साठी ही आताची नवी चाळिशी आहे! आता आपलं आयुष्यमान वाढलं असल्यानं स्वत:ला सतत कार्यरत आणि सर्जनशील ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणं आवश्यक आहे, आणि मनोरंजन व्यवसायात ते करणं खूप आव्हानात्मक असू शकतं. चित्रपट हे माध्यम वृद्ध कलाकारांशी, विशेषत: स्त्रियांशी, कठोर वागलं आहे. त्या तुलनेत टीव्हीने विविध प्रकारच्या चेहऱ्यांना/वयांना मोठ्या प्रमाणावर स्वीकारलं आहे. म्हणूनच रत्ना पाठक शाह यांना हे माध्यम कायमच आनंददायी आव्हान वाटलं आहे. एवढंच नव्हे तर एक वृद्ध अभिनेत्री म्हणून त्यांनी त्यांच्या आईचे ऋण फेडण्याचा मार्गही त्यातूनच शोधला. नसीर नेहमी मला म्हणायचा, ‘वय झालं की, अभिनेत्री म्हणून तुला तुझं श्रेय मिळेल!’ ते ऐकून मला काही फारसं बरं वाटत नसे. वय होईपर्यंत वाट बघायचा संयम कुणाकडे असतो?… पण अखेर झालं तसंच. चित्रपटांतल्या ‘हिरॉइन’च्या व्याख्येत मी बसत नाही, हे मला आधीपासूनच माहीत होतं. माझी बहीण सुप्रिया (सुप्रिया पाठक) मात्र त्याच्याशी पुष्कळच मिळतीजुळती दिसे आणि माझ्या अगदी उलट तिला त्या प्रकारच्या चित्रपटांचं प्रेमही होतं. पण तिलाही स्वत:ला ज्यातून आनंद मिळेल अशा भूमिका मिळवणं कठीण जात होतं.
परंतु मला अशी आशा होती की, ‘आर्ट फिल्म्स’मध्ये माझ्यासारख्या अभिनेत्रीसाठी काही जागा असेल. पण तिथेही लगेच एक ‘स्टार सिस्टीम’ तयार झाली. नसीररुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी आणि स्मिता पाटील, इथपर्यंतच त्यांचं प्रायोगिकत्व मर्यादित होतं. इतर अनेक अभिनेते- दीप्ती नवल, पंकज कपूर, पवन मल्होत्रा, नीना गुप्ता, सतीश शहा आणि इतरही कितीतरी जणांना टीव्हीवर समाधान मानावं लागत होतं किंवा चित्रपटांत लहान लहान भूमिका कराव्या लागत होत्या… आणि मी बावळटासारखी कुणीतरी मला विचारावं म्हणून वाट बघत बसले होते!
सुदैवानं त्या काळात टीव्ही माध्यमात ‘कंटेंट’ आणि कलाकार या दोन्ही बाबतींत धोका पत्करण्याचं धाडस होतं. तिथे अभिनेता ‘कसा दिसतोय’, यापेक्षा तो त्या विशिष्ट भूमिकेत खरा वाटेल का, त्याला बघण्यात लोकांना रस वाटेल का, हे महत्त्वाचं होतं. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे टीव्हीवरचे सर्व वयांचे अभिनेते घराघरांत लोकप्रिय झाले होते. त्या वेळी चित्रपटांत स्त्रियांचं ‘प्लास्टिक’ सौंदर्य आणि पुरुषांच्या खोट्या ‘पीळदार’ शरीराचं प्रदर्शन, यांची चलती होती. आपल्या प्रेक्षकांना वैविध्याचा स्वीकार करायची सवय लावण्याचं श्रेय सुरुवातीच्या काळातल्या टीव्हीलाच! त्यामुळे माझे वरचे दात मोठे असणं किंवा मी अगदी ‘तारुण्याच्या पहिल्या बहरात’ नसणं तिथे चालून गेलं. तिथे मी मलाही अनपेक्षित असताना गाणी म्हणणं, नाचणं, धडपडणं, सुसाट गाडी चालवणं (तेही लहान मुलांच्या सिनेमात!), अतिरंजित ‘ड्रामा’ आणि सुमार विनोद असलेले प्रसंग साकारणं, हे सर्व केलं… आणि त्यात मला खरोखर मजा येत होती!
रंगमंचावर मात्र मला सातत्यानं नवी आव्हानं हाताळायला मिळत होती. ‘डियर लायर’ या नाटकात मला ४५व्या वर्षांपासून जवळपास ८०व्या वर्षांपर्यंत असा त्या स्त्रीचा प्रवास दाखवायचा होता. तोही मेकअप किंवा कॉस्च्युम्सची मदत न घेता! २५ वर्षांपूर्वी मी जेव्हा ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’त शिकत होते, तेव्हा एका वृद्ध स्त्रीची भूमिका मी अगदी वाईट केली होती. ‘डियर लायर’च्या वेळेला मात्र वय होत चाललेल्या अभिनेत्रीचं चित्र मी बरंच अचूक रंगवू शकले. विशेषत: काम मिळत नसल्यामुळे, एकटेपणामुळे होणारी तिची चिडचिड. पुढच्या नाटकात मी एक तरुण मुंबईकरीण होते, मला त्यात प्रेमप्रसंगही साकारायचे होते; तर त्यानंतरच्या नाटकात एका मध्यमवयीन मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका मला मिळाली. प्रत्येक वेळी ही जाणीव झाली, की तोपर्यंतच्या वाटचालीत मी जे काही शिकले होते, त्यामुळे मी त्या भूमिकेत शिरून विचार करू शकले. आता माझं वय आणि अनुभव दोन्ही वाढलं होतं. अभिनय कसा समृद्ध होत जातो हेही मला समजत होतं. ‘अँटीगनी’ हे नाटक मी तरुणाईत करूच शकले असते, पण तेव्हा काही मी कसलेली अभिनेत्री नव्हते आणि आयुष्य, त्यातल्या गुंतागुंतीही मी जवळून बघितलेल्या नव्हत्या. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की जेव्हा कोणताही अभिनेता ‘नटसम्राट’ किंवा ‘किंग लिअर’सारख्या भूमिका साकारायला खऱ्या अर्थानं तयार होतो, तेव्हा मोठा काळ एकामागून एक नाटकाचे प्रयोग करण्याची त्याची शारीरिक परिस्थिती राहिलेली नसते. वय हे दुधारी तलवारीसारखं आहे ते एका हातानं देतं आणि एका हातानं नेतंही!
वय वाढण्यातलं मोठं आव्हान असतं केस पांढरे होण्याचा स्वीकार करणं. मला माझ्या आईकडून चांगली त्वचा मिळाली आहे, पण केस पांढरे होण्याचे ‘जीन्स’ही तिच्याकडूनच मला मिळाले असावेत, कारण तिशीत पाऊल ठेवताच माझे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली होती. अशा चिंतातुर माणसांना ‘हेअर डाय’चा मोठा आधार वाटतो! माझ्याही मदतीला तोच आला. ‘अँटीगनी’च्या वेळेस वयाने बरीच लहान असलेली मुलगी साकारताना मला ‘हेअर डाय’ची फारच गरज भासली. त्यानंतर मात्र बदल स्वीकारावाच लागला. मी केस रंगवणं बंद करण्यामागेही नसीरची प्रेरणा मोठी होती. त्याचा मुद्दा असा होता की, ‘ज्यांचा चेहरा मुळातच कमी वयाचा दिसतो, त्यांच्यासाठी पांढरे केस हा फक्त एक रंग आहे! त्यामुळे त्यांच्या दिसण्यावर विशेष परिणाम होत नाही. केस रंगवणं बंद करण्यासाठी तुम्ही जर चेहरा म्हातारा होईपर्यंत थांबलात, तर मात्र नंतर तुम्ही फार वेगळे दिसताय असं वाटतं.’ त्याच्या या म्हणण्यानं काम साधलं!
अर्थात नाइलाजानं निर्णय घेतला, तरी मनात धाकधूक होती. पांढरे केस असलेल्या व्यक्तीला लगेच ‘बुड्ढा/ बुड्ढी’ हे संबोधन चिकटतं. मला प्रकर्षानं आठवतं, की काही लोक अगदी मला ऐकू येईल अशा आवाजात आपसात म्हणायचे, ‘ऐ कितनी बुड्ढी हो गई हैं!’ समोरच्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया द्यायचा मोह फार मोठा असतो. पण ते व्यक्त करून झाल्यावर पुष्कळदा आपण बावळटासारखं बोललो असं वाटतं; त्यामुळे अशा वेळी न बोललेलं बरं असतं! आपण भारतीय दुसऱ्याच्या भावनांकडे फारसं लक्ष देत नाही आणि वर ‘अपन तो भाई ऐसे ही हैं,’ असं म्हणत त्या गोष्टीचा अभिमानसुद्धा बाळगतो. माझ्या सुदैवानं माझा स्टायलिस्ट चांगला होता. त्यानं मला एक स्मार्ट हेअरकट दिला आणि त्यामुळे पांढऱ्या केसांमध्ये माझा आत्मविश्वास टिकून राहिला. या सुरुवातीच्या काळात माझ्या वयाच्या आणि माझ्यापेक्षा मोठ्या अनेक अभिनेत्रींनी माझ्या या ‘धैर्याचं’ कौतुक केलं, पण त्या स्वत: तरुण दिसण्याचे प्रयत्न करतच होत्या. आणि ते का, हे मला कळू शकतं. मला भूमिका मिळणं कठीण जात होतं, कारण माझ्या समोरचे बहुतेक पुरुष अभिनेते अजूनही आनंदाने केस रंगवत होते. पण आरशात पाहिल्यावर मला मी आवडायचे! त्यामुळे बदलाचा स्वीकार करता आला. यात आणखी एक झालं, ते म्हणजे अनेक तरुण अभिनेत्यांच्या आईची भूमिका आता मला मिळू शकणार नव्हती. पण त्यामुळेच जास्त वेगळ्या प्रकारच्या भूमिका माझ्याकडे येऊ लागल्या. हा एक अनपेक्षित ‘साइड इफेक्ट’ होता. कारण माझ्या वयाचे अनेक लोक निवृत्तीची भाषा करत असताना माझ्याकडे काम आहे, याची जाणीव झाली.
‘करोना’ची टाळेबंदी सुरू असताना असा एक चित्रपट माझ्याकडे आला. तोही गुजराती! ही माझी मातृभाषा. पण त्यात मी आजवर फक्त दोन नाटकं केली होती. चित्रपट ‘कच्छ एक्स्प्रेस’ची संहिता अगदी वेगळी होती. गुजराती चित्रपटसृष्टीत या प्रकारचे चित्रपट अपवादाने आढळतात. तरुण लेखक, दिग्दर्शक आजच्या काळातल्या कथा, नवीन दृष्टिकोनातून जास्त प्रमाणात मांडू लागले होते आणि मुख्य म्हणजे त्यांना निर्माते मिळत होते. त्या चित्रपटसृष्टीचं एक प्रकारचं पुनरुज्जीवन होत होतं. मला माझी भूमिका आणि त्या तरुण, उत्साही युनिटबरोबर काम करण्याचा आनंद तर होताच, पण त्यापेक्षाही मोठा आनंद होता, तो माझ्या मातृभाषेत काम करण्याचा. राम मोरी या तरुण संवादलेखकानं संवादांत जो परिणाम साधलाय, ते वाचून माझा आनंद वाढला. वाक्प्रचारांचा आणि बोलीभाषेचा आकर्षक वापर, पटकन बोलता येईल अशी ‘हायब्रिड’ बोलीभाषा आणि व्यक्तिरेखांमधलं खरं वाटणारं नाट्य, यामुळे माझं काम सोपं झालं. मी गुजरातीत अभिनय केला, त्याला २० वर्षं होऊन गेली होती. त्यामुळे तीच आपली रोजची, एकमेव भाषा असल्यासारखं बोलता येईल का, याबद्दल जरा शंका वाटत होती. चित्रपटाचा ‘महुरत’ झाला आणि पूजेनंतर कुणीतरी अचानक ‘अंबा मा नो गरबो’ गायला सुरुवात केली. आपोआप सगळ्यांनी त्या सुरात सूर मिसळले आणि आधी काही न ठरवता एकदम गरबा नृत्य सुरू झालं. मला दम लागेपर्यंत आम्ही गरबा खेळत होतो आणि हाती घेतलेलं काम अगदी छान पूर्ण करायचं हा विश्वास मनात होता…
चित्रीकरण स्वप्नवत झालं. आम्ही तालमी सुरू केल्या आणि चित्रीकरण सुरू झाल्यावर त्यात आमच्या बाजूनं इतकं काही काही वेगळं देण्याचा प्रयत्न केला की ते अकल्पितपणे जिवंत झालं. युनिटमध्ये सगळ्यांत वयस्कर मीच. त्यांच्याबरोबर मी प्रथमच काम करत होते आणि हे अभिनेते किती आत्मविश्वासानं आणि कौशल्यानं अभिनय करतायत याचं मला सतत आश्चर्य आणि आनंद वाटत होता. अभिनेत्यांकडे काय काय प्राथमिक क्षमता असतात, याबाबतीत आज नि:संशयपणे जमीन-अस्मानाचा बदल झालाय. आम्ही या वयात होतो, त्यापेक्षा आताचे तरुण अभिनेते खूपच आत्मविश्वास असलेले आणि तयारीचे आहेत. बाकीच्या ‘क्रू’च्या बाबतीतसुद्धा हेच म्हणता येईल. या युनिटचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे निर्मिती, चलचित्रण, ध्वनी, कलादिग्दर्शन, कपडेपट या विभागांचं नेतृत्व स्त्रिया करत होत्या.
हा चित्रपट मला विशेष वाटतो, त्याचं आणखी एक कारण म्हणजे ती मी माझ्या आईला (दीना पाठक) दिलेली आदरांजली होती! तिचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. या भूमिकेत तो प्रभाव प्रतिबिंबित झालाच, शिवाय मी माझी स्वत:चीही भर घातली. म्हणजे जणू ती प्रथम माझं कुठं तरी चुकेल म्हणून, मला वाट दाखवायला माझ्या खांद्यांवर बसली होती आणि नंतर मात्र तिला फारसं काही करावं न लागल्यामुळे ती आनंदानं विसावली! या चित्रपटाच्या काही प्रसंगांत स्वत:ला पाहताना मला माझ्यात आणि आईच्यात खूप साम्य दिसतं, पण ती नक्कल नाहीये, तर आमच्यातली एकरूपता आहे. आधी तिच्या अभिनयाची ‘कॉपी’ करणं, मग तिची शैली एकदम दूर ठेवणं, अनेकदा त्याची चेष्टा उडवणं, असे टप्पे पार करत करत माझा प्रवास तिची खास जादू समजून घेण्यापर्यंत पोहोचला. अभिनेत्री म्हणून तिला जणू प्रत्येक स्त्री व्हायचं होतं! हावरेपणानं वेगवेगळे अनुभव स्वत:त उतरवत आयुष्य जगण्याची तिची जादू तिनं थोडीशी मलाही दिलीय!
chaturang@expressindia.com