‘‘गावकऱ्यांनी स्मिताला डॉक्टर म्हणून स्वीकारले असले तरी तिने या परिसराला मनापासून स्वीकारले आहे याची खूणगाठ मला पटली ती स्मिताच्या बाळंतपणात. जन्मल्यावर बाळाला जंतुसंसर्ग झाला. स्मितानं आग्रह धरला असता तर बाळाला मी नागपूरला हलवलं असतंही, पण इथला गाशा मात्र गुंडाळला असता, कारण ज्या सुविधा मी इथल्या गरीब आदिवासींना देऊ शकत नव्हतो त्यांचा वापर स्वत:साठी करण्याचा कोणताही नतिक अधिकार मला नाही, असं माझं प्रामाणिक मत होतं. स्मितानं हलायला नकार दिला. बाळाची तब्येतही हळूहळू सुधारली. आणीबाणीच्या परिस्थितीत स्मितानं घेतलेल्या त्या एका निर्णयामुळे तिनं माझी तत्त्वं आणि स्वप्नं स्वीकारली असल्याची आणि माझ्याप्रमाणे तिची पाळंमुळं या गावात रुजली असल्याची सुखद जाणीव मला झाली.’’ सांगताहेत मेळघाटातील बैरागडमध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. रवींद्र कोल्हे आपली पत्नी डॉ. स्मिता कोल्हे यांच्याबरोबरच्या २६ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
ए म.बी.बी.एस. झाल्यावर दुर्गम भागात जिथं डॉक्टर पोहोचलेला नाही अशा भागात जाऊन काम करण्याचं मी ठरवलं. त्यापूर्वी सुमारे ३७ सेवाभावी संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कार्यपद्धतीचा मी बारकाईनं अभ्यास केला आणि मगच आपली कोणतीही संस्था न काढता गरिबातल्या गरीब माणसाला वैद्यकीय सेवा द्यायची या निश्चयानं मेळघाटातील सातपुडा पर्वतामध्ये वसलेल्या बरागड या गावाची निवड केली.
तेथील आदिवासी आपल्याला स्वीकारतील की नाही, ही शंका मनात होती, कारण औषधांपेक्षा जडीबुटींवर त्यांचा अधिक विश्वास असतो, असं ऐकलं होतं; परंतु पहिल्या दिवसापासून रुग्णांचा ओघ सुरू झाला. उलटय़ा, जुलाब, डांग्या खोकला, क्षय, धनुर्वात, बलाच्या िशगामुळे झालेल्या गंभीर जखमा वा सुरुंगस्फोटात हाताच्या झालेल्या चिंध्या अशा रुग्णांवर मी उपचार करत होतो. दीड वर्षांनंतर मला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी. करण्यासाठी प्रवेश मिळाल्यामुळे मी नागपूरला परतलो. १९८७ साली एम.डी.ची परीक्षा दिल्यानंतर लग्न करून बरागडला जायचं मी ठरवलं. मी ठरवलं खरं, पण माझ्याशी लग्न करायला तयार कोण होणार याची माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना काळजी वाटायला लागली. याचे कारण म्हणजे भावी पत्नीकडून असलेल्या माझ्या चार अपेक्षा. माझ्या दृष्टीने या अपेक्षा पूर्णपणे व्यावहारिक होत्या. माझ्या अनुभवावर आधारित होत्या. माझी पहिली अपेक्षा होती की, मुलीला चारशे रुपयांत घर चालवता यायला हवे, कारण प्रत्येक रुग्णाकडून मी एक रुपया फी घेत असे आणि महिन्याला साधारण चारशे रुग्ण तपासत असे. दुसरी अट होती की, तिची एका वेळी चाळीस कि.मी. चालायची तयारी हवी, कारण वर्षांतले सहा-आठ महिने पावसामुळे बरागडपर्यंतची एस.टी. सेवा बंद असे. त्यामुळे चाळीस कि.मी. अंतर पायीपायी चालत पार करावे लागे, तेही रानावनातून, कधी भलीमोठी चढण चढत, तर कधी उतरत. तिसरी अट होती- पाच रुपयांत लग्न करण्याची, कारण नोंदणी पद्धतीने लग्न करायला तेवढा खर्च येत असे आणि चौथी अट होती- स्वत:साठी नाही, पण इतरांसाठी भीक मागायची तयारी ठेवायची. ही अट घालायचे कारण म्हणजे दुसऱ्याकडे भीक मागताना स्वत:चा अहंभाव सोडायला लागतो. सामाजिक काम करताना या अहंचा अडथळा ठरू नये यासाठीची ही अट. या अटी ऐकून अनेक मुलींकडून नकार येत होते. तशातच कुणी तरी स्मिता मांजरे ही मुलगी सुचवली. स्मिता होमिओपॅथीची डॉक्टर. तिला भेटायला मी तिच्या दवाखान्यात गेलो. भारीपकी साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, पायात फॅशनेबल चपला अशा अवतारातील स्मिताला पाहून आपला इथेही ‘राँग नंबर’ लागला असल्याचं माझ्या लक्षात आलं; पण स्मितानं बोलायला सुरुवात केली आणि आमच्या गप्पा चांगल्या दोन तास रंगल्या. विचारांचा धागा जुळतोय याची आम्हाला जाणीव झाली. स्मिताचं राहणीमान जरी उच्चभ्रू स्तरात मोडणारं असलं तरी सामाजिक कामात तिला असलेला रस तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नंतर आम्ही अनेक वेळा भेटलो आणि पूर्ण विचारांती लग्नाचा निर्णय घेतला. आम्हाला ओळखणाऱ्या सर्वाना हा निर्णय ऐकून धक्काच बसला. स्मितासारखी फॅशनेबल मुलगी माझ्याबरोबरच्या वनवासी आयुष्याला लवकरच कंटाळून जाईल, अशी शंका अनेकांनी बोलून दाखवली. कुणाकुणाला तर तिचा हा निर्णय आत्मघातकी वाटायला लागला; पण कुणाच्याही टीका-टिप्पणीकडे आम्ही लक्ष दिलं नाही. आमचा निर्णय पक्का होता. २ डिसेंबर १९८९ रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. स्मितानं १५ रुपयांची साडी खरेदी केली आणि आम्ही बरागडला आमच्या घरी आलो.
यापूर्वीचं सगळं आयुष्य नागपूरसारख्या शहरात गेलेल्या स्मितानं बरागडचं कच्चं झोपडीवजा घर, शेणानं जमीन सारवणं, विहिरीवरून पाणी आणणं, शिवाय वीज नाही, फोन नाही अशा अपरिचित आयुष्याशी काही दिवसांत जुळवून घेतलं. लग्नाआधी ती मला म्हणाली होती, ‘‘मी कधी चूल पेटवली नाही, मला चहासुद्धा करता येत नाही.’’ तेव्हा मी तिला दिलासा दिला होता की, काही हरकत नाही. मला पुरणा वरणाचा स्वयंपाक करता येतो; पण प्रत्यक्षात तो करून घालणं शक्य झालं नाही, कारण बरागडला आल्यावर रुग्णांची जी काही रीघ सुरू झाली, की तिला स्वयंपाकात मदत करायची गोष्ट तर राहोच, वेळच्या वेळी मला पोळीभाजी खायला वेळ मिळणं कठीण व्हायला लागलं. पावसाळा सुरू झाला आणि तिच्या दृष्टीनं एक नवंच संकट उभं राहिलं. पाऊस सुरूझाल्यावर साप, िवचू, बेडूक आणि नानाविध कीटक, कधीकधी तर अजगरही घरात घुसू लागले. मला त्याची सवय होती. घरातलं हे प्राणिसंग्रहालय पाहून तिची प्रचंड चिडचिड होई. ‘‘मला हे बिलकूल आवडत नाही रवी.’’ हे वाक्य मला दिवसातून दहा वेळा ऐकायला लागे. एकदा मी तिला गमतीने म्हणालो, ‘‘स्मिता, तू असा का नाही विचार करत, की हे जंगल त्यांचं आहे. आपण त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. ती बेडकी बघ, तुझ्यासारखं त्या बेडकामागे तुणतुणं लावत आहे- काय ही माणसं! मला नाही आवडत. मोकळेपणी किडेही खाता नाही येत.’’ यावर ती हसून सोडून देत असे. पुढे आमची मुले साप पकडायला शिकली. त्यांच्याबरोबरीने तीही साप, नाग पकडून जंगलात सोडून द्यायला लागली.
नागपूरमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून स्मितानं नाव कमावलं होतं. इथे आल्यावरही माझ्या कामात मदत करायची तिची इच्छा होती; पण माझा स्वत:चा होमिओपॅथिक उपचार पद्धतीवर फारसा विश्वास नव्हता. अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीतील उपयुक्त ठरतील अशा गोष्टी शिकायची तिची तयारी होती; पण मला वेळ होत नव्हता. परंतु बाळंतपणात बाई अडली तर माझ्या अनुपस्थितीत स्मिता तिचा जीव वाचवू शकेल याची मला खात्री होती. आमच्या लग्नाचं नक्की झाल्यावर माझ्या सांगण्यावरून नागपूरच्या मातृसेवासंघात जाऊन तिनं बाळंतपण कसं करायचं हे शिकून घेतलं होतं. मीही तिला अनुभव मिळावा म्हणून बाळंतपणाची केस आली की आवर्जून बरोबर घेऊन जात असे; पण गाववाल्यांना मात्र ती डॉक्टर आहे हे पटत नसे. एक स्त्री डॉक्टर असू शकते हे त्या समाजाच्या पचनी पडण्यासारखं नव्हतं. त्यांच्या दृष्टीनं ती फार तर नर्सबाई होती. एकदा किडनी स्टोनची महिला रुग्ण दवाखान्यात आली. माझ्या मते तिच्यावर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नव्हता; जी तिथे शक्य नव्हती. स्मितानं माझ्या परवानगीनं तिला होमिओपॅथीची औषधं दिली आणि बघताबघता तिच्या वेदना थांबल्या. एकदा उलटय़ा-जुलाबाने हैराण झालेल्या रुग्णाबाबत हाच अनुभव आला. तेव्हा माझाही होमिओपॅथीवर विश्वास बसला. एकदा तर हरिराम कामू या जखमी रुग्णाला घेऊन गावकरी आले. तेव्हा मी परगावी गेलो होतो. जंगलात शिकारीला गेलेला असता वाघाशी झालेल्या झटापटीत तो रक्तबंबाळ झाला होता. स्मितानं चारशे टाके घालून त्याचा जीव वाचवला. पाणीही न पिता आठ-दहा तास ती काम करत होती. ते पाहून गावकऱ्यांचा तिच्या वैद्यकीय ज्ञानावर विश्वास बसला आणि मग मात्र ती नर्सबाईची डॉक्टर झाली.
गावकऱ्यांनी स्मिताला डॉक्टर म्हणून स्वीकारले असले तरी तिने या परिसराला मनापासून स्वीकारले आहे याची खूणगाठ मला पटली ती स्मिताच्या बाळंतपणात. तिच्या पहिल्या बाळंतपणात आमच्या बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे असल्यामुळे प्रसूती व्हायला खूप प्रयास पडले. जन्मल्यावर बाळाला लगेचच जंतुसंसर्ग होऊन न्यूमोनिया आणि सेपटिसिमिया झाला. माझ्याकडे उपचारासाठी पुरेशी औषधे होती; परंतु बाळ प्रतिसाद देत नव्हता. अशा परिस्थितीत त्या भागातील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणकुमार परदेशी यांनी बाळाला नागपूरला हलविता यावे यासाठी जीप पाठविली. मला स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानाविषयी शंका नव्हती आणि जगात कुठेही गेलो असतो तरी याशिवाय वेगळे इलाज नाहीत याची खात्री होती. तरीही बाळाला तिथून हलवायचे की नाही हा निर्णय मी स्मितावर सोडला. स्मितानं आग्रह धरला असता तर बाळाला मी हलवलं असतंही, पण त्यानंतर इथला गाशा गुंडाळून प्रॅक्टिस करण्यासाठी मोठय़ा शहरात गेलो असतो, कारण ज्या सुविधा मी इथल्या गरीब आदिवासींना देऊ शकत नव्हतो त्यांचा वापर स्वत:साठी करण्याचा कोणताही नतिक अधिकार आपल्याला नाही, असं माझं प्रामाणिक मत होतं; परंतु वस्तुस्थिती समजून घेऊन स्मितानं तिथून हलायला नकार दिला. हळूहळू आमच्या बाळाची तब्येतही सुधारली. आणीबाणीच्या परिस्थितीत स्मितानं घेतलेल्या त्या एका निर्णयामुळे तिनं माझी तत्त्वं आणि स्वप्नं स्वीकारली असल्याची आणि माझ्याप्रमाणे तिची पाळंमुळं या गावात रुजली असल्याची सुखद जाणीव मला झाली.
गावातल्या लोकांचाही आमच्यावर इतका विश्वास बसला की, आम्हाला वैद्यकीय विषयातील कळतं म्हणजे सर्वच विषयांतील कळत असणार असं गृहीत धरून घरगुती भांडणापासून शेतीविषयक अडचणींपर्यंत अनेक विषयांवर सल्ला घेण्यासाठी ते आमच्याकडे येत. अशा वेळी फक्त कुंपणावर बसून सल्ला देणं आम्हाला दोघांनाही जमलं नाही. आम्ही शेतीविषयक प्रयोग करायचे ठरविल्यावर शेतातले अवजड दगड उचलतानाही स्मिता कधी मागे राहिली नाही. माझ्याबरोबरीनं अंगमेहनतीची कामे तिनं केली. त्यामुळेच यशस्वीपणे शेती करून शेती फायद्यात होऊ शकते, हे आम्ही दाखवून देऊ शकलो. आमच्या येथील भिलड बाबाच्या मेळाव्यात बळी दिले जाणारे बळी आणि त्यामुळे वाहणारे रक्ताचे पाट, मुंडक्यांचा खच पाहून माझ्याप्रमाणे स्मिताही अस्वस्थ झाली. ते दृश्य पाहून तिनं मांसाहार सोडून दिला. बळीची प्रथा बंद होण्यासाठी गावकऱ्यांना हाताशी धरून आम्ही अथक प्रयत्न केले. त्याला यश आलं.
मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, सक्तीचे धर्मातर, मध्ययुगात शोभावेत अशा प्रकारे स्त्रियांवर होणारे अत्याचार, सरकारी कामकाजातील भ्रष्टाचार, वनतस्करी अशा एक ना अनेक समस्या घेऊन गावकरी समोर आले तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो. त्यासाठी असंख्य वेळा कोर्टकचेऱ्या केल्या; परंतु एक-दोन अपवाद वगळता, आम्हाला तिथेही कधी न्याय मिळाला नाही. कधी साक्षीदार फुटले, कधी न्यायाधीश उलटले. आम्ही अवलंबिलेला ध्येयवाद आणि सत्यावरची निष्ठा सहन न होऊन कुणी घर पेटवलं, कुणी पशात बुडवलं. कुणी जिवावर उठलं. अशा प्रसंगांना सामोरे जाताना आमच्या दोघांमध्येही कैक वेळा मतभेद झाले. कधीकधी तर मनातले राग-उद्वेग टोकाला पोचले, कारण आम्ही दोघंही मनस्वी, दोघंही आग्रही. आग्रहाचं परिवर्तन दुराग्रहात होऊ नये अशी आजूबाजूची परिस्थिती. बरागडचा धबाबा पाऊस. साप-िवचवांचा सहवास. पशाची चणचण. आमच्या दोघांच्या वाटय़ाला आलेली आजारपणं नि अपघात. रोजचं जगणं आव्हान ठरावं असं वास्तव स्वीकारताना एका क्षणी आम्ही ठरवलं की, दोघांनी उभं केलेलं घर दोघांनी मिळून सावरायचं आहे. एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन भिन्न असतो हे दोघांनी मिळून समजून घेतलं. नुसतं समजून घेतलं नाही तर एकमेकांच्या मतांचा आदर करत आचरणात आणलं. म्हणूनच दोघांमधील नातं घट्ट होत गेलं. मी गांधीवादी, तर महाविद्यालयात असल्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केलेल्या स्मिताची विचारसरणी िहदुत्वाकडे झुकणारी; परंतु कोणत्याही वादापलीकडे पोहोचणारा मानवता धर्म हा आपला पहिला धर्म आहे हे आम्ही दोघांनी समजून घेतल्यामुळे धर्मातराचा प्रश्नसुद्धा बरागडमध्ये दंगाधोपा न होता आम्ही हाताळू शकलो याचा आम्हाला अभिमान
आहे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही काही मित्रांनी मिळून बरागडसारख्या ठिकाणी जाऊन काम करण्याचा निश्चय केला होता. मित्र आणि पत्नी दोघेही सोबत असावेत अशी माझी इच्छा होती. मित्रांनी माझ्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न केलाही, पण काही ना काही कारणाने ते कायमस्वरूपी साथ देऊ शकले नाहीत, याची खंत मला आजही आहे. त्याच वेळी संघर्षांचे अनेक प्रसंग आले तरी स्मिता सोबत राहिली याचे समाधानही आहे. एकमेकांना साथ देणारे पती-पत्नी असतील तर त्यांची ताकद दुप्पट नाही तर चौपट होते याचा अनुभव मला कायमच आला.
२०१३ साली आमच्या लग्नाला पंचवीस वष्रे पूर्ण झाली. लग्न करताना मी चार अटी घातल्या होत्या, त्या शहरी आयुष्यापेक्षा सर्वस्वी वेगळं आणि कष्टप्रद असं आयुष्य जगण्याची तयारी असावी म्हणून. स्मितानं हे आयुष्य हसतमुखानं स्वीकारलं. फक्त स्वीकारलं नाही, तर त्यात झोकून दिलं. म्हणूनच एकमेकांच्या सहवासात जगण्याचे वेगवेगळे आयाम आम्ही समजून घेऊ शकलो. गांधीजींची अन्त्योदयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवू शकलो. आजही आम्ही कच्च्या घरात राहतो. दर पावसाळ्यात दोघं मिळून घर शाकारतो. शेणानं जमीन सारवतो. चुलीवर स्वयंपाक करतो. त्यामुळे गरिबातल्या गरीब आदिवासी माणसाला आपले वाटतो. गेल्या २५-३० वर्षांमध्ये मेळघाटात पक्के रस्ते झाले आहेत. एस.टी.ची वाहतूक सुरू झाली आहे. तरीही उर्वरित महाराष्ट्रापासून असलेलं त्याचं तुटलेपण अजून संपलेलं नाही.
हे तुटलेपण फक्त भौगोलिक नाही, तर मानसिक आहे, भावनिक आहे. जेवढी जास्तीत जास्त माणसं मेळघाटात येतील, स्थानिक लोकांशी संवाद साधतील, त्यांच्या जवळ असलेलं तंत्रज्ञान आणि कौशल्यं यांची ओळख करून देतील तेव्हाच मेळघाटाची नाळ महाराष्ट्राशी नाही तर जगाशी जोडली जाईल. तिथं नव्यानं येणाऱ्या माणसांच्या स्वागतासाठी आमचं वास्तव्य तिथं असणं किती महत्त्वाचं आहे हे आम्ही दोघंही समजून आहोत.
म्हणूनच इथे येणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी कडय़ाकुलपं नसलेल्या आमच्या घराचे दरवाजे सदैव उघडे आहेत. यातच आमच्या सहजीवनाचं सार्थक सामावलेलं आहे.
शब्दांकन – मृणालिनी चितळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा