‘‘मी एक कथा लिहिलीये. डोळ्याखालून घालाल?’’ तिनं अवघडत, संकोचत मला विचारलं तेव्हा मला भरून आलं. माझ्यासारखीला तिच्यासारखीनं इतपत दखलपात्र मानणं म्हणजे काही चेष्टा नव्हती. किती झालं तरी ती आजची आताची, उभरती, हौशी लेखिका होती. माझी असली नसली ‘कर्तबगारी’ आता बऱ्यापैकी मागे पडलेली होती. माझ्यापाशी लेखनाचा अनुभव नक्कीच होता. आहे. पण त्या अनुभवामधून आताच्या कोणाला किती, काय मिळेल याचा अंदाज नाही. स्वत:हून कोणाला काही सांगायला जावं ही उमेद नाही. पण तिनं आपणहून तिचं हस्तलिखित माझ्या हाती दिलं तेव्हा जीव अंमळ सुखावला खरा. आपली लेखनकामाठी अगदीच काही वाया गेली नाही या सुखद विचारात मी तिचं लेखन हातात घेतलं. तिनं अधीरपणे विचारलं,
‘‘वाचून दाखवू? समोर बसून?’’
‘‘नको. मी वाचेन सवडीने’’
‘‘मग उद्या येऊ?’’
‘‘या आठवडय़ात मला फार काम आहे हो. पण पुढच्या आठवडय़ात नक्की करू आपण या कथेचं काहीतरी.’’
‘‘पुढच्या सोमवारी, सकाळी दहा वाजता आले तर ठीक होईल?’’ तिची घाई तिच्या शब्दाशब्दांत, देहबोलीत दिसतच होती. आयुष्याच्या एका टप्प्यावर, मीही तशीच घाईला आल्यासारखी करायचे हे मी विसरले नव्हते. तरीही थोडी सावधानता बाळगून चुचकारत म्हणाले,
‘‘लवकरात लवकर वाचते. वाचून झाली की फोन करते. हे ठीक आहे ना?’’
‘‘ठीक आहे.’’ ती नाइलाजाने म्हणाल्यासारखी म्हणाली. उठली. जायला निघाली. पुन्हा थांबून म्हणाली, ‘‘माझ्या मोबाइलवरच फोन कराल ना? दोन्ही नंबर घेतलेत ना? मी दोन मोबाइल वापरते म्हणून म्हटलं. काहीवेळा एखाद्याची रेंज असते.. नसते..’’
‘‘काळजी करू नका. मी वेळ वाया दवडणार नाही.’’ मी मनापासून शब्द दिला. नव्या लेखकाचा आपल्या लेखनामध्ये किती जीव गुंतलेला असतो हे मला माहीत आहे. सुरुवातीची ती नशा औरच! पुढे मन निबर होत जातं. तिचं तसं होण्याच्या आत जमेल तेवढं खतपाणी घालायला हवं. या दृष्टीने मी तिची कथा लवकरच वाचली. नवशिकेपणाच्या खूप खुणा होत्या तिच्यात. पण सुधारणं शक्य होतं. त्या दृष्टीने तिच्याशी बोलायचं ठरवलं.
मागच्या वेळेसारखीच यावेळेलाही ती आली तेव्हा खूपच गडबडीत होती. आल्याआल्या लगबगीने म्हणाली,
‘‘मग काय? विद्यार्थी पास की नापास?’’
‘‘नापास कशाने होतोय? फक्त आणखी चांगल्या मार्कानी पास होणं शक्य आहे का हे बघायचंय.’’
‘‘चटकन सांगा हं. मला जायचंय.’’
‘‘कुठे?’’
‘‘निवेदन करायला. एका काव्यसंग्रहाचं प्रकाशन आहे. त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे आहे. अधूनमधून अशी कामं घेते. मजा येते.’’
‘‘अरे वा! चांगलं आहे की मग. छान चटपटीतपणा येत असेल अंगी. तशीच तुमची कथाही चटपटीत आहे. फक्त तुमची नायिका शेवटी जो निर्णय बदलते ना तो विश्वासार्ह वाटायला हवा. या दृष्टीने त्याला साजेसे सूक्ष्म बदल तिच्या वागण्यात अगोदरपासूनच दाखवायला हवेत. पटतंय ना?’’
‘‘प्रश्नच नाही. पण रेडियोच्या श्रोत्यांना आवडलाय म्हणे हा शेवट’’
‘‘तुम्ही ही कथा आकाशवाणीवर सांगितलीत का?’’
‘‘ही म्हणजे शब्दश: ही नाही हो. पण याच मूळ कल्पनेचा विस्तार केला म्हणायला हरकत नाही. रेडियोचं कॉण्ट्रॅक्ट नेमकं आताच मिळालं. म्हणून वेळ मारून नेली. पण श्रोत्यांनी स्वीकारली म्हणे ती माझी गोष्ट. तिथली प्रोग्रॅम एक्झीक्युटिव्ह आमच्या गल्लीतलीच आहे.’’
