कर्करोग झाला की, आयुष्य संपले, अशी भावना तयार होते आणि या निराश मन:स्थितीत स्वत:साठी जगणं, स्वत:वर प्रेम करणं, गरज लागल्यास स्वत:वर खर्च करणं आणि कधीतरी लागल्यास कुटुंबीयांकडून सेवा करून घेणं या गोष्टीबद्दल यातल्या प्रत्येक स्त्रीला अपराधी वाटतं. ही अपराधी भावना कमी करणारी एक परिषद नुकतीच पुण्यात पार पडली, त्याचा हा लेखाजोखा. कर्करोगावर यशस्वीपणे मात केलेल्या वंदना अत्रे यांचा.
‘ही याकुता. हिच्या आईला कर्करोग झाल्यावर उपचारादरम्यान, तिचे केस गेले. आईच्या या वेदनेत सहभागी होण्यासाठी हिनेही आपले केस पूर्णपणे उतरवले.’ पुण्याच्या ‘फोर पॉइंट’ हॉटेलच्या लॉबीमध्ये उभी असताना कोणीतरी सांगत होते. एरवी पॉश, उच्चभ्रू वर्गाच्या हलक्या कुजबुजीची आणि तशाच मंद संगीताची सवय असणारी ती लॉबी त्या दिवशी गजबजून गेली होती. गावोगावाहून आलेल्या स्त्रियांच्या वर्दळीने आणि त्या वर्दळीचा रंग होता ताजा- झळझळीत गुलाबी! वर्दळीतील कित्येक स्त्रिया डोक्यावर स्कार्फ बांधून आल्या होत्या, तर काहींच्या डोक्याचा तुळतुळीत गोटा होता. भरघोस केसांचे विगही अधूनमधून दिसत होते, पण या कशाबद्दलही एकाही स्त्रीच्या चेहऱ्यावर अवघडलेपण दिसत नव्हते. परस्परांना अजिबात ओळखत नसूनही त्या सगळ्या एकमेकींच्या सख्या होत्या, कारण त्यांना गुंफणारा वेदनेचा बंध एकच होता. कर्करोगाचा!
पुण्यात झालेल्या या पहिल्या राष्ट्रीय ‘ब्रेस्ट कॅन्सर सव्‍‌र्हायव्हर्स’ परिषदेसाठी महाराष्ट्रातील विविध गावांमधून तब्बल २०० पेक्षा अधिक स्त्रिया आल्या. एरवी कर्करोगाचे निदान झाल्यावर आपल्या आप्त मित्रांना त्याचा सुगावा लागू नये म्हणून खटपट करणाऱ्या स्त्रिया वारंवार भेटत असताना स्वत:च्या कर्करोगाचा खुलेआम स्वीकार करणाऱ्या आणि त्याबाबत बोलू इच्छिणाऱ्या स्त्रिया बघून बरं वाटत होते.
इथे येण्यापूर्वी प्रत्येकीची आपली एक कहाणी होती. कोणी बडय़ा कॉर्पोरेट नोकरीत हाय प्रोफाइल काम करणारी तर कोणी मुंबईच्या सोशल लाइफमधून वारंवार ‘पेज थ्री’वर झळकणारी. यांच्याबरोबर महाराष्ट्रातील एखाद्या छोटय़ाशा खेडय़ात शेतीकाम करणारीही होती. कर्करोगाचे निदान त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रथम भेटले तेव्हा ‘मीच का?’ हा प्रश्न प्रत्येकीला पडला. प्रत्येकीच्या आयुष्याचा वेग काही काळ मंदावला. ज्या शरीराने इतकी वर्षे न कुरकुरता साथ केली त्याने आपल्या मर्यादांचे पांढरे निशाण फडकवले आणि नातलगांची कुजबुज, नोकरीतील रजा आणि उपचारांच्या खर्चापायी भसाभस रिकामा होणारा खिसा यापैकी कोणत्या ना कोणत्या प्रश्नाने प्रत्येकीची वाट अडवली गेली. या सगळ्यावर मात करीत जीवनाला नव्या उमेदीने भिडणाऱ्या आणि त्यासाठी परस्परांकडून ऊर्जा घेऊ बघणाऱ्या स्त्रिया एकमेकींना प्रथमच भेटत होत्या.
घडय़ाळाची बॅटरी संपल्यावर नवीन बॅटरी आपण टाकतो तेव्हा घडय़ाळ पुन्हा नव्याने सेट करावे लागते. कर्करोग झालेल्या कोणत्याही रुग्णाचेही असेच असते. केमोथेरपी, रेडिएशन या सगळ्या चक्रातून बाहेर पडलेले त्याचे शरीर पूर्वीपेक्षा फार फार वेगळे असते. रेडिएशनची तीव्र किरणे आणि केमोची विषारी द्रव्ये पोटात गेल्याने ते बावरून गेलेले असते. अचानक वजनवाढ, हाडे ठिसूळ होणं, हातापायाची बोटे बधिर होणं रोज नवे प्रश्न. कधी स्तन काढल्यामुळे रिकाम्या, मूक झालेल्या शरीराचे ‘आक्रंदन’ मान वर काढत असते. हे सगळे प्रश्न शांतपणे समोर मांडून त्यातील गुंता सोडवून डॉक्टरांची- आधार गटांची मदत घेत कसे जगता येते हे एकमेकींना सांगणारी- दाखविणारी ही परिषद!
मुळात ही कल्पनाच भन्नाट. कोणत्याही आजारासंदर्भात नवी औषधे, नवे तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियांची विकसित कौशल्ये या संदर्भात चर्चा करणाऱ्या डॉक्टरांच्या शास्त्रीय परिषदा नेहमीच होतात, पण या परिषदेत डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांपुढे बोलायचे होते. नव्या उपचारांबद्दल त्यांना शहाणे करायचे होते. कर्करोगाच्या क्षेत्रात रोज इतके क्रांतिकारी, आधुनिक शोध लागत आहेत की रुग्णांपुढे आता एखाद्या ‘कॅफेटेरिया’मध्ये जावे तसे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्याला ‘कॅफेटेरिया अॅप्रोच’ म्हटले जाते. नाशिकचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राज नगरकर या परिषदेविषयी झालेल्या गप्पांमध्ये सांगत होते, ‘या नव्या उपचारांविषयी जाणून, स्वत:साठी कोणते उपचार निवडावेत याची निवड त्यांनी करावी, डॉक्टरांना याबाबत शंका विचाराव्यात, असा प्रयत्न या परिषदेत नक्कीच झाला.’ स्तनाच्या कर्करोगामुळे स्तन काढून टाकलेल्या स्त्रीच्या शरीरातील अन्य ठिकाणचे टिश्यूज (उती) वापरून पुन्हा तो स्तन निर्माण करता येतो. किंवा रेडिएशन तंत्रात आता इतकी आधुनिकता आली आहे की, शस्त्रक्रियेदरम्यान (intra- operative) ने देऊन पुढील कितीतरी वेदना, साइड इफेक्ट्समधून मुक्त होता येते हे सांगणारी या परिषदेतील तज्ज्ञांची सत्रे ही उपस्थितांना कमालीची दिलासा, आश्वासन देणारी होती. किंबहुना डॉ. अनुपमा माने, डॉ. आरती शिराळी (या परिषदेच्या संकल्पनेची जनक!) डॉ. ए. बी. रानडे, डॉ. राज नगरकर यांसारख्या जाणत्यांची या परिषदेतील उपस्थिती, लॉबीत होणाऱ्या गप्पा हेच कित्येकजणींसाठी अतिशय धीर देणारे, दिलासादायक होते. तज्ज्ञपणाची झूल उतरवून आणि प्रसंगी रात्रीच्या गाला डिनरमध्ये झालेल्या ‘रॅम्प वॉक’मध्ये सहभागी होऊन यांनी उपस्थितांशी एक अनाम असे नाते निर्माण केले.
