डॉ. भूषण शुक्ल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांना घडवताना पालकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. मुलांच्या सुखासाठी, शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी बहुतांश पालकांना कष्ट करावे लागतातच. काही मुलं मात्र लहानपणापासूनच आईवडिलांच्या पैशांचे आपण मालक आहोत, असा समज करून घेतात. यामुळे कोणालाही न विचारता घरातील पैसे घेऊन, त्यांच्या दृष्टीने चोरून नव्हे शाळेतल्या मित्रांना पार्टी देणं, ही बारा वर्षांच्या अक्षयला त्याची चूक वाटत नाही. पालकत्वाची ही प्रश्नपत्रिका कशी सोडवली त्याच्या आईवडिलांनी?

नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून संदीप अक्षयला शाळेच्या बससाठी खाली सोडून आला आणि आवरून तो जिमला जायची तयारी करत होता तेवढ्यात फोन वाजला. महेशचा फोन होता. इतक्या सकाळी फोन म्हणजे काहीतरी इमर्जन्सी असणार म्हणून संदीपने काळजीनं लगेच फोन उचलला, ‘‘काय रे महेश, काय झालं?’’

‘‘हे बघ आज अक्षयच्या डायरीमध्ये बहुतेक टीचरची नोट येणार आहे. काल त्याने वर्गात काही मुलांना प्रत्येकी एक मोठा कॅडबरीचा बार वाटला. ज्यांना कॅडबरी दिली नाही त्यांच्यापैकी कोणीतरी टीचरला सांगितलं. आज त्या बहुतेक अक्षयला रागावतील आणि नोट्सुद्धा पाठवतील. मला रोहनकडून आताच कळलं.’’

महेशचा मुलगा रोहन आणि संदीपचा अक्षय हे एकाच वर्गात होते आणि चांगले मित्रही होते. त्यामुळे त्यांच्या आई-बाबांची ओळख झाली आणि कालांतरानं चांगली मैत्री बनली होती. आता काय करावं या विचारात संदीप असतानाच मोनिका तिथे आली, ‘‘जिमला गेला नाहीस अजून. तब्येत बरी नाहीये का?’’

‘‘मी ठीक आहे. आपल्या चिरंजीवांचं डोकं मात्र फिरलेलं दिसतंय.’’ संदीपने सगळं काही मोनिकाला सविस्तर सांगितलं. ते सगळं ऐकून मोनिकाचा चेहरा अगदीच पडला. ‘‘अरे, देवा. आता ही तिसरी वेळ. मागच्या दोन्ही वेळेस फक्त मलाच कळलं आहे असं दाखवून, थोडंसं रागावून आपण सोडून दिलं. आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय. कालच आई सांगत होत्या की, त्यांचे २००० रुपये कमी झालेत. ‘‘मला आता खात्री पटलीय की, अक्षयला बोर्डिंग स्कूललाच पाठवायला पाहिजे. त्याशिवाय शिस्त लागणार नाही त्याला.’’ संदीप चांगलाच रागावला होता.

‘‘अरे, तिथे वर्षातले नऊ महिने राहणार आणि शेवटी शाळा तर संपेलच ना? मग त्यापुढे काय?’’

‘‘ठीक आहे. आज घरी आला की बोलूया त्याच्याशी. आईलाही सांगून ठेव.’’

दुपारी अक्षय घरी आला तेव्हा नेहमीप्रमाणे मोनिकाने त्याची बॅग घेतली आणि डायरी वाचायला काढली. डायरीमध्ये काहीही नोट नव्हती. थोडं नीट बघताच तिच्या लक्षात आलं की, डायरीचं एक पान फाडलेलं आहे. ते पान अक्षय समोर धरून ती म्हणाली, ‘‘टीचरने काहीतरी निगेटिव्ह नोट दिली म्हणून तू हे पान फाडून टाकलंस?’’

चेहऱ्यावरची रेषसुद्धा न हलवता अक्षय म्हणाला, ‘‘वर्गात ओढाओढी झाली. फाटलं असेल.’’

‘राग’ आणि ‘निराशा’ हे दोन्हीही आवरून धरून मोनिकाने शक्य तितक्या शांत आवाजात अक्षयला सांगितलं, ‘‘तू काल शाळेमध्ये महागाची कॅडबरी वाटली. हे आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. बाबालासुद्धा कळलेलं आहे. मागच्या दोन्ही वेळेस छोटी चूक आहे म्हणून मी ते सोडून दिलं होतं. या वेळेस तू खूप जास्त पैसे खर्च केलेले आहेस. ते आमच्यापैकी कोणाच्या तरी पाकिटातूनच घेतलेले असणार आहेस. मी तुला विचारत राहायचं आणि तू नाही म्हणत राहायचं याला काही अर्थ नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट लॉकरमध्ये ठेवत नाही. या घरात जे काय आहे ते आपल्या सगळ्यांचंच आहे या भावनेनं जे काय आहे ते उघड तुझ्यासमोर असतं. असं असताना तू असं का वागतोस? तुला काय कमी आहे की तू हे पैसे चोरतो आहेस? तू मागितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही तुला देतो की नाही?’’

अक्षय तिच्याकडे बघत होता. पुढचा प्रश्न न विचारता मोनिका शांतपणे तो बोलायची वाट बघत राहिली. थोड्या वेळाने अक्षय बोलता झाला, ‘‘आई, माझे सगळे मित्र नेहमी माझे कपडे, शूज, गॅजेट्स बघत असतात. वर्गातल्या सगळ्या मुलांपेक्षा माझ्याकडे जास्त वस्तू आहेत. त्यामुळे अधूनमधून मी त्यांना पार्टी द्यावी, असं त्यांना वाटतं. मित्रांना पार्टी देण्यासाठी मी जर पैसे मागितले, तर ते तुम्ही मला निश्चित देणार नाही.’’

‘‘म्हणजे काय स्वत:च्याच घरात चोरी करायची?’’

मोनिकाचा आवाज इतका वाढला की, आजीलासुद्धा ऐकू गेला. आजी घाईघाईनं तिथे आली. ते दोघेही एकमेकांकडे रागावून बघत आहेत हे लक्षात येताच आजी दारापाशी थांबली. ‘‘काय झालं मोनिका?’’

‘‘आई बघा ना. अक्षयने पुन्हा घरातले पैसे घेऊन मित्रांना पार्टी दिली. मागच्या दोन्ही वेळेस आपण जे समजावून सांगितलं ते अगदीच पालथ्या घड्यावर पाणी दिसतंय.’’

हतबल आवाजात आजीने अक्षयला विचारलं, ‘‘राजा तू स्वत:च्याच घरात अशी चोरी का करतोस?’’

अक्षय बराच वेळ ओठ दाबून गप्प राहिला. नंतर अत्यंत निग्रहानं त्यानं तोंड उघडलं, ‘‘हे बघ तुम्ही सगळे आपले, घर आपले, पैसे सगळे काही माझेच आहेत, मोठा झाला की हे मलाच मिळणार आहे वगैरे सतत म्हणत असता. बाबांनी तर आपल्या दुकानालासुद्धा माझंच नाव दिलं आहे.’’

‘‘हो. हे सगळं तुझंच आहे. आम्ही काय बरोबर घेऊन जाणार आहोत का?’’ आजीचा स्वर अजूनही समजुतीचाच होता.

‘‘मग हे सगळं जर माझं आहे, तर त्यातले काही पैसे घेऊन मी माझ्या मित्रांना पार्टी दिली तर काय बिघडलं? हे माझेच पैसे आहेत ना?

‘‘राजा आपल्या घरात जे आहे ते आपल्या सगळ्यांचंच आहे यात काय शंका नाही.’’

‘‘सगळ्यांचं काय आहे? तुमचं तिघांचं आहे. तुम्ही हवे तेव्हा हवे तितके पैसे खर्च करता. तुम्हाला कोणाला कोणाची पर्मिशन घ्यावी लागत नाही. बाबांनी परवाच जिमला जाण्यासाठी दहा हजार रुपयांचे शूज घेतले. विचारलं का कोणाला? परवानगी घेतली का कोणाची? तुम्ही सगळे फक्त म्हणता की हे सगळं तुझं आहे. पण यातलं माझं काहीही नाहीये. जर माझं असतं, तर तुम्ही याला चोरी म्हटलं नसतं. मला कशालाही हात लावायला परवानगी नाहीये. त्यामुळे मी माझ्या स्वत:साठी घरातले थोडे पैसे जर घेतले तर तुम्ही त्याला ‘चोरी’ म्हणता? मी फक्त मित्रांनाच गिफ्ट देतोय ना? दारू पीत नाहीये. बाबा तर ते पण करतो. दरवेळी परदेशातून येताना इतक्या महागाच्या दारूच्या बाटल्या घेऊन येतो सगळ्यांना कौतुकानं दाखवत असतो की ही वीस हजाराची असते पण ड्युटी फ्रीमध्ये दहा हजाराला मिळाली. हे पैसे उडवणं नाही का? मी मित्रांना पार्टी दिली, तर ती चोरी आणि बाबांनी खर्च केलं तर ती गिफ्ट असं कसं काय?’’

बारा वर्षांच्या मुलाच्या तोंडून हे सगळं परखड बोलणं ऐकून आई आणि आजी दोघीही स्तब्ध झाल्या. अक्षयला कशा प्रकारे उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना. शेवटी ‘‘जाऊ दे बाबा. हे सगळं माझ्या अकलेपलीकडचं आहे. संदीप आला की शांतपणे बोलून याच्यावर काहीतरी पर्याय शोधूया.’’, असं म्हणून आजीने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला डायनिंग टेबलकडे घेऊन गेली. मोनिका तिथेच विचार करत बसली. या वेळी तर अक्षयला होस्टेलला जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही याची तिला खात्री पटली.

तेवढ्यात दार उघडण्याचा आवाज आला आणि संदीप घरात आला. मोनिकाच्या छातीची धडधड अजूनच वाढली. तिने त्याला किचनमध्ये बोलावलं. अक्षय आणि आजी तिथे बसलेले होतेच.

संदीपने आत आल्या आल्या अक्षयच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि ‘‘काय चॅम्पियन आज काय कार्यक्रम केलात?’’ असं हसत हसत विचारलं. आजी, मोनिका आणि अक्षय तिघेही हसावं की घाबरावं या मन:स्थितीत असतानाच बाबा पुढे म्हणाला, ‘‘अक्षय तुझ्या शाळेत काय झालं आहे हे मला कळलं. मी प्रिन्सिपलना फोन केला. त्यांनी तिन्ही प्रसंग मला सांगितले आणि तुझे मित्र नेहमी तुझ्याकडे पार्टी मागतात आणि तूसुद्धा मित्रांना अशा पार्ट्या देतो. हे मला त्यांनी सांगितलं.’’

अक्षयची नजर पुन्हा एकदा खाली गेली. बाबा इतक्या गमती गमतीत बोलतो आहे आणि तेही इतक्या सिरियस गोष्टीबद्दल म्हणजे हे सगळे निश्चित नाटक आहे. बहुतेक काही क्षणांतच त्याच्या रागाचा स्फोट होईल. आपल्याला दोन फटके बसतील आणि या वेळेस तर होस्टेल निश्चित अशी त्याची खात्री पटली.

संदीपने जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा अक्षयने अलगद खांदा काढून घेतला. ‘मारायचं असेल तर मार. उगाच प्रेमाचं नाटक नको करू आणि असं फ्रेंडली होण्याचं नाटक तर मुळीच करू नको.’, असं त्याच्या मनात चालू होतं. अर्थातच हे बाबाला तोंडावर बोलण्याची त्याची हिंमत नव्हती.

संदीपच पुढे बोलला, ‘‘तुला मित्रांना पार्ट्या द्यायच्या आहेत आणि पार्टी घेऊन तुझ्याबरोबर टिकणारे मित्र हे तुझे खरे मित्र तुला जर वाटत असतील तर मी काय सांगणार? कारण काही दिवसांत दुसरा कोणीतरी पार्टी देणारा आला की हे सगळे त्याचे मित्र होतील. हे तू स्वत:च्या डोळ्यांनी बघशीलच. माझ्या धंद्यामध्ये माझं एक तत्त्व आहे की, ‘मोठा डिस्काउंट’ या कारणाने माझ्याकडे येणारे ग्राहक हे त्या डिस्काउंटचे ग्राहक आहेत. माझे नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या फारसा मागे लागायचा प्रयत्न करत नाही. मैत्रीमध्येसुद्धा हेच खरं आहे. फक्त पार्ट्यांसाठी गोळा होणारे लोक हे खरे मित्र नाहीत. १२व्या वर्षी तुला हे पटणं शक्य नाही. चार वेळा मित्र तुला सोडतील तेव्हा अनुभवातून तू हेसुद्धा शिकशील. मीही तसाच शिकलो आहे. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या स्वत:चं डोकं आपटूनच शिकाव्या लागतात.’’

आता आश्चर्यचकित होण्याची वेळ अक्षय, मोनिका आणि आजी या सगळ्यांची होती. संदीपचं बोलणं संपलं नव्हतं, ‘‘मी आणि तुझी आई खूप मेहनत करून आणि डोकं वापरून हे पैसे कमवतो. आपल्या सुखासाठी, तुझ्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी हे पैसे ठेवलेले आहेत. पण हे तुझे नाहीयेत. आतापर्यंत या सर्व गोष्टी तुझ्या आहेत हे सांगण्याची मी चूक केली. तुझा त्यामुळे गैरसमज झाला. मी मित्रासारखा तुझ्याशी वागायला गेलो ही माझीच चूक झाली. मी तुझा बाप आहे आणि बापच राहणार. हे सगळं आम्ही कमावलं आहे. आमच्या नंतरच तुला मिळणार आहे आणि त्याला बहुतेक अजून खूप वेळ लागणार आहे.’’

बाबाच्या या विनोदावर हसावं की काय हे अक्षयला कळेना. म्हणून त्याने आईकडे बघितलं. बाबाला अनेक वर्षं नीट ओळखून असलेली आई मनापासून हसत आहे हे बघून तो थोडा रिलॅक्स झाला. संदीपचं अजून सगळं संपलं नव्हतं. तो बोलतच होता, ‘‘तुला जर पैशाची गरज असेल तर मी तुला जॉबची सोय करतो. तुला कॉम्प्युटर उत्तम येतो. माझ्याकडे दुकानामध्ये विश्वासाच्या माणसाने करण्याची काही कामे आहेत. आठवड्याला चार किंवा पाच तास लागतील. त्यापेक्षा जास्त लागणार नाही. तू जर माझं काम विश्वासानं आणि व्यवस्थित करणार असशील तर दर महिन्याला तुला काहीतरी पगार देण्याची मी सोय करतो. तू बारा वर्षांचा असलास तरीही तुला स्वत:च्या कष्टाचे पैसे मिळवण्याची, स्वकमाईची आणि त्याचं पुढे काय करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्याची माझी तयारी आहे. मला असं वाटतं की, यातून तू जास्त जबाबदार होशील. तू हुशार आहेस चार चुका केल्यास तरी त्यातून शिकशील असं मला वाटतं. खात्रीच आहे मला. मोनिकाचा मुलगा बुद्धू असू शकत नाही.’’

आता सगळेच जण जरा निवांत झाले. अक्षय म्हणाला, ‘‘मी जरा विचार करून तुला सांगतो. काम काय आहे आणि कसा वेळ त्याच्यासाठी काढावा लागेल? त्याच्यासाठी मला किती पगार हवा आहे याच्यावर मला विचार करावा लागेल.’’ संदीप आणि मोनिका मनापासून हसले आणि आजीच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अक्षय त्याच्या रूममध्ये आवरायला निघून गेला.

संदीप या दोघींकडे वळला. समोर पैसे पडलेले असताना त्याला हात लावायचा नाही. एवढा सेल्फ कंट्रोल मोठ्या मोठ्या माणसांमध्ये नसतो. तो आपल्या मुलांमध्ये असेल ही अपेक्षा करणं ही आपली चूक झाली. शिवाय आजकाल मुलं जे काही उद्याोग करतात ते त्याच्या डोळ्यासमोर आहेतच. त्याने पैसे उचलून काही वेडंवाकडं केलं नाहीये. फक्त खाण्यावर पैसे खर्च केलेले आहेत. ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. हे पुन्हा होऊ नये ही आपली तिघांची जबाबदारी आहे असं मला वाटतं.’’

मोनिका म्हणाली, ‘‘मलासुद्धा अगदी असंच वाटतं. इतके दिवस ही गोष्ट आपल्या तिघांमध्येही उघडपणे बोलली गेली नव्हती. यापुढे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पैसा हा उघड्यावर राहणार नाही, याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. दुकानातून आलेली कॅश ही थेट लॉकरमध्ये गेली पाहिजे. आपलं पाकीट, पर्स हे व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून कुलूप लावलं गेलं पाहिजे. लहान मुलांच्या समोर अशा प्रकारचं प्रलोभन ठेवायचं आणि त्याची सत्त्वपरीक्षा घ्यायची हे योग्य नाही. भलेभले ऋषीसुद्धा तपोभंग करून बसतात तिथे अक्षयचा काय पाड?’’

हे ऐकताच आजीनं मोनिकाला चांगली जोरात टाळी दिली. ‘‘हे बाकी खरं बाई. आजकाल लहान मूल होणं हे फार अवघड आहे. तुमच्या लहानपणी सारं काही सोपं होतं. आजूबाजूला मुळी फार काही नव्हतंच. त्यामुळे असले खड्डे असलेल्या रस्त्यात आपलं लहानपण गेलं नाही. आपल्याला उगाच वाटतं की, आपण लहानपणी खूपच चांगले होतो वगैरे. असो. आजच्यापुरता तरी आपला प्रश्न सुटलेला दिसतोय. बघूया पुढचा प्रश्न काय येतोय. या पालकत्वाच्या प्रश्नपत्रिकेत!’’

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang article about children misuse money of parents amy