विनोद मुळ्ये
इंग्रजी नाटककार क्रिस्तोफर मार्लो यांच्या ‘डॉ. फॉस्ट्स’ या नाटकात एका पात्राच्या तोंडी स्वर्ग आणि नरक या मनाच्या अवस्था आहेत, असं वाक्य आहे. या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतील तो खडतर जीवनप्रवासातही आनंदी राहू शकतो. त्यामुळेच सर्व सुखसोयी असूनही असमाधानी आणि दु:खी राहायचं की अभावातही समाधानी आणि आनंदी राहायचं, हे ज्याचं त्यानंच ठरवावं…
अगदी काल-परवाचीच घटना आहे. भाजी कापण्याच्या विळीचा लाकडी पाट तुटला होता म्हणून तो दुरुस्त करण्यासाठी सुताराकडे गेलो होतो. सुतारदादा फारच वयोवृद्ध होते. घराच्या बाहेरच ओसरीवर दुकान थाटलेलं. ते दुकान कमी आणि दारिद्र्याचं प्रदर्शन जास्त वाटत होतं. माझं काम सांगितलं अन् विचारलं, ‘‘काकाजी, कितने पैसे लोगे?’’ (इंदौर हिंदी भाषिक प्रदेशात असल्यामुळे इकडे हिंदीच बोलतात.) माझा प्रश्न ऐकताच सुतारदादा मोठ्यानं हसले अन् म्हणाले, ‘‘अरे, बाबूजी! जो देना है, सो दे दो. मैं रख लुंगा. आप कम दोगे तो दुसरा दे देगा. तकदीर से ज्यादा और समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता है.’’ ते परत तसेच हसले. त्या गरिबीतही मला त्यांच्या हसण्यात समाधान आणि आनंदाचा धबधबा कोसळताना दिसला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी भांडी घासणाऱ्या आजीबाई नेहमीप्रमाणे घरी आल्या. आजीबाईंचं वय आहे सत्तरच्या वरती, शरीरानं अगदी किडूकमिडूक आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं. असं असूनही शरीराने मात्र अगदी काटक. रपरप चालतात, पटकन खाली बसतात आणि पटकन उठतातही. घरी ‘अठरा विशे दारिद्र्य’ आणि नेहमी काही ना काही संकटं. मी विचारच करत बसलो, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ की नको देऊ? तेवढ्यात त्याच चटकन म्हणाल्या, ‘‘दादा, दिवाळीचा, नया सालचा नमस्कार’’ (मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बऱ्हाणपूर सीमेलगत असंच अर्ध हिंदी-अर्ध मराठी चालतं.) आणि खळाळून हसल्या, अगदी उन्मुक्तपणे. एखाद्या अल्लड नदीसारख्या. अशा विपरीत परिस्थितीतही त्यांचं ते दात नसल्यामुळे बोळकं झालेल्या तोंडातून निघालेलं ‘हास्य’ अजूनही डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं आहे.
असंच एक दिवस संध्याकाळी बँक सुटल्यावर स्कूटरवरून घरी परतत होतो. चौरस्त्यावर लाल दिवा असल्यामुळे थांबलो होतो. आधी मी एकटाच होतो. पण लगेचच माझ्या डावी-उजवीकडे भारदस्त मोटारी येऊन थांबल्या. लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याची माझी जुनी खोड असल्यामुळे मोटारीत बसलेल्यांचे भाव टिपू लागलो. डावीकडच्या मोटारीतील मागे बसलेला कुणी मोठा असामी वाटत होता. महागड्या मोबाइलवर तो आपल्या मॅनेजरला रागावत होता. ‘‘शर्माजी, ओ टेंडर अपने हात से गया ही कैसे? दस करोड का टेंडर था वो. आप को मैं तनखा किस बात की दे रहा हूं?’’, असं म्हणून, नाही रागानं ओरडूनच, त्याने मोबाइल बंद केला. उजवीकडे बघितलं. लाल दिवा केव्हा पिवळा आणि मग हिरवा होतोय याची वाट बघत बसलेले गृहस्थ स्टिअरिंगवरचा उजवा हात जरा मोकळा करून बोटांवरच काही आकडेमोड करत होते. बहुतेक ‘निंन्यानव के फेर’मध्ये असावे. इतक्यात माझ्यामागून हसण्याचा आवाज आला. मागे वळून बघितलं. अगदी गंजलेल्या आणि जुन्या सायकलीवर एक गवंडी येऊन थांबला. मागे एक स्त्री बसली होती, बहुतेक त्याची बायको असावी. हातात दोन खणी जेवणाचा डबा होता. एक चिमुकली असेल तीन/चार वर्षांची. पुढे सायकलच्या दांड्यावर बसली होती. दिवसभर मातीत खेळून फाटका फ्रॉक आणि संपूर्ण शरीर मळलं होतं. आसपास मोठमोठ्या चकचकीत गाड्या बघून त्या चिमुकलीनं तोंडानेच आवाज काढला, ‘पी s s पी s s, भुर्र s s’आणि खळाळून हसली, अन् तिच्याबरोबर तिचे आई-बाबाही. आपण कुठे आणि कसे आहोत याचं भान न ठेवता.
आमची बँकेची शाखा मोठी असल्यामुळे तिथे उपमहाव्यवस्थापक बसायचे. स्वीय सहायक पदावर असल्यामुळे मी त्यांच्या जवळच असायचो. त्यामुळे ते मला त्यांची सुख-दु:खं सांगून मन हलकं करत. बँकेत वेगवेगळी कर्जं मिळत. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांनी सर्व कर्जं घेतली होती आणि तरीही त्यांना नेहमी पैशांची चणचणच भासत असे. ते नेहमी असमाधानीच असायचे.
तो पावसाळ्यातील रविवारचा दिवस होता. मोकळ्या हवेत फिरण्याच्या दृष्टीनं सायकलवरून शहरापासून जरा लांब गेलो होतो. आकाशात एकदम ढग दाटून आले आणि पाऊसही पडू लागला. मी कुठे तरी निवारा शोधू लागलो. शहराबाहेरील जागा असल्यामुळे रस्त्यालगत एक घर इथं तर दुसरं तिथं होतं. पण जवळच एक झोपडीवजा दुकान दिसलं. पटकन सायकल तिथे थांबवली आणि डोकं भिजू नये या हेतूनं अंग चोरून दुकानात एका कोपऱ्यात उभा राहिलो. पुढे पडवी होती आणि मागे एकाच खोलीत संसार थाटला होता. त्या पडवीतच पन्नाशीच्या जवळपास असलेल्या त्या माणसानं चप्पल, बूट दुरुस्त करण्याचं दुकान थाटलं होतं. लाल-काळ्या पॉलिशच्या दोन-तीन डब्या, ब्रश आणि चपला शिवण्याचं साहित्य इतकंच काय ते तिथं होतं.
मी उभा राहिलो तोच एक-दोन दुसरी माणसंही निवाऱ्याला आली. मला वाटलं, त्या माणसाला आमचं तिथे उभं राहणं आवडणार नाही. पण झालं उलटच. तो आम्हाला मोकळेपणानं म्हणाला, ‘‘बाबूजी, अंदर आ जाओ. भीग जाओगे.’’ पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. अशातच अजून पाच-सहा माणसं येऊन दाटवाटीनं उभी राहिली. तिथे आता जागाच उरली नव्हती. दुकानदाराच्या हे लक्षात आलं. तो परत म्हणाला, ‘‘अब मैं दुकानही समेट लेता हूं. बारीश में अब वैसे भी कौन आएगा? तुम्हालाही व्यवस्थित उभं राहता येईल.’’
त्या अगदी साधारण माणसाच्या मनाचा हा ‘मोठेपणा’ आणि ‘समाधानी वृत्ती’ बघून मला माझा एक चुलत भाऊ आणि त्याची बायको आठवल्याशिवाय राहिले नाही. काही दिवसांपूर्वी मी आणि बायको मुलीकडे अमेरिकेला गेलो होतो. त्याच सुमारास न्यूयॉर्कला अनेक वर्षांपासून स्थायिक झालेल्या त्या चुलत भावाकडे दोन दिवस राहायला म्हणून गेलो. त्याचं भलं मोठं बैठं घर न्यूयॉर्क शहराच्या एका सधन वस्तीत होतं. पुढे ‘लँड स्केपिंग’ केलेली अगदी विस्तीर्ण जागा, मागे स्वीमिंग पूल असलेलं ‘बॅक यार्ड’, त्यात ‘बार्बेक्यू’करता वेगळी जागा, एका कोपऱ्यात ‘फायर प्लेस’ आणि घरात अमेरिकेसारख्या धनाढ्य/प्रगत देशाला साजेशा सर्व सुखसोयी होत्या. पण ‘स्वर्गासम’ त्या घरात ‘स्वर्ग’ (समाधान आणि आनंद) मात्र नव्हता. माझा भाऊ आणि त्याची बायको पदोपदी आणि क्षणोक्षणी या ना त्या कारणानं वाद घालत होती. आनंद नव्हताच त्या घरात.
कधीही आणि कुठेही वरील सर्व प्रसंग आठवतात आणि माझं मन एकदम ५० वर्षांपूर्वी माझ्या विद्यार्थी जीवनात जातं. त्या वेळी मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी होतो. आम्हाला इंग्रज नाटककार क्रिस्तोफर मार्लो यांचं १५९२-९३च्या सुमारास लिहिलेलं नाटक ‘डॉ. फॉस्ट्स’ अभ्यासक्रमात होतं. या नाटकात ‘मेफिस्टोफिलीस’ हे एक पात्र आहे. त्याचं एक वाक्य अजूनही मला जसंच्या तसं आठवतं. तो म्हणतो, ‘‘हेवन ऑर हेल? इज ए स्टेट ऑफ माईंड. इट कॅन मेक हेवन, हेल अँड हेल, हेवन.’’ किती खरं आहे. नाही का? ‘स्वर्ग’ (आनंद किंवा समाधान) आणि ‘नरक’ (दु:ख किंवा असमाधान) आमच्या ‘मानसिक आरोग्या’वरच अवलंबून असतात. मानलं तर आम्ही अभावातही समाधानी व आनंदी राहू शकतो. अगदी त्या सुतारदादांप्रमाणे. माझ्या घरी येणाऱ्या त्या आजीबाईंप्रमाणे किंवा त्या चिमुकली आणि तिच्या आई-बाबांप्रमाणे.
नाही तर त्या मोटारीत बसलेल्या श्रीमंत माणसाप्रमाणे किंवा माझ्या त्या उच्चपदविभूषित बँकेच्या अधिकाऱ्याप्रमाणे अगदी खायला-ल्यायला मुबलक असलं, तरी ‘असमाधानी’ किंवा ‘दु:खी’ राहू शकतो.
हा लेख लिहिताना मला अगदी माझ्याच घरातील घटना नमूद करण्याचा मोह आवरता येत नाहीये. माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचं लग्न १९५५ मध्ये झालं होतं. एक वर्षाच्या आतच माझ्या आई-बाबांच्या लक्षात आलं की तिच्या नवऱ्याचं लक्ष मुळी संसारात नाहीच. म्हणून त्यांनी खटपट करून माझ्या बहिणीला आदिवासी भागात शिक्षिकेची नोकरी मिळवून दिली अन् तिचा खडतर जीवन प्रवास सुरू झाला. त्या काळात, म्हणजे सुमारे ६५-७० वर्षांपूर्वी मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवरील आदिवासी भाग फारच मागासलेला होता. रस्ते, पाणी आणि वीज कुठेच नसायची आणि चोऱ्या, मारामारी व खून अगदी सामान्य बाबी होत्या. त्यात तिला काही अपत्यही नव्हतं. पण तिनं कधीही जीवनाविषयी तक्रार केली नाही आणि सदैव आनंदी राहिली. तिला गायनाची आवड होती. कुणीही तिला गाणं म्हणायला सांगितलं की ती ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजां’ची एकच कविता म्हणायची, ‘‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या…’’ तिचं गाणं संपलं की, ऐकणारा तिचं अगदी तोंड भरून कौतुक करायचा, पण आमचं काळीज मात्र तुटायचं आणि आमचे डोळे पाणावल्याशिवाय राहात नसत, कारण आम्हाला माहीत होतं तिला कोणतं ‘सुख’ मिळालं ते.
खडतर जीवनप्रवासातही अत्यंत ‘समाधान’ आणि ‘आनंद’ मानणारी माझी बहीण अजूनही मला दीपस्तंभासारखीच वाटते. तिचं ‘सौख्य’ बघून खरंच इंद्रदेवही नक्कीच लाजत असेल.
एकूण काय तर सर्व सुखसोयी असूनही असमाधानी आणि दु:खी राहायचं की अभावातही समाधानी आणि आनंदी राहायचं, हे ज्याचं त्यालाच ठरवायचं आहे.
vinoddmuley@gmail.com