ही परिषद म्हणजे कर्करोगासह जगलेल्या, जगत असणाऱ्या रुग्णांची ‘दुखभरी दास्ताँ’ होऊन अश्रूंच्या महापुरात चिंब भिजू नये यासाठी सर्व ते प्रयत्न प्रमुख संयोजक डॉ. शोना नाग आणि देविका भोजवानी यांनी केले होते. डॉ. शोना या पुण्यातील प्रसिद्ध मेडिकल आँकोलॉजिस्ट तर देविका या मुंबईतील एक ‘सेलिब्रिटी सोशलाइट’ पण स्वत: कर्करोगाच्या अनुभवातून गेल्यावर टाटा मेमोरियलच्या मदतीने ‘वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह’ हा आधार गट चालविणारी स्त्री. अभ्यासाच्या जोडीला धमाल असा या परिषदेचा चेहरा नक्की ठरल्यावर मग त्यात रंग भरण्यासाठी डॉ. शोना-देविकाच्या टीमने सर्व ते प्रयत्न केले. ढोल-तालाच्या विलक्षण चैतन्यमय ठेक्यावर सकाळी-सकाळी आगाखान पॅलेसपासून ‘सव्र्हायव्हर्स वॉक’ झाला. त्या वेळी गुलाबी छत्र्या, गुलाबी झेंडे, टी-शर्ट्स, बॅनर्स आणि ‘चक दे’ फेम सागरिका घाटगेची उपस्थिती यामुळे वातावरण चैतन्यमय झालं. मग स्मिता तळवलकरसारखी गोष्टीवेल्हाळ स्त्री आपले ‘सेलिब्रिटी स्टेटस’ विसरून एक सव्र्हायव्हर या नात्यानं सगळ्यांशी गप्पा मारायला आली. ‘नवऱ्यापेक्षा कॅन्सर बरा’ असे थट्टेनं म्हणत तिनं कॅन्सरनं आपल्याला किती निडर, हिंमतवान केले आहे, हे सांगितले तेव्हा उपस्थित प्रत्येक स्त्री तो अनुभव स्वत:च्या अनुभवाशी ताडून बघत होती! अभ्यासाच्या छोटय़ा-छोटय़ा सत्रांबरोबर मजेची, गप्पांची अशी सत्रे जोडून दिल्याने परिषदेसाठी आलेल्या स्त्रिया काही तासांतच रिलॅक्स झाल्या, मनमोकळेपणाने एकमेकींशी गप्पा मारू लागल्या आणि मुख्य म्हणजे मुलगी माहेरी आल्यावर तिला प्रेमाने खाऊ-पिऊ घालण्याचे जे लाड आई करते ते लाडही संयोजक स्त्रियांनी केल्यामुळे समोर आयते आलेले, गरमागरम जेवण जरा चार घास जास्तच जेवल्या!
अर्थात कर्करोग म्हणजे फक्त आधुनिक उपचार नाहीत त्याबरोबर बाकी अनेक छोटे-मोठे प्रश्नही आहेत. उपचारांचा सहसा ना परवडणारा खर्च, विमा कंपन्यांचे मोघम, गुळमुळीत धोरण, दीर्घकाळ चालणाऱ्या उपचारांमुळे नोकरीत येणारे रजेचे प्रश्न आणि मुख्य म्हणजे अजूनही समाजात कर्करोगाबद्दल असणारा ‘कलंकभाव’ (स्टिग्मा) या प्रत्येक प्रश्नावर वैयक्तिक पातळीवर ज्याला-त्याला लढावेच लागते, पण याबाबत शासकीय पातळीवर धोरणात्मक असे काही निर्णय घेता येणार नाही का हा प्रश्न परिषदेतील पॅनल चर्चेत गांभीर्याने चर्चिला गेला. कर्करोगग्रस्ताला समाजाकडून सहानुभूती मिळते, मदत मिळते पण या व्यक्तिगत प्रश्नांना, मदतीला निश्चित असे धोरणात रूपांतरित करण्यासाठी एक ‘दबाव गट’ म्हणून हा गट भविष्यात काम करू शकतो, असे प्राथमिक आश्वासन तरी इथे नक्कीच मिळाले आणि याही पलीकडे काही गोष्टी मिळाल्या. मौल्यवान जीवन निरोगी सुंदर जगण्याचा धडा मिळण्यासाठी प्रत्येकाला कर्करोगाचा ‘धडा’ मिळण्याची गरज नाही. योग, प्राणायाम, फिटनेस, कधीमधी चुकीचा पण एरवी पोषक, योग्य आहार याबरोबर मन तणावमुक्त करणारे एक तंत्र (ध्यान, संगीत, फिरणे काहीही) आणि सर्वात महत्त्वाचे, निराश भावनांना दरवाजे बंद करीत स्वत:वर प्रेम करायला हवे, करायलाच हवे हे इथे आलेल्या तज्ज्ञांनी वारंवार सांगितले.
 स्वत:साठी जगणे, स्वत:वर प्रेम करणे, गरज लागल्यास स्वत:वर खर्च करणे आणि कधीतरी गरज पडल्यास कुटुंबाकडून सेवा करून घेणे या गोष्टीबद्दल प्रत्येक स्त्रीला अपराधी वाटत असते. या अपराधाची तीव्र छटा जरा सौम्य होऊ शकली तरी या परिषदेचे सार्थक झाले असे म्हणायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा