एक ‘गरीब गाय’, तर दुसरी आडदांड, रासवट! पण दोघींची गरज एकच ‘डोक्यावर छप्पर आणि सुरक्षित घर’. जगण्याच्या खोल समजुतीनं एकीला वरवर सोशीक, पण बेरकी केलंय; तर दुसरी दु:खाला पुरून उरल्यावरही ‘निखालस माणूस’ आहे. समाजाचं तत्त्वज्ञान झुगारून आपली एक पर्यायी व्यवस्था उभी केल्याच्या गुर्मीत राहणाऱ्या एका पुरुषाला या दोन स्त्रिया पाहता पाहता तेजोहीन करून टाकतात. विजय तेंडुलकरांनी ‘सखाराम बाइंडर’मध्ये मानवी स्वभावाचे पकडलेले हे पैलू म्हणूनच कालातीत!

साऱ्या मध्यमवर्गीय संस्कारी समाजमनाला हादरवून सोडलेलं सत्तरच्या दशकातलं विजय तेंडुलकर यांचं नाटक- ‘सखाराम बाइंडर’. आपल्या नैसर्गिक प्रेरणांच्या गरजा भागवण्यासाठी समाजानं कुटुंबव्यवस्था, लग्न या गोष्टी अस्तित्वात आणल्या. त्यात हिंसाचार नाही असं नाही, पण तो गृहीत धरला असावा. ‘सखाराम’ हा या व्यवस्थेला नाकारून आपल्या आदिम प्रेरणांना जाणून आपली स्वत:ची अशी एक व्यवस्था निर्माण करतो. त्यात तो गरजवंत बाई हेरून, तिला हवं ते- म्हणजे डोक्यावर छप्पर आणि संरक्षण देऊन तिच्याकडून गरत्या बाईसारखा संसार आणि शरीरसुख याची अपेक्षा ठेवतो. त्याच्या दृष्टीनं हा एक ‘चोख व्यवहार’ आहे. त्याबद्दल बोलताना कुठलाही आडपडदा न ठेवता बोलतो. लहान वयात त्यानं घर सोडलं आहे ते स्वत:च्या मर्जीनं जगण्यासाठी. तो धनिक नाही. छापखान्यातला ‘बाइंडर’ आहे. गांजा, दारूचं व्यसन आहे. जे काही करतो, त्यात अपराधी भाव नाही. छातीठोकपणे आपलं ‘कर्तुक’ मान्य करतो. खोटेपणा मात्र त्याच्यासाठी ‘पाप’ आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…

या नाटकात महत्त्वाची आहेत ती दोन स्त्रीपात्रं. प्रथम येते, ‘लक्ष्मी’. ती वरकरणी गरीब, गांजलेली, अशी ‘सात्त्विक’ स्त्री आहे. ‘नवऱ्यानं टाकलेली’ म्हणून सखारामाच्या आश्रयाला आलेली. तिच्या वरकरणी व्यक्तिमत्त्वाआड एक तेजस्वी, हिशोबी स्त्री दडली आहे, जी स्वत:च्या अस्तित्वासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. सखारामनं आपल्या ‘भणंग’ तत्त्वज्ञानाखाली गाडून टाकलेले मूळचे संस्कार ती जागे करते. ‘तो तिचा ताबेदार असताना तिनं त्याची गुलामी निमूट स्वीकारली पाहिजे,’ हे मान्य करून ती राहत असताना सगळं ठीक असतं. पण त्याच्या नकळत ती त्याच्यावर राज्य करू लागली आहे, हे लक्षात येताच त्याचा तिच्यातला रस संपतो. तो लक्ष्मीला घराबाहेर काढतो.

दुसरी येते, ती ‘चंपा’. आडदांड, रासवट, आकर्षक, धाडसी. आजवरच्या बायकांपेक्षा निराळी! दारू पिणारी, ‘नवऱ्याला सोडून आलेली’. लक्ष्मी ‘देव-देव’ करणारी, तर ही ‘देवाचं काही लागत नाही मी’ म्हणणारी! एरवी प्रत्येक बाईवर गुरकावणारा सखाराम हिच्या रूपानं, शारीरिक ओढीनं पुरता घायाळ झाला आहे. नामर्द नवऱ्याकडून भरपूर अत्याचार सहन केलेल्या चंपाला शारीरिक संबंधांत कुठलाच रस नाही. उलट एक प्रकारचा तिरस्कारच आहे. पण बाहेर ‘नवरा नसलेली’, वाटेल त्याची ‘उपलब्ध मालमत्ता’ असं समजून तिला भोगलं जाईल, ‘त्यापेक्षा हा एकटा परवडला,’ या विचारानं ती हा ‘व्यवहार’ स्वीकारते. शारीरिक संबंध घडताना मन मारण्यासाठी दारूचा आधार घेते.

कालांतरानं लक्ष्मी परत दारी आल्यावर वरपांगी निव्वळ श्रमविभाजन- ‘तू घर बघ, मी त्याला बघते,’ असं म्हणून लक्ष्मीला घरात घेताना चंपा सखारामाच्या होकाराची, परवानगीची वाट बघत नाही. सखाराम लक्ष्मीला मारायला लागल्यावर मध्ये पडून तिला वाचवतेही. चंपाचा नवरा हा ‘डिसमिस फौजदार’आहे. तिचा माग काढत इथवर पोहोचलेला. तिनं फोडून काढल्यावरही दात काढणारा, विकृत, तिच्यावर अत्याचार करून त्यातून आनंद घेणारा.

लक्ष्मी आल्यावर केवळ तिच्या अस्तित्वानं सखाराम बावचळतो. तिच्या सततच्या वावरानं त्याच्या चंपाबरोबरच्या संबंधांत बाधा येते. चंपाही त्याला धुत्कारते. त्याला जगणं असह्य होतं. ‘घरात मी राजा, बाहेर कुणी जोड्याजवळ का उभं करे ना!’ असा बाणा असलेला सखाराम आता तेजोहीन झाला आहे. अशा वेळी ‘चंपा दाऊदकडे जाते,’ असं सखारामाच्या डोक्यात भरवून लक्ष्मी त्याच्या हातून चंपाचा खून करवते. आपणच त्याचे तारणहार असल्याचं भासवून ती आता त्याचं आयुष्य हाकणार आहे. सखारामची गुर्मी पूर्ण उतरून तो तिच्या मागे फरपटत जाणार आहे…

चंपा आणि लक्ष्मीची गरज एकच आहे! डोक्यावर छप्पर. निवारा, अन्न आणि सुरक्षितता. चंपा घरात आल्यावर जेव्हा लक्ष्मी परत घरात येऊ बघते, तो प्रसंग तेंडुलकरांनी कमीत कमी शब्दांतल्या थेट संवादात मांडला आहे. लक्ष्मीला पूर्णपणे माहीत आहे, की सखारामसमोर तिची धडगत नाही. तो घराबाहेर पडल्याबरोबर ती वेळ साधून घरात शिरकाव करू बघते. आधी चंपा तिला हाकलते, पण लक्ष्मी चिवटपणे घरात शिरतेच. आपली ओळख पटवून देताना अभावितपणे सांगितल्यासारख्या गोष्टी हेतुत: सांगत ती आपला त्या घरातला अधिकार सांगते. वरपांगी चंपा सखारामाच्या तत्त्वज्ञानाशी मेळ राखणारंच तत्त्वज्ञान बाळगतेय असं वाटतं. त्याच्याच- सारखी ती कुणाला भीक घालत नाही. लक्ष्मी मात्र सतत ‘संस्कारांनी मी महान’ अशा आविर्भावात चंपावर ‘कुंकवासाठी का होईना, नवरा हवा’, ‘सणासुदीची दारू पिऊ नये’, ‘देवाब्राह्मणांसमोर गाठ बांधलेल्या नवऱ्याबद्दल वावगं बोलू नये,’ असा एक दांभिक दबाव आणते. पण चंपा त्याला बळी पडत नाही. लक्ष्मीत संसार करण्याच्या असोशीसारख्या गोष्टी आहेत. ती मुंगळ्याशी, कावळ्याशी बोलते, हसते. चंपामध्ये हे असं काही उरलंच नाहीये. लहान असतानाच नवऱ्याच्या विकृतीच्या आणि वासनेच्या जाळात होरपळून तिचं काळीज राख झालं आहे. कुठल्याही स्त्रीसुलभ, कोमल भावना तिच्यात शिल्लक नाहीत. असं असूनही ती निखालस माणूस आहे! आश्रयाला आलेल्या बाईला घरात घेताना तिला आपलं अस्तित्व इथं टिकेल की नाही, याबद्दलची असुरक्षितता जाणवतच नाही असं नाही, पण एक किरकोळ तंबी देऊन ती लक्ष्मीला आसरा देते. याउलट लक्ष्मी आत्मकेंद्री आहे. सखारामशिवाय आता तिला तरणोपाय नाही. पण सखारामची ‘भूक’ बघता तो कधीही तिला घराबाहेर काढू शकतो, हे तिला पुरतं ठाऊक आहे. ती अत्यंत बेरकी आहे. सखारामचं तत्त्वज्ञान तिला पुरतं माहीत आहे. ‘खोटेपणा हे एकमेव पाप आहे,’ ही त्याची धारणा तिला ठाऊक आहे. आधीच लक्ष्मीच्या वावरानं असहाय झालेल्या आणि त्यामुळे चंपानंही दूर सारल्यामुळे दुखावलेल्या सखारामच्या मनात लक्ष्मी चंपानं न केलेली प्रतारणा, खोटेपणा पद्धतशीरपणे भरवते. त्याला चंपाचा खून करायला लावून, त्यात त्याला अडकवून, त्या खुनाची दहशत घालून, आपलं त्याच्या आयुष्यातलं स्थान आणि पर्यायानं स्वत:साठीचा निवारा भरभक्कम करते!

या दोन्ही स्त्रियांकडे स्वत:चं तेज आहे. सामाजिक व्यवस्थेत एकट्या स्त्रीला मान आणि स्थान नाही, हे दोघींनाही माहीत आहे. व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्याएवढी ताकद त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांनी सखारामबरोबरचा व्यवहार स्वीकारला आहे. लक्ष्मी अगतिक वाटते, पण ती तशी नाही. ती आपली ‘सात्त्विकता’ वापरून सखारामला नमवते, तर चंपा शरीरसंबंधांतला रस संपून, तिटकारा निर्माण होऊनही केवळ व्यवहार म्हणून, मन मारून जगते आणि त्याबदल्यात आसरा मिळवते.

या दोन्ही पीडित स्त्रिया. पण त्यांची जगण्याची समजूत खोल आहे. त्यांच्या भिन्न पार्श्वभूमीमुळे त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद अतिशय वेगळे आहेत. त्यातलं योग्य आणि अयोग्य ठरवणं प्रेक्षकांना सोपं जात नाही. त्याचमुळे अशा प्रवृत्तीचं उघडंवाघडं, आदिम प्रेरणेचं दर्शन घडवणारं, रासवट भाषेत विवाह संस्थेवर, बेगडी संस्कारांवर भाष्य करणारं हे नाटक त्या काळच्या समाजाला हादरवूनच गेलं.

आज ‘लिव्ह इन’, डेटिंग अॅप्स, ‘वन नाइट स्टँड’, ‘नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड’च्या जमान्यातही हे नाटक भेदकच वाटेल. आणि त्यातले संदर्भही. कारण हे नुसतं परिस्थितीचं नाटक नसून मनोवृत्तीचं नाटक आहे. विजय तेंडुलकर स्वत: म्हणत, ‘लेखकानं न्यायाधीश होऊ नये’. तो त्याची पात्रं एका विशिष्ट पद्धतीनं का वागत आहेत, याचे संदर्भ पुरवतो. पण या पात्रांचं वागणं योग्य आहे की नाही, याचा निवाडा करत नाही. सध्याच्या ‘सारे काही तपासून घेऊ, मग निर्णय देऊ/घेऊ’च्या काळात असं खणखणीत नाटक ‘कालअसंगत’ ठरणार नाही.

आता आपण फार ‘आधुनिक’ झालो आहोत, समता, समानता आणि एकूणच जगण्याबाबत, सामाजिक न्यायाबाबत जास्त विवेकी झालो आहोत, असं आपल्याला वाटत असलं, तरीही हे नाटक आपल्याला विचारांच्या आवर्तात ढकलेल. आपली वैयक्तिक ‘मूल्यव्यवस्था’ काय आहे, हे पडताळून पाहायला भाग पाडेल. मानवी व्यवहारातल्या ‘अमानवीयतेकडे’ आपलं लक्ष जाऊ लागेल. वरवर दिसणाऱ्या छोट्या-मोठ्या करारांआड किती मोठा हिंस्रा व्यवहार आहे हे जाणवेल. आणि कधी वरकरणी एखाद्या ‘साधारण तडजोड’ वाटणाऱ्या कृतीमागे जगण्यामुळे वाढलेल्या समजूतीनं घडवून आणलेला समन्वय आहे, हेही दिसून येईल!

मनुष्य हा स्खलनशील प्राणी आहे. सखाराम ‘पतित’ आहे की ‘पावन’, हे लेखक कुणाच्याही तोंडून वदवत नाहीत. तो ‘आहे तो असा आहे’! तेंडुलकरांच्या या नायकाची आणि या दोन नायिकांची गोष्ट बघता बघता त्यात गुंतून जायला होतं. त्यांच्या ‘उत्कर्ष आणि पतना’बरोबरच त्यांच्या अस्तित्व टिकवण्याच्या निकराच्या झगड्याची कहाणी हे नाटक सांगतं. मला ते म्हणूनच कालातीत भासतं. आजही हे नाटक केलं तर प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतीलच.

chinoosumeet@gmail.com

Story img Loader