जेव्हा एखादा माणूस स्वत:चं सुख मिळविताना इतरांचं सुख हिरावलं जाणार नाही याची काळजी तो घेतो, तेव्हा, ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वानुसार जगण्याचा योग्य मार्ग त्याला सापडलेला असतो. वामनराव प म्हणतात की, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या जीवनात अंतर्मनाच्या या कायद्याचं पालन करेल तर समाधानी राहील. आपल्याला इतरांच्या सुखाने सुखी होता आलं नाही तरी निदान त्यांच्या सुखाने दु:खी होऊ नये.

सद्गुरू वामनराव प यांनी सुखी जीवनमार्गाची दिशा ठरविण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ हे महत्त्वाचं तत्त्व सांगितलं आहे. आपल्याला इतरांकडून जे अपेक्षित असतं तेच इतरांना आपल्याकडून अपेक्षित असतं. सहभावनेने, संवेदनशीलपणे इतरांच्या स्वातंत्र्याचा, मतांचा, अधिकारांचा आदर करावा त्याच वेळी आपलं स्वातंत्र्य, मतं, अधिकारही आपण जपायला हवेत. आपण नेटकेपणाने, शांततेने, सन्मार्गाने जगावं. इतरांनाही सुखाने जगू द्यावं. हे समजावताना त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातील दोन ओळींचा दाखला दिला आहे.
 ‘न घडो कोणाही भूतांचा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे.’ कुणाबद्दल मत्सर वाटला तरी त्याचं कारण ईर्षां किंवा द्वेषबुद्धी असू शकते. ज्याच्याबद्दल मत्सर वाटला त्या व्यक्तीच्या प्रगतीचा, यशाचा राग येतो. त्याला अमुक मिळालं पण त्याच्यापेक्षा मी अधिक लायक होतो, असंही वाटू शकतं. मग त्याचं यश तुच्छ लेखणं, त्याच्याबद्दल खोटय़ा बातम्या पसरवणं, त्याला खाली खेचण्यासाठी कारस्थानं करणं अशी र्कम हातून घडू लागतात. पण त्या वेळी आतील विवेकबुद्धी टोचणी लावत असल्याने मन अस्वस्थ राहतं. अस्वस्थ मनात रागाची भावना चट्कन निर्माण होते. हे सगळं काही मत्सरग्रस्त माणसाला आनंददायी ठरत नाही. म्हणून इतरांबद्दल मन निर्मळ ठेवणं, त्यांच्या यशाचं कौतुक वाटणं, त्यांच्याशी स्पर्धा न करता, आपल्या उद्दिष्टांसाठी कष्ट करीत राहणं, एकंदरीत सहभावयुक्त जीवन जगणं म्हणजे ईश्वरपूजा आहे. असं जगणं आपल्याला आणि आपल्या आसपासच्या माणसांना आनंददायक ठरतं.
वामनराव प असं विचारतात की, आपण असे वागतो का? प्रत्यक्षात बहुतेक वेळा नेमका उलटा अनुभव येतो. माणसं स्वत: सुखाने जगत नाहीत आणि इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत. ‘आपलं नाक कापीन पण इतरांना अपशकुन करीन.’ या म्हणीनुसार बहुसंख्य माणसं पुष्कळदा वागत असतात. या संदर्भात एका बोधकथेचं चपखल उदाहरण वामनराव प यांनी दिलं आहे.
एकदा दोन माणसं देवाला प्रसन्न करण्यासाठी एकाच वेळी तपश्चय्रेला बसली. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल तीव्र स्पर्धा होती. त्यामुळे राग, द्वेष, दुसऱ्याला अपयश मिळावं अशी दुष्ट भावना होती. अनेक वर्षांच्या खडतर तपश्चय्रेनंतर त्यांच्यापकी एकाला देव आधी प्रसन्न झाला. त्याने वर मागायला सांगितलं, पण एक अट घातली. जे तो स्वत:साठी मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल. बराच वेळ विचार करून त्याने म्हटलं, ‘‘देवा, माझा एक डोळा फुटू दे.’’ त्याचा एक डोळा फुटला. दुसऱ्याला अंधत्व आलं. अनेक वर्षांची तपश्चर्या मातीमोल झाली. दोघांचंही नुकसान झालं.
ही गोष्ट मार्मिक आणि वस्तुस्थितीची निदर्शक आहे. अशी दुष्टबुद्धी माणसं अनेक असतात. मला न्याय मिळावा, या उद्दिष्टाऐवजी माझं नुकसान झालं तरी चालेल, पण माझ्या शत्रूचं पूर्ण वाटोळं करीन या हेतूने अनेक माणसं न्यायालयात जात असतात. या वृत्तीमुळे पिढय़ान्पिढय़ा वैर चालून अनेक चांगली घराणी रसातळाला गेली आहेत. दुसरी काही माणसं अशी आहेत की त्यांच्या डोक्यात एक किडा सतत वळवळत असतो. या माणसांना इतर लोक सुखात आहेत, आनंदात आहेत, हे पाहवतच नाही. काही तरी घडावं, त्या सुखी माणसांचं वाईट व्हावं, नुकसान व्हावं, फटका बसावा अशीच इच्छा त्यांच्या मनात सतत वास करीत असते. पण या विकृत विचारसरणीने ते स्वत:च्या हातांनी दु:ख, संकटं, आपत्ती, विपत्ती यांना आमंत्रित करीत असतात. ‘चिंती परा ते येई घरा.’ ही मराठीतील म्हण या माणसांच्या स्थिती-गतीचे नेमकं वर्णन करते. आपल्या मनात जे काही विचार चाललेले असतात ते आपल्या भोवतालचं जग, आपली परिस्थिती कशी असेल ते ठरवत असतात. दुसऱ्याचं नुकसान व्हावं असं चिंतन करणारी माणसं कळत-नकळत त्याच प्रकारची सूचना अंतर्मनाला देत असतात. प्रत्यक्षात तशी परस्थिती त्यांच्याभोवती निर्माण करण्याचं कार्य अंतर्मनाकडून घडतं, पण ते त्यांच्या संदर्भात घडतं. इतरांबद्दल केलेलं वाईट चिंतन त्यांच्या बाबतीत प्रत्यक्षात उतरतं.
कित्येक माणसांचं मन द्वेषभावना, वैफल्य, दुभंग मन:स्थिती अशा नकारात्मक विचार-विकारांनी व्यापलेलं असतं. अनादी अनंत अशा विश्वचतन्याच्या सकारात्मक स्पंदनांशी हे लोक कधीच जोडले जात नाहीत. ते शांत, सुस्वभावी माणसांचा राग राग करतात. आनंदी, स्नेहशील, सहकार्य तत्पर माणसांना तुच्छ लेखतात. या ना त्या कारणांनी त्यांचा अपमान करतात. याच नकारात्मक भावना त्यांच्या अंतर्मनाचा कबजा घेतात. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या जगण्यात अनेक अडचणी निर्माण होऊन सारं जगणं विकृत होऊन जातं.
आपल्या जीवनाला व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ, समूर्त व अमूर्त अशा दोन बाजू असतात. जे विचार, विश्वास, तत्त्वं वगरे अमूर्त, व्यक्तिनिष्ठ गोष्टी एखाद्याच्या अंतर्मनावर ठसतात, मुद्रित होतात, कोरली जातात ती सगळी स्वत:च्या जगण्यात प्रत्यक्षात उतरतात. समूर्त होतात. घटना-प्रसंगादिकांनी वस्तुनिष्ठ होतात. म्हणून वामनराव प असे सांगतात की, अंतर्मनाचे हे वैशिष्टय़ लक्षात घेऊन माणसाने स्वत: जगावं आणि इतरांनाही जगू द्यावं.
आपलं सुख साध्य करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. ही इच्छा पूर्ण करताना काही माणसांना इतरांच्या सुखदु:खाशी देणंघेणं नसतं. पण ती इतरांना दु:खी करून सुख मिळवीत नाहीत. त्यांचा स्वार्थ जरी प्रबळ असला तरी त्यांनी माणुसकी सोडलेली नसते. काही माणसं स्वसुखासाठी इतरांना दु:खी करतात. ही माणसं खालच्या पातळीवर उतरतात. काही माणसांना इतरांच्या दु:खामुळे आनंद होतो. अशी माणसं कित्येकदा आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्यांना वेदना देतात, इजा करतात, छळ करतात. ही अत्यंत अधम पातळीवर उतरलेली माणसं असून खरा आनंद कधीही मिळवू शकत नाहीत. प्रसंगी स्वसुखाचा त्याग करून परहित साधणारी माणसं खरा आनंद मिळवून जीवन संपन्न करतात. सर्वसामान्य माणूस क्वचित प्रसंगी असा वागतोही. पण दैनंदिन जगण्यात जेव्हा स्वत:चं सुख मिळविताना इतरांचं सुख हिरावलं जाणार नाही याची काळजी तो घेतो, तेव्हा, ‘जग आणि जगू द्या’ या तत्त्वानुसार जगण्याचा योग्य मार्ग त्याला सापडलेला असतो.  
वामनराव प म्हणतात की, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या जीवनात अंतर्मनाच्या या कायद्याचं पालन करील तर समाधानी राहील. आपल्याला इतरांच्या सुखाने सुखी होता आलं नाही तरी निदान त्यांच्या सुखाने दु:खी होऊ नये. भुकेल्यांना जेवू घालणं अतिशय उत्तम काम आहे. त्यामुळे मिळणारं समाधान अजोड आहे. पण हे करता येत नसेल तर त्यांच्या तोंडचा घास तरी काढून घेऊ नये. इतरांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा करता आली नाही तरी निदान त्यांची िनदा करू नये.
थोडक्यात सांगायचं तर इतरांनी आपला सन्मान राखावा, आपल्या स्वातंत्र्यावर घाला घालू नये आपल्या गुणांची कदर करावी, आपल्या कामात अडथळे आणू नये, आपल्या कामाची बूज राखावी अशा अनेक गोष्टी आपल्याला हव्या असतील तर आपण त्या इतरांनाही दिल्या पाहिजेत. यामुळे आपण आणि भोवतालचा समाज यात सुसंवादित्व निर्माण होईल.

Story img Loader