तब्बल ४८ वर्षांपूर्वी पुण्यातील चार लेखिका साहित्यविषयक चर्चेच्या ओढीतून एकमेकींच्या घरी महिन्यातून एकदा येऊ लागल्या. ज्यांच्या कविता, लेखनाकडे साहित्यविश्व गांभीर्याने बघत होतं अशा संजीवनी मराठे, पद्मा गोळे, शांताबाई किलरेस्कर, सरिता पत्की, सुधा साठे आदी लेखिका आपले लेख, त्यातील विषय व गुणदोष अशी चर्चा करण्यासाठी भेटू लागल्या. त्या स्त्रियांभोवती कुतूहल वाढू लागले आणि पुण्यातील अन्य लेखिकांची पावले या चर्चेकडे वळू लागली. आजही ही साहित्य दिंडी अविरतपणे सुरूच आहे. आजही अनेक लेखिका एकत्र येतात. चर्चा करतात. या एकत्र येण्यातूनच विविध साहित्यविषयक उपक्रम हाती घेतले गेले. प्रयोग राबविले गेले. त्याविषयी..
जगण्यासाठी माणसाला काय लागते? फक्त शरीर जगविणारी भाकरी पुरते की त्याबरोबर मनाला उभारी देणारे एखादे टवटवीत फूलही गरजेचे असते? बुद्धीला आव्हान देणारे असे काही आयुष्यात नसेल तर जगणंही निर्थक होऊ शकते. जगणं सुंदर व्हावं, ते अर्थपूर्ण करणारी नित्यनवी बुद्धिगम्य आव्हाने समोर असावी आणि त्याला भिडत असताना समविचारी मैत्रिणींचा एक मोठा परिवार भोवती जमत जावा. एखाद्या कथा- कादंबरीत शोभावे असे हे चित्र प्रत्यक्षात दिसले ते पुण्यात. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या मैत्रिणींशी गप्पा मारताना. आपल्या सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे उपक्रम आणि त्यांनी केलेले संशोधन बघितले की आश्चर्याने अवाक् व्हायला होते. साहित्यचर्चा, जीवनविषयक विचारांची देवाणघेवाण आणि काही मूलगामी संशोधन करणाऱ्या या स्त्रिया भेटल्या तेव्हा एक गोष्ट जाणवली. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन काही करावे या ओढीनेही एकत्र येणाऱ्या स्त्रिया भोवती आहेत. त्या संख्येने थोडय़ा आहेत, असतील, पण त्यांच्या कामाचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा आणि दमदार आहे.
तब्बल ४८ वर्षांपूर्वी १९६५ साली पुण्यातील चार लेखिका साहित्यविषयक चर्चेच्या ओढीत एकमेकींच्या घरी महिन्यातून एकदा भेटू लागल्या. असा काही उपक्रम तेव्हा पुण्यालासुद्धा अगदी नवीन होता. शिवाय या चार लेखिकाही हौशेपोटी पाळणा आणि डोहाळ जेवणाची गाणी रचणाऱ्या गटातील नव्हत्या. ज्यांच्या कविता, लेखनाकडे साहित्यविश्व गांभीर्याने बघत होतं. अशा संजीवनी मराठे, पद्मा गोळे, शांताबाई किलरेस्कर, सरिता पत्की, सुधा साठे अशा या लेखिका आपले लेख, त्यातील विषय व गुणदोष अशी चर्चा करण्यासाठी भेटणाऱ्या. त्या स्त्रियांभोवती कुतूहल वाढू लागले आणि पुण्यातील अन्य लेखिकांची पावले या चर्चेकडे वळू लागली आणि या गटाला एक छान वळण लागले. शैलजा राजे, शकुंतला फडणीस, दीपा गोवारीकर, मुक्ता दीक्षित अशा पुण्यातील लेखिका तर येऊ लागल्याच, पण दुर्गाबाईंसारख्या विदुषीही चर्चेसाठी मुंबईहून पुण्यात आल्या. आता या बैठका महाराष्ट्र साहित्य परिषदेने वापरण्यासाठी मोफत देऊ केलेल्या सभागृहात होऊ लागल्या आणि पहिल्या पाच वर्षांतच एक नवा उपक्रम या साहित्यप्रेमी भगिनींनी हाती घेतला. या मंडळात दाखल झालेल्या ‘माहेर’च्या त्या वेळच्या संचालिका सुमनताई बेहेरे यांनी या मैत्रिणींनी लिहिलेले साहित्य ‘माहेर’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केले. केवळ चर्चेपलीकडे उचलले गेलेले हे पाऊल या सर्व मैत्रिणींची उमेद वाढविणारे होते. सुमनताईंनी सुरू केलेली ही परंपरा पुढे जवळजवळ तिसेक वर्ष अखंड सुरू होती. ‘माहेर’खेरीज ‘वहिनी’, ‘मधुकंस’ अशा अन्य मासिकांनी या मैत्रिणींचे साहित्य आवर्जून छापले.
या प्रोत्साहनामुळे कल्पना आली ती स्वत:चा दिवाळी अंक काढायची आणि ‘साहित्यप्रेमी’ हा दिवाळी अंक दिमाखात बाजारात येऊ लागला. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातील लेखिकांचा सहभाग तर त्या अंकात असतोच, पण त्याखेरीज मान्यवर लेखकांची उपस्थिती असल्याने त्या अंकाला आजवर मसापचा, रोटरीचा पुरस्कार मिळून त्याचा गौरव झाला आहे. साहित्यप्रेमींच्या या परिवारात ज्योत्स्ना देवधर सामील झाल्यानंतर आणखी एक वेगळा प्रयोग या लेखक मैत्रिणींनी केला. तो होता चक्री कादंबरीचा. कादंबरीचे एकेक प्रकरण वेगवेगळ्या लेखिकेने लिहीत ही कादंबरी पुढे सरकते. प्रत्येक लेखिकेचे भावविश्व, विचारांची बैठक, भाषांचे कौशल्य हे वेगळे, पण अशा बहुरंगी पण एका सूत्राला धरून लिहिलेली ‘वाळवंटातील वाट’ किंवा ‘मिठूमियाँ’ ही बाळांसाठी लिहिलेली कादंबरी हा साहित्याच्या प्रांतातील एक वेगळा आणि दुर्मिळ प्रयोग होता.
या भगिनी मंडळात येणारी प्रत्येक स्त्री येताना आपल्याबरोबर आपल्या नव्या कल्पना आणि सर्जनशील मन घेऊन येते. त्यामुळे अनेक नव्या कल्पना या अवकाशामध्ये स्फूरण पावतात आणि प्रत्यक्षात येतात. नवोदित लेखकांसाठी हस्तलिखित स्पर्धा, महाविद्यालयीन युवक- युवतींसाठी स्वरचित काव्य गायन/वाचन स्पर्धा, वैशिष्टय़पूर्ण सामाजिक लेखन करणाऱ्यांशी गप्पा-चर्चा, आपल्या लेखनाद्वारे वैचारिक योगदान देणाऱ्या लेखिकांचा गौरव, दुर्बल गटातील मुला-मुलींच्या शाळेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेणे अशा विविध उपक्रमांनी आज साहित्यप्रेमींचे हे मंडळ गजबजले आहे. गेल्या ४८ वर्षांत टप्प्याटप्प्याने उपक्रमांची भर पडत गेली आहे. आज प्रामुख्याने तीन प्रकारे त्याची विभागणी करता येईल. एक विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये दर महिन्याला होणारी भाषणे, चर्चासत्रे, गप्पा, मुलाखतींचा समावेश आहे. दुसरा, पुरस्कार विभाग. या विभागाला पुण्यातून आणि महाराष्ट्रातून विविध देणग्या मिळाल्या असून, त्यातून हे पुरस्कार दिले जातात. महाविद्यालयीन युवक- युवतींसाठी संजीवनी काव्य पुरस्कार, साहित्यप्रेमी सभासदांसाठी कालिदास काव्य पुरस्कार, स्त्रीवादी लेखनासाठी सुधाताई जोशी पुरस्कार, जीवनविषयक योगदान देणाऱ्या लेखिकेला मालतीबाई दांडेकर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांद्वारे साहित्यप्रेमी भगिनी साहित्याच्या क्षेत्रातील उत्तमाला दाद देतात, प्रोत्साहन देतात.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा तिसरा आणि अत्यंत उल्लेखनीय, अभिमानास्पद विभाग म्हणजे त्यांचा संशोधन विभाग आणि त्यातही दाद द्यायला हवी ती संशोधन करण्याच्या आत्यंतिक प्रबळ अशा स्वयंप्रेरणेला आणि इच्छाशक्तीला. डॉ. मंदा खांडगे यांचे अतिशय आग्रही आणि अभ्यासू नेतृत्व त्यामागे आले. त्यामुळे एखाद्या विद्यापीठात व्हावे तसे संशोधनाचे दोन महत्त्वाचे आणि मूलगामी प्रकल्प या मंडळाने सिद्ध केले असून, एवढय़ाच तोलामोलाचे दोन प्रकल्प सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
१३ सप्टेंबर १९७७ रोजी या संशोधन विभागाची स्थापना झाली. तत्पूर्वी अशा प्रकारचे काही काम हातात घेण्याची इच्छा मंदाताई खांडगे यांनी           डॉ. सरोजिनी वैद्य यांच्यापाशी व्यक्त केली होती. मराठी वाङ्मयाचा जो काही इतिहास आजवर लिहिला गेला आहे त्यामध्ये स्त्री साहित्यिकांच्या कामगिरीची दखल घेणारा मजकूर हा अगदी जुजबी, म्हणजे पूर्ण पुस्तकात पाच-सहा पाने एवढाच. या विषयाची अधिक तपशीलवार चिकित्सा व्हायला हवी, त्याचे योग्य मूल्यमापन तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून व्हायला हवे, असे मंदाताई खांडगे यांचे म्हणणे होते. सरोजिनीताईंना ही कल्पना फार आवडली आणि या संशोधनाचे खंड राज्य मराठी विकास परिषदेतर्फे प्रसिद्ध केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. १८५० ते २००० असा दीडशे वर्षांचा व्यापक पट समोर ठेवून स्त्री साहित्याचा मागोवा घेणाऱ्या या प्रकल्पाच्या संपादक म्हणून डॉ. मंदा खांडगे, डॉ. लीला दीक्षित, डॉ. अरुणा ढेरे आणि किमया खडवेकर यांनी काम केले. स्त्री लेखिकांनी लिहिलेल्या पंधरा साहित्य प्रकारांचा मागोवा घेणारे तीन खंड प्रसिद्ध झाले ते मात्र भारती अभिमत विश्वविद्यालयातर्फे आणि केवळ खंड प्रसिद्धीपुरतेच हे सहकार्य मर्यादित नव्हते तर प्रकाशन समारंभाचा खर्चही ‘भारती’ने उचलला आणि स्त्रियांनी अतिशय जिद्दीने पार पाडलेला हा प्रकल्प समाजासमोर आला.
संशोधनाचा हा पहिला अनुभव साहित्यप्रेमी मैत्रिणींसाठी खूपच प्रेरणादायी आणि वेगळा उत्साह, उमेद देणारा असावा. कारण त्यापाठोपाठ या मैत्रिणींनी अधिक मोठे आव्हान स्वीकारले. ते होते देशपातळीवर विविध भाषांमध्ये लिहिणाऱ्या स्त्रियांच्या साहित्याचा मागोवा घेण्याचे. या निमित्ताने मराठी भाषेचे कुंपण ओलांडून इतर भाषांच्या, त्यात अभिव्यक्ती करणाऱ्या स्त्रियांच्या अंतरंगात डोकावून बघायला मिळणार होते. स्वतला व्यक्त करण्यासाठी भाषेचे बोट धरणाऱ्या सगळ्या स्त्रिया, त्यांच्यात काही समान भावबंध, दुवा आहे का हे तपासून बघण्याच्या या प्रयत्नात विविध भाषांतील तज्ज्ञ लेखक म्हणून सामील झाले. या द्विखंडात्मक  प्रकल्पाचे संपादक म्हणून दिल्ली विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. विद्या देवधर, डॉ. नीलिमा गुंडी आणि डॉ. मंदा खांडगे यांनी काम केले. अर्थात या प्रकल्पाची गरज होती ती मराठीसह इंग्लिशमध्येही येण्याची. कारण गुजराती, मल्याळी, पंजाबी, सिंधी अशा २० भाषांतील साहित्याविषयी बोलताना केवळ मराठीपुरते राहून चालणार नव्हते. त्यामुळे मराठीबरोबरच इंग्लिश भाषेतही हे खंड प्रसिद्ध झाले आहेत. साहित्याच्या प्रांतात देशपातळीवर इतके पायाभूत काम यापूर्वी झालेच नव्हते. त्यामुळेच या खंडांसाठी मदत करणाऱ्या भारती विद्यापीठाने प्रकाशन समारंभही तेवढाच जोरदार केला. महाश्वेतादेवीसारखी वडीलधारी जाणती लेखक मैत्रीण प्रकृतीची कुरकुर दूर ठेवून कौतुक करण्यासाठी प्रथमच पुण्यात आली. भाषा अभ्यासक गणेश देवी आले.
