डॉ. नितीन बळवल्ली
लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय (सायन)- आमचं कॉलेज. पहिलाच दिवस. उत्सुकता आणि धाकधूक. सूचना येते- ‘विभागप्रमुख डॉ. नरसिंह दाभोलकर लेक्चर घेतील. प्रत्येकानं आपापल्या रोल नंबरप्रमाणेच बसायचं आहे. लेक्चर सुरू होताच दारं बंद होतील. उशिरा प्रवेश मिळणार नाही.’
सर येतात. उंच, शिडशिडीत. पन्नाशीचे. भव्य कपाळ, रिमलेस चष्मा. गालांची हाडं उंच. केस चापूनचोपून बसवलेले. तुळतुळीत दाढी केलेली. बोलणं खणखणीत,पण संथ लयीत. सर पुनरुच्चार करतात- ‘‘रोल नंबरप्रमाणेच बसायचं. एप्रन हवाच. दुपारी टय़ुटोरिअल्स आणि तोंडी परीक्षा. सुटका नाही.’’ पहिल्या लेक्चरचा पहिला शब्द ते फळय़ावर लिहितात- ‘होमिओस्टेसिस’. म्हणजे पेशीच्या यंत्रणेतील बिघाड नैसर्गिकरीत्या पूर्वपदाला येण्याची क्रिया. लेक्चर संपतं. वर्गात नाराजीचा सूर. ‘‘अरे हे मेडिकल कॉलेज आहे की शाळा?’’ मुलं आपला वरचढपणा दाखवण्याचा विचार करत असतात. पण दुसऱ्याच लेक्चरपासून सर एकेकाला त्यांचं संपूर्ण नाव घेऊन उठवू लागतात, तेव्हा हे साधं काम नाही हे लक्षात येऊ लागतं. तरीही, ‘‘हं, त्यात काय? सुरुवातीलाच सर्वाकडून फॉर्म भरून घेतले होते फोटोसकट! तेच हे पाठ करून आपल्यावर रुबाब दाखवत असतील.’’ एकादोघा धीट मुलांनी इतरांना पटवून दिलं. गैरहजर विद्यार्थ्यांला पुढल्या लेक्चरला सर उभं करत. ‘‘राहिलेला पोर्शन कव्हर करून घ्या. नाही तर माझ्या ऑफिसमध्ये कॉलेज संपल्यावर भेटा. काही अडचण असल्यास मी पुन्हा शिकवीन.’’ आपली पूर्ण कुंडली सरांना पाठ असणार हे प्रत्येकाच्या आता लक्षात आलं होतं. त्यांचे स्मरणशक्तीचे हे अचाट प्रयोग बेटकुळय़ा दाखवण्यासाठी नसून प्रत्येक विद्यार्थ्यांबद्द्ल असलेल्या आस्थेमुळे होते, हे नाठाळ पोरांच्याही ध्यानात येऊ लागलं होतं.
दर महिन्याला परीक्षा असे. त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा, म्हणजे ‘पासिंग’पेक्षा कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वेळेनंतर जादा टयुटोरिअल्स. इंग्रजी कच्चं असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीच्या शिक्षकाची नेमणूक. हुशार गणल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडलेल्या विद्यार्थ्यांला घासूनपुसून योग्य मार्गावर आणण्यात त्यांना जास्त रुची होती. कॉलेजची वेळ संपल्यावरही सरांच्या ऑफिसचे दिवे चालू असायचे. ऑफिसची खोली प्रशस्त, स्वच्छ व टापटीप होती. त्यांच्या टेबलावर रामकृष्ण परमहंस यांचा छोटासा फोटो होता. भिंतीवर इंग्रजीत सुविचार लिहिलेला होता Great minds discuss IDEAS, Average minds discus EVENTS, Poor minds discuss PEOPLE. कॉलेजनंतर अभ्यासात मागे पडलेल्या मुलांसाठी सरांचं जादा शिकवणं सुरू झालं. सरांशी मराठीत बोललो, तरी सरांचं उत्तर नेहमी इंग्रजीमध्येच असे. ही कसरत तोंडी परीक्षेत विद्यार्थी उत्तरं देताना अडखळू नयेत म्हणून! एक ‘रिपीटर’ विद्यार्थी त्या खास वर्गात होता. सर त्याला मात्र मराठीत समजावून सांगत. ‘‘पाठ करायचं नाही. विषय समजून घ्यायचा,’’ असं समजावत.
तिमाहीनंतर सरांचा शैक्षणिक प्रयोग सुरू झाला. म्हणजे पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची शेवटी आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर जोडी. दुसऱ्याची शेवटून दुसऱ्याशी. हुशार आणि कमजोर विद्यार्थ्यांच्या जोडगोळीनं आपापसांत चर्चा करून विषय समजून घ्यावा ही त्यांची अपेक्षा! पुन्हा तीन महिन्यांनी परीक्षा झाल्या की नवीन जोडय़ा. शिकवताना त्यांचं सामाजिक भान सहजपणे व्यक्त होत असे. एकदा ते ‘मानवी प्रजोत्पादन’ हा विषय शिकवत होते. ‘प्राण्यांचं प्रजोत्पादन ठरावीक ऋतूंमध्ये होतं, कारण ते सम्प्रेरकांनी (estrous cycle) नियंत्रित असतं. मानवाच्या बाबतीत ही क्रिया वर्षभर चालू असते. त्यामुळे लोकसंख्या किती वाढू द्यायची हे बुद्धीनंच ठरवावं लागेल,’ असं ते सहज सांगून जात.
त्यांची दिनचर्या काटेकोर आणि वक्तशीर होती. कॉलेजला येताना सकाळची ठरलेली लोकल. फस्टक्लासच्या डब्यातली ठरलेली सीट. वर्षांनुवर्ष त्यात खंड नाही. वाटेत भेटलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा अभिवादन करणार. कॉलेजात कायम एप्रन. सहकाऱ्यांशी नेहमी सौजन्यानं वागणार. जिथे रांगेत उभं राहायचं तिथे रांगेतच उभे राहणार. कॉलेज विद्यार्थ्यांच्या विश्वात प्राध्यापकांना टोपणनाव असतं, जे बहुधा त्यांचं अर्कचित्रच असतं! डॉ. दाभोलकरांचं ‘बाप’ हे टोपणनाव पूर्वापार चालत आलेलं आणि कायम टिकलेलं. त्या नावाची यथार्थता विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांनी अनुभवली. विभागप्रमुख (शरीरक्रिया शास्त्र) म्हणून सरांनी अनेक वर्ष काम केलं. काही काळ ते डीनसुद्धा होते.
सर निवृत्त होऊनही दशकं लोटली. एकदा सर्वोत्तम प्राध्यापक असलेल्या सरांना भेटण्यासाठी स्नेहसंमेलन घेण्याचं ठरलं. स्थळ- सायनच्या ‘लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज’चाच शरीरक्रियाशास्त्राचा लेक्चर हॉल. लेक्चरचा विषय ठरला ‘Physiology of Human Consciousness म्हणजे ‘मानवी जाणीव’. हॉल खच्चून भरलेला. विद्यार्थ्यांच्या बाकांवर आताचे प्रतिथयश डॉक्टर बसले होते. प्रत्येकाला मेडिकल कॉलेजच्या पहिल्या दिवसाचीच आठवण येत होती. सर आले. वयोमानानुसार किंचित वाकलेले. पुढे आलेल्या दातांपैकी एक गैरहजर! त्यामुळे बोलण्याला एक मिश्कील झाक. पण वाणी अस्खलित. वय ऐशीला टेकलेलं असूनही कित्येकांना नावानं बोलावून सरांनी आपल्या अचाट स्मरणशक्तीचा प्रत्यय दिलाच. पहिल्यांदाच लेक्चर सुरू होताक्षणीच हॉलची दारं बंद करण्यात आली नाहीत! सर म्हणाले, ‘‘अनेक वर्ष मी एक खंत बाळगून होतो. या विषयात जे नोबेलप्राप्त नवं संशोधन होत आहे त्याची ओळख मी तुम्हा सर्वाना करून देऊ शकलो नाही. कारण तो भाग अभ्यासक्रमात नव्हता. आज माझी प्रदीर्घ काळची खंत अंशत: दूर होऊ शकेल.’’ पुढे तासभर कठीण संकल्पना सोप्या करत त्यांचं या विषयावरील चिंतन स्पष्ट करण्यात गेला. श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या सर्वामधून दिसत होती ती त्यांची अध्यापनाची तळमळ, जी एव्हाना प्रौढ झालेल्या माजी विद्यार्थ्यांनाही जाणवत होती. या अफाट विद्यार्थिप्रियतेचं गमक काय? साधेपणा, निरपेक्ष वृत्ती? शेवटच्या विद्यार्थ्यांलाही ज्ञान देण्याची तळमळ, की माणूस म्हणून जाणवलेला मोठेपणा? त्यांचा शिकवण्याचा विषय अगदी पायाभूत, वलय नसलेला, क्लिष्ट. जो पहिल्याच वर्षी शिकविला जातो. प्रत्येकावर, त्यातही मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कष्ट घेऊन, जणू काही एक विद्यार्थी नीट शिकला नाही, तर आपल्या शिकवण्यातच काही न्यून राहिलं, या भावनेनं ते ज्ञान देत राहिले. विद्यार्थ्यांना डॉक्टरीच्या या प्रचंड विश्वात घासूनपुसून पाठवत राहिले. डॉक्टरी पेशाबद्दल नेहमीच बरंवाईट वाचण्यात येतं. बऱ्यापेक्षा वाईटच जास्त! पण डॉ. नरसिंह अच्युत दाभोलकरांसारखे अनेक ‘चितळे मास्तर’ आजही चांगल्याला अधिक चांगलं आणि वाईटाला कमी वाईट करत सर्वदूर कार्यरत असतील. त्यायोगे चांगले डॉक्टर आणि चांगली माणसं घडवण्याची प्रक्रिया निरंतर चालत राहील.
अलीकडेच ६ एप्रिल २०२३ रोजी त्यांचा जीवनप्रवास थांबला. विभागाच्या लेक्चर हॉलचं नामकरण त्यांच्या नावे करून कॉलेजनं त्यांची स्मृती चिरंतन केली आहे.
अभ्यासाचा संस्कार! – स्वाती पाचपांडे
अजूनही तो दिवस मला लख्ख आठवतो. १९८३ हे वर्ष आणि माझा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल त्या दिवशी लागणार होता. प्रचंड धाकधूक होत होती. नाशिकमध्ये तेव्हा भयावह दंगल उसळली होती आणि मी काहीकाळ काकांकडे अडकले होते. माझ्या निकालाची उत्सुकता माझे गुरुवर्य आणि वर्गशिक्षक अविनाश गाडगीळ यांनादेखील तितकीच होती. मी जेव्हा संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे गुणपत्रिका घेऊन गेले नाही, तेव्हा ते स्वत:च माझं घर शोधत आमच्या वाडय़ात आले. खालच्या मजल्यावरूनच त्यांनी आवाज दिला. सर घरी आलेले पाहून आम्हाला अत्यानंद झाला. मला ८५ टक्के गुण मिळाले होते आणि त्यांच्या विषयात अगदी एक-दोन गुण गेले होते. आमच्या बॅचची काही मुलं बोर्डात आली होती. सर प्रचंड खूश होते. सरांनी आमच्यावर घेतलेली मेहनत अशा रीतीनं फलद्रूप झाली होती.
माझी मुलं जेव्हा आज म्हणतात, ‘‘तू आम्हाला अभ्यासाच्या बाबतीत थोडीही चालढकल करू देत नव्हतीस. जी शिस्त तू लावून दिलीस, ती आम्हाला आजही उपयोगी पडते. तर्कशुद्ध अभ्यास करायला तू शिकवलंस.’’ तेव्हा मुलांच्या यशानं समाधान लाभलेली माझ्यातली आई हळवी होत भूतकाळाची सफर करून येते! आयुष्याला समृद्ध करणारे क्षण आठवतात. याच क्षणांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. आयुष्याचा पाया घडवणारे अविनाश गाडगीळसर डोळय़ांसमोर येतात. हे नाव मनात कोरलं गेलं आहे. अजूनही सरांशी अधूनमधून संवाद घडतो आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती लाभलेल्या सरांना विद्यार्थ्यांची नावं आजही आठवतात. ते आवर्जून सगळय़ांची खबरबात घेत असतात. गोरापान कोकणस्थी वर्ण, उंच देहयष्टी, पांढराशुभ्र झब्बा-पायजमा परिधान केलेले आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे सर येताच टाचणी पडल्यावर आवाज व्हावा इतकी शांतता वर्गात पसरत असे. आदरयुक्त दरारा असायचा त्यांचा. सकाळी सहा वाजता आमची बॅच असायची. सर अगदी प्रसन्नचित्तानं शिकवत. विषयाच्या तळाशी जाऊन त्यांचं शिकवणं असायचं आणि मुलांचे चेहरे त्यांना वाचता येत असत. अवघड विषय लीलया सोपे करून शिकवत. सगळी सूत्रं तोंडपाठ! ‘एम.जी.रोड’वरील श्रीरामवाडीमधला सरांचा क्लास म्हणजे तिथे नाशिकमधल्या सगळय़ा हुशार मुलांची मांदियाळी असायची! आज त्यांचे बव्हंशी विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी, तर कुणी डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक आहेत. साधारण ८० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना तिथे इयत्ता आठवीपासून प्रवेश असायचा. त्यामुळे अर्थातच निकोप स्पर्धा असायची. कुठलीच दंगामस्ती किंवा चुकीच्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये घडत नसत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सरांवर. त्यांची ज्ञानलालसा पूर्ण करण्यासाठी सर उत्सुक असत. आणि खरंच.. क्लासचा तो ज्ञानवर्धक एक तास आम्ही कधीच बुडवत नसू.
