शर्मिला पुराणिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मधली पिढी म्हणजे ज्यांना घरातल्या वरिष्ठांचंही करायला लागतं आणि कनिष्ठांचंही. अनेकदा हे वरिष्ठ आपल्या वय होत चाललेल्या मुला-सुनेकडून अनेक अवाजवी कामांची अपेक्षा करतात, तर कनिष्ठांची पिढीही आई-वडिलांकडून तीच अपेक्षा करते. यामुळे कोंडी होते ती मधल्या पिढीची. काय करायला हवं स्वत:ची कोंडी फोडण्यासाठी या मधल्या पिढीने?
प्रसंग १-
मी मैत्रीण सुषमाकडे तिला नात झाली म्हणून बघायला गेले होते. ती खूप दमलेली दिसत होती. तिच्या नातीला पाहिलं, तिच्याशी खेळले, मग बाळाला भूक लागली म्हणून तिची आई तिला आत घेऊन गेली. तेवढय़ात सुषमा आमच्यासाठी कॉफी घेऊन आली, म्हणाली, ‘‘मी या सासूबाईंच्या अपेक्षांनी दमून गेले आहे. मला नात झाली त्याच्या काही दिवस आधी माझी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली. तरी नातीचं सगळं काही मी करते आहे, मुलीचं बाळंतपणही नीट करते आहे. अगदी आता मी आहे, त्याच वयाच्या माझ्या सासूबाई असताना त्यांचंही हेच ऑपरेशन झालं होतं.. तेव्हा मी त्यांचंही सगळं काही करत होते. तेव्हा कधी थोडा वेळ माझ्या मुलीला- म्हणजे त्यांच्या नातीला घ्याम्हटलं, तर म्हणायच्या, ‘माझं आताच ऑपरेशनझालंय. मला नाही झेपत.’ पण आजही मला काही त्रास होत असेल तर ना त्या समजून घेत ना मुलगी. त्यांच्याशी कसं वागावं, हेच कळत नाही!’’
प्रसंग २-
आमचा मित्र अजय मला फोनवर सांगत होता, ‘‘अगं, जरा माझ्या आईला समजाव ना एकदा, की डायपर वापर म्हणून. आता ऐंशी वर्षांची आहे ती. मला कळतंय, की तिला कधी कधी लघवीवर ताबा राहात नाही. पण मग डायपरघालावा ना.. कुठेही पटकन लघवी करते. मी तिचा मुलगा आहे म्हणून समजून घेतो. माझी बायको पूनम खूप समजूतदार आहे. माझी आई म्हणून ती काही बोलत नाही गं! पण तिला हे सगळं सहन करावं लागतं. तिला कधी कधी खूप त्रास होतो. मग, थोडा वेळ आम्ही दोघं घराबाहेर जातो आणि सोसायटीच्या बागेत बसतो. परत घरी गेलो, की आईची पूनमच्यानावानं भुणभुण सुरू होते, ‘काय सारखी मध्ये मध्ये भटकायला जातेस? कुठे गायब होतेस?’ मग त्यावर पूनमची चिडचिड; पण आईनंडायपर वापरला तर किती तरी प्रश्न सुटतील. आई काही केल्या ऐकतच नाही.. प्लीज, तू सांगून बघतेस का एकदा आईला.’’
प्रसंग ३-
सकाळी चालण्याच्या वेळी दोन मैत्रिणी गप्पा मारत होत्या. एक मैत्रीण दुसरीला म्हणाली, ‘‘तुझं बरं गं बाई, तुझा मुलगा परदेशी राहतो. मुलगा, नातवंडं चार-आठ दिवस येतात. त्यांचं, नातवंडांचं कौतुक केलं, की मग तू मोकळी. माझा मुलगा-सून अगदी आमच्या घराजवळच राहतात. सून तसं खूप काही खूप करिअर वगैरे करत नाही; पण नातवाला सांभाळण्यासाठी आम्हाला गृहीतच धरते.. कधी शाळेतून आणा, क्लासला सोडा.. कधी मुलांना पार्टीलाजायचं झालं, तर मुलगा अचानक फोन करून करून नातवाला राहायला पाठवतो. आमचे एक नातेवाईक म्हणतात, या वयात तुम्ही परत आई-बाबा झालायत असंच वाटतं! तुम्ही जबाबदाऱ्या कमी करायच्या ऐवजी वाढवताच की!’’
प्रसंग ४-
माझा वृत्तपत्रातला एक लेख वाचून माझ्याकॉलेजमधल्या मैत्रिणीचा फोन आला. ‘‘आताच आले ऑफिसमधून. छान लेख लिहिलायस गं! पण म्हटलं, आज शनिवार संध्याकाळ. तुला आजच फोन करावा आणि अभिप्राय कळवावा. नाही तर माझी ही वेळ अमेरिकेतल्या मुलीशी बोलण्याची असते. त्या वेळी मी इतर कोणाशी बोलत नाही; पण शनिवार-रविवार मी तिला फोन करत नाही आणि तिलाही सांगते, तूपण नको करू.. तुमचा वीकेंड ना, मी नाही तुम्हाला त्रास देणार. आठवडाभर कामात असता, घ्या तुम्ही विश्रांती!’’
वर नमूद केलेल्या चारही प्रसंगांवरून असं लक्षात येतं, की ही तक्रार करणारी मंडळी साधारण पन्नास ते पासष्ट वयोगटातली आहेत. त्यांना घरातल्या त्यांच्यापेक्षा वरिष्ठ लोकांचं करताना त्रास होतोय. त्याचबरोबरीने घरातले कनिष्ठ अर्थात मुलाबाळांच्या अपेक्षा पूर्ण करता करता ते थकून जात आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुर्मान वाढलं आहे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे नवी पिढी व्यग्र झाली आहे. त्यामुळे या मधल्या पिढीला अनेक आघाडय़ांवर एका वेळी लढायला लागतंय. आपल्यापेक्षा मोठे म्हणून त्यांचा ज्येष्ठांचा मान राखणं, त्यांचं औषधपाणी, रुग्णालय, पथ्य, पेन्शनची कामं, बँकेची कामं, त्यांचं मनोरंजन, त्यांना नातेवाईकांकडे घेऊन जाणं किंवा त्यांना भेटायला आलेल्या लोकांसाठी वेळ काढून काही करणं करावं लागतंय, तर दुसरीकडे आपल्या मुलांनाही मदत करणं, त्यांचं करिअर चांगलं व्हावं म्हणून त्यांचं मूल सांभाळणं, त्यांच्या ऑफिसच्या वेळा पाहून आपल्या गोष्टी ठरवणं.
सून किंवा मुलगी यांचंबिझीरूटीन म्हणून त्यांचं घर सांभाळणं. त्यांना त्यांच्या मुलांना वेळ देता येत नाही, त्याची भरपाईसुद्धा आपणच करणं. नातवंडांनी घरचं खावं म्हणून त्यांच्या आवडीचे पदार्थ घरी करणं. घरातल्या तरुण पिढीचं ‘डाएट’ सांभाळणं, घरातील छोटी-मोठी कामं करणं करावं लागतंय आणि कामांची ही यादी संपतच नाही. हे सगळं करताना मधल्या पिढीची दमछाक होते. मधल्या पिढीची ज्येष्ठांबरोबर वागताना अशी मानसिकता असते, की ‘यांची आता वयं झाली आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी कष्ट केलेत. मोठय़ांना उलट बोलू नये, त्यांचा अपमान करू नये. त्यांचे आता कितीसे दिवस राहिलेत?..’ काही ठिकाणी हेही दिसून येतं, की पंचाहत्तरीउलटलेले लोक या मध्यम वयातल्या लोकांच्या वयाची, त्रासांची अजिबातच दखल घेत नाहीत. जो समजूतदारपणा त्यांनी पुढच्या पिढीत रुजवला, तो त्या पिढीशी वागताना ते का वापरू शकत नाहीत? त्यांच्या वयामुळे त्यांच्यातला विवेक गेला असेल का? की वयामुळे ते आत्मकेंद्री तर होत नाहीत ना?असा प्रश्न पडतो.
खूप ठिकाणी मध्यम वयाची पिढी संयम आणि समजूतदारपणा दाखवून तरुण पिढीला, आपल्या मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देऊन करिअर, जोडीदार, त्यांचं राहायचं ठिकाण निवडण्याची मुभा देत आहेत, त्यांची ‘प्रायव्हसी’ जपत आहेत. तसंच, त्यांच्या संपर्कात राहाता यावं, त्यांचं काय चाललंय ते कळावं, म्हणून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, मोबाइल, कॉम्प्युटरसारखी साधनं वापरून, समाजमाध्यमं हाताळून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत; पण कधी कधी त्यामुळे तरुण मंडळींना ती पालकांची लुडबुड वाटते.
मधल्या पिढीतले काही मोजकेच लोक असे दिसतात, की ज्यांच्यावर ज्येष्ठांची जबाबदारी नाही किंवा काही ना काही कारणानं मुलांची किंवा नातवंडांची जबाबदारी नाही; पण असे लोकही आपल्या वयाच्या इतर लोकांच्या समस्या समजून घेताना दिसत नाहीत. उलट ‘तुम्ही फार अडकून पडता या सगळय़ात..’ अशी इतरांची चेष्टा करताना दिसतात किंवा ‘मोकळे व्हा सगळय़ातून,’ असा आग्रहसुद्धा धरतात.
माझी एक मैत्रीण तिच्या आईला सांभाळते, मुलीच्या करिअरसाठी‘सपोर्ट’ व्हावा म्हणून नातीला सांभाळते. ती नेहमी म्हणते, ‘‘आपली पिढी म्हणजे जात्यातलेही आम्ही आणि सुपातलेही आम्हीच!’’
या मधल्या पिढीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते, की यातल्या स्रियांना जास्त कसरत करावी लागते आणि याच वयातले पुरुष मात्र बऱ्याच वेळेला थोडी तटस्थ भूमिका घेतात. शिवाय ते आपल्या बायकोला, बहिणीला किंवा वहिनीला सहज सांगून जातात की, ‘नको लक्ष देऊ! हे तुला आता माहीतच आहे ना? मोठी माणसं अशीच वागणार!’ किंवा त्यांचीच मुलं बेजबाबदारपणे वागली, तरी घरातल्या स्त्रीलाच दोष देतात की, ‘तूच सवयी लावल्यास या! मग आता काय अपेक्षा करतेस?’ इथे पुरुषांनीही आपल्या बरोबरीच्या स्त्रियांना समजून घेऊन सहकार्य करणं गरजेचं आहे.
या मधल्या पिढीतील लोकांचा त्रास कमी करण्यासाठी काय काय करता येईल?.. तर दोन्ही पिढय़ांनी एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत मोकळा संवाद वेळेवर साधायला हवा. मला काय करायला जमेल आणि काय जमणार नाही, याचं आत्मपरीक्षण करून ते आधीच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. योग्य वेळी स्वत:साठी ‘नाही’ म्हणणंही जमवलं पाहिजे. मोठय़ांना किंवा लहानांना मदत करता आली नाही किंवा त्यांना आनंदी ठेवता आलं नाही, तर अपराधीपणाची जाणीव न ठेवता काही गोष्टी आपल्यालाही वयानुसार करता किंवा बदलता येणार नाहीत हे स्वीकारलं पाहिजे.
जर प्रत्येक पिढीनंदुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्या त्या पिढीच्या समस्या समजून घेऊन त्यानुसार स्वत:मध्ये विचारपूर्वक काही बदल केले, तसंच प्रत्येक पिढीनं आपल्या वागण्या- बोलण्यातलं तारतम्य जाणीवपूर्वक जपलं, तर प्रत्येकच पिढीच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतील आणि ‘सुपातले जात्यात’ जाताना तो बदल सगळय़ांसाठीच सुसह्य होईल.
(लेखिका समुपदेशक आणि वकील आहेत.)
25.sharmila@gmail.com