मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या बाळांचं परदेशातलं बालपण कसं असेल, याची उत्सुकता आमच्या नातवाची, रेयानची भेट होईपर्यंत ताणली गेली होती. परदेशात जन्माला आलेल्या रेयानशी आम्हाला आमच्या मातृभाषेतून बोलता येईल का, आपली भाषा त्याला समजेल का, त्याला आपलंसं करता येईल का, असे अनेक प्रश्न मनात घोंघावत होते. पण त्यानंतर अनुभवलेलं सारं काही विलक्षण, आल्हाददायी आणि मनात आनंद फुलवणारं असंच होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी उठल्यावर लाजऱ्याबुजऱ्या रेयानचं लांबूनच आम्हाला न्याहाळणं ‘हे आजी-आजोबा’ म्हणूनच होत होतं, याची जाणीव आम्हाला होती. लहानग्यांना आपलंसं करायला थोडा अवधी द्यावा लागतो, तसा तो द्यायचा असंच आमचं ठरलं होतं. त्यासाठी बाजूला पडलेली रेयानचीच खेळणी हाताळण्याचा बहाणा आम्हाला करावा लागला. थोड्याच वेळात रेयान आमच्या जवळ आला. त्याच्या पायाच्या तळव्यावरून हळुवार बोटं फिरवून मराठीतच मी विचारलं, ‘‘गुदगुल्या करू का?’’. थोडा वेळ तळव्यावरून बोटं फिरवून थांबलो. त्यातली मौज अनुभवल्यावर रेयान लगेचच म्हणाला, ‘‘डू गुदूगुदू अगेन’’… त्याचं इंग्रजाळलेल्या मराठीतलं असं मजेशीर उत्तर म्हणजे आमच्यातल्या यापुढच्या सुखद संवादाची नांदी होती. पुढच्या काळात पायाच्या तळव्यापासून सुरू झालेली गुदूगुदूची गाडी पाय, पाठीवरून डोईवरच्या केसापर्यंत जाऊन पोचली. आमची बोटं अंगावर फिरवून घेताना रेयानच्या चेहऱ्यावर असीम सुखाचा आनंद पसरलेला असायचा. येणारं हसू मारूनमुटकून दाबून ठेवत म्हणायचा, ‘‘आय अॅम नॉट लाफिंग’’ अन् चेहऱ्यावर पसरलेला आनंद, मात्र लाफिंग गॅस सुटल्याचा निर्वाळा द्यायचा.

छोटासा रेयान लाजराबुजरा, हसरा, मौजमजा मस्ती करणारा असा होता. छोटुकल्या रेयानचं नामकरण माझ्याकडून आपसूकच चिमणीसारखा छोटा म्हणून ‘चिम्या’ असं झालं. माझी चिम्या अशी हाक ऐकली की तो न चुकता म्हणायचा, ‘‘आय अॅम नॉट चिम्या.’’ हे त्याचं उत्तर ठरलेलं असायचं. आजी-आजोबा म्हणून त्याचं आमच्याजवळ येणं हे प्रत्येक वेळी आम्हाला इवल्याशा हाताने मिठी मारून, बिलगूनच व्हायचं. आमच्या अशा स्पर्शामधून त्याला विलक्षण आनंद मिळायचा. त्यापुढची पायरी होती त्याची इवलीशी एकेक बोटं इथे भात, इथे भाजी, आमटी, पोळी असं म्हणत त्याच्याच तळहातावर दुमडून कढीची पाळ खाकेपर्यंत नेऊन गुदूगुदू करण्याची. मात्र यातले सर्व मराठी शब्द उच्चारण्याचा त्याचा प्रयत्न आम्हा सर्वांनाच खूप सुखावून जायचा.

सुरुवातीच्या भात, भाजी, आमटी, पोळी या शब्दांची जागा सँडविच, बर्गर, पिझ्झा, ऑमलेटसारख्या त्याच्या ओळखीच्या शब्दांनी आजीनं घेऊन दाखवली, अन् यातली खरी मजा रेयानला कळत गेली. त्यानंतर तो आमच्या जवळ आला की, आमची हाताची बोट मुडपून लगेच त्याचं भात, भाजी सुरू व्हायचं.

पाठीवर त्याचं ओझं घेऊन कांदे, बटाटे म्हणत फिरण्याची मजा काही औरच असायची. कांदे-बटाटे असं म्हणत फिरताना शरीराला हलकेच दिलेले हिसके, हळूच मारलेल्या उड्या यातून रेयानला मिळणाऱ्या सुखद क्षणांचा परमावधी गाठला जायचा. मग चळ लागल्यासारखा तोच प्रकार पुन:पुन्हा करण्याचा त्याचा हट्ट व्हायचा. काही वेळा त्याचा हट्ट पुरवल्यावर, मीही ‘‘आता नो कांदे, नो बटाटे, नो काकडी, नो टोमॅटो, नो गाजर…’’ अशी काहीशी निरर्थक बडबड केली की त्याच्या हसण्याचा धबधबा सुरू व्हायचा अन् त्याच्या हसण्याच्या धबधब्यात त्याचा हट्टही वाहून जायचा.

त्यानंतर आमचा त्याला खेळवण्याचा दुसराच प्रकार सुरू झाला. त्यात ‘टांग टिंग टिंगा’ यासारखं गाणंही आलं. सोपे शब्द आणि लयबद्ध चाल यामुळे हे गाणं त्याला खूपच आवडलं. मग हे गाणं यूट्यूबवर वरचेवर दाखवायचा त्याचा हट्ट मला वारंवार पुरवावा लागला. त्यानं हे गाणं बऱ्याचदा ऐकल्यावर त्याचं स्वत:च ते म्हणणं ओघानेच आलं. ‘टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टूंग …मारुतीच्या बेंबीत शिरला बाई भुंगा…’ यातला सुरुवातीला अर्थ न कळलेला ‘बेंबीत’ हा शब्द रेयान असा काही जोर लावून उच्च्चारायचा की आमची हसून हसून पुरेवाट व्हायची. आम्हाला हसताना बघून रेयानच्या चेहऱ्यावरचे निरागसतेचे भाव असायचे. आम्ही का हसतोय असा प्रश्न त्याला पडायचा. पुढे पुढे हे गाणं म्हणताना स्वत:चा टी-शर्ट वर करून आपलीच ‘बेंबी’ आम्हाला दाखवण्यापर्यंत त्याची मजल गेली. याच गाण्यातला पिंगा आणि फुगडी बघितली की त्याची सही सही नक्कल करण्याचा प्रयत्न रेयानकडून तातडीनं केला जायचा. अवघा आनंदीआनंद पसरायचा.

रेयानची गाणं ऐकण्याची आणि म्हणण्याची आवड माझ्या लक्षात आलेली होतीच, ती आवड जोपासायचं आम्ही ठरवलं. सोपे छानसे अर्थपूर्ण शब्द असलेलं दुसरं गाणं त्याला म्हणून दाखवलं. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं.’ लगेचच ते यूट्यूबवर दाखवण्याची रेयानची फर्माईशही अपक्षेप्रमाणे आली आणि आम्ही ती पूर्णही केली. हे गाणं यूट्यूबवर दोन प्रकारांत दिसायचं. नाटकात जसं आहे तसं एका प्रकारात, तर दुसऱ्या प्रकारात त्यात गाण्याचे शब्द आणि मधल्या भागात छानसं संगीत होतं. रेयानच्या मूडप्रमाणे ‘‘आजोबा डिफरंट’’ अशी फर्माईश आली की मी त्याला दुसऱ्या प्रकारातलं गाणं ऐकवायचो. पुढे हेही गाणं त्याला म्हणता येऊ लागलं. त्यातल्या ‘नक्की’ या शब्दाचा त्याचा उच्च्चार इतका स्पष्ट अन् रेटून केलेला असायचा की आम्हालाही सुरुवातीला क्षणभर आश्चर्यचकित व्हायला झालं. शिवाय ‘काय पुण्य असलं की ते’ या वाक्यातला ‘ते’ या शब्दानंतरचा छोटासा आलाप रेयान त्याच्या वयाला अन् आवाजाला झेपेल असा घ्यायचा की आम्हालाही अचंबित व्हायला झालं.

