आरती अंकलीकर
‘केसरबाई केरकर शिष्यवृत्ती’च्या निमित्तानं शास्त्रीय संगीतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांशी माझी भेट झाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. करिअरच्या अगदी सुरुवातीला, ऐन विशीत डॉ. अशोक रानडे आणि पु. ल. देशपांडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायलाही मिळालं. या प्रवासाच्या आठवणी फार मोलाच्या आहेत. कारण त्या चिरकाळ मनात रुतून आहेत. आजही स्वररूपानं झंकारत आणि शिकवत राहिल्या आहेत!
२५ मार्च १९८०ची सकाळ. मुंबईत उन्हाळा सुरू झाला होता. माटुंग्याहून सचिवालय येथे जाणाऱ्या पाच नंबरच्या बसमध्ये चढलो आम्ही. मी,आई आणि बाबा. डबलडेकर बस. त्यावेळी रहदारी कमी असे. डबलडेकरच्या वरच्या मजल्यावर सगळय़ात पुढच्या सीटवर बसून वाऱ्याची मजा घेणं आवडीचं होतं आमचं. पण त्या दिवशी आम्ही खालच्या भागातच बसलो. ‘केसरबाई केरकर शिष्यवृत्ती’साठी माझी ऑडिशन होती.
‘एन्.सी.पी.ए.’मध्ये (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्टस्) जायचं होतं. त्याचं तितकंसं दडपण नव्हतं. मी रमतगमत चालले होते. सचिवालय हा शेवटचा स्टॉप. उतरून आम्ही चालत निघालो. तो परिसर खूप आवडतो मला. बाहेर पडलं की समोर अथांग सागर. नरिमन पॉइंट ते चौपाटीपर्यंतचा दिसणारा गोलाकार रस्ता. नयनरम्य. आम्ही पोहोचलो. बाहेरच्या उकाडय़ातून आत एकदम ए.सी.च्या थंडाव्यात आलो. उत्तम व्यवस्था. सगळीकडे कार्पेट. सुरेख लाकडी खुच्र्या. त्यांचा स्टाफ पांढऱ्याशुभ्र कपडय़ांत वावरत होता. त्या सुव्यवस्थेचं, टापटिपीचं थोडं दडपण आलं. एका हॉलमध्ये बसवलं आम्हाला. तिथे मात्र बहुतांशी आमच्यासारखीच मंडळी.
ऑडिशनला आलेली मुलंमुली आणि त्यांचे पालक. काही मुंबई-पुण्याची, काही छोटय़ा शहरांमधून आलेली. मोठय़ा शहराचं, मोठय़ा संस्थेत आल्याचं दडपण सगळय़ांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.आम्हीही मिसळून गेलो त्या दडपणाच्या डोहात. २८ जण होते ऑडिशनसाठी. एकेकाचा नंबर लागत होता. एका खोलीत ऑडिशन होती. बाहेर आल्यावर बाकी मंडळी उत्सुकतेनं आतली हकीकत विचारत होती. सगळं दबक्या आवाजात चाललं होतं. मी थोडी बिनधास्त होते. काही ओळखीच्या स्पर्धक मैत्रिणींबरोबर गप्पा, विनोद चालू होते. पण दबक्या आवाजातच. आई मध्येच तिच्या घाऱ्या डोळय़ांचा धाक दाखवत होती. तेवढय़ात मला बोलावलं गेलं. माझा खटय़ाळपणा मी बाजूला सारला. मनावर पटकन दडपणाची चादर ओढली आणि ऑडिशनच्या खोलीत शिरले. समोर साक्षात डॉ. प्रभा अत्रे, सुप्रसिद्ध सारंगीवादक पं. रामनारायणजी, विचारवंत, बंदिशकार आणि आग्रा घराण्याचे अध्वर्यू
पं. दिनकर कायकिणी, संगीतशास्त्रज्ञ , डॉ. अशोक रानडे. इतकी थोर मंडळी एकत्रितपणे समोर पाहून मी दडपणाच्या चादरीला अधिकच घट्ट कवटाळलं.
गोड स्मितहास्य असलेल्या प्रभाताई. गडद रंगाच्या बॉर्डरची पांढरीशुभ्र साडी, मोठी टिकली. लांब गळय़ातलं. जाडजूड केसांची सुरेखशी पोनीटेल. पं. रामनारायणजी पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले. बोलण्यात विलक्षण मिठास, सुरेल बोलणं त्यांचं. कायकिणीजीसुद्धा मोतिया रंगाचा कुडता, घोळदार लखनवी पायजमा. धारदार नाक. करारी आणि मृदुतेचा संगम चेहऱ्यावर. रानडेकाका ताठ बसलेले. कडक शिस्तीचे. मी सगळय़ांना वाकून नमस्कार केला, तानपुरा घेतला हातात आणि छेडू लागले.. गायला लागले. बहुतेक नजर खालीच, पण एखादेवेळी समोर बसलेल्या दिग्गजांकडे नजर गेल्यावर त्यांच्या डोळय़ांतली चमक आश्वासक दिसली. त्यांनी समेवर दिलेली दाद प्रोत्साहित करू लागली. मी चांगली गायले, असं त्यांच्या आविर्भावावरून लक्षात आलं. २८ जणांमध्ये आपलं गाणं सर्वोत्तम होईल असं गाण्याची आवश्यकता होती. माझी छाप पडलेली दिसली मला. आईबाबाही खूश झाले.
अखेर मला एन.सी.पी.ए.चं शिष्यवृत्ती मिळाल्याचं पत्र आलं, हनुमान जयंती होती त्या दिवशी. मोठी संस्था, केसरबाईंसारख्या दिग्गज कलाकाराच्या नावानं असलेली ही शिष्यवृत्ती मिळाल्यानं अहंकार सुखावला. २८ जणांना मागे टाकल्याचं सुख आणि आईबाबांना खूश केल्याचा आनंदही! घरी, शाळेत सगळीकडे कौतुक होई. माझ्या मेहनतीच्या गाडीचं इंधन हे माझं होणारं कौतुकच तर होतं. त्यामुळे ही गाडी परत भरधाव निघाली. नवीन स्टेशन गाठायला.
पुढची दोन वर्ष किशोरीताईं अमोणकरांकडे तालीम मिळाली. १९८२ मध्ये शिष्यवृत्तीचा काळ संपला. मी ताईंकडून बाहेर पाऊल टाकून सावरू पाहात होते. एन.सी.पी.ए.नं दोन वर्षांत केलेली माझी प्रगती पाहण्यासाठी ‘लिटिल थिएटर’मध्ये माझा कार्यक्रम आयोजित केला होता. छोटंसं थिएटर, वातानुकूलित. त्या काळात इतकी सुसज्ज आणि चांगलं डिझाईन असलेली छोटेखानी थिएटर्स नव्हतीच. कार्यक्रम ऐकायला अनेक दिग्गज मंडळी, श्रोते हजर होते. चंद्रहास विसानजी, इंडियन प्लायवुड कंपनीचे मालक आणि अभिजात संगीताचे भक्त उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायिका सरलाताई भिडेही आल्या होत्या, भाची अश्विनीला (सुप्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे) घेऊन. मी नजर टाकली श्रोत्यांवर, तर मागच्या रांगेत एका कोपऱ्यात ताईंचे यजमान रविकाका अमोणकरही दिसले. तिसऱ्या-चौथ्या रांगेत ताईंची शिष्या- दिल्लीची गुरिंदर कौर दिसली. मी ताईंकडे जाणं सोडल्याच्या दु:खानं क्षणात मान वर काढली. समोर बसलेल्या व्यक्तींचं दडपण, ताईंकडे मिळालेल्या तालमीचं दडपण, त्यांची तालीम थांबल्याचं दु:ख, सल.. रवीकाका, गुरिंदर आपली परीक्षा घ्यायला आले असावेत, हा विचार, बरोबरीनं स्तिमित करून टाकणारं गाणं गाणाऱ्या केसरबाईंसारख्या गायिकेच्या परंपरेचा आपण एक भाग आहोत, ही भावना. पण या सगळय़ा विचारांवर मात करणारा एक विचार म्हणजे आत्मविश्वासानं, सर्वोत्तम गायचंय हा. तानपुऱ्याच्या झंकाराची शक्ती काही औरच आहे. रागचित्र समोर दिसण्यातही ती शक्ती आहे. परमेश्वरानं दिलेल्या देणगीला, प्रतिभेला, तळमळीची, चांगल्या गुरूंची, संधींची आणि मेहनतीची जोड मिळाल्यावर येणारा आत्मविश्वास हा तानपुऱ्याच्या झंकारात एकाग्र झाल्यावर आपसूक वर येतो.
