कसं जगायचं? हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं आहे. आरोग्यदायी, तंदुरुस्त जगणं हवं असेल तर प्रत्येकाने आपलं आपण खाण्यावर नियंत्रण राखणं गरजेचं. त्यानिमित्ताने काही शंकांचं निरसन.
बघता बघता वर्ष संपत आलं! संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या आपल्या गप्पा खूपच रंगल्या. गप्पा-गोष्टींच्या रूपात किंवा कधी सूचनेच्या रूपात मला तुम्हा सर्वाना आहार-मार्गदर्शन करता आलं.
परवाच माझ्याकडे एक रुग्ण आला होता. वजन जास्त, मधुमेह आहे आणि कोलेस्टेरोलची पातळी वाढलेली- त्याचा अट्टहास असा की मांसाहार प्रमाणात केला तर बिघडतं कुठे? त्या वेळी मनात विचार आला की असे कितीतरी ‘निरागस’ प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतात तेच तुमच्याशी प्रश्नोत्तर-रूपामध्ये तुम्हाला सांगितले तर तुमच्याही मनातल्या शंकांचं निरसन होईल आणि आपला ‘सारांश’ पण होऊन जाईल! सर्व वाचकांच्या प्रेमाच्या प्रतिक्रियांमुळे खूप प्रोत्साहन-आनंद मिळाला. मी मागे म्हटल्याप्रमाणे अन्नातील ‘प्राणा’चे जतन याविषयी बोलण्याआधी जरा एक धावता आढावा घेऊया- वर्षभरातील ‘आनंदाचे खाणे’चा सारांश!
१) ७ महिन्याचं बाळ आहे आणि रोज ओट्सची खीर देते – इति आई.
उत्तर- अचानक मार्केटमध्ये आलेला हा पदार्थ आरोग्यदायी (हाय फायबर असलेला) आहे याबाबत शंका नाही. पण एक लक्षात असू द्या की ओट्स एलर्जीसुद्धा निर्माण करू शकतात. म्हणून एवढय़ा लहान बाळांसाठी गहू, नाचणी, तांदूळ, मूगयुक्त भरड (अफा – अे८’ं२ी फ्रूँो)ि च योग्य आहे.
२) रोज नाश्ता केला जातो पण बिस्किट्स / कॉर्नफ्लेक्स / टोस्ट खातो.
उत्तर – नाश्ता करणे सक्तीचे आहे हे बरोबरच आहे. कारण रात्रभरात कमी झालेली रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढणे हे मेंदूसाठी अत्यंत गरजेचे आहे. पण चुकीचे पदार्थ खाऊन पोट भरण्यापेक्षा योग्य पदार्थाची निवड करणे गरजेचे आहे. घरी बनवलेला (प्रमाणात तेल / तूप वापरून) विविध प्रकारचा नाश्ता हा कधीही प्रोसेस्ड फूडपेक्षा चांगला!
३) संध्याकाळी लहान मुलांना (आणि मोठय़ांनासुद्धा) नूडल्सचा नाश्ता लागतो अगदी रोज!
उत्तर- प्रिय आई-बाबांनो, एक गंमत लक्षात घेतली का तुम्ही? आपल्या मुलांनी नीट (?) चपाती-भाजी-डाळ-उसळ-दूध-फळ खावे म्हणून आपली किती मेहनत असते- अगदी पदार्थ बनवून जोपर्यंत मुलगा-मुलगी पोटभर खात नाही तोपर्यंत सगळ्या कसरती केल्या जातात! नूडल्स-चिप्सची सवय काय लगेच लागते? आईच्या हाताच्या चवीपेक्षा मशीनची चव चांगली का ठरते? मुले गुलाम (!) का होतात? विचार करण्यासारखे आहे नं? मुलांमधली अतिक्रियाशीलता नियंत्रणात ठेवायची असेल तर साखर-मैदायुक्त तयार फूड्स नेहमी खाणे कधीही वाईट! चिक्की, चणे-फुटाणे, शेंगदाणे, मूग-भेळ, दही-काला, घावनसारखे ‘५ मिनिटांमध्ये’ तयार होणारे पदार्थ खायला काय हरकत आहे?
४) ब्रेड आणि नूडल्स- मैद्याचे खात नाही तर वाईट काय?
उत्तर- कोलेस्टेरोल-ट्रान्स फॅट फ्री, अख्ख्या गव्हाचे पिठाचे पदार्थ मैदा किंवा अतिचरबीयुक्त पदार्थापेक्षा चांगले हे बरोबर आहे, पण तरीही तयार फूड हे नैसर्गिक नाही. मग आरोग्याला कसे चांगले असेल? साखर नाही, पण टोटल काबरेहायड्रेट्स किती आणि कोलेस्टेरोल नाही, पण टोटल फॅट्स-कॅलॅरीज किती हे विसरून चालणार नाही. म्हणून असे ‘हेल्दी’ पदार्थ खाताना जरा जपूनच!
५) साखर बंद तर फळांमध्येसुद्धा साखर असतेच ना, तर फळ बंद का नाही?
उत्तर – मधुमेही पेशंट्सना नेहमी पडणारा हा प्रश्न आहे. साखर-गूळ-मध हे पदार्थ रक्तातील साखर लगेच वाढवतात. फळांमध्ये साखर असली तरीही फायबरसुद्धा मुबलक प्रमाणात असतो, जो रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढू देत नाही. फक्त कोणत्या प्रकारची फळे किती प्रमाणात आणि कधी खावीत हे आपल्या आहारतज्ज्ञांकडून समजावून घ्या आणि हो साखर न घातलेला ज्यूस कधी तरी घेतला तर चालेल, पण रोज नक्कीच नाही.
६) जळजळ होते म्हणून टोमॅटो, डाळी, भाज्या पूर्ण बंद केल्या आहेत, तरी अठळअउकऊ घ्यावेच लागते.
उत्तर- छातीत का जळजळ होते ते सर्वप्रथम शोधून काढणं गरजेचे आहे. खाण्याच्या चुकीच्या वेळी चावून न खाणं, चुकीचे पदार्थ खाणे, वेळी-अवेळी झोप- नक्की काय कारण आहे ते शोधावे. म्हणजे उगीचच काही पदार्थ वगळून खाण्याचा तोल बिघडवू नये आणि ंल्ल३ूं्र२ि घेऊन केवळ उपचार करण्यापेक्षा उपाय केलेला कधीही चांगला.
७) विटामिन्सच्या गोळ्या खाऊनसुद्धा अशक्तपणा जाणवतो.
उत्तर. चांगल्या कंपनीच्या (महागाच्या) विटामिन गोळ्या घ्याव्यात की नाही हे तुमचे आहारतज्ज्ञ ठरवतीलच पण गोळ्या खाव्यात की नाही यापेक्षा योग्य आहार घेणे तितकेच गरजेचे आहे.
८) पूर्ण दिवसभरात नाही. पण संध्याकाळी मात्र थकवा जाणवतो, पाय दुखतात.
उत्तर. पाणी योग्य प्रमाणात पिणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे दिवसातील सर्व जेवण (शक्यतो घरी बनवलेले) घेणे! आणि अन्न जर जीवनसत्त्व आणि प्रथिनयुक्त असेल तर संध्याकाळचा थकवा आपण टाळू शकतो. (जर दुसरा काही आजार नसेल तर)
९) कितीही कमी खाल्ले तरी वजन कमी होत नाही!
उत्तर. शरीराला योग्य कॅलरीजची गरज असते आणि याचे प्रमाण बिघडले तर वजन वाढू किंवा कमी होऊ शकते. कमी प्रमाणात खाल्ल्याने प्रथिने आणि जीवनसत्त्वे कमी मिळतातच, पण आपण जे काही खातो ते शरीरामध्ये साठवले जाते आणि वजन कमी होत नाही म्हणून तुमच्या आहारतज्ज्ञाला तुमचे डाएट ठरवू दे. आमच्या आईच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘जेणू काम तेणू होय, दुजा करे सो गोता खाय!)’
१०) आधीच दमलेले असतो आम्ही, अजून व्यायाम कसा करणार?
उत्तर- रुग्ण अगदी बरोबर सांगतात. जर आज व्यायामाला अचानक सुरुवात केली आणि उद्या व्यायाम अचानक बंद झाला तर दमायला नक्कीच होते. म्हणून हळूहळू सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. मग दमण्यापेक्षा तुम्हाला नवचैतन्य अधिक लाभेल. आणि जे काही कराल ते न कंटाळता अगदी मनापासून करा. आपोआप चांगले रिझल्ट्स मिळतील.
माझे रुग्णांना नेहमी एक सांगणे असते- आयुष्य किती आहे हे आपल्याला माहिती नाही- खरे तर आपल्या आयुष्याची दोरी आपल्या हाती नाही. पण आपल्या आयुष्याची गुणवत्ता नक्कीच आपल्या हाती आहे. ‘इतने साल तंबाखू खाया कुछ बिघडा नही! अभी ७० साल की उमर में क्या होगा? मरना तो है ही तो कल के बदले आज क्यू नही?’ अरे, पण आज मरणार कशावरून? अजून १० वर्षे कर्करोगग्रस्त होऊन जगलात (!) तर काय?
मंगेश पाडगावकरांची एक कविता मला नेहमीच स्फूर्तिदायक वाटते, कदाचित तुम्हालाही आवडेल-
सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत. की गाणं म्हणत,
तुम्ही सांगा कसं जगायचं?
डोळे भरून तुमची आठवण कोणी तरी काढतंच ना,
उन उन घास तुमच्यासाठी वाढतंच ना,
दुवा देत हसायचं की शाप देत बसायचं..
काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं,
दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणी तरी उभं असतं,
प्रकाशात उडायचं की काळोखात कुढायचं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा