळ पुढे गेल्याचा साक्षात्कार व्हायचा. पूर्वी नुसती पोरंटोरं हट्टी असत. सांडलवंड करून कपडय़ांवर डाग पाडत. आता डागच हट्टी झाले. नुसतं ‘ढवळा’ न म्हणता ‘ढवळवा’ म्हटल्याने पोटात ढवळल्याचा प्रत्यय आला. शिवाय ‘पाणीमध्ये’ वगैरे म्हटल्याने एकेका जोडाक्षराची बचत झाली. अल्पाक्षरी, अर्थबहुल वगैरे म्हणतात तशी भाषा! आयती घरात येऊन पडत्येय. या खुषीत ‘पेपर’ कुशीत घेऊन मावशी वाचायला बसणार तेवढय़ात शेजारच्या बंगल्यातली सातवीतली पोर सकाळची शाळा गाठण्यासाठी घाईघाईने बाहेर पडली. ‘‘निघालीस का गं? आज डब्यात काय घेतलंयस?’’ मावशींनी उत्साहानं विचारलं.

‘‘आज मॉम बोलली, ‘तिला जेवण बनवायला वेळ नाही.’ मग मी बोलली, ‘‘मी कॅण्टीनमध्ये ग्रॅब करीन.’’

‘‘जेवण जेवतात ना गं? त्यासाठी आधी स्वयंपाक करतात, नाही का?.. आणि मॉम तुला काहीतरी ‘म्हणेल’ ना? ‘बोलेल’ कशाला? बरोबर आहे ना?’’

‘‘बा ऽऽऽऽ य ..’’ पोरीनं मावशींच्या शिकवणीचा त्यांच्याच बरोबर निरोप घेत म्हटलं. रिक्षा आली होती तिला नेणारी. मावशींनीही जोराजोरात निरोपाचा हात हलवला.

वर्तमानपत्र पुढय़ात पसरणार तेवढय़ात त्यांच्याकडे ‘जेवण बनवणारी’ बाई आज रोजच्यापेक्षा लवकर घरी हजर झाली. तीही छान नटून थटून.

‘‘काय बनवू पटकन सांगा.’’

‘‘तशी काम केल्यासारखं दाखवून खूप वर्ष तू आम्हाला बनवतेच आहेस बये. पण आज एवढा थाट?’’

‘‘पूजेला जायचंय. ही रेड कलरची साडी घातलीये. तो कलर माझ्यावर शोभतोय ना मावशी?’’

‘‘च.. च.. किती वेळा सांगू? साडी घालत नाहीत. नेसतात. तुझ्यावर शोभायला तू काही भिंत आहेस का गं? भिंतीवर रंग शोभतात, माणसाला रंग शोभतात, खुलून दिसतात, नाही का?’’ बाईनं ओटय़ासह त्यांच्यावरही बोळा फिरवला तेव्हा तिला सांगणं हे पालथ्या घडय़ावर पाणी ठरेल, हे लक्षात घेऊन मावशी रोजच्या मराठी वर्तमानपत्राला भिडल्या.

आपल्याकडे आता कोणत्याही भाषेतलं वर्तमानपत्र फारसं आनंदी वर्तमान देऊ शकत नाही, उदासीच आणतं. पण या खानदानी वृत्तपत्राला आताशा मराठी भाषेतल्या नित्यनव्या गटांगळ्यांनी नवनवी खुमारी येई. बातम्या लिहिताना कर्ता- कर्म- क्रियापद असली क्षुद्र तंत्रं ते पाळत नसतंच. पण कोणता शब्द, कोणत्या अर्थाने कुठे, कसा वापरावा याचाही धरबंध नसे. ‘मागची पाश्र्वभूमी’ काय, ‘सिद्धहस्त लेखणी’ काय, ‘मैत्रत्वपूर्ण संवाद’ काय, ‘बद्धपरकर’ काय, एका पक्षाने दुसऱ्या ‘पक्षासोबत’ जाणं काय, निर्णयावर ‘कायम’ असणं काय.. भाषेला दासी- बटकी- गुलाम असल्यासारखं ताबडायचं, या एका निर्णयावर ते कायमचेच ‘कायम’ राहिले होते. वाचक बरेचदा निवांत असत. एखादा जाब विचारत. अलीकडेच गल्लीतले कोणीतरी दिग्गज (हे विशेषण सध्या ‘हिट’ होतं!) गचकण्याच्या बातमीमध्ये ‘त्यांच्या पश्चात त्यांच्या उभय पत्न्या आहेत.’ असं वाक्य छापून संबंधितांमध्ये माफक भय निर्माण केलं होतं. पण पुढे उभयपक्षी समझौता झाला.

आजही पहिल्या पानावरच एक दिग्गज ‘आवरलेले’ होतेच. पण स्वत:च्या प्रपंचात त्यांनी अनेकवचनांची चैन केली नसल्यामुळे वाचक अनेकवचनी मौजेले मुकले होते. मात्र आज एका शिक्षण परिषदेचा वृत्तान्त होता. त्यात विद्यार्थ्यांच्या ‘कलेकलेने घ्यावं’ असा मौलिक संदेश तिथल्या दिग्गजांनी दिला होता. त्या अश्राप पोराटोरांचा कलेकलेला लिहिणाऱ्याच्या अकलेवर तिथेच सोडून मावशी वर्तमानपत्राच्या मराठीच्या कलाकलाने घेत पुढे वाचत राहिल्या.

इतक्यात फोन वाजला. वाचन थांबवून बोलावं लागलं. पलीकडे तरुण भाची होती.

‘‘किती दिवसांनी फोन करत्येस गं?’’

‘‘पिंकीचा बर्थडे आलाय नाऽऽ त्या तयारीत व्यस्त होते.’’

‘‘गणितात व्यस्त असतं ग. तू तयारीत व्यग्र असशील.’’

‘‘परवा ये.. संध्याकाळी ५ ला तिचा आवडता ब्लॅक फॉरेस्ट कट करायचाय.. तेव्हा पोच.. येतांना तुझा तो फॅन्सी नाईफ आण गं!’’

‘‘..च् च्.. केक कापायला सुरी आणायला सांग ना गं.’’

‘‘एऽऽ तू फारच मराठी मराठी करतेस हं मावशी..’’

‘‘फार करत असते तर ‘कृष्णारण्य कापायला’ नसते का म्हणाले?’’

‘‘कृष्णारण्य?’’

‘‘ब्लॅक फॉरेस्ट! एवढं आम्हालाही कळतं बरं का. पण रोजचे साधेसोपे मराठी शब्द वापरायला काय जातं तुमचं? अं? आणि तुम्हीच बोलला नाहीत तर पुढे तुमची मुलं..’’

मावशींनी कितव्यांदा तरी, कोणाला तरी प्रेमाने सांगितलं. पण समोरून कितव्यांदा तरी त्याच अर्थाचं उत्तर आलं,

‘‘ए मावशी.. किती इम्पॉर्टण्ट इश्यूज हॅण्डल करायचे असतात गं आम्हाला रोजचे रोज?.. तुम्ही लोक कुठलं काय लावून धरता उगाच?.. आधीच टाइम नाही इथे कोणाला..’’

चौफेर मावशींना वेळेची वानवा दिसत नव्हती असं नाही. पण तिच्यात आपण आपल्या भाषेला सर्वात जास्त भरडतोय, येऊ नये ती वेळ तिच्यावर आणतोय हे कोणालाच समजू नये? त्या चुटपुटत बसल्या..

गेली काही वर्षे अनेक बायकांचं घरात रांधणं-वाढणं झपाटय़ाने कमी होत चाललं असल्यानं वाहिन्यांवर पाकसिद्धीच्या कार्यक्रमांना ऊत येणं साहजिक होतं. रोज दुपारी त्यातलाच एखादा कार्यक्रम बघून त्या जीव रमवत. त्या दिवशी एका वाहिनीवर ‘दुधीची खीर’ ‘बनत’ होती आणि मावशी मनोमन तिचं मराठी सुधरून घेत बघत होत्या.

‘‘अगोदर दूध गरम करा.’’ (गरम करायला काय ते आंघोळीचं पाणी आहे? आपल्यात दूध मुळात तापवतात. गरजेप्रमाणे उकळतात. आटवतात. चला पुढे.)

‘‘दुधी खिसा.’’ (खिसा तर कोणालाही हवाच. पण दुधी किसला तरी पुरतो.)

‘‘खीस कढईत परतावा.’’ (खीस तर खीस. पण परतवायला काय तो रणांगणातला हल्ला आहे का? कढईत परतलेलं पुरतं की. चला पुढे)

‘‘बदामाची पेस्ट आणि इलायची पावडर टाका.’’ (पेस्ट आणि पावडर ही प्रसाधनं आहेत हो. स्वयंपाकात कोरडी असेल तर पूड आणि ओलं वाटण असायला हरकत नाही. चला पुढे.) असं बरंच पुढे जात जात एकदाची खीर झाली, पुढे साहजिकच तिचं पोषणमूल्य वगैरे आलं आणि त्यातच मराठीचं पुरतं शोषण झालं. ‘‘ही खीर इतकी चवदार, पौष्टिक बनते की कितीही पिली तरी चालते.’’

ही ‘पिली’ मात्र मावशींच्या डोक्यातच गेली. काय चाललंय आपलं? अहोऽऽ येता- जाता- उठत बसता- कार्य करता कसल्या ओबड- धोबड, आकारउकार नसलेल्या भयाण भाषेसह जगतोय आपण? आपल्याला केस- कपडय़ांपासून दरवाजे- खिडक्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट इतकी टापटीप चकचकीत नटवी लागत्येय. फक्त भाषेबद्दल एवढी उदासीनता का? तीही मातृभाषेबद्दल? या प्रश्नाला तोंड तरी कुठे फोडणार?

‘‘व्वा!’’ मावशींना एकदम ‘व्वा!’ या नव्या हेल्पलाइनची आठवण झाली. ‘वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाईस, व्हीव्हीएए’ आता बहुतेकवेळा माणसांना एकमेकांची सुख-दु:खं बोलायला वेळ नसतो. हे ‘व्वा’वाले म्हणे ऐकून तरी घेतात. तेही पहिली तीन मिनिटं मोफत! करावा का त्यांना फोन?.. करावाच! मावशींनी धीर केला. ‘‘हॅलोऽऽ मला जरा एका वेगळ्याच समस्येबद्दल बोलायचंय हो.’’

‘‘हां.. म्हणजे सहन होत नाही.. सांगता येत नाही टाइप..’’

‘‘छे हो! तसलं काही नाही. सांगता ढीगभर येतं. लोकांना कदाचित समजत नाही.. होतंय काय.. माझी फार भाषिक उपासमार होतेय हो.. सुबक, डौलदार, झुळझुळीत मराठी कुठे मिळतंच नाही आता! ’’

‘‘असं काही असतं का?’’

‘‘खरंय. असं काही असतं हेही लोक विसरत चालल्येत.’’

‘‘थोडं प्रॉब्लेमवर या ना मॅडम. पैशांचा, रिलेशनचा प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘म्हटलं तर रिलेशनचा आहे. भवतालाशी नातंच तुटल्यागत होतं हो. यामुळे एकेकदा आपणच दुरावतोय.. पुढच्यांचं काय होणार?’’

‘‘हा जो प्रॉब्लेम आहे, हा जो डायलेमा आहे, ही जी समस्या आहे, ती तुमचीच आहे का आम आदमीची पण आहे?’’

‘‘आम आदमीचीच की. नुसत्या भाषेच्या श्रीमंतीनेही आम आदमीचा खास आदमी होऊ शकतो एक वेळ. पण भाषाच गमावलीत, मातृभाषा गमावलीत तर उरणार काय आपल्याजवळ?’’

‘‘गमावली कुठे? सगळीकडे एक्झिस्ट करते की ती. ही जी भाषा म्हणताय, ही लँग्वेज, हे जे कम्युनिकेशन आहे ते तर खूप जास्त चाललंय सध्या.’’

‘‘हो तर! एका शब्दाला दहा शब्द वापरताहेत आता लोक. ही.. जी.. जे.. ते.. हे.. जे.. या ठिकाणी.. त्या ठिकाणी .. अमके असोत.. तमके असोत.. काय काय असो?’’

‘‘कम टू द पॉइंट मॅम, या ठिकाणी खूप लोकांना खूप जास्त सीरियस इश्यूज डिस्कस करायचे असतात. अगदी डोमेस्टिक व्हायोलन्सपर्यंत.. त्या ठिकाणी, युनो..’’

‘‘हा पण लिंग्विस्टिक व्हायोलन्सच आहे हो! मी मराठी कशाला मानू? सांगा.’’

‘‘ज्या सेण्टेन्सचा एण्ड मराठी व्हर्बने होईल ते मराठी माना. इज दॅट ओके?’’

येथे तीन मिनिटं संपली. या ठिकाणी आपली चिकाटी संपू द्यायची की आपण आपलं म्हणणं ज्या त्या ठिकाणी मांडत राहायचं हा जुनाच प्रश्न, ही जुनी समस्या, हा जुना डायलेमा मावशींना त्या ठिकाणी घेरून राहिला.

Story img Loader