लोकसंस्कृती अनेकांगांनी पाण्याच्या अधिष्ठानावर उभी आहे. पाऊस आणि पाणी यांच्या स्त्रीमनात एक अनोखं स्थान आहे. तिच्या भावनेतून, विचारातून, ओव्यातून हे नातं उलगडत जातं, ‘वळीवाच्या पाऊसानं जिमिनबाई भरदान. ताईत बंधूराया तिची वटी भर।’ अशी जमिनीची ओटी भरायला लावणाऱ्या, पावसाशी थेट संवाद साधणाऱ्या लोकसंस्कृतीचे हार्द-गाभा अर्थात हृदयाशी असलेलं नातं सांगणारा लेख.
आ पल्या भारतीयांच्या अर्थात महाराष्ट्रातल्याही लोकसंस्कृतीत निसर्ग अनेक प्रकारे येत असतो. सण-वार, चाली-रीती, रूढी, समजुती त्या निमित्ताने होणारे आचार, व्रत-वैकल्ये आणि सर्व प्रकारचे कलात्मक आविष्कारही निसर्ग संवादी, निसर्ग केंद्री आहेत. हल्ली ‘पर्यावरण’ हा शब्द वापरला जातो. पण मला तो अगदीच ओबडधोबड वाटतो…. 
लोकसंस्कृतीतल्या त्याच्या स्थानाच्या दृष्टीने ओबडधोबड! त्यापेक्षा निसर्ग बरा पण त्याहीपेक्षा अन्वर्थक, योग्य म्हणजे प्रकृती! प्रकृतीत सहजता आहे, आपोआपपणा आहे; सहज स्वीकार आहेच. पण त्याहीपेक्षा आपण माणसे आणि सर्व चराचर सृष्टीही एकच आहोत. आपण सर्व मिळून प्रकृती आहोत. या विश्वात निर्माण झालेले आहोत. आपले सर्वाचे मूलतत्त्व एकच आहे. पर्यावरण शब्दाला सतत उपयुक्ततेचा एक पैलू असतो. तर प्रकृती माणसासह सर्व स्थिरचराला कवेत घेणारी! तीत एकत्व आहे. उपयुक्ततेपेक्षा ‘ममत्व’ आहे. मी आणि प्रकृती भिन्न, वेगळे नाही हे अभिप्रेत आहे. ‘मी’ (माणूस) प्रकृतीचाच एक भाग आहे. त्यामुळे प्रकृतीमध्ये झालेले, केलेले बदल माझ्यातही होतात. प्रकृतीतल्या इतर घटकांशी असलेले माझे नाते जैविक आहे, सहोदरत्वाचे आहे, हे गृहीततत्त्व आहे.
ही थोडी गंभीर प्रस्तावना झाली का? पण ती लक्षात घेतल्याखेरीज लोकसंस्कृतीचे हार्द-गाभा अर्थात हृदयाशी असलेलं नातं नीट उलगडणार नाही. कळणार नाही. आज आपण ते हरवून बसलो आहोत.
लोकपरंपरेतील स्त्रियांच्या ‘पाणी’ आणि पाण्यासंबंधीच्या बाबींसंबंधीच या लेखात विचार करू. विशेषत: लोकपरंपरेतील स्त्रियांची गाणी, ओव्या, कथा या केवळ ग्रामीण, अनक्षर, जुन्या काळातल्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे एक तर ‘अडाणी(?) खरे तर ‘अनक्षर’ असूनही किती छान!’  असा कौतुकाचा एखादा उद्गार किंवा ‘आहे झालं जुनंपानं काही तरी भरताड!’ असा उपेक्षेचा सूर असतो. त्यात वर्णन केलेल्या बाबींचं आपल्या आजच्या जगण्याशी काय नातं आहे. जाते, विहीर, बैल, मोट यांचा आणि आपला काय संबंध! यातल्या अनेक वस्तू नवीन पिढीनं पाहिलेल्याही नाहीत हे खरं! पण त्या ओव्यांतून – गाण्यांतून व्यक्त झालेली संवेदना आपण कशी स्वीकारणार आहोत? तसं बालकवींच्या ‘फुलराणी’चं आणि आपलं तरी काय नातं?
आपणा नागरी मंडळींचा पावसाशी संबंध येतो तो (हल्ली) रस्त्यात पाणी साचणं, उन्हाळ्यात पाणीपुरवठा (नळाचा) कमी होणं, म्हणून धरणांची जलसंधारणाची चर्चा! केवळ उपयुक्त वस्तू म्हणून! पण ‘कृषिनिष्ठ’ (केवळ शेतकरी नव्हे) स्त्री-पुरुष पाऊस पाणी आपलाच एक आप्त, आंतरसखा म्हणून अनुभवतात- ती वस्तू दूरस्थ नसते. ती जणू व्यक्ती असते. पाऊस, पाणी, नद्या, जलाशय त्यांच्या ओवीत, कवितेत चेतन व्यक्तिमत्त्व घेऊन येतात. त्या कवितेतल्या केवळ उपमा, उत्प्रेक्षा, रूपक अशी वरवरची अलंकरणे नसतात. ते आपल्या अस्तित्वाचेच एक अंग असते.
म्हणून मग (दगडाचे) जाते हा देव असतो, अंतरीचं ‘गूज’ ज्याच्याजवळ मोकळेपणाने बोलावे असा सखा असतो. नाग भाऊ असतो, कधी प्रियकर असतो, नदी आई असते, बहीण असते, समुद्र बाप असतो. विहीर सखी असते, तुळस लेक असते अशी अवती भवतीची सगळी सृष्टीतत्त्वे साजिवंत – जिवंत सखेसोबती असतात. त्यांच्यात देवत्वही असते. पण हा देव ‘सखाभाव’ असलेला! त्याचे भय नसते. अगदी पंढरीचा विठ्ठलही कधी बाप, कधी भाऊ, कधी सखा-मित्र! म्हणून त्याच्याजवळ तक्रारी सांगणं, प्रेम मोकळेपणानं सांगणं, त्याला चिडवणं, थट्टामस्करी करणं तर कधी त्याला चक्क शिव्या घालणं! (अरे विठय़ा अरे विठय़ा। (मूळ मायेच्या कारडय़ा।।
-जनाबाई) असं सगळं असतं. सजीव-निर्जीवाचे आपले आजचे हिशेब लोकसंस्कृतीत नसतातच! भावबंध प्रबळ! सगळं चराचर आणि मी – माणूस एकाच मुशीतून आलेलं आणि हेही प्रकृतित:च सहज अनायाने स्वीकारलेलं. हे सगळं लक्षात घेऊन लोकसंस्कृतीतल्या पाऊस पाण्यात थोडं भिजावं.
मग एखादी ओवी सहजच सांगते,
 ‘‘ज्याला नाही लेक। त्याने तुळस लावावी।
    लगीन लावून देव करावे जावई।।’’
यातला नर्म विनोद, युक्तिवाद, प्रकृतीशी चेतन नातं हे सगळं आजच्या ‘स्त्री-भ्रूणहत्या’ करंटय़ा मानसिकतेला कसं उमगणार। (आणि पचणार?)
‘‘पड पड पाऊसा काय पडूसं वाटेना।
   पाप धरतीला साठवेना।।’’
किंवा
‘‘पडू दे पाऊसा, पिकू दे माझा मका।
करीन तुझ्या डोरल्याला टिका।’’
असा पावसाशीच थेट संवाद चालतो तो जणू आपला सखा-बंधू समजून!
असंच विहिरीशीही नातं असतं.
‘‘नवस करू गेले हिरीबाई तू सुंदरी।
जतन कर माझे चारी बैल, मोटकरी।।’’
विहीर देवता म्हणून नवस पण ‘सुंदरी’ सखीही मोटेला बैल जोडून चालवणं कौशल्याचं काम, म्हणून नव्यानं मोट चालवायला लागलेल्या मुलाची मोटकरी लेकाची काळजी! म्हणून विहिरीचीही विनवणी।
‘‘हात मी जोडीते, हिरीबाईच्या काठाला।
बाळ माझा लहान, नवा लागला मोटंला।।’’
अनेक प्रकारांनी पाऊस पाणी लोकपरंपरेतल्या ओवी गीतात अवतरतं-
 दोन भावनांची आणि आशयांची अनेक वलयं बोली भाषेत पाण्याभोवती फिरत असतात.
पोरीबाळांना निष्कारण पिडणारे ‘सडक सख्या हरी’ (रोड रोमियो) नेहमीच असतात. आधुनिक काळात बायका-मुली धीट झाल्या आहेत. (असं म्हणतात) तरी त्यांचा उपद्रव होतोच. पण लोकपरंपरेत जात्यावर दळण दळणारी एखादी धीट सखी सुनावते,
‘‘आम्ही कुलवंताचा लेकी-
   जशा तलवारीच्या अण्या।
   जाईल तुझं पाणी
   दुरून बोल शहाण्या।’’
असं ‘पाणी’ बोली भाषेतूनही ओसंडून वाहत असतं. ही एक जात्यावरची ओवी आहे.
पाऊस-पाणी, नद्या, विहिरी, सागर यांची वर्णनं करणाऱ्या किंवा रूपकं म्हणून या सर्वाचा जात्यावरच्या ओव्यांतून फार सुंदर, सहज उपयोग केला आहे. केला आहे म्हणण्यापेक्षा तो सहज झाला आहे, आपोआप झरणाऱ्या पावसाच्या धारांसारखा!
वेळेवर हवा तसा पाऊस झाला नाही तर एरवी धाडसी असलेला शेतकरी गडीही कावराबावरा होतो.
 ‘‘पड पड पावसा, नको बघूस ताला माला।
ताईत बंधू माझा, कुणबी अट्टलाचा भ्याला।।’’
मग पाऊस आला की ही बहीणच सुखानं ओथंबून येते.
‘‘पावसानं फळी मांडली कोसावरी।
माझ्या बंधूच्या ऊसावरी।।’’
वळिवाचा पाऊस तर फार महत्त्वाचा! उन्हाळाभर रखरखलेल्या जीवांना आणि जमिनीला प्राणदाता ठरणारा! वाजत-गाजत, गर्जत, विजा चमकवीत येणारा! त्याचं वर्णन करणाऱ्या ओव्या या सुंदर उत्कट भावकविताही आहेत.
‘मेघराजाचा वाजे डफ। ईजबाईचं नर्तन
मागं पावसाचं येनं।।’
‘वळीवाच्या पाऊसानं जिमिनबाई भरदार
ताईत बंधूराया तिची वटी भर।।’
जमिनीची ओटी भरणारी ही मानसिकता कशी उमगणार?
कृष्णा-कोयनेकाठच्या लोकपरंपरेतील कवयित्रींनी त्या नद्यांची सुंदर चेतनरूपं ओव्यांतून रंगवली आहेत.
‘पंचगंगेपरास कृष्णाबाई किती धीट।
जाते दत्तगुरुच्या पायाशी नीट।।
कृष्णेचा महापूर नरसोबाच्या वाडीत ज्यांनी पाहिला आहे, त्यांना या ओवीची गंमत कळेल आणि ओवीकर्तीची संवेदनशीलता आणि भाषाप्रभुत्व जाणवेल.
– कृष्णाबाई बोले, अवखळ माझे बहिणी
थीर चालावं माझ्यावाणी।।
कृष्णा-वारणेपेक्षाही कराडला होणारा कृष्णा कोयनेचा ‘प्रीतिसंगम’ अनोखा आहे. परस्परविरोधी दोन्ही दिशांनी समोरासमोरून वाहत येणाऱ्या नद्यांचे संगम दुर्मीळ असतात. कृष्णा-कोयनेचा संगम, त्यांपैकी एक! तो ‘प्रीतिसंगम’ आहे.
‘कृष्णा मिळाली कोयनेप्रती
सखे ग सुरेख संगम किती’
असं एक स्त्री-गीत आमची आई म्हणत असं. जात्यावरच्या ओव्यातून तर नद्यांची किती तरी देखणी चित्रं आहेत.
‘‘बारा वरसांनी बहीण भागीरथी (गंगा) आली-
कृष्णा उठून भेटली, कोयना हुंदक्यानं दाटली।’’
कृष्णा-कोयनेच्या प्रवाहात बारा वर्षांनी गंगा अवतरते अशी लोकश्रद्धा आहे. तशीच चंद्रभागाही ओवीत येते.
‘‘भरली चंद्रभाग, नाव झालीया नवरी।
पिर्तीचा पांडुरंग, शेला जरीचा आवरी।।’’
किंवा-
‘‘चंद्रभागेला आला पूर पंढरीला पडला वेढा।
सोन्याच्या इटेवर, इट्टल-रखमाईचा जोडा।।’’
-‘‘करमाईला साडीचोळी, सत्तभामेला दोखा।
माझ्या सुळसाबाईला, थंड पान्याचा गारवा।।’’
विठ्ठलाशी संबंधित तीन स्त्रियांचे नातेसंबंध किती सूचकपणे अल्पाक्षरात सांगितले आहेत!
– अशी अनक्षर पण शहाणी ग्रामकन्या पंढरीला जाण्याची असोशी बाळगून असते. पंढरीला जाऊन आल्यावर भल्याभल्याना सांगता येणार नाही. अशा साध्या आणि नेमक्या शब्दात मानवी देहाचं मर्म सांगते.
‘‘सया पुशीताती, पंढरी जाऊन काय केलं?
चंद्रभागेच्या पान्यानं, देह भांडं उजळलं।
 देह केवळ भांडे। बाहेरचे आवरण।
भांडय़ाच्या आत पाणी असेल, प्राण असेल तरच त्याचं महत्त्व! जल म्हणजे जीवन, प्राण हा इत्यर्थ।
लोकसंस्कृती अशी अनेकांगांनी पाण्याच्या अधिष्ठानावर उभी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा