संकेत पै
आपली स्वप्नं, ध्येयं प्रत्यक्षात आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुनियोजित दूरदृष्टी अर्थात ‘व्हिजन’. सातत्यानं आणि दीर्घकालीन प्रयत्न केल्यानंतर साध्य होणारी ध्येयंच तुम्हाला चिरकाल टिकणाऱ्या यशाकडे घेऊन जातात. या दीर्घकालीन यशासाठी स्वत:त बदल करणंही तितकंच गरजेचं आहे. सोमवारपासून सुरू होणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी असंच चिरकालीन बदलाचं वर्ष ठरो..
‘काही वेळा आपण मनाशी घट्ट धरून ठेवलेली स्वप्नं वास्तवात येऊ शकत नाहीत, मात्र तीच स्वप्नं काही वेळा आपल्या कल्पनेच्याही पार पलीकडच्या, अधिक भव्यदिव्य अशा ध्येयाकडे नेणारी शिडी असू शकतात.’ एका मार्गदर्शकाने मला पाठवलेल्या साप्ताहिकात हा विचारप्रवर्तक सुविचार मी वाचला.
..आणि मी थेट भूतकाळात पोहोचलो. जवळपास दोन दशकं मी एक विशिष्ट स्वप्न उराशी बाळगलं होतं. माझे करिअरसंबंधीचे सर्व निर्णय मी ते ध्येय डोळयांसमोर ठेवूनच घेतले होते; पण ते माझ्यासाठी नव्हतंच हे माझ्या लक्षात आलं! त्या ध्येयपूर्तीसाठी मी खूप गोष्टींची गुंतवणूक केली होती, त्यामुळे त्याचा विचार मनातून काढून टाकणं फार अवघड होतं. शिवाय ‘हे नाही तर काय?’ हा प्रश्नही होताच; पण अखेर निर्णय घ्यावाच लागणार होता. नवीन शक्यता अजमावून पाहाव्या लागणार होत्या, नवं स्वप्न बघावं लागणार होतं.. आणि हे सर्व वयाची तिशी सरत चाललेली असताना!
लहानपणापासून आजूबाजूचा समाज आपल्याला एक विशिष्ट प्रकारे विचार करण्याच्या दृष्टीनंच घडवतो. तसे सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश आपल्याला विविध माध्यमांतून मिळत असतात. आपली विचारधारा, मूल्यं, वागणं आणि अगदी आपण पाहात असलेल्या स्वप्नांवरही त्यांचा प्रभाव असतो आणि शेवटी आपल्या ठरवून दिलेल्या त्याच नियमांच्या रस्त्यावर आपण चालू लागतो.. अगदी ‘खूप उशीर झालाय’ याची जाणीव होईपर्यंत!
माझ्यासमोर जेव्हा हा पेच उभा राहिला, तेव्हा त्यात दोन प्रश्न होते- कुणी तरी माझ्यासाठी लिहिलेलं आयुष्य मला जगायचं आहे, की माझ्या आयुष्याची संहिता स्वत: लिहून त्यानुसार जगायचं आहे? या वळणावर मी विचार करायला थोडा अवकाश घेतला आणि ‘स्व’चा शोध आपल्याला पुन्हा घ्यावा लागेल, हे मान्य केलं. जे स्वप्न मी ‘माझं’ समजून इतकी वर्ष वाटचाल करत आलो होतो, ते माझं नव्हतंच, याचा स्वीकार करायचं मी ठरवलं आणि त्याच वेळी, ‘आता काही तरी नवं शोधावं लागेल,’ याचाही. ते ‘नवीन काही तरी’ काय असू शकेल, याचा अंदाज मी बांधला होता; पण तो निर्णय घेणं सोपं नव्हतं. मात्र येणाऱ्या बदलासाठी आपण तयार व्हायलाच हवं आणि ‘मी त्या वेळी तो पर्याय अजमावून पाहिला असता तर?..’ अशी हळहळ नंतर करत बसण्यापेक्षा आताच योग्य निर्णय घेण्याचं धैर्य एकवटणं बरं, असा विचार केला.
अर्थात तुमचाही प्रवास माझ्यासारखाच असेल असं मुळीच नाही. परंतु दरवर्षी आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर स्वत:त बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. वर्षांरंभी तर एखादी परंपरा असावी तसे नवे संकल्प केले जातात. नाती, आरोग्य, आर्थिक नियोजन, करिअर या गोष्टींबाबतच्या संकल्पांचा भरणा होतो. मात्र आता हे संशोधनानं सिद्ध झालंय, की नववर्षांचे म्हणून केलेले सुमारे ९० टक्के संकल्प फसतात. अनेक जणांच्या बाबतीत त्यांचे नववर्षांचे संकल्प आई-वडील, समाज, शैक्षणिक व्यवस्था, प्रसारमाध्यमं आणि अगदी चित्रपटांच्याही प्रभावातून तयार झालेले असतात. किंबहुना व्यक्तींकडून आंधळेपणेच ते ठरवले जातात. त्यामुळे आपल्या विचारांवर या घटकांचा कितपत परिणाम होतो, हे लक्षात घ्यायला हवं. त्याच वेळी आपल्या विचारधारेत जे बसत नाही, त्याला सामोरं जाण्याची तयारीही ठेवायला हवी. या पार्श्वभूमीवर आतापर्यंतच्या संकल्प फसलेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत २०२४ कसं वेगळं ठरेल, याचा विचार करू या.
संकल्प नको! दीर्घकालीन दृष्टिक्षेप मांडू
आपले ‘संकल्प’ हे समाजानं आपल्याला आखून दिलेल्या रस्त्यावरची मुक्कामाची ठिकाणं असतात आणि ती सर करण्यासाठी दरवर्षी महत्त्वाकांक्षी योजना आखल्या जातात, हे आता लक्षात आलंच असेल. यामुळेच कितीही इच्छा असली आणि प्रयत्न केले, तरी एका टप्प्यावर संकल्प फसत जातात. ‘इच्छा होती, पण वेळच मिळाला नाही’, ‘इच्छा होती, पण उत्साहच टिकत नाही,’ अशी कारणं आपण स्वत:ला देतो. त्यामुळे पहिलं काम हे, की संकल्प करायचेच नाहीत!
प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अंतराळ पर्यटन व्यवसायाची संकल्पना मांडून २००४ मध्ये ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीची स्थापना केली, तो नक्कीच त्यांचा ‘नववर्षांचा संकल्प’ नव्हता किंवा १९८३ मध्ये भारतानं क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवलेला पाहून सचिन तेंडुलकरनं भारतासाठी खेळायचं असं ठरवलं, तोही निश्चितच सचिनचा नववर्षांचा संकल्प नसणार! पुढे २०११ मध्ये सचिनला विश्वचषक हातात उंचावून विजय साजरा करण्याची संधी मिळाली. त्याचं एक स्वप्न पूर्ण होण्याचा तो क्षण होता. तर २०२१ मध्ये ब्रॅन्सन यांनी स्वत: चाचणी अवकाशयानात बसून उड्डाण केलं.
अमेरिकेतले मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘दरवर्षी ४० विद्यापीठांमधले पदवीपूर्व विद्यार्थी मला भेटतात. जर त्यांनी ‘मिसेस बी.’ यांचा धडा अमलात आणला, तर त्यांना मला भेटावंच लागणार नाही!’ बफे यांनी अपेक्षित असलेल्या ‘मिसेस बी.’ म्हणजे रोझ ब्लमकिन. रोझ यांनी १९३७ मध्ये ‘नेब्रास्का फर्निचर मार्ट’ची स्थापना केली होती. त्या रशियातून स्थलांतरित झालेल्या. आपली थोडी शिल्लक आणि भावाकडून कर्जाऊ घेतलेले ५०० डॉलर्स, यातून त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती. १९८० च्या दशकापर्यंत, बफे यांच्या दृष्टीत येण्याआधीच ती अमेरिकेतली सर्वात मोठी फर्निचर रीटेल कंपनी झालेली होती. १९८३ मध्ये बफे यांनी या कंपनीचे ९० टक्के समभाग ५५ दशलक्ष डॉलर्सना विकत घेतले. केवळ एका पानाच्या करारावर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, त्या कोणत्या विश्वासावर?.. केवळ एका मोठया फर्निचर व्यवसायात आपण गुंतवणूक करतोय, यापेक्षा एका बाईच्या दूरदृष्टीवर- ‘व्हिजन’वर विश्वास ठेवून आणि त्याची फळं प्रत्यक्ष पाहूनच बफे यांनी तो निर्णय घेतला होता.
या उदाहरणांतून काय दिसतं?.. स्वप्नं प्रत्यक्षात यायला वेळ लागतो आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुनियोजित दृष्टिक्षेप- अर्थात स्वप्नांमागचं ‘व्हिजन’. शिवाय त्यात दीर्घकाळाचा विचार लागतो. तुम्ही ‘व्हिजन म्हणजे काय?’ असा गूगल सर्च देऊन पाहिलात, तर तुम्हाला अनेक व्याख्या मिळतील. ‘मूनशॉट गोल’ असा एक शब्दप्रयोग अशा ध्येयांसाठी वापरला जातो. म्हणजे सातत्यानं आणि दीर्घकालीन प्रयत्न केल्यानंतर साध्य होणारी ध्येयं. काही जण त्याला ‘बिग हेअरी ऑडाशियस गोल्स’ (BHAG) असंही संबोधतात. म्हणजे मोठं ध्येय ठेवून दीर्घकालीन यशासाठीची योजना आखणं. काही असंही सांगतील, की आपल्या आयुष्यातल्या ‘का’ची उत्तरं शोधण्याचा मार्ग म्हणजे ‘व्हिजन’ ठरवणं. माझ्या मते अशी योजना आखणं म्हणजे अनेक शक्यतांचा विचार करत मांडलेला एक खेळ आहे. मी आज ‘लाइफ कोच’ म्हणून काम करतोय, त्यासाठी याच प्रकारे वाटचाल केली. यात केवळ ‘का’ची उत्तरं शोधणं आणि कारणांचा विचार करणं, याच्या बरंच पलीकडे जावं लागतं. तुम्ही ज्या मार्गावर चालायचं ठरवलंय तो मार्ग या प्रयत्नांत स्पष्टपणे दिसू लागतोच, पण आजूबाजूचं जग कसं असेल, याचाही अंदाज येतो.
आपलं असं ध्येयासाठीचं व्हिजन ठरवताना ते जणू एखादं ‘जिगसॉ’ कोडं आहे, असा विचार करा. डोंगर, दऱ्या, नद्या, स्वच्छ, मोकळं आकाश, आयुष्यातले धाडसी क्षण, एकत्र राहणारे, जगणारे मानवसमूह, समाज, यातलं तुम्हाला जे हवं, ते तुम्ही आपल्या जिगसॉ कोडयात घेऊ शकता. अशी आदर्श, सर्वसमावेशक, संयमानं पुढे जाणारी आणि कठीण परिस्थितीत टिकून राहून परत मार्गक्रमणा करू शकणारी योजना म्हणजे तुमचं व्हिजन. एकदा ही योजना तयार झाली, की तुमची जी काही ध्येयं असतील, त्या सगळयांना एक संदर्भ प्राप्त होतो. म्हणजे ध्येयं हे जिगसॉ कोडयाचे सुटे भाग आणि असे सर्व भाग, त्यांना जोडणारे भाग जोडल्यावर जी दिसते, ती दीर्घकालीन योजना- व्हिजन. अर्थात यातलं एकेका ध्येयाचं शिखर सर केल्यानंतर आपण प्रगती करत असल्याचा आनंद, समाधान, हे मिळतंच. पण त्यासाठी आपण आखलेली जी दीर्घकालीन योजना आहे, ती पुढे जात राहण्याची प्रेरणा देत राहते.
परिस्थितीशी मिळतंजुळतं घ्या!
जगानं आजवर आर्थिक मंदी, युद्ध, तंत्रज्ञानाचा अवास्तव फुगवलेला फुगा फुटण्याचे प्रसंग आणि नुकत्याच झालेल्या करोनाच्या महासाथीसारखे प्रसंग, अशा अनेक गोष्टींना तोंड दिलं आहे. अर्थातच त्यामुळे माणसांचं वागणं एकुणातच प्रतिसादाऐवजी ‘प्रतिक्रियात्मक’ (रीअॅनक्टिव्ह) झालं आहे. अगदी तुमच्या रोजच्या आयुष्यातले संवाद आठवा. आपलं वागणं किती वेळा प्रतिक्रियात्मक असतं? आपण वजनकाटयावर चढतो. त्यावर जो वजनाचा आकडा दिसतोय, त्याला प्रतिसाद म्हणून तडकाफडकी निर्णय घेतो, की आपण बारीक व्हायला हवं! पण पुढे त्यासाठी आपल्या हातून खरोखरचे प्रयत्न होतात का? यातून घ्यायची शिकवण ही, की समोर उभ्या ठाकणाऱ्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं स्वाभाविकच आहे; पण जेव्हा आपण दीर्घकालीन योजना आखायला शिकतो, तेव्हा बदलांनुसार जुळवून घेण्याचं कौशल्य फार महत्त्वाचं ठरतं.
सचिन तेंडुलकरला त्याचं क्रिकेटमधलं स्वप्न साकार होण्याच्या वीस वर्षांच्या प्रवासात जुळवून घेण्याचं हे कौशल्य वापरावं लागलंच. रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या अंगी जर मिळतंजुळतं घेऊन पुढे चालत राहण्याचं कौशल्य नसतं, तर कदाचित त्यांनी ‘अवकाश पर्यटना’चं आपलं स्वप्न काहीच वर्षांत सोडून दिलं असतं. ‘नेब्रास्का फर्निचर मार्ट’ तर एका स्त्रीनं वयाच्या चाळिशीत सुरू केलं. तो काळ लक्षात घ्या- १९२९ च्या जागतिक महामंदीनंतरचा. त्या काळी माणूस ५५ वर्ष जगला तरी चांगलं समजलं जात असे! त्यानंतर चाळीस वर्ष रोझ ब्लमकिन रीटेल क्षेत्रात यशाच्या शिखरावर होत्या. जुळवून घेण्याच्या कौशल्याचा फायदा असा होतो, की ‘आपण एका रात्रीत आयुष्य बदलू शकू’ या आकर्षक विचाराला दूर ठेवता येतं.
Eicher Motors चे प्रमुख कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ लाल यांची गोष्टही अशीच. ते जेव्हा कंपनीत आले, तेव्हा कंपनीच्या १५ व्यवसाय शाखा होत्या आणि तोटयात होत्या. त्यांच्यापुढे पर्याय असा होता, की सर्व १५ अननुभवी व्यवसाय शाखा चालवत राहायचं, की त्यातील काहींची निवड करून त्यांच्या पाठीशी उभं राहात त्यांना मोठं करायचं?.. मोटारसायकल आणि ट्रक उत्पादन व्यवसायांच्या बाबतीत लाल यांच्याकडे दीर्घकालीन योजना होती. त्यांनी इतर १३ व्यवसाय बंद करायचा निर्णय घेतला. ‘रॉयल एन्फिल्ड’ हा एक नावाजलेला मोटारसायकल ब्रँड आहे; केवळ युनायटेड किंग्डम आणि भारतातच नाही, तर जगभरात! पण गोष्ट इथेच संपत नाही.. करोनाच्या महासाथीच्या दरम्यान जेव्हा लाल यांना कंपनीच्या समभागधारकांनी हटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर लाल यांना आपला पाठिंबा जाहीर केला. सांगितलं, की त्यांचा दृष्टिकोन कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगला होता.
परिस्थितीशी जुळवून घेताना नेहमीच आपण जिंकू असं नसतं. काही वेळा हारही पत्करावी लागते. काही निर्णय चुकू शकतात. लोकांकडून दूषणं ऐकावी लागू शकतात, पण दीर्घकालीन दृष्टीनं पाहिलं, तर आव्हानांचा सामना करण्याची शक्ती आपल्या ठायी यातून निर्माण होते. काळ बदलतो, तसे स्वत:त बदल घडवणं जमू लागतं. यातून होतं असं, की आपण आपल्या ध्येयांसाठी जी दीर्घ मुदतीची योजना आखली आहे, त्या प्रवासात आपण समुद्रात भक्कमपणे उभ्या ठाकलेल्या जहाजासारखे टिकून राहू शकतो. अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग काळानुसार वेगळे असू शकतील, हे आपल्याला माहीत असतं. प्रतिकूलतेतून लवकर बाहेर पडणं यामुळे शक्य होतं. या सगळयाचा एकत्रित परिणाम असा, की आपण आयुष्यात अधिक आनंदी, समाधानी राहू शकतो.
आता मुख्य प्रश्न असा, की २०२४ मध्ये तुम्ही चिरकाल टिकणारे बदल घडवायच्या मार्गावर चालायला सुरुवात करणार की नाही! अल्पजीवी संकल्पांपासून दूर राहून हा मार्ग निवडलात, तुम्हाला ‘चीअर’ करणाऱ्यांमध्ये एक मी तरी नक्कीच असेन!
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त असलेले ‘लीप अहेड अँड ह्युमन पोटेन्शियल’ कोच आहेत. TEDx वरील व्याख्याते तसेच ध्यानयोगतज्ज्ञ म्हणूनही ते सर्वश्रुत आहेत.)
sanket@sanketpai.com