डॉ. अंजली जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘मी आणि राहुलनं ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय.’’ जवळपास दोन वर्षांपूर्वी बंगळूरुला निघताना मी आईबाबांना सांगितलं होतं.
घरात एकदम सन्नाटा पसरला!
‘‘राहुलच्या आईवडिलांना मान्य आहे का?’’ बाबांनी विचारलं.
‘‘त्यानंही कानांवर घातलंय त्यांच्या!’’
मी म्हटलं.
‘‘स्पृहा, एवढा मोठा निर्णय घेताना आम्हाला विचारावंसंही वाटलं नाही!’’ आई दुखावल्या स्वरात म्हणाली.
ही ‘लिव्ह-इन’मध्ये राहण्याबाबतची नाराजी होती, की हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना सांगितलं नाही याबाबतची नाराजी होती, हे ठरवणं अवघड होतं आणि समजा, निर्णय घेण्यापूर्वी सांगितलं असतं, तर सहजपणे मान्यता दिली असती का? परत शांतता पसरली. मला जास्त वेळ बसवेना. निरोप घेऊन मी निघाले.
मी नोकरीसाठी बंगळूरुला गेले, तेव्हा राहुलशी ओळख झाली होती. मी इंजिनीअर, तर राहुल ग्राफिक डिझाइनच्या क्षेत्रात. आमचं ‘क्लिक’ झालं तेव्हा वाटलं, की अध्ये-मध्ये भेटण्यापेक्षा एकत्रच राहावं. रोज एकमेकांचा सहवास तरी मिळेल! अर्थात ‘लिव्ह-इन’च्या निर्णयाचं स्वागत आमचे आईवडील करणार नाहीत, याची कल्पना आम्हाला होतीच. आमचे एकत्रित फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर ते पाहत असणारच. ‘लग्न कधी करणार?’ अशी विचारणा दोघांच्याही आईवडिलांकडून अध्येमध्ये होत होती; पण आम्हाला एवढय़ातच लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं. आमच्या दोघांच्या करिअरचं बस्तान अजून बसायचं होतं. आमच्यातले संबंध दीर्घकाळ चालू राहू शकतील का, हे अजमावण्यासाठीच आम्ही ‘लिव्ह-इन’चा पर्याय निवडला होता. एकत्र राहिल्याशिवाय एकमेकांच्या बारीकसारीक सवयी आणि स्वभावाचे कंगोरे कसे कळणार?
आणखी वाचा-वळणबिंदू: हृदय रिकामे घेऊनी फिरतो…
..‘लिव्ह-इन’मध्ये राहून आता दोन वर्ष झाली. आमच्या दृष्टीनं हा ‘ट्रायल पीरियड’ आहे. आपण एकमेकांना अनुरूप आहोत की नाही, हे अजमावून पाहण्यासाठी परस्परांना दिलेला हा अवकाश आहे. एकदा लग्नात अडकलं, की भूमिका बदलतात. सामाजिक अपेक्षा, रीतीभाती यात स्वत:ला ठोकून बसवावं लागतं. आपल्याकडे सहजीवनाचा निर्णय हा दोन व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, असं मानलं जात नाही. त्यात कुटुंब, नातेवाईक, समाज सगळेच घुसतात. मग त्या संबंधांना सार्वजनिक स्वरूप येतं. आमच्या संबंधांना सार्वजनिक स्वरूप द्यायचं की नाही, याबाबतचा आमचा निर्णय अजून झालेला नाही आणि एवढय़ात ते दडपण आम्हाला घ्यायचंही नाही. पण हे आईबाबांना समजणं कठीण आहे. ते हा विषय अधूनमधून छेडत राहतातच.
बाबांनी एकदा विचारलं, ‘‘अजून किती काळ असंच राहणार?’’
‘‘दोन वर्षांत ओळख पटली नाही का?’’ आईनं टोमणा मारला. सगळे प्रश्न शेवटी लग्नावर येऊन घसरतात. ही पिढी लग्नाबाबत एवढी ‘ऑब्सेस्ड’ का आहे, ते कळत नाही.
‘‘प्रश्न ओळख पटण्या-न पटण्याचा नाही. लग्न ही मोठी कमिटमेंट आहे. ती पेलवू शकू का, हे या क्षणी ठरवता येत नाही. जेव्हा तयारी होईल, तेव्हा लग्नाचा विचार करू. करूच असंही नाही.’’ मी म्हटलं.
‘‘अगं, पण कुणी विचारलं तर आम्ही काय सांगायचं?’’ आईनं विचारलं.
‘‘सांगायचं, की आम्ही ‘लिव्ह-इन’मध्ये राहतोय म्हणून! एवढं कसलं लोकांचं दडपण घेता? तुम्ही जर हे नातं आनंदानं स्वीकारलंत तर लोकांनी बोलण्याचा प्रश्न येतो कुठे?’’
अजूनही आमच्या दोघांपैकी कुणाच्याही आईवडिलांनी त्यांच्या मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांत आम्ही ‘लिव्ह-इन’मध्ये राहात आहोत हे खुलेपणानं सांगितलेलं नाही. म्हणजे यांच्याच मनात किती अडसर आहेत!
तेवढय़ात बाबा म्हणाले, ‘‘नवनवीन बातम्या रोज कानांवर पडत आहेत, ‘लिव्ह-इन’मधली मुलं हिंसक पद्धतीनं मुलींना मारून टाकतात. कसा करणार आम्ही आनंदानं स्वीकार? लोकांचं बाजूला ठेव, पण पालक म्हणून काळजी वाटणार नाही का आम्हाला?’’
‘‘बाबा, अशा एखाद्-दुसऱ्या घटनांवरून सगळय़ा ‘लिव्ह-इन’च्या संबंधांत असं घडेल हे कशाच्या आधारावर ठरवता तुम्ही? स्त्रियांबद्दलच्या हिंसक घटना फक्त ‘लिव्ह-इन’मध्येच नाहीत, तर सर्व नातेसंबंधांत दिसून येतात. विवाहित स्त्रिया अशा हिंसेला बळी पडण्याचं प्रमाण तर किती तरी जास्त आहे. मग ‘लग्न नको’ असं म्हणता का?’’ मी उसळून म्हटलं. यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं; पण मला माहितीय, की आईबाबांना ‘लिव्ह-इन’ मुळातच फारसं रुचत नाही.
‘लिव्ह-इन’मध्ये राहणं म्हणजे लग्नाशिवाय शारीरिक संबंध जाहीर करणं आलं. ते त्यांना नकोय! शारीरिक संबंधांचा एवढा बाऊ का करतात हे? शिवाय ‘लिव्ह-इन’मध्ये ‘वंशाचा दिवा’ पेटत नाही ना! म्हणजे राहणीमान आधुनिक असलं, तरी गाभ्यातले विचार मात्र जुनाटच!
समर्पक उत्तर सुचलं नाही, की आईचा नेहमीचा मुद्दा असतो- ‘‘स्पृहा, ‘लिव्ह-इन’मध्ये मुलींना जास्त धोका असतो गं! अशा संबंधांत मुली खूप गुंततात; पण जर बाहेर पडायची वेळ आली, तर किती त्रास होईल याचा विचार केला आहेस का?’’
आणखी वाचा-वळणबिंदू : मूल नको गं बाई
यावर माझं उत्तर तयार असतं- ‘‘लग्न झाल्यावर तुटलं, तर त्याचा त्रास तर किती तरी जास्त असणार नाही का? त्या तुलनेनं ‘लिव्ह-इन’मध्ये मानसिक, आर्थिक किंमत कमीच नाही का?’’ पण हे आईबाबांना पटवून घ्यायचं नसतं. आमच्या दोघांच्याही आईवडिलांना वाटतं, की ‘लिव्ह-इन’ म्हणजे ‘कॅज्युअल रिलेशनशिप’ आणि लग्न म्हणजे ‘सीरियस रिलेशनशिप’. आमचं म्हणणं असतं, की आपले संबंध कॅज्युअल आहेत की सीरियस आहेत, हे तपासल्याशिवाय कसं कळणार? ते तपासायला ‘लिव्ह-इन’ आम्हाला वाव देतं. त्यांना वाटतं, की ‘लिव्ह-इन’मध्ये पार्टनर कधीही सोडून जाईल ही टांगती तलवार डोक्यावर असते. तसं न झालं तर उत्तम, पण तसं होऊ शकतं, ही शक्यता आम्ही खुली ठेवतो. त्यांना वाटतं, की ‘लिव्ह-इन’ म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं. याउलट आम्ही जबाबदारी पेलवण्यास आपण समर्थ आहोत की नाही, याचा निवाडा केल्याशिवाय निर्णय घेत नाही. त्यांना वाटतं की आम्ही स्वार्थी आहोत. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय, की आमचं आयुष्य कसं जगायचं, हे आमचं आम्हाला ठरवू द्या! तो स्वार्थीपणा कसा होईल? यामुळे जर ते दुखावले गेले तर त्याला जबाबदार आम्ही, की ते स्वत:?..
‘मुलांचं काय?’ हा पण एक नेहमी उपस्थित होणारा प्रश्न. खरं सांगायचं तर सध्या तरी हा प्रश्न आमच्या अजेंडय़ावर नाही. जिथे आम्ही आमचेच संबंध तपासून पाहतोय, तिथे आणखी एक जबाबदारी वाढवण्याचा विचार सध्या तरी आम्ही करत नाही. अर्थात आमचे संबंध ‘लाँग-टर्म’ राहू शकतील याची खात्री पटली, तर तोही विचार करू. तोपर्यंत ‘लिव्ह-इन’मधल्या मुलांना सामावून घेणारी समाजव्यवस्था निर्माण झाली तर उत्तमच, नाही तर वेगळा पर्याय निवडू. ‘लिव्ह-इन’मध्ये धोके आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. संबंध तुटले की कधी कधी विकोपाला जाऊ शकतात, कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातात, सेक्शुअल हरॅसमेंटच्या केसेस होऊ शकतात; पण कुठल्या पर्यायात धोके नाहीत?.. धोके आहेत म्हणून पर्यायच निवडायचा नाही असं नाही. आम्हाला तो अनुभव तर घेऊन बघू दे ना! समजा, आमचा निर्णय चुकला, तरी चुकण्याचा आणि त्यातून सावरण्याचाही अधिकार आम्हाला आहे ना?
आई-बाबा म्हणतात, ‘लिव्ह-इन’मुळे तडजोड करण्याची क्षमता नष्ट होते. उलट हा निव्वळ गैरसमज आहे! ‘लिव्ह-इन’मध्येही तडजोड असते. आमचंच उदाहरण पहा! राहुल बऱ्यापैकी नीटनेटका आहे, तर मी पसारा घालते. त्याला थंडगार एसी प्रिय, तर मला त्यात हुडहुडी भरते. तो पहाटे ताजातवाना असतो, तर मी रात्री! बाहेरून आल्यावर ड्रॉवरमध्ये न ठेवलेले माझे शूज् त्याला खुपत राहतात, तर पलंगावर पडलेला त्याचा ओला टॉवेल माझ्या डोक्यात जातो. मग आम्ही दोघं अनेक तडजोडी एकमेकांसाठी करतो. आपण किती ‘इव्हॉल्व्ह’ होऊ शकतो, स्वत:ला किती मुरड घालू शकतो, किती ‘स्ट्रेच’ करू शकतो, हे तपासून पाहण्याची संधी ‘लिव्ह-इन’ देतं. जर फारच तडजोडी कराव्या लागत असतील किंवा फरपट होत असेल तर संबंधांना पूर्णविरामही देता येतो.
आणखी वाचा-वळणबिंदू : मी इथे आणि तू तिथे!
खरं तर किती साधं-सरळ आहे हे! पण साध्याच गोष्टी समजून घ्यायला जास्त अवघड असतात. माझ्या परिचयातल्या ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या बहुतेक मुलामुलींना जास्तीत जास्त विरोध पालकांकडूनच होतो. कधी तो छुपा असतो, तर कधी उघड! कधी नात्यांवर ओरखडे पडतात, तर कधी मनाचे लचके तोडले जातात. कधी संबंध ताणले जातात, तर कधी तुटतात. दोन्ही बाजूंनी वादविवाद, आरोप-प्रत्यारोप, ताणतणाव हे तर बहुधा अटळच असतात. जास्त विरोध होईल असं वाटलं, तर मग आम्ही पालकांना ‘लिव्ह-इन’संबंधी सांगतच नाहीत. जे सांगतात, त्यांचे पालकही कुटुंबातल्या अगदी मोजक्या लोकांपुढे ते उघड करतात. इतर नातेवाईकांना कळू नये म्हणून आटोकाट दक्षता घेतात. तुमचे फोटो सोशल मीडियावर टाकू नका, अशा सूचना आम्हाला देत राहतात. आमच्यापाठी लग्नाचा तगादा लावतात!
‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या आमच्या मित्रमैत्रिणींचा आम्ही एक ‘सपोर्ट ग्रुप’ तयार केला आहे. अशा कसोटीच्या प्रसंगी आम्ही एकमेकांना आधार येतो. स्वत:ला ढासळण्यापासून वाचवतो. आहे त्या परिस्थितीत वस्तुनिष्ठपणे मार्ग काढतो. आफताब पूनावालाचं प्रकरण झाल्यापासून जागेबाबतच्या आमच्या अडचणी फारच वाढल्या आहेत. शेजाऱ्यापाजाऱ्यांची कुत्सित बोलणी, लोकांच्या विखारी नजरा, यांना तोंड द्यायला आम्ही हळूहळू शिकतोय.
..आईबाबांचा फोन वाजला. हल्ली त्यांच्याशी सहज, मनात येईल ते बोलताच येत नाही. त्यांनी परत ‘लिव्ह-इन’बद्दल छेडलं तर कमीत कमी वाद होतील अशी काय उत्तरं द्यायची किंवा चलाखीनं हा विषय बाजूला कसा सारायचा, याचे विचार मनात चपळाईनं शिरले. यात स्वत:चं नैसर्गिक बोलणं हरवून जातं!
‘‘स्पृहा, आमच्या लग्नाच्या तीसाव्या वाढदिवसानिमित्त एक छोटा समारंभ करायचं ठरवतोय. तुझ्याशी बोलून दिवस नक्की करायचाय.’’ आई उत्साहात दिसत होती. .
‘‘जवळच्या नातेवाईकांना आणि परिचितांना बोलवायचं म्हणतोय.’’ बाबा म्हणाले.
राहुलला आमंत्रण देण्याचा विषयही त्यांच्या डोक्यात नव्हता. लक्षात आलं, की अजून बरीच वाटचाल करावी लागणार आहे! हल्ली अनेक फोरम्स, चित्रपट, वेबसीरिज या विषयाला प्राधान्य देत आहेत; पण या विषयाचा स्वीकार समाजमनाच्या गाभ्यापर्यंत अजून पोहोचला नाही. खरं तर पालक हे काम चांगलं करू शकतात. कारण ते समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची साथ मिळाली तर चौकटीपलीकडची आमची ही वाटचाल सुकर होऊ शकेल.
मग मी आपणहून विचारलं आईबाबांना.. ‘‘राहुल आणि त्याच्या आईबाबांना बोलवू या का?.. या समारंभाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो ना?’’
anjaleejoshi@gmail.com