‘‘चला ऽ त्या निमित्ताने रेडियोमाध्यमाची चाचपणी झाली तुमच्या हातून. शेवटी प्रत्येक माध्यमाची मागणी, गरज वेगवेगळी असते. ती समजून कामं करणाराच पुढे जातो. पण ही कथा तर तुम्ही अंकासाठी लिहिली असेल ना?’’
‘‘बघू.. जिथे जाईल तिथे.. एक-दोन कथास्पर्धा जाहीर झाल्या आहेत. त्यांच्या नियमात बसत असेल तर पाठवीन. फार वशिलेबाजी चालते हो अशा स्पर्धामध्ये.’’
‘‘हो का? हल्लीचा स्पर्धाचा माहौल मला तितकासा माहीत नाही. मी स्पर्धक असायचे त्याला तीन-चार जन्म लोटल्येत.’’
‘‘तुमच्यावेळी मज्जा असणार हो. माध्यमं कमी, स्पर्धाही कमी. मी परवा नुसतं फेसबुकवर माझ्या या कथेविषयी एक वाक्य टाकलं तर काहीतरी चौपन्न-छप्पन्न ‘लाईक्स’ आल्येत मला. त्यावरून मला वाटतंय, ही कथा हिट् होणार.’’
‘‘तिच्यात काहीतरी लक्षणीय आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. आता फक्त ती जास्त नेमकी, परिणामकारक करायला हवी. तुम्ही सध्या कोणाच्या कथा वाचताय? यांच्या? त्यांच्या?’’ मी एक-दोन लेखकांची नावं उच्चारली. ती त्या नावांमुळे उत्तेजित वगैरे काही झालेली दिसली नाही. पुन्हापुन्हा याच अर्थाचा प्रश्न विचारल्यावर म्हणाली,
‘‘फार अवांतर वाचायला वेळ कुठे असतो आम्हाला? जॉब आहे, घरसंसार आहे, दोन-तीन सोशल ग्रुप्स आहेत. एवढय़ा सगळ्यांना तोंड देतादेता पुरती दमछाक होते.. ही एवढी छोटीशी कथा लिहिण्यासाठी किती आटापिटा करावा लागला, माझं मला माहिती.’’
‘‘खरंय. लेखन ही कृती सोपी नाहीच्चे नाहीतरी. छोटं लिहिणं, सोपं लिहिणं तर महाकर्मकठीण! एका मोठय़ा इंग्रजी लेखकाचं वाक्य ऐकलंयत का? तो म्हणे म्हणाला होता, ‘छोटं टिपण लिहायला मला सध्या अजिबात वेळ नाहीये, म्हणून ऐसपैस पाच-सहा ताव लिहून देतो हवे तर!’’
तिनं हे ऐकलेलं नसावं. तिला माझंही फारवेळ ऐकायचं नसावं. अगांगी मुरलेल्या लगबगीने म्हणाली,
‘‘मला चटकन् दोन-तीन टिप्स देता ना?’’
‘‘शेवटचा भाग पूर्णपणे नव्याने लिहावा लागेल असं वाटतं.’’
‘‘आता एवढी मेहनत नका बाई करायला लावू. एक-दोन वाक्यं परिच्छेद इकडे तिकडे, इथपर्यंत ठीक आहे.’’
‘‘तुम्हाला ठीक असेल, तुमच्या कथेला नाही.’’
‘‘हे कोणी ठरवायचं?’’
‘‘तूर्त तरी मीच. तुम्हीच मला कथा दाखवलीत, म्हणून. शेवटी हे काही गणित नव्हे की बुवा हेच उत्तर बरोबर आणि हे चूक! ह्य़ाचं म्हणणं खरं आणि त्याचं खोटं. असं लिहिलं तर पास, तसं लिहिलं तर नापास. फारतर वाचकाच्या हृदयाच्या ‘पास’ म्हणजे जवळ किती जाता येतं ते बघायचं.’’
‘‘लोकल ट्रेनमध्ये ऑफिसला जाताना मी साधी सिनेमाची स्टोरी सांगायला गेले तरी समोरासमोरच्या दोन्ही बाकांवरच्या बायका कान देऊन ऐकायच्या मागे लागतात.’’
‘‘लागू देत की. रंगवून सांगण्याचं कसब वेगळं. कोऱ्या कागदावर उतरवणं वेगळं. कोरा कागद ही फार अक्राळविक्राळ चीज असते बरं. भल्याभल्यांच्या मुसक्या आवळू शकतो तो. म्हणून तर xxx मला म्हणाले होते..’’ मी एका विख्यात संपादकांचं नाव घेतलं. ते तिच्या गावीही नव्हतं. भाबडेपणाने म्हणाली,
‘‘तुम्ही त्यांचा सल्ला घ्यायचात?’’
‘‘घ्यायचे आणि मानायचेसुद्धा. उमेदीच्या काळामध्ये चार-पाच संपादकांना, जाणकारांना मी मनापासून मानायचे. त्यांच्या पसंतीला उतरेपर्यंत लेखनावर हात फिरवत राहायचे. वेळ जायचा, कष्ट पडायचे पण शेवटी आश्वस्त वाटायचं. लेखनाचं समाधान मिळायचं. इंग्रजीत ‘साऊंडिंग बोर्ड्स्’ म्हणतात तसं काहीसं..’’ मी जुने दिवस आठवत म्हणाले. माझ्या स्मरणरंजनाला टाचणी लावत ती म्हणाली, ‘‘बरे बाई एकेक संपादक तुमच्या लेखनावर एवढाल्ला वेळ घालवायचे! आता एवढय़ातल्या एवढय़ात त्या अमुकतमुक वृत्तपत्राच्या कचेरीत मी तीन वेळा गेले तर तीनही वेळा रविवार पुरवणीच्या वेगवेगळ्या संपादकांना भेटले. प्रत्येक नव्या येणाऱ्याशी पहिल्यापासून बोलायला सुरुवात करावी लागली. एका मालकाचं एक मासिक आहे आणि वर्षांनुवर्ष तो त्याच्या संपादकाच्या खुर्चीत इमानाने बसून आहे, असं किती कमी दिसतं हो आताशा.. आपल्या मराठीत तरी..’’
‘‘संपादक नसले तर कोणी ज्येष्ठ प्राध्यापक, कोणी खंदे वाचणारे असे तर भेटू शकतील ना. वाचून बघायला.. मत द्यायला.. शेवटी काय आहे, आपण लिहितो ते आपल्याला चांगलं वाटणारच. दुसऱ्या एखाद्या जाणत्याच्या चष्म्यातून ते कसं दिसतं हे बघून घ्यायला हरकत नसावी. निदान सुरुवातीच्या काळात तरी. पुढे मग प्रत्येकामध्येच थोडाफार बनचुकेपणा यायला लागतो.’’
‘‘फार पुढचंबिढचं कोण बघत बसलंय इथे? ही कथा एकदा लिहिली आहे, ती कुठेतरी छापून आली की झालं. सहज तुम्ही भेटलात, माझ्या लेखनात तुम्हाला रस आहे असं वाटलं, म्हणून दाखवली एवढंच.’’
‘‘माझं सोडा हो. तुम्ही माझं ऐकाच असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण निदान त्या अंगाने विचार करा. शेवटी आपलं लेखन हे फक्त छापील कागदावर उतरायला हवंय की वाचकांच्या मनामनात उतरायला हवंय तुम्हाला? तात्पुरतं टिकणं आणि दीर्घकाळ टिकणं याच्यात फरक आहे हे तरी तुम्ही मान्य कराल.’’
‘‘हूं.’’ ती नाइलाजाने म्हणाली. थोडावेळ शांत राहिली मग एकदम उसळून म्हणाली, ‘‘सध्याच्या या झंझावती वेगात आणि महापुरात कुठे काही टिकेल असं खरंच वाटतं तुम्हाला? आता म्हणू नये, पण तुमच्या पिढीतलं तरी किती लेखन टिकलं हो? बऱ्यापैकी ‘स्लो पेस’ तेव्हा असूनसुद्धा? ते अमके तमके लेखक माझे मामा बरं का. ऐंशीच्या दशकातले वजनदार मराठी लेखक होते ते! आज कुठे नामोनिशाणी नाही. खूप घासूनघासून लिहायचे असं ऐकलंय. काय फायदा?’’
बोलण्याच्या भरात पठ्ठीनं एकदम मर्मावरच घाला घातलाय असं मला झालं. ती भस्सकन माझ्या पायाखालची सतरंजी ओढत होती? की मी उगाच आपल्या जुजबी सतरंजीला हवेत उडणारा गालिचा समजून तरंगायला बघत होते?.. कोण जाणे. त्या गोंधळातच ती माझ्याकडची कथा घेऊन गेली. ‘‘काय करता येतं ते बघते,’’ म्हणाली. आठ-दहा दिवसांमध्येच तिचा फोन आला. अर्थातच घाईत! तिची कथा छापून आली होती. तिला हव्या त्या प्रतिष्ठित प्रकाशनात नाही, तर दुसऱ्याच कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी. मी तिचं अभिनंदन करत थोडं सावधपणे विचारलं,
‘‘मग? शेवटी काही बदललंत की नाही?’’
‘‘बदललं ना! संपादक बदलले! ते अमुक साप्ताहिकवाले उगाचच जरा जास्त आव आणत होते. त्यांचा नाद सोडला. ह्य़ा तमुकांकडे नुसतं जायचा अवकाश! त्यांनी लग्गेच छापून टाकलं. आता पुढे नवीन काय लिहिणार हे सुद्धा विचारलं. आता बोला.’’ तिनं बोलण्याची खुली ऑफर दिली. मी ती घेऊ शकले नाही. आधी एवढं बोलल्यावर नवं काय बोलायचं आणि कशासाठी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा