तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ
स्वत:चं खासगीपण सांभाळण्यासाठी एकटं राहणं आणि माणसांच्या गर्दीतही एकाकीपणानं जीवनाला वेढून टाकणं यात मुळातच फरक आहे. यातला दुसऱ्या प्रकारचा एकटेपणा मनाचा. जगण्यातला अर्थच ज्यामुळे हरवल्यासारखा वाटतो, असा. आज वेगवेगळ्या कारणांनी अनेकांची अशा एकाकीपणाशी गाठ पडते आहे. पण जीवनात आपल्या नातेसंबंधांवर आपण प्रयत्न केले, तर कधी तरी ज्यानं आपलं मुक्तपणे ऐकून घ्यावं असा कान आणि क्वचित रडावंसं वाटलं, तर तीही मुभा देणारा खांदा आपल्याला नक्की मिळू शकतो.. किंबहुना आपणही दुसऱ्यासाठी तो होऊ शकतो.
साधारणपणे ८० च्या दशकात ‘उलुशी खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारीच सुख,’ असं सहा-आठ माणसांच्या घरात राहणाऱ्या सुनेला वाटणं अगदी साहजिकच होतं. किंबहुना मोठय़ा माणसांच्या धाकाशिवाय एकटं राहायला मिळणं ही चैन वाटायची. त्यानंतर नोकरीनिमित्तदुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचं प्रमाण वाढत गेलं, तसं विभक्त कुटुंबपद्धती वाढू लागली. त्यामुळे वेगळं राहणं ही चैन अनेक कुटुंबांना विनासायास मिळाली. या सगळय़ांकडेपाहिलं की एकटेपणा ही चैन किंवा सुख वाटतं. पण आपण आता करोनाच्या साथीतून बाहेर पडलेली पिढी आहोत आणि या दीर्घकाळ चाललेल्या साथीत प्रत्येकालाच कधी ना कधी हा एकटेपणा अंगावर आला होता. करोनाची साथ गेली, आयुष्य पूर्वपदावर आलं. आपला प्रवास पुढे सुरू राहिला, पण एकटेपणा हा तसाच घर करून राहिला आहे. एकटेपणा वाटण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे, की जागतिक आरोग्य संघटनेला याची दखल घेऊन एकाकीपणा ही एक नवीन साथच आहे असं म्हणावं लागलं! म्हणूनच त्याचा गांभीर्यानं विचार करायची वेळ आता येऊन ठेपली आहे.
नीतू नुकतीच कॅनडाला उच्च शिक्षणासाठी गेली. आईकडून लाडावलेल्यानीतूला सुरुवातीला तिथे सगळय़ांशी जुळवून घेताना बराच त्रास झाला. भारतातही ती फारसं बाहेर पडायची नाही. ती भली की तिचं शिक्षण भलं. त्यासाठी कॉलेज एवढंच तिचं विश्व होतं. तरीही नीतू कॅनडात एकटी पडली. कुणावर विश्वास ठेवावा? कुणाशी बोलावं? तिला काहीच उलगडा होत नव्हता. आपल्या एकटेपणाबद्दल बोलताना ती म्हणाली, की मुंबईच्या अचाट गर्दीतून बाहेर पडल्यानं कॅनडात रस्त्यावर सहसा कुणीच माणूस न दिसणं, इथून एकटं वाटणं सुरू झालं.
एकटं असणं (बीइंगअलोन) आणि एकाकीपणा (लोन्लीनेस) यात फरक आहे. आपण करोनामध्ये आपापल्या घरात बंद होतो तेव्हा आपण एकटे होतो. समाजापासून, मित्र-नातेवाईकांपासून. पण इंटरनेटच्या कृपेमुळे सगळय़ांच्या संपर्कात राहण्याचा पर्याय आपल्याकडे होता. त्यामुळे प्रत्येक कुटुंब किंवा व्यक्ती घरात एकटी असली तरी त्यांना एकाकीपणा जाणवला असेलच असं नाही. नीतूच्या आयुष्यात घराचं दार उघडलं तरी बोलायला कुणी नव्हतं, तिचं जेवणात लक्ष आहे की नाही हे बघायला कुणी नव्हतं. पण आई-बाबा आणि भारतातले मित्रमैत्रिणी दूरसंचार क्रांतीमुळे तिच्याशी जोडलेले होते. त्यामुळे मनात एकाकीपणानं घर केलं नाही किंवा ती पोकळी तिला जाणवली नाही.
याउलट एकाकीपणाच्या अवस्थेत ‘मला कुणी समजून घेत नाही’, ‘माझी कुणालाच गरज नाही’, ‘माझ्या असण्या-नसण्यानं कुणालाच फरक पडत नाही’, ‘मला कुणाच्याच आयुष्यात प्राधान्याचं स्थान नाही’ या प्रकारचे विचार मनात येत राहतात. ही खूप तीव्र भावना असते. एकाकीपणाच्या अवस्थेत व्यक्ती एकटी असेलच असं नाही. भरल्या घरातही एखाद्याला हा एकाकीपणा जाणवू शकतो. निदा फाजली यांनी लिहिलेली आणि जगजीतसिंग यांनी गायलेली, ‘हरतरफ हर जगहबेशुमारआदमी, फिर भीतनहाईयों का शिकार आदमी’ ही गझल याचीच निदर्शक!
एका समुपदेशन सत्रात एका १८ वर्षांच्या मुलानं आपल्या एकाकीपणाचं वर्णन करताना सांगितलं, की ‘रात्रीच्या वेळी मला इतकं एकटं वाटतं की मग कडाक्याची थंडी असली तरी पंखा जोरात लावून झोपतो.. जेणेकरून मला निदान बोचऱ्या हवेच्या अस्तित्वाची तरी जाणीव होईल.’ या वाक्यातूनच त्याच्या एकाकीपणाची भयाण तीव्रता अंगावर येते.
पूर्वी जेव्हा ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर एखादा माहितीपट बघताना एखाद्या सिंहाला जंगलात एकटाच फिरताना पाहायचे, तेव्हा मला नेहमी वाटायचं की ‘याला बोअर होत नसेल का?’ हे वाटायचं कारणच असं, की आपल्याला सहजीवनाची खूप सवय असते. माणूस मुळातच सामाजिक प्राणी आहे. तो आदिमानव काळापासूनच कळपात राहिलेला आहे. त्यामुळे एकटं राहणं हेही सुदृढ मनाला कधीच जमत नाही. त्यामुळे एकाकीपणा तर मनावर आघातच करतो.
सुषमा ही तिशीतली तरुणी पुण्यात नोकरी करायची आणि तिचा नवरा अजित नगरला आपल्या आई-वडिलांबरोबर राहायचा. सुषमाला बदली मिळत नव्हती आणि अजित पुण्याला बदली घ्यायला तयार नव्हता. ‘वन-बीएचके’च्या घरात सुषमाला खूप एकटं वाटायचं. सुरुवातीला तासभर फोनवरबोलणारा अजित आता पाच-दहा मिनिटांत फोन आटपायचा. मग सुषमाला घरातली शांतता बोचू लागायची. एकदा रात्री वीज गेल्यावर तिचा जीव गुदमरला. सुरक्षिततेसाठी गच्च बंद केलेली दारं-खिडक्या आणि आतला अंधार, ही भीती तिनं त्या रात्री अनुभवली. आपल्याला काही झालं तर अनोळखी जागेत आपल्याला कोण मदत करेल? कुठे जायचं? या प्रश्नांनी तिच्या मनात काहूर उठवलं. अशा असंख्य सुषमा कामाच्या निमित्तानं जोडीदारापासून वेगळय़ा राहतात आणि मग हा एकाकीपणा एक प्रकारची भीती घेऊन येतो.
मनीषाच्या घरची परिस्थिती थोडी वेगळी होती. तिचा नवरा केदार मोठय़ा कंपनीत मोठय़ाहुद्दय़ावर कामाला होता. त्यांच्या लग्नाला आता वीस वर्ष झाली होती. मुलं आपापल्या कामात होती. घरात सगळय़ा कामांसाठी बाई होती. सगळे जण सकाळी नऊला कामासाठी बाहेर पडायचे आणि रात्री यायची कुणाचीच वेळ निश्चित नव्हती. सुरुवातीला तिनं भरपूर सिनेमे-वेबसीरिजबघितल्या. नंतर त्यातही तिला रस वाटेनासा झाला. सगळं घर टापटीप राहायचं, कारण पसारा करायलाच कुणी दिवसभर घरी नसायचं. सगळय़ांचादिवसभरात काही तरी निरोप देण्यासाठी फोन व्हायचा, पण ‘तू कशी आहेस?’, ‘तू जेवलीस का?’ हे विचारायला कुणालाच वेळ नसायचा. मुलं मोठी होईपर्यंत ती घरातून फारशी बाहेर पडलीच नव्हती, त्यामुळे आता छंद नव्हते तिला. मध्येच वाटून जायचं, की यापेक्षा एकत्र कुटुंब असतं तर बरं झालं असतं. निदान सासू-सासऱ्यांमुळे घराला जाग असली असती. मुलं, नवरा सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपापल्या कामात आणि फोनवर मग्न असायचे. मनीषाच्या मनाचा एकाकीपणा असा वाढत वाढत गेला, की तिला खाण्यापिण्यात, टीव्हीमध्ये, माणसांमध्ये रस वाटेनासा झाला. मनीषाचा एकाकीपणा तिच्या आयुष्यात अशा प्रकारे आधी विमनस्कता आणि नंतर डिप्रेशन (नैराश्य) घेऊन आला.
एकाकीपणा हा शब्द स्वत: एकटा येत नाही, तर तो अनेकदा उदासीनता-विमनस्कता, भीती (फियर), दुष्चिंता (एन्झायटी) हे मानसिक आजार घेऊन येतो. पस्तिशीतलीरुही शाळेपासूनच एकदम हुशार व चुणचुणीत मुलगी होती. आयआयटीमधून पदवी घेऊन बाहेर पडल्यावर परदेशात गेली तेव्हाच आई-बाबा लग्नासाठी मागे लागले होते. पण करिअरमध्ये अडथळा होईल, नंतर बघू, असं म्हणत तिनं लग्न टाळलं. नंतर राहून गेलं. कितीही यश मिळालं तरी तुमचं शरीर तुमच्याशी त्याच्या गरजांबद्दल बोलल्याशिवाय राहत नाही. आता तिला जोडीदाराबरोबरच आईपणाची ओढ लागली होती. पण तिच्या बरोबरीचा, तिच्या अपेक्षांवर खरा उतरेल असा जोडीदारच तिला दिसत नव्हता. दिवसभर खूप काम असायचं. किंबहुना एकटेपणाच्या भीतीनं ती स्वत:ला कामात बुडवून घ्यायची. पण असं किती काळ चालणार होतं.. आपलं पुढे कसं होणार? आपण आयुष्यभर एकटे राहणार का? हे सगळे विचार तिला त्रास द्यायचे. दणदणीत पगार मिळणाऱ्या तिला आपापल्या मुलांच्या मागे धावाधाव करणाऱ्या मैत्रिणींचा हेवा वाटायचा. या सततच्या अतिविचार करण्यामुळे, ‘ओव्हरिथकिंग’मुळे तिचा एकटेपणा हा दुष्चिंता घेऊन आला.
फक्त जोडीदार नसणं हे एकमेव एकाकीपणाचं कारण आहे का? प्रियंका नावाची माझी एक रुग्ण घटस्फोटानंतर माहेरी परत आली. तिच्या लग्नाचा अनुभव इतका वाईट होता, की लग्न तुटल्याची सल, जोडीदार नसण्याचं कोणतंही दु:ख तिच्या मनात नव्हतं. ती माहेरी आल्यानंतर तिला ‘का परत आलीस?’ असं जरी कुणी तोंडावर बोललं नाही, तरी तिला स्वीकारलं गेलं आहे असंही तिला जाणवत नव्हतं. तिच्या करिअरमध्ये ती खूश होती. पण घरी तिला जे पूर्वीसारखं प्रेम, आपुलकी पाहिजे होती, ते मिळत नव्हतं. आणि त्यातून तिला एकाकीपणा आला होता. प्रेम, दया, प्रशंसा, समानभूती (एम्पथी) या सगळय़ा माणसाच्या मूलभूत मानसिक गरजा आहेत. त्या पूर्ण होणं मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. या गरजा समाजात पूर्ण होतातही, पण त्यापेक्षाही जास्त त्या घरातून पूर्ण होण्याची अधिक गरज आणि अपेक्षा असते. नेमकं प्रियंकाला तेच मिळत नव्हतं. प्रियंकाला तिच्या पूर्वायुष्यातून बाहेर पडण्यासाठी आईनं पाठीवर फिरवलेला मायेचा आणि धीर देणारा हात हवा होता, तिच्या कामाची दखल घेत कौतुकानं दिलेली शाबासकीची थाप हवी होती. दैनंदिन आयुष्यात तिच्याबरोबर झालेल्या बऱ्यावाईट प्रसंगांसाठी आईनं श्रोता झालेलंहवं होतं. पण आई फक्त तिचं पुढे कसं होणार आणि लोकांना काय वाटेल, एवढीच काळजी करत बसायची. इतरांकडेही सतत तेच बोलत राहायची. परिणामी प्रियंका आणि तिच्यामध्ये एक नवीनच भिंत उभी राहिली होती. ती भिंत होती परकेपणाची आणि त्यातून येणाऱ्या एकाकीपणाची.
ज्योती तिच्या ऑफिसमध्येरुजू होऊन आज सहा महिने झाले होते. ती बदली होऊन ऑफिसमध्ये आली होती. आधीच्या सगळय़ाकर्मचाऱ्यांचा इथे छान ग्रुप होता. ज्योतीच्या आधी तिथं ज्या ऑफिसर बाई होत्या, त्या सगळय़ांना खूप आवडायच्या. ‘ज्योतीमुळेच त्या दुसरीकडे बदलून गेल्या,’असा काही तरी सूर ऑफिसमध्ये होता. कामाव्यतिरिक्त तिच्याशीफारसं कुणी बोलायचं नाही. जेवणाच्या वेळातही त्यांच्यात जायला तिला खूप संकोच वाटायचा. या सगळय़ा परिस्थितीत एक-दोन महिने ज्योती असं होणारच म्हणून शांत राहिली. पण सहा महिन्यांनंतर मात्र ती रोज घरी येऊननवऱ्याजवळ रडायची. ऑफिसमधल्या एकटेपणामुळे ऑफिसला जायची वेळ आली की तिला रडू यायला सुरू व्हायचं. अशा ज्योतीही अनेक ऑफिसमध्ये बघायला मिळतात. तशा त्या शाळेत, कॉलनीत, भिशी ग्रुपमध्येसुद्धा सहज भेटतात. त्याला वयाचंही काही बंधन नसतं. अशा प्रकारच्या ग्रुपचं फलित हा एकाकीपणा असतो.
माणसाला आधार व्यक्तीकडूनच मिळू शकतो. ती व्यक्ती जोडीदार, मित्र, नातेवाईक किंवा कामाच्या ठिकाणावरील सहकारी, असं कुणीही असू शकतं. मनातल्या गोष्टी सांगायला, कधी तरी रडू आल्यावर रडायला एक खांदा प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. आपल्या नातेसंबंधांवर आपण प्रयत्न केले तर आपल्याला असा खांदा नक्की मिळू शकतो. शिवाय एकटेपणावर मात करण्यासाठी स्वत:ची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे. घरीच आहोत म्हणून वेळापत्रक नाही, शरीराच्या वेळापत्रकाच्या विपरीत रात्रभर जागायचं आणि दिवसा खूप उशिरापर्यंत झोपायचं, यातून एकाकीपणात भर पडते. त्यामुळे लवकर झोपणं आणि लवकर उठणं, काही व्यायाम करणं,दिवसभरात काही ना काही कामानिमित्त बाहेर पडणं, सकस अन्न खाणं, या गोष्टींनीही खूप फरक पडतो. इतिहासात डोकावलं तर देशासाठी दीर्घ कालावधीचा तुरुंगवासभोगताना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘कमला’ हे काव्य आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताचा शोध’सारखा मोलाचा ग्रंथ लिहिला. एकटेपणाचं रूपांतर एकाकीपणात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी, तसंच वेळ सत्कारणी लागावा आणि मनही निरामय राहावं यासाठी त्यांना नक्कीच त्याचा लाभ झाला असणार. आपणही एकाकीपणाचे बळी ठरणार नाही, यासाठी शक्य ते करता येऊ शकतं.
कदाचित कुटुंबातून आधार मिळाला नाही, तरी विविध विषयांवर काम करणारे किती तरी सपोर्ट ग्रुप किंवा संस्था आहेत. त्यात आपण सहभागी होऊ शकतो. नंतरही जर एकाकीपणावर मात करता आली नाही, तर मात्र तुम्हाला थेरपीची मदत घ्यावी लागेल. ‘मी कुणाला नको आहे’, ‘माझ्या जगण्याला काही अर्थ नाही’, ‘माझ्यासाठी कुणाला वेळ नाही’, अशा प्रकारच्या सर्व धारणा या विवेकाच्या कसोटीवर तपासून बघाव्या लागतील आणि अविवेकी धारणा या विवेकनिष्ठ धारणांमध्ये बदलाव्या लागतील. तरच तुम्हाला तुमच्या एकटेपणातून सुटका मिळून तुमचं आयुष्य हवंहवंसं वाटू लागेल.
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)
trupti.kulshreshtha@gmail.com