अतिशय जोमाने आणि संशोधनाची शिस्त पाळत, नेटाने काम करणाऱ्या साहित्यप्रेमी मैत्रिणींच्या संशोधन विभागाने आता देशपातळीवर आणखी एक प्रकल्प हाती घेतला आहे. तो आहे भारतीय भाषांमधील समाजसुधारक आणि विचारवंतांनी मांडलेला स्त्रीविचार जाणून घेण्याचा. स्त्रियांच्या लेखनकर्तृत्वाचा धांडोळा घेतल्यावर आता या कर्तृत्वाकडे बघण्याचा, समाजातील विचारवंतांचा दृष्टिकोन तपासण्याचे हे प्रयत्न आहेत. २०१४ साली हे मंडळ आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. आणि त्यानिमित्ताने हे काम समाजाला अर्पण करण्याचा मंडळाचा इरादा आहे.
तब्बल साडेचार दशकाचा मोठा प्रवास. अनेक वाटांनी बहरलेले विविध उपक्रम आणि या निमित्ताने जोडल्या गेलेल्या, कामात सहभागी होणाऱ्या असंख्य स्त्रिया, लेखिका, कार्यकर्त्यां. या  प्रवासामध्ये एक काळ असा आला होता जेव्हा संस्थेला कमालीची मरगळ आली. संस्था बंद पडण्याची भीती निर्माण झाली, पण त्या वेळी मंदाताई, मंजरी ताम्हणकर यांनी पुन्हा सगळ्या जुन्या- जाणत्यांच्या भेटी घेऊन त्यांना संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये येण्याची विनंती केली. सतत पाठपुरावा करीत पुन्हा संस्थेच्या कामात प्राण फुंकला. त्यानंतर मात्र मरगळीचे असे क्षण पुन्हा आले नाहीत. ते येऊ नयेत यासाठी सतत सावध असणाऱ्या मैत्रिणींचा प्रवाह संस्थेमध्ये येत राहिला. शांताबाई- पद्माताईंनी सुरू केलेल्या या संस्थेचे नेतृत्व आज ज्योत्स्ना आफळेंच्या कल्पक हातामध्ये आहे आणि त्यांना साथ आहे ती मीरा शिंदे, शलाका माटे, यामिनी रानडे, उज्ज्वला गोखले, कविता भालेराव, कुमुद राळे, कविता मेहेंदळे, चंचल काळे अशा कितीतरी मैत्रिणींची. पण ही नावे आहेत प्रातिनिधिक. ४८ वर्षांच्या या वाटचालीत पुण्यातील प्रत्येक लिहिती स्त्री कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने या दिंडीत सामील झाली आहे आणि ही संस्था ‘भगिनींची’ कागदोपत्री असली तरी प्रभाकर पाध्येंपासून, शंतनुराव किलरेस्करांपर्यंत कित्येक पुरुषांनी या संस्थेला वेळोवेळी काही सुचवले आहे, मदतीचा हात दिला आहे.
वैचारिक समृद्धीसाठी एकत्र येणाऱ्या, हातात हात गुंफत तो वारसा पुढे नेणाऱ्या या स्त्रिया सुशिक्षित समाजाची गरज आहेच. समाजाच्या बौद्धिक विकासासाठी, नवनवे साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी एकत्र येणाऱ्या त्या शक्तीला मनोमन सलाम.

Story img Loader