सरांचं अफाट ज्ञान पाहून आम्ही अवाक व्हायचो. भौतिकशास्त्र आणि गणित हे त्यांचे मुख्य विषय होते. सरांचं प्रत्येक विद्यार्थ्यांकडे अगदी बारीक लक्ष असायचं. एखाद्याचं लक्ष थोडं जरी विचलित झालं, की सरांना ते लगेच लक्षात येत असे. न बोलता लाकडी बेंचवर बोट आपटत ते अंगठीचा टकटक आवाज करायचे. शांततेतल्या त्यांच्या त्या आवाजानंही धडकी भरत असे!
आता आठवलं, की लक्षात येतं, की त्यांनी जो अभ्यासाचा संस्कार माझ्यावर घालून दिला, तो मी पुढे माझ्या मुलांना दिला. त्यांचंही यशस्वी करिअर घडलं. अध्यापन करत असते तेव्हाही सर आठवत राहातात. कुठलाही अवघड टॉपिक शिकवण्याची त्यांची हातोटी लक्षणीय. चाळीस वर्षांपूर्वी ‘स्मार्ट’ पद्धतीनं अभ्यास करवून घेणं त्यांना साधलं होतं. आता तर डिजिटल माध्यमाची मदत असते, तरीही विद्यार्थ्यांना अभ्यासात स्वारस्य असतंच असं नाही.
आमचे प्रखर बुद्धिमत्तेचे गाडगीळ सर आजही कधी माझा लेख वाचनात आला, की प्रतिक्रिया देतात. तेव्हाही एखाद्या विद्यार्थ्यांनं अभ्यासेतर यश मिळवल्यास त्यांना आनंद होत असे. वर्गात त्या विद्यार्थ्यांचं ते अभिनंदन करायचे. क्रिकेट त्यांचा जीव की प्राण! रणजी क्रिकेटपटू असलेल्या सरांची १९६१ मध्ये रणजी ट्रॉफीसाठी कॅप्टनपदी निवड झाली होती. त्या काळी सांगलीच्या ‘वालचंद महाविद्यालया’तून अभियंता झालेले सर पुढे ‘किर्लोस्कर’ कंपनीत दहा वर्ष उच्चपदस्थ होते. ते तिथे फारसे रमले नाहीत, कारण अध्यापन हा त्यांचा आवडता विषय होता. ‘मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढण्यास उपयुक्त असा धर्म म्हणजे विद्यादान होय. विद्या देणारा आणि विद्या घेणारा असे दोघेही या धर्माच्या योगानं खरीखुरी माणसं बनतात,’ असं आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं आहेच. सरांनी १९७३ ते २००७ पर्यंत अध्यापनाचं कार्य आवडीनं केलं. असंख्य विद्यार्थीशिल्पं त्यातून घडत गेली. त्यांच्याप्रति मनात अपार आदराची भावना आहे, जी व्यक्त करताना शब्दही तोकडे पडतात. मनाची महानता, भावनांची तरलता, कर्तव्याची कठोरता आणि मूल्यांची तत्त्वनिष्ठता लाभलेले आमचे सर नेहमीच आरोग्यसंपन्न राहोत, अशीच देवाकडे प्रार्थना!
nbalvalli@gmail.com
swtpachpande@gmail.com