संपदा वागळे
नगरमधल्या बेलवंडी गावात त्यांचे पानटपरीचे दुकान. कवितेच्या आवडीने त्यांना दरवर्षी विविध साहित्य संमेलनांतून फिरवले आणि मग एके दिवशी त्यांनीही ठरवले, आपल्याही गावात संमेलन भरवायचे, पण मान्यवर येतील का? आणि पैसे कुठून आणणार? या प्रश्नांचे उत्तर आईच्या आत्मविश्वासात आणि लेकासाठी हाती घेतलेल्या लाटणे-पोळपाटात होते. प्रचंड कष्ट करत या माऊलीने पैसे उभारले आणि त्यांनी मेहनतीने नामवंतांसह संमेलन भरवले. गेली १९ वर्षे या गावात साहित्य संमेलन भरत आहे. अभिनेते डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, साहित्यिक आनंद यादव, डॉ. सदानंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, डॉ. सुधा कांकरिया हे मान्यवर या संमेलनात येऊन गेले आहेत. गावातले तरुण त्यांच्या साहित्याचे प्रकटीकरण करत आहेत. रंजनाताई आणि अशोक शर्मा या मायलेकांच्या कष्टांची, त्यांच्या साहित्ययज्ञाची ही कहाणी..
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।
हा चरण उच्चारताच मातृशक्तीची अनेक रूपे व्यक्तिरूपात सहज नजरेसमोर येतात. काही अंशी अशीच परंपरा पुढे नेणारे वर्तमानातील एक नाव म्हणजे बेलवंडी गावातील (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) रंजनाताई शर्मा. लहानपणापासूनच साहित्याची आवड असणाऱ्या आणि त्यासाठी दरवर्षी अ.भा. साहित्य संमेलनात हजेरी लावणाऱ्या आपल्या लेकाच्या मनातील आपल्याही गावात छोटेखानी साहित्य संमेलन भरवण्याची विलक्षण तळमळ जाणल्यावर रंजनाताई शर्मा ही माऊली तन-मन-धनाने त्याच्यापाठी उभी राहिली आणि या भक्कम पाठबळावर तिचा हा लेक गेली १९ वर्षे छोटेखानी एकदिवसीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करून साहित्यसेवा करीत आहे. या माय-लेकराच्या अफाट जिद्दीची, अथक परिश्रमांची ही कहाणी बेलवंडी गावात (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) नुकत्याच झालेल्या १९ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ऐकायलाच हवी!
अशोकच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. ताटात वरण-भात दिसे तो फक्त सणासुदीला. आईची तर वीस वर्षे नवऱ्याच्या आजारपणात सरकारी रुग्णालयातच गेली. अशा कठीण परिस्थितीत अशोक यांनी उदरनिर्वाहासाठी घराच्या ओटय़ावरच लहानशी पानटपरी सुरू केली. आडनाव ‘शर्मा’ असले तरी ही मंडळी अंतर्बाह्य मराठी आहेत. अशोक यांनी पानटपरी सांभाळून मुक्त विद्यापीठातून ‘बी.ए.’ केलं. आपला वाचनाचा, कविता करण्याचा छंद जपला. कवितांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कवींना भेटायचे, त्यांना ऐकायचे, संधी मिळाली तर आपली कविता सादर करायची, या हेतूने कवी संमेलनाला जाण्याची इच्छा त्यांच्या मनात मूळ धरू लागली. तेव्हा घरात अनंत अडचणी होत्या. वडिलांबरोबर आईच्या रुग्णालयाच्या वाऱ्या सुरू होत्या. दोन लहान बहिणी लग्नाच्या होत्या, त्यासाठी दोन पैसे बाजूला टाकणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत अशोक यांना गाडीभाडय़ापुरते पैसे खर्च करणेही कठीण होते. तरीही त्याची विलक्षण आस बघून त्यांच्या आईने त्यांना प्रोत्साहन दिले. आईच्या आधारावर अशोक जळगाव, पुणे, लातूर, कऱ्हाड, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणच्या कवी संमेलनाला आणि पुढे अ.भा. साहित्य संमेलनाला गेले, जात राहिले.. दरवर्षी संमेलनातील भारलेले वातावरण अनुभवल्यावर आपल्याही गावात- बेलवंडीमध्ये एखादे कवी संमेलन भरवावे, या कल्पनेने अशोक यांना अक्षरश: झपाटले. २००२ चा तो काळ. हा विचार बोलून दाखवताच सगळय़ा गावाने त्यांना वेडय़ातच काढले. गावकरी म्हणाले, ‘‘तू येडा की खुळा? या आडनिडय़ा गावात कोण मोठे लेखक, कवी, कलाकार यायला बसलेत? उगा उंटावरून शेळय़ा हाकाया जाऊ नगंस..’’ मात्र आईने आपल्या लेकावर विश्वास ठेवला. म्हणाल्या, ‘‘अशोक, भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.’’ त्या शब्दांवर त्यांनी ‘वि. वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषद’ या नावाने गावात पहिले एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलन भरवायचे ठरवले. ९ मार्च २००३ ही तारीख पक्की झाली; पण पानटपरीच्या दुकानातून महिना पाच-सहा हजार रुपये मिळवणाऱ्या अशोक यांच्यासाठी हे शिवधनुष्य उचलणे महाकठीण होते. साहित्यिक कोण आणि कसे बोलवायचे, त्यांच्या मानपानाचा, जेवणाखाण्याचा खर्च, झालेच तर मांडव उभारायला हवा, गावातील लोकांना कार्यक्रमाला येण्यासाठी तयार करायला हवे.. एक ना दोन, अनेक प्रश्न!
यातील मुख्य प्रश्न म्हणजे पैशांची जबाबदारी त्यांच्या आईने, रंजनाताई शर्मा यांनी घेतली. रंजनाताई ही एक अत्यंत हुशार, कर्तबगार स्त्री. पतीनिधनानंतर काही वर्षांनी (१९९२) त्या अंगणवाडी सेविका म्हणून कामाला लागल्या. दोन-अडीच किलोमीटर अंतरावरील वस्तीवर चालत जाऊन-येऊन केलेल्या कामाचा मोबदला मिळे महिना फक्त पन्नास रुपये. निवृत्त होताना हे मानधन चार हजार रुपयांवर पोहोचले. अशोकच्या निर्धाराला साथ देण्यासाठी त्यांनी आपले अंगणवाडीचे काम सांभाळून खानावळ सुरू केली. गावातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलांसाठी जेवणाचे डबे चालू केले. त्यासाठी त्या आपल्या मुलींच्या मदतीने सकाळ-संध्याकाळ पाचशे-पाचशे पोळय़ा करत. त्यांचा दिवस पहाटे ३ ला सुरू होई आणि रात्री १२ नंतर संपे. याशिवाय त्यांनी लोकरीची तोरणे, रुमाल करून विकले. उदबत्त्या वळल्या. फावल्या (!) वेळात त्या स्त्रियांना शिवणकाम शिवू लागल्या. अशा रीतीने दिवस-रात्र काम करून त्यांनी वर्षभरात ५० ते ६० हजार रुपये जमवले आणि ते लेकाच्या हातावर ठेवले ते गावात साहित्य संमेलन सुरू करण्यासाठी. तेही एक-दोन वर्षे नव्हे, तर पुढची तब्बल दहा वर्षे त्यांचा हा साहित्ययज्ञ सुरू होता. सातत्याने सुरू असलेल्या या जगावेगळय़ा कार्यासाठी खोडद ग्रामस्थांनी (ता. जुन्नर, जि. पुणे) या मायलेकरांना ‘श्यामची आई पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे. मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातात लाटणे घेतलेल्या रंजनाताईंनी मुले मोठी झाल्यावर मुक्त विद्यापीठातून ‘बी.ए.’ केले. त्यांची आध्यात्मिक समज मोठी आहे. संपूर्ण भगवद्गीता त्यांना अचूक उच्चारांसह मुखोद्गत आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, हरीविजय, भक्तीविजय, नवनाथ हे ग्रंथ त्यांनी वाचले आहेत. कदाचित म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जाणे त्यांना जमले असावे. पावलोपावली परीक्षा पाहाणारा हा प्रवास! एके वर्षी प्रमुख पाहुण्यांनी आयत्या वेळी येण्याजाण्याच्या प्रवास खर्चाची मागणी केली. रंजनाताईंच्या वर्षभराच्या कष्टांचे पैसे मंडप उभारणे, खाणेपिणे आणि इतर व्यवस्था यातच संपले होते. या बिकट प्रसंगी त्यांनी तात्काळ अंगावरचा एकमेव दागिना असलेली सोन्याची अंगठी अशोकच्या हवाली केली आणि वेळ साजरी झाली. संमेलनासाठी पाहुण्यांना आमंत्रित करायचे तर अशोक यांच्याकडे त्या वेळी फोनही नव्हता; पण खंबीर मातेचा हा तितकाच हिंमतवान लेक हार थोडाच मानणार! टेलिफोनच्या बूथवरून एक रुपयाचे नाणे टाकून केलेला फोन आणि पाठोपाठ धाडलेले निमंत्रणाचे २५ पैशांचे पोस्टकार्ड हीच त्यांची आयुधे. या सामग्रीवर पहिल्या संमेलनाला चक्क नटसम्राट डॉ. श्रीराम लागू, प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, लेखक गंगाधर महांबरे, कुसुमाग्रजांचे बंधू प्रा. केशवराव शिरवाडकर, ग्रामीण कथाकार अण्णासाहेब देशमुख अशी दिग्गज मंडळी आली आणि गावकऱ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. या सर्वाचे संपर्क नंबर अशोक यांनी कसे मिळावले ते त्यांचे त्यांनाच माहीत! ज्यांनी यावे म्हणून प्रयत्नांची शर्थ करावी लागते असे नामवंत निव्वळ एक फोन आणि पोस्टकार्डावरचे आमंत्रण या भांडवलावर कधीही न पाहिलेल्या एका छोटय़ाशा गावात कुठलीही अपेक्षा न ठेवता येतात, ही निश्चितच अशोक यांच्या साहित्यनिष्ठेची पुण्याई!
तर ही सर्व पाहुणेमंडळी आली. पत्र्याचे छप्पर असलेल्या अशोक यांच्या साध्याशा घरात सतरंजीवर बसून पत्रावळीवर जेवली. गावातल्या लोकांसमोर (जे बहुधा गंमत बघायला जमले होते) त्यांनी आपले विचार मांडले. अशोकच्या एकांडय़ा लढाईत त्याला साथ देण्याचे आवाहन केले. त्या दिवसाने एक चमत्कार घडला. तो म्हणजे गावकऱ्यांच्या अशोककडे बघण्याच्या नजरा बदलल्या. मात्र बाकी परिस्थितीत फारसा फरक नव्हता.
पुढच्या २००४ च्या संमेलनासाठी अशोकच्या मदतीला संतोष भोसले, रंगनाथ मासाळ, हिरामण लाढाणी, युवराज पवार असे काही शेतकरीमित्र आले. या वेळचे निमंत्रित होते तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, गीतकार जगदीश खेबूडकर आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते. निधीची व्यवस्था रंजनाताईंच्या श्रमातूनच! बेलवंडी गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरासमोरील पटांगणात भरणाऱ्या या साहित्य संमेलनाला इतरही अनेक प्रतिष्ठित पाहुणे येऊन गेले आहेत. अभिनेते निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, साहित्यिक आनंद यादव, डॉ. सदानंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, डॉ. सुधा कांकरिया असे बरेच! मायलेकांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे बेलवंडीच्या ग्रामस्थांमध्ये साहित्यप्रेम हळूहळू रुजते आहे. आता अनेक गावकरी संमेलनात कविता मंचावरून सादर करतात. १७ व्या संमेलनात गावातीलच नववीत शिकणाऱ्या वर्षां खामकर हिच्या स्वरचित शंभर कवितांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता काही प्रकाशकही संमेलनात आपला स्टॉल लावू लागलेत. पुस्तकांची विक्रीही होते.
हे साहित्य संमेलन एकदिवसीय असले, तरी त्यात पुस्तक प्रकाशनांशिवायही अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. सकाळी ९ वाजता ग्रंथिदडी निघते. यात गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयातील नववी आणि दहावीची मुले भाग घेतात. शाळेचे लेझीम आणि झांज पथक उत्साहात सादरीकरण करते. कार्यक्रमाची सुरुवात कवी संमेलनाने होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातात. निमंत्रितांच्या भाषणानंतर संमेलनाचे सूप वाजते. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी आधीचे तीन-चार महिने अशोक शर्मा साथीदारांसह अहोरात्र राबतात.
८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणतात, ‘‘अशोक शर्मा यांनी आईच्या आधारावर सर्व जातीधर्माच्या गावकऱ्यांना एकत्र आणून गावाचा सांस्कृतिक चेहरामोहरा पार बदलून टाकला आहे. हे संमेलन म्हणजे आसपासच्या पाचपन्नास गावांसाठी चर्चेचा विषय बनले आहे. एका ‘फाटक्या’ माणसाची सांस्कृतिक बांधिलकी ग्रामीण मातीच्या गंधात न्हाऊन निघताना मी स्वत: अनुभवली आहे.’’
ग्रामीण भागातल्या एका छोटय़ा गावात साहित्य संमेलनाची सुरुवात करणाऱ्या अशोक शर्मा यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले; पण मिळालेली सन्मानचिन्हे ठेवण्यासाठी त्यांच्या घरी साधे कपाटही नाही. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ असे त्यांचे घर! सर्व ट्रॉफी त्यांनी दोन गोण्यांमध्ये भरून ठेवल्यात.
पत्रांच्या फाइल्सचीही तीच कथा. त्यांचा पत्रलेखनाचा छंद तर स्तिमित करणारा आहे. पत्र पाठवण्यासाठी त्यांना कोणतेही निमित्त पुरते. उदा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून गिरीश कार्नाड यांना, नवा अल्बम आवडला म्हणून महेंद्र कपूरना, माई मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर आशा भोसले यांना सांत्वनपर, उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल पी. व्ही. नरसिंह राव यांना अभिनंदनपर, अशी असंख्य पत्रे त्यांनी लिहिलीत. मुख्य म्हणजे या सर्वाकडून आलेली उत्तरेही त्यांनी जपून ठेवलीत (अर्थात गोणीत!
दहा वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर बेलवंडीच्या ग्रामस्थांना संमेलनाचे आणि शर्मा मातापुत्राच्या तळमळीचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लोकसहभाग मिळू लागलाय. ‘बेलवंडी व्यापारी पतसंस्था’, ‘साई सेवा पतसंस्था’, ‘महात्मा फुले पतसंस्था’, ‘बेलवंडी ग्रामपंचायत’ अशा काही संस्था मदतीचा हात देऊ लागल्या आहेत. यंदा त्यात भर पडली ती बेलवंडी खरेदी विक्री संघ आणि भैरवनाथ सोसायटीची. पण ही मदत पुरेशी नाही. रंजनाताई आता थोडय़ा थकल्यात (वय वर्षे ७०). स्वकष्टाने गेली १८ वर्षे साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या अशोक शर्मा या अवलियाची पन्नाशी आली आहे, पण आर्थिक स्थिती तशीच आहे. मोबाइल फोन दोन वर्षांपूर्वी हातात आला, तोही कुणी भेट दिला म्हणून!
मायलेकांच्या अविरत कष्टांतून जवळजवळ गेली दोन दशके सुरू असलेल्या साहित्यसेवेच्या या अनोख्या वारीची दखल राज्य शासन, स्थानिक प्रशासन अन्यथा कोणी साहित्यप्रेमी दानशूराने घ्यायला काहीच हरकत नसावी..
यंदाचे संमेलन
बेलवंडीतील १९ वे ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच- म्हणजे २१ जुलैला ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. हे राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी, तर प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ व के.ज. पुरोहित (शांताराम) यांचे जन्मशताब्दी वर्ष. म्हणून हे संमेलन या प्रभृतींना अर्पण करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी अशोक शर्मा यांचे, त्यांनी बेलवंडीसारख्या लहान गावात गेली १९ वर्षे ग्रामीण मराठी साहित्याचा जागर सुरू ठेवला आणि बेलवंडी परिसरात साहित्याची गोडी निर्माण केली याबद्दल तोंडभरून कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथिदडीने संमेलनाला प्रारंभ झाला. कविसंमेलनात तर शालेय विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांच्या बुजुर्गापर्यंत अनेकांनी आपल्या कविता सादर केल्या. दुपारच्या सत्रातील परिसंवादाचा विषय होता- ‘बदलते सामाजिक व राजकीय अस्तित्व आणि ग्रामीण व दलित साहित्य’. यावर सेवानिवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील व प्रा. बाळासाहेब बळे यांनी विचार मांडले. तसंच आरोग्य, शिक्षण, समाजकार्य, उद्योग, समाजाभिमुख शासकीय नेतृत्व, यामध्ये स्पृहणीय कामगिरी बजावणाऱ्या ग्रामस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी आबालवृद्ध धरून दोनएकशे श्रोते उपस्थित होते. त्यातील ७०-७५ पाहुण्यांसाठी रंजनाताईंनी आचाऱ्यांच्या मदतीने घरीच पुरी-भाजी, वरणभात, जिलबी, लाडू असा सुग्रास बेत केला होता. अतिथींच्या पोटपूजेसाठी त्यांची महिनाभरापासून तयारी सुरू होती. पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींना यातच धन्यता वाटते म्हणा!
अशोक शर्मा – ९४२१५७९२७९ waglesampada@gmail.com