एकंदरीतच रेयानचे मराठी शब्दोच्चार अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, आणि शुद्ध असे होते, अन् हीच आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब होती. मला हिंदी, मराठी गाणी फावल्या वेळात गुणगुणण्याची आणि ती यूट्यूबवर बघण्याची सवय होती. याच सवयीमुळे रेयानला त्याच्या हट्टापायी यूट्यूबवर समोर दिसलं ते अगदी जुनं ‘तुम जो आओ, तो प्यार आ जाये’ हे गाणं ऐकवलं. कर्णमधुर संगीत, श्रवणीय चाल, सोपे शब्द असलेलं हे गाणं आणि त्याचबरोबर दृत लयीतली काही गाणीही रेयानला ऐकवली. कोणतं गाणं ऐकायचं आहे ते गाणं लक्षात ठेवण्याची त्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. ‘तुम जो आओ’ या गाण्यातला नायक पांढऱ्या घोड्यावर बसून गाणं म्हणतो. हे गाणं ऐकण्याची रेयानची फर्माईश असेल तर म्हणायचा, ‘व्हाइट हॉर्स’, ‘मेरे मनका बावरा पंछी’ या गाण्यातल्या नायिकेच्या बोटावर दिसणारा पोपट म्हणजे ‘पॅरट’ हा रेयानचा हे गाणं ऐकण्यासाठीचा परवलीचा शब्द होता, तर ‘अपलम चपलम’सारखं गाणं शब्द सांगूनच लावायला सांगायचा. दररोज संध्याकाळी पाचच्या सुमाराला रेयान बालवाडीतून घरी यायचा.

एके दिवशी त्याच्या यायच्या वेळेतच आमची भेळेची तयारी झालेली होती. भेळेचा एक बाऊल तयार होतोय तोच रेयान आत आला. भेळेच्या वासाने एकदम आजीजवळ गेला, ‘आ’ करून भेळेचा एक घास घेतला आणि दुसऱ्याच क्षणाला अख्खा बाऊल घेऊन धूम पळाला अन् थोडा दूर जाऊन मजेत भेळ मटकवायला लागला. भेळेच्या दुसऱ्या घासाला आजीकडे पाहून अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाचं वळं करून म्हणाला, ‘आज्जी….मस्त’. आजीने शिकवलेल्या नव्या शब्दाचा हा वापर होता, योग्य वेळी अन् योग्य प्रकारे केलेला.

अगदीच काही करायचं नसलं की रेयानची आजी-आजोबांना घेऊन शाळा भरायची. रेयानच्या या शाळेत आजी व आजोबा असे दोनच विद्यार्थी असायचे आणि रेयान अर्थातच टीचर. यातले आजोबा नेहमीप्रमाणे ‘बॅड बॉय’ या कॅटॅगरीत आणि आजी ‘गुड गर्ल’ असायची. मग ‘नंबर्स कॉल’ करायची रेयानची ऑर्डर यायची. वन, टू, थ्री… नुसते आकडे म्हणण्यात कोणालाच काहीच मजा यायची नाही. मग वन, टू, थ्री.. टी टॅ टाम टीम.. अशी बरीचशी निरर्थक बडबड मी केली की रेयानला काहीतरी आगळंवेगळं अन् गमतीदार ऐकायला मिळायचं. एकीकडे स्वत:चं हसणं दाबून ठेवत तो आजीला ऑर्डर करायचा, ‘कॉल पुलीस’ आणि ‘नॉटी बॉय’ आजोबांना शिक्षा कर अशी काहीशी ही ऑर्डर असायची. या सगळ्या प्रकारात एक छानशी निरागसता ठासून भरलेली असायची अन् या सर्वांत दडलेली गंमतगोडी आमच्यासाठी खूपच लोभसवाणी.

उण्यापुऱ्या दोन महिन्यांच्या आमच्या वास्तव्यात एका रात्रीत आम्हा सर्वांनाच अचंबित करणारा प्रकार घडला. पहाटेचे साडेचार-पाच वाजले असावेत. रेयानची स्वारी झोपेतून उठून आम्ही दोघं झोपलो होतो तिथे आली. पुढच्याच क्षणाला त्याने ‘आजी-आजोबा’ अशी हलकेच हाक मारली आणि लगेचच आमच्या दोघांमधल्या पांघरुणात शिरून गाढ झोपी गेला. नातवाशी जमलेली गट्टी, आमच्यातला जिव्हाळा आणि वात्सल्यभरलं प्रेम याचीच ही लोभस निष्पत्ती होती. आमच्यासाठी मात्र हा दुधावरच्या सायीचा आटून घट्ट झालेला गोड पेढा होता.

pajoshi51 @hotmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatt chaturang abroad mother tongue language experience amy