एकही खुर्ची रिकामी नसलेल्या ‘लिटिल थिएटर’मध्ये मी ‘पूर्व कल्याण’ रागानं सुरुवात केली. मधल्या दोन वर्षांत या रागाचा रियाज झालाच नव्हता. ताई जयपूर घराण्याच्या. या घराण्यात हा राग गायला जात नाही. ताईंकडून मिळालेली तालीम आणि वसंतरावांकडून (वसंतराव कुलकर्णी) मिळालेली तालीम यांचं मिश्रण सौंदर्यपूर्णरीत्या सादर करण्यात मी यशस्वी झाले. ‘बागेश्री’देखील गायले, ताईंनी शिकवलेली. भैरवी, ठुमरी वसंतरावांनी शिकवलेली. कार्यक्रम उत्तम झाला. मंगेश मुळे तबल्याच्या साथीला आणि डॉ. विद्याधर ओक हार्मोनियमच्या साथीला होते. या मैफलीच्या यशामुळे मला लोकप्रियता आणि सन्मान मिळाला. तो काळ सोशल मीडियाचा नव्हता. ‘माऊथ पब्लिसिटी’चा होता. या कार्यक्रमामुळे माझ्या गाडीला भरपूर इंधन मिळालं. इंधनाची टाकी फुल झाली! गाडीनं वेग घेतला.
व्यापक दृष्टी असलेली मंडळी एन.सी.पी.ए.मध्ये एकत्र आल्यानं या संस्थेत अभिजात संगीतावर बरंच काम होत होतं. अनेक शिबिरं, कार्यक्रम होत. पं. शरच्चंद्र आरोलकर बुवांचं एक शिबीर झालेलं मला आठवतंय. ग्वाल्हेर घराण्याच्या अनेक बंदिशी, टप्पे बुवांनी शिकवले आम्हाला. स्तिमित करून टाकणारी गायकी त्यांची. स्वरस्थानं न गाता त्यांच्यामधून जाणाऱ्या मिंडेनं सजलेली गायकी. ठेक्याच्या मात्रा न गाता, त्यांच्या मधून जाणारी मिंडयुक्त लय. एकाहून एक सरस ‘अंदाज की तिहाईयाँ’.
१९८३ मध्ये ‘एन.सी.पी.ए.’ मध्ये नवीन थिएटर बांधून तयार झालं. टाटा थिएटर. यच्चयावत सुविधा असलेलं. फिरता रंगमंच, आलिशान, कृत्रिम ध्वनिव्यवस्थेची गरज नसलेलं थिएटर. माईकशिवाय आपला आवाज १००० लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी रचना असलेलं. या थिएटरमधून दिसणारं अथांग अरबी समुद्राचं दृश्यही सुखकारक. इथल्या कॅफिटेरियामध्ये मिळणारी सँडविचेस आणि फेसाळ कॉफीदेखील मस्त!
डॉ. अशोक रानडे आणि आपले सगळय़ांचे लाडके पु. ल. देशपांडे- भाईकाका, या दोघांनी मिळून एक कार्यक्रम आयोजित केला होता. १९१० ते १९४० या काळातील नाटकांमधील काही पदं सादर करण्याचा. मी, आशा खाडिलकर, शैला दातार, अश्विनी भिडे, शरद जांभेकर, हृषिकेश बोडस आणि चंद्रकांत लिमये, आम्ही सगळे होतो गायला. ४-५ तालमी झाल्या ‘एन.सी.पी.ए.’मध्ये. रानडेकाका आणि भाईकाकांनी गाणी बसवून घेतली. माझ्या वाटय़ाला एक कठीण गाणं आलं होतं. ‘पुष्पपराग सुगंधित’ हे. टप्पा अंगानं जाणारं. जलद ताना असलेलं, लयीला अवघड, तालाला किचकट असं. भाईकाकांनी माणिकताईंना (सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा) विनंती केली, हे गाणं मला शिकवण्याची. त्यांचा हातखंडा होता हे अवघड गीत गाण्यात. भाईकाकांनीदेखील हे गाणं बसवायला मदत केली होती. एका स्वरावरून लांबच्या दुसऱ्या स्वरावर नेणाऱ्या छोटय़ा छोटय़ा जलद तानांनी नटलेलं हे गाणं. भाईकाका म्हणाले, ‘‘याची बढत करताना, ससे इकडून तिकडे उडय़ा मारताहेत अशी कल्पना कर आणि छोटय़ा छोटय़ा, आकर्षक, जलद ताना म्हण.’’ इतकी महत्त्वाची सूचना होती ती! गाणं छान बसलं. छान नटलं!
२१ नोव्हेंबर १९८३ उजाडला. ‘टाटा थिएटर’मध्ये जमलो आम्ही. १००० खुच्र्या असलेल्या थिएटरमध्ये १५०० लोक बसले असावेत. एकही खुर्ची रिकामी नव्हती. आणि पायऱ्यांवरदेखील श्रोते बसले होते. ‘खचाखच भरा हुआ थिएटर’! रानडे काका आणि भाईकाकांचं अभ्यासू, दर्जेदार, रंजक निवेदन आणि आम्हा सगळय़ांची एकाहून एक सरस गाणी. मी सगळय़ात लहान होते रंगमंचावर, २० वर्षांची! गडद निळय़ा काठांची, गडद गुलाबी रंगाची साडी नेसले होते. ताईंकडे साडी नेसून ती सावरत बसनं जाण्याचा बराच रियाज झाला होता. त्यामुळे साडी मला आरामदायक होती. भाईकाका एका तालमीला म्हणाले होते, ‘‘१९१० ची नाटय़पदं १९८३ मध्ये सादर होताना जीन्स पॅन्ट आणि शर्ट अशा आधुनिक पहरावात गा!’’ पहराव बदलला, पण संगीताचे संस्कार बदलले नाहीत, हा त्यामागचा विचार त्यांचा.
अतिशय जाणकार श्रोते जमले होते या कार्यक्रमाला. सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळेही होते. कार्यक्रम रंगत होता उत्तरोत्तर. ‘एकच प्याला’ या नाटकातलं ‘घास घे रे तान्ह्या बाळा’ हे पद मी गाणार होते. भाईकाका बोलत होते या गाण्याबद्दल, त्याच्या पूर्वपीठिकेबद्दल. नाटकातील नायिका सिंधू आपल्या बाळाला भरवतानाचं हे पद. गरिबीनं, पतीच्या व्यसनानं त्रासलेली सिंधू. तिच्या एकंदर परिस्थितीचं वर्णन भाईकाकांनी इतकं सुरेख केलं, की तिथे जणू ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रवेशच उभा राहिला. थिएटरमध्ये ‘पिनड्रॉप’ शांतता होती. मी आर्ततेनं गाऊ लागले. ‘घास घे रे तान्ह्या बाळा, गोविंदा गोपाळा.. भरवी यशोदामाई, सावळा नंदबाळ घेई.. घास घे रे तान्ह्याऽऽऽ बाळा’. ‘तान्ह्या’ नंतरच्या आलापानंतर मी भाईकाकांच्या डोळय़ांत अश्रू तरळलेलं पाहिलं. गाणं संपलं. श्रोत्यांच्या डोळय़ांत अश्रू होते. सगळे भावूक. उत्कट अनुभव होता तो. भाईकाकांच्या निवेदनानं माझ्या आणि श्रोत्यांच्या संवेदना अशा ठिकाणी नेऊन ठेवल्या, की तिथून उत्कटतेनं, आर्ततेनं गाणं अगदी सोप्पं झालं मला आणि श्रोतेही त्या अनुभवाला सामोरे जाण्यासाठी अगदी तयार झाले होते.
हे असे अनुभवदेखील गुरूच! खूप शिकवून जाणारे, शिकवत राहणारे. मला जेव्हा हवं तेव्हा मी या अनुभवांच्या केवळ विचारानंच त्या मनोवस्थेत जाऊ शकते, आजही. आणि त्याच उत्कटतेनं गाऊ शकते. ही त्या अनुभवाची ताकद. त्या अनुभवाच्या वेळी झालेल्या उत्कट मनोवस्थेची ताकद. त्या मनोवस्थेला साथ देणाऱ्या आवाजाची, मन आणि आवाजाच्या टय़ुनिंगची ताकद.
तरल भावनांचा उत्कट अनुभव देणाऱ्या भाईकाकांना सादर प्रणाम!