क्लस्टर ‘सी’मधले जे तीन व्यक्तिमत्त्व विकार आहेत, ते तीनही विकार लोकांना कमी आणि स्वत:ला जास्त त्रास करून घेणारे आहेत. पण सोबत असणाऱ्या जवळच्या व्यक्तीला त्यांचा विशिष्ट वर्तन प्रकार सांभाळणं जड जातं हे मात्र नक्की. पहिल्या ‘अव्हॉइडन्ट व्यक्तिमत्त्व’ प्रकारात व्यक्ती समाजात मिसळायला घाबरतात, हे आपण पाहिलं, पण आज आपण ज्या व्यक्तिमत्त्व विकाराच्या प्रकाराची माहिती घेणार आहोत, त्या प्रकारातील व्यक्तींना सतत समाजातील कोणा ना कोणावर अवलंबून राहायची सवय असते.

क्लस्टर ‘सी’मधील दुसरा प्रकार आहे. ‘डिपेन्डन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर’. नावातच जसं सांगितलेलं आहे, तसं या व्यक्तिमत्त्व विकारातील व्यक्तींना दुसऱ्यावर अवलंबून राहायची खूप सवय असते. थोड्या-फार प्रमाणात आपण सगळेच एकमेकांवर अवलंबून असतो. कोणीच पूर्णपणे स्वावलंबी असू शकत नाही. स्वावलंबित्वापेक्षा सहअवलंबित्व जास्त वास्तव आहे. पण या व्यक्ती मात्र आयुष्यातील मोठ्या निर्णयापासून रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी ठरवण्यासाठीसुद्धा दुसऱ्या कोणाचा तरी आधार शोधतात. एकंदरच या ‘क्लस्टर’मध्ये असतं, तसं सतत चिंताक्रांत आणि घाबरलेलं असणं ही या विकाराची ठळक लक्षणं.

Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा : ‘भय’भूती : भीतीचा आकाश पाळणा

दीपाली हे तिच्या घरातलं शेंडेफळ! घरात तिचे भरपूर लाड व्हायचे. आई सगळं हातात आणून द्यायची. लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण ती मोठी झाली तशी आईला तिचं अवलंबून राहणं खटकायला लागलं. एकदा तिची आई तिच्या मैत्रिणींबरोबर एका सहलीला गेली. बाबाही घरात नव्हते. आईनं जेवण तयार करून ठेवलं होतं आणि राहिलेलं फ्रिजमध्ये ठेवायला सांगितलेलं होतं. दीपालीची अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा होती. त्या नादात ती जेवण फ्रिजमध्ये ठेवायला विसरली. दुसऱ्या दिवशी जेवण खराब झालं. तिनं आईला फोन करून विचारलं, ‘‘ते खराब झालेलं जेवण खाऊ की नको?’’ वास्तविक पाहता २०-२१ वर्षांच्या मुलीला खराब जेवणाचं काय करायचं, एवढं कळू नये? पण अशासारख्या लहानसहान गोष्टीबद्दलही तिला या विकारामुळे विचारायला लागायचं. कॉलेजला जाताना तिच्या गाडीचं टायर पंक्चर झालं तर बाबांना फोन करून ती बोलवून घ्यायची आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची. अशा प्रकारे या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींना रोजच्या व्यवहारातले निर्णय घेण्यासाठीसुद्धा कोणाची तरी मदत घ्यावी लागते.

या व्यक्तींना ही कामं येत नसतात असं नसतं. खरं तर या विकाराचं दुसरं लक्षण आहे, ते म्हणजे कोणतेही निर्णय घ्यायचे म्हटलं की जबाबदारी आली, नेमकी तीच त्यांना घ्यायची नसते. मोठ्ठे निर्णय घेणं म्हणजे तर यांच्या जिवावर येतं. बारावीचा निकाल लागल्यानंतर बी.एस्सी.ला जायचं की अभियांत्रिकीला? हे ठरवताना तिनं पालकांना सांगितलं की, तुम्हीच ठरवा मी काय घेऊ ते? बाबा म्हणाले, ‘‘अगं, अभ्यास तुला करायचा आहे. तुलाच ठरवावं लागेल ना.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘आणि मला मी ठरवलेलं करायला जमलं नाही तर?’’ अशा प्रश्नाला काही उत्तर नाही. आयुष्यातले मोठे निर्णय घेताना साधारणपणे सगळेच जण चारचौघांबरोबर विचारविनिमय करतात. पण शेवटी जबाबदारी घेऊन तो निर्णय ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो. पण आपण निर्णय घेतला आणि काही चुकलं तर? असा विचार करून ते समोरच्याने घेतलेल्या निर्णयाच्या मागे डोळे झाकून जाणं पसंत करतात.

पदवीच्या तिसऱ्या वर्षी प्रमोदनं दीपालीला लग्नाची मागणी घातली. तिलाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटायचं शिवाय सगळ्याच गोष्टी जुळणाऱ्या होत्या, फक्त तिला प्रमोदला स्वत:च्या जबाबदारीवर निवडायचं नव्हतं, वाट बघून बघून शेवटी प्रमोदनं आईबाबांना मध्ये घालून सरळ तिच्या पालकांकडे जाऊन तिला मागणी घातली आणि मग त्यांचं लग्न झालं.

१९७४ मधल्या ‘सफर’ चित्रपटात हेमामालिनी आणि फिरोझ खान यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं आहे. ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे…’ तो तिच्या इतक्या प्रेमात असतो की, ‘तुम दिनको अगर रात कहो तो रात कहेंगे…’ म्हणतो. चित्रपटात ते ठीक आहे, परंतु ‘डिपेन्डन्ट व्यक्तिमत्त्व विकारा’च्या व्यक्तीही कोणाच्याच मताला कधीच विरोध करत नाहीत. मी जर असा विरोध केला तर मी लोकांना आवडणार नाही आणि मग ते मला सोडून जातील, मी एकटा-एकटी पडेन, असं त्यांच्या मनात घट्ट रुतलेलं असतं. त्यापेक्षा लोकांच्या ‘हो’ मध्ये ‘हो’ मिळवलं की, लोक त्यांनाच जास्त पसंत करतील असा त्यांचा समज असतो. याचा परिणाम असा असतो, लोकांना असा विरोध न करणारे, तुमचंच बरोबर म्हणणारे लोक खूप शांत, समजूतदार वाटतात. प्रत्यक्षदर्शी, लोकं सोडून जाण्याच्या भीतीनं त्यांना खरं काय वाटतंय ते त्यांनी आत दाबून टाकलेलं कोणाच्याच लक्षात येत नाही.

दीपालीचीही परिस्थिती फार वेगळी नव्हती. लग्नानंतर प्रमोदने तिला सांगितलं, ‘‘तुला नोकरी करायची काहीच गरज नाही.’’ यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तिनं नोकरी सोडून दिली, पटत नव्हतं तरीही. नंतर खर्च वाढले तेव्हा प्रमोदनं तिला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तगादा लावला. पण ‘डिपेन्डन्ट व्यक्तिमत्त्व विकारा’च्या दीपालीसारख्या व्यक्ती स्वत:चं नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी नेहमीच स्वत:ला असमर्थ समजतात. तेवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे कधीच नसतो. अशा वेळी नोकरीही नाही आणि स्वत:चा व्यवसायही नाही, अशी त्यांची अवस्था होऊन बसते. तिच्यावर नवऱ्याने आणि घरच्यांनी काहीतरी करण्यासाठी पाठिंबा देण्याच्या नादात खूप दडपण आणलं, तर तिचा जीव घाबराघुबरा होऊन जायचा. खूप चिंताक्रांत वाटायचं. आपण त्यांचं ऐकू शकत नाहीये म्हणून खूप अपराधी वाटायचं.

हेही वाचा : सांधा बदलताना : जगण्याचं तत्त्वज्ञान

दुसऱ्यांच्या मनात आपली प्रतिमा चांगली व्हावी म्हणून या व्यक्तिमत्त्व विकारानं पीडित व्यक्ती कोणाच्या कोणत्याच कामाला नाही म्हणत नाहीत. दीपाली इंजिनीअर असल्याचा फायदा घेऊन प्रमोद तिच्याकडून काम करून घ्यायचा. म्हणजे बघा, तिनं बाहेर नोकरीला जायचं नाही, पण याची कामं मात्र करून द्यायची. ती प्रमोदपेक्षा जास्त हुशार होती, त्यामुळं त्याचा फायदाच व्हायचा. पण तिच्यावर मात्र घर सांभाळून, मुलांचा अभ्यास सांभाळून ही कामं करायचा ताण यायचा.

आता ही तर घरातलीच गोष्ट झाली, पण जिथं मुलं स्वत:चा अभ्यास सोडून दुसऱ्यांच्या नोट्स पूर्ण करत बसतात, गर्लफ्रेंडसाठी आपल्या गरजेच्या गोष्टी कमी करून तिच्या मागण्या पुरवत बसतात, तिथं परिस्थिती अधिक बिकट होऊन बसते. हे वाचताना आपल्याला असं वाटेल की, त्यात काय असतं एवढं? नाही म्हणून मोकळं व्हायचं. करून करून काय करेल ती. पण हीच वृत्ती त्यांच्यात नसल्यामुळं ते सातत्यानं दुसऱ्यांसाठी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आणि स्वत:चं नुकसान करून घेऊन काम करतात.

‘डिपेन्डन्ट व्यक्तिमत्त्व विकारा’च्या व्यक्ती कधीच एकट्या राहू शकत नाहीत. त्यांना सतत सल्ला द्यायला किंवा सोबत करण्यासाठी कोणीतरी त्यांच्या जवळ असणं गरजेचं होऊन बसतं. घरी, कामाच्या ठिकाणी किंवा चक्क पार्टीमध्येसुद्धा त्यांना एकटं वाटू शकतं. प्रमोद कामाच्या संदर्भात बाहेरगावी गेला की, दीपाली तिच्या मैत्रिणींना अक्षरश: गयावया करून घरी बोलावून घ्यायची. त्यामध्ये सहजता नसायची तर ती तिची आत्यंतिक निकड कळायची. कोणी सोबत नसलं की, तिला खूप असहाय वाटायचं. दीपालीच्या बाबतीत तिचा प्रमोदबरोबरचा नातेसंबंध टिकून राहिला होता, पण ‘डिपेन्डन्ट व्यक्तिमत्त्व’ प्रकारातील व्यक्ती या एकटं पडू नये म्हणून एक नातेसंबंध तुटला की लगेच दुसऱ्या नातेसंबंधात जातात. त्यामागे एकटेपणाची भीती असतेच, त्याशिवाय त्यांच्या आयुष्यातील छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे निर्णय घ्यायला कोणीतरी असणं ही त्यांची गरज असते.

या विकाराचं शेवटचं लक्षण असतं, ते म्हणजे एकटेपणाची अवास्तव भीती. आपण आयुष्यात कधीतरी एकटे पडू, मग आपले आयुष्य किती अवघड असेल, याच्या कथा ते मनातल्या मनात रंगवत राहतात. आणि हे खरंच घडणार आहे या कल्पनेनं अस्वस्थ होतात.

आत्तापर्यंत पाहिलेल्या इतर व्यक्तिमत्त्व विकाराप्रमाणे आठपैकी पाच लक्षणं दिसून येत असतील आणि त्या व्यक्तीने वयाची १८ वर्षं पूर्ण केली असतील तरच या विकाराचं निदान केलं जाऊ शकतं पण इतर व्यक्तिमत्त्व विकारांपेक्षा हा विकार वेगळा एवढ्यासाठी आहे, कारण या व्यक्ती उपचार घेण्यासाठी लवकर तयार होतात. त्यांना समुपदेशनातून बरीच मदत मिळते, आत्मविश्वास जर जास्तच कमी असेल तर प्रसंगी औषधोपचारांचाही मर्यादित फायदा होऊ शकतो.

हेही वाचा : आला हिवाळा…

सरतेशेवटी, आपण विविध गुणांचा समुच्चय असलेलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतो. कायम एकटेपणाच्या भीतीने कोणाच्या तरी आवाजात आवाज मिसळून, पुढं पुढं करून तात्पुरता फायदा होऊ शकतो, पण आपण स्वत:साठी कधीच ठाम भूमिका घेतली नाही याचे निश्चितच दु:ख होईल. इथं कवी संदीप खरे म्हणतात ते या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांच्या स्वभावाला खूप चपखल बसतं, ‘मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही.’

trupti. kulshreshtha@gmail. com

(तळटीप या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)

